घरसंपादकीयओपेडजगाच्या नकाशावरील धार्मिक पर्यटनाचे अयोध्या मॉडेल!

जगाच्या नकाशावरील धार्मिक पर्यटनाचे अयोध्या मॉडेल!

Subscribe

आगामी काही वर्षांतच अयोध्येतील भव्य राम मंदिर देश आणि जगाच्या नकाशावर धार्मिक पर्यटनाचे भव्यदिव्य केंद्र म्हणून विकसित होणार आहे. अयोध्या धाममध्ये रेल्वे, रस्ते, विमानतळ, हॉटेल, वाहतूक, पायाभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. राम मंदिर उभारणी प्रकल्प सर्वच राज्यकर्त्यांसाठी आदर्श वस्तुपाठ ठरला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून केल्या जात असलेल्या सुमारे ८५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अयोध्येचा मेकओव्हर केला जात आहे. सध्या अयोध्येत ५९० खोल्यांची क्षमता असलेली केवळ १७ हॉटेल्स आहेत, तर ७३ नवीन हॉटेल्स निर्माणाधीन आहेत. यामध्ये ताज, आयएचसीएल, एचटीसी, मेरियट इंटरनॅशनलसारख्या मोठ्या ग्रुपचा समावेश आहे. भारतासह जगभरातून येथे येणार्‍या पर्यटकांना जुन्या नगराच्या परिवर्तनाचे नवे अयोध्या मॉडेल साकारलेले दिसणार आहे. हीच नव्या भारताची नवी ओळख असणार आहे.

अयोध्येतील न भूतो न भविष्यती असा रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या भारतवर्षाने याची देही याची डोळा अनुभवला. भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. यावेळी मंदिर परिसरात विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. तब्बल ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होताच देशभरातील रामभक्तांनी दिवाळी साजरी केली. एकामेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला. अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरात देवदेवतेची प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही, अशी भूूमिका चारही शंकराचार्यांनी घेतली.

आगामी निवडणुकीत राजकीय लाभ मिळावा म्हणून प्राणप्रतिष्ठा विधी घाईघाईने उरकला जात असल्याचा आरोपही शंकराचार्यांनी केला. त्यावर मुख्य राम मंदिर आणि गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून केवळ पहिल्या मजल्यावरील राम दरबाराचे काम शिल्लक असल्याचा खुलासा राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी केला. तज्ज्ञांच्या मते राम मंदिर परिसरातील उर्वरित २० ते ३० टक्के बांधकाम पूर्ण व्हायला आणखी २ ते ३ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

केवळ राम मंदिरच नाही, तर सध्याच्या घडीला संपूर्ण अयोध्या नगरीला नवा साज चढत आहे. जुने एक मजली, दुमजली वाडे, दगड-माती-चुन्याने बांधलेली कौलारू घरे पाडून त्या जागी नव्या इमारती आकाशाच्या दिशेने सरकू लागल्या आहेत. खरे तर २०१९ मध्ये राम मंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच मंदिराभोवतीच्या जमिनींचे दर वाढू लागले होते. आतापर्यंत अयोध्येतील जमिनींच्या किमतीत किमान २५ ते ३० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आगामी काळात अयोध्येत विशेषत: राम मंदिराच्या आसपासच्या परिसरातील जमिनीचे दर आणखी वाढणार आहेत. ५ वर्षांपूर्वी अयोध्येत ज्या दराने जमीन मिळत होती, त्यात दिवसागणिक वाढ होत आहे. ५ वर्षांपूर्वी ज्या जमिनीची किंमत ३५ लाख रुपये होती, त्या जमिनीची किंमत आजघडीला १ कोटीहून अधिक झाली आहे.

८ ते १० लाख रुपयांना विकली जाणारी जमीन २० ते २५ लाखांना विकली जात आहे. अयोध्येत नवी निवासी संकुले, हॉटेल, व्यावसायिक इमारती उभारण्यासाठी जमिनींचे व्यवहार तेजीत आहेत. विशेषकरून स्थानिकांपेक्षा बाहेरून येणारे उद्योजक आणि गुंतवणूकदार अयोध्येतील जमिनी विकत घेण्यात सर्वाधिक रस दाखवत आहेत. लोढा ग्रुप, ताज ग्रुप, हैदराबाद ग्रुप, तिरुपती बालाजी ग्रुप हॉटेल इंडस्ट्री आणि टाऊनशिपमध्ये गुंतवणूक करत आहेत. लोढा ग्रुपने राम मंदिरापासून अंदाजे ७ किलोमीटर अंतरावर २५ एकर जमीन खरेदी करून त्यावर टाऊनशीपचे बांधकाम सुरू केले आहे. एवढेच नाही, तर देशभरातील धर्मस्थळांनाही अयोध्या भुरळ घालत आहे. दक्षिण भारतातली उत्तराधी मठानेही येथे १३ हजार चौरस फूट जमीन खरेदी करून बांधकाम सुरू केले आहे.चांगला मोबदला मिळत असल्याने ४ ते ५ वर्षांपूर्वी जमिनी विकलेल्या स्थानिकांवर आता पश्चातापाची वेळ आली आहे.

- Advertisement -

अयोध्या नगरीपासून १० किमी अंतरावर असलेल्या शेत जमिनींना ५ वर्षांपूर्वी एकरी २० ते २५ लाखांचा दर मिळत होता. आता या शेतजमिनी एकरी ८० ते ८५ लाखांना, तर काही १ कोटीच्याही पुढे विकल्या जात आहेत. २०१९ मध्ये सुमारे ५ हजार चौरस फुटांच्या एका व्यावसायिक मालमत्तेचा दर ४५०० रुपये प्रति चौरस फूट म्हणजे २ कोटी २५ लाख होता. आज याच व्यावसायिक मालमत्तेचा दर ५ कोटींच्या पुढे गेला आहे. पूर्वी जी जागा दीड ते २ हजार चौरस फुटांना विकली जात होती, तीच जागा आता प्रति चौ.फूट ५ हजारांच्या पुढे विकली जात आहे. अयोध्येतील मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान जिल्ह्यात १३ हजार ५४२ मालमत्तांची नोंदणी झाली होती. राम मंदिराच्या निर्णयानंतर २०२१ मध्ये २२ हजार ४७८, तर २०२२ मध्ये २९ हजार मालमत्तांची नोंदणी झाली. त्यानुसार गेल्या ५ वर्षांमध्ये अयोध्येत मालमत्तांच्या नोंदणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे.

आगामी काही वर्षांतच अयोध्येतील भव्य राम मंदिर देश आणि जगाच्या नकाशावर धार्मिक पर्यटनाचे भव्यदिव्य केंद्र म्हणून विकसित होणार आहे. अयोध्या धाममध्ये रेल्वे, रस्ते, विमानतळ, हॉटेल, वाहतूक, पायाभूत सुविधेसह सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. राम मंदिर उभारणी प्रकल्प सर्वच राज्यकर्त्यांसाठी आदर्श वस्तुपाठ ठरला आहे. आज केंद्रातील नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून केल्या जात असलेल्या सुमारे ८५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अयोध्येचा मेकओव्हर केला जात आहे.

एक प्राचीन धर्मस्थळ ते धार्मिक पर्यटनाचे अत्याधुनिक केंद्र असा या अयोध्यानगरीचा प्रवास सुरू झाला आहे. कधी काळी अयोध्या नगरी १२ योजने (एक योजन-१२ किमी) लांब आणि ३ योजने रुंद होती. अयोध्या विकास प्राधिकरणाने अयोध्या महायोजना २०३१ नावाचा मास्टर प्लान तयार केला आहे. या प्लाननुसार जिल्ह्यातील १३३ चौरस किलोमीटर मुख्य नियोजित शहर क्षेत्र आणि ३१.५ चौरस किमी क्षेत्र विकसित होत आहे. येथे उत्तर प्रदेश सरकारचे २६ विभाग सुमारे ३० हजार कोटींच्या १८७ प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात व्यग्र आहेत. त्यामध्ये शहर विकास विभागाकडून सर्वाधिक ५४, नगरविकास विभाग ३५ आणि पर्यटन विभागाकडून २४ प्रकल्प अयोध्येत सध्याच्या घडीला सुरू आहेत.

२०१७ मध्ये अयोध्येत केवळ २.८४ लाख पर्यटक आले होते. त्याच अयोध्येत २०२१ मध्ये ३ लाख २५ हजार, २०२२ मध्ये २ कोटी ३९ लाख आणि गेल्या वर्षअखेर सुमारे २ कोटी ५० लाख पर्यटकांनी भेट दिली. आता राम मंदिर लोकार्पणानंतर भाविकांचा किंबहुना पर्यटकांचा ओघ दुपटी/तिपटीने वाढण्याचा अंदाज आहे. २०२५ पर्यंत सुमारे ५ कोटी पर्यटक अयोध्येला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा अर्थातच हॉटेल्स, एअरलाईन्स, हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी, ट्रॅव्हल यासह सर्व क्षेत्रांना फायदा होणार आहे. कधीतरी प्रभू येशूचे जन्मस्थान बघण्यासाठी जेरूसलेमला जावे, अशी ख्रिश्चनधर्मीयांची श्रद्धा असते. मुस्लीम धर्मीय आयुष्यात एकदा तरी मक्का, मदिनेला जाण्याचा पण पूर्ण करतात, तसेच कदाचित भविष्यात हिंदू धर्मीय एकदा तरी रामलल्लाचे दर्शन घ्यायला अयोध्येत आल्यास नवल वाटायला नको.

त्याच अनुषंगाने भविष्याचा वेध घेत अयोध्येत पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. सध्या अयोध्येत ५९० खोल्यांची क्षमता असलेली केवळ १७ हॉटेल्स आहेत, तर ७३ नवीन हॉटेल्स निर्माणाधीन आहेत. यामध्ये ताज, आयएचसीएल, एचटीसी, मेरियट इंटरनॅशनलसारख्या मोठ्या ग्रुपचा समावेश आहे. किमान ४० हॉटेल्स २०२७ पर्यंत कार्यान्वित होतील, असा अंदाज आहे.

१४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अयोध्येतील ऋषी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फेज-१ कार्यान्वित झाला आहे. १० लाख प्रवासी हाताळू शकेल इतकी या विमानतळाची क्षमता आहे. २०२५ पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता वाढून ६० लाख प्रवाशांपर्यंत जाईल. इंडिगोने दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई येथून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाने बंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली येथून थेट उड्डाणे जाहीर केली आहेत. स्पाईसजेट आणि आकासा एअरनेही अनेक मार्गांवरून अयोध्येला थेट विमानसेवा जाहीर केली आहे.

अयोध्याधाम रेल्वे जंक्शनमुळे अयोध्या नगरी देशाच्या वाहतूक नकाशाशी जोडली गेली आहे. या रेल्वे स्थानकाची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. या माध्यमातून इथून दररोज ६० हजार प्रवासी प्रवास करू शकतील. आयआरसीटीसीने अयोध्येसाठी टूर पॅकेज जाहीर केले आहे. राम मंदिराच्या दिशेने जाणारे प्रशस्त मार्ग, चौपदरीकरण झालेले रस्ते यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारली जात आहे. भारतासह जगभरातून येथे येणार्‍या पर्यटकांना जुन्या नगराच्या परिवर्तनाचे नवे अयोध्या मॉडेल साकारलेले दिसणार आहे. हीच नव्या भारताची नवी ओळख असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -