घरसंपादकीयओपेडनद्या, नाल्यांचे प्रदूषण रोखले तरच सफाईला अर्थ!

नद्या, नाल्यांचे प्रदूषण रोखले तरच सफाईला अर्थ!

Subscribe

दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबईतील नद्या आणि नाले हे स्वच्छ झालेले कधी पाहायला मिळत नाहीत. नद्या आणि नाले स्वच्छ राहण्यासाठी यामध्ये होणारे प्रदूषण सर्वात आधी रोखणे गरजेचे आहे. नद्या आणि नाल्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनाच करण्यात आल्या नाहीत तर कितीही प्रमाणात साफसफाईसाठी खर्च करण्यात आला तरी वारंवार होणार्‍या प्रदूषणामुळे तेथील अस्वच्छता काही दूर होणार नाही. त्यामुळे नद्या, नाल्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. तेव्हाच खर्‍या अर्थाने त्यांची साफसफाई होईल. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. मुंबईतील नद्या, नाल्यांना मिळालेले गटारगंगेचे स्वरूप बदलणार तरी कधी? कचरा आणि निर्माल्याबाबत महापालिकेने प्रयत्न केले आहेत. तसेच नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. हे सांडपाणी मलनि:सारण केंद्राकडे वळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी नद्या आणि नालेसफाईचे काम केले जाते. उन्हाळ्याला सुरुवात झाली की, मुंबईतील नद्या आणि नालेसफाईच्या कामांना वेग येतो. यंदाही पावसाळा पूर्वतयारी म्हणून महापालिका प्रशानसनाच्या वतीने हे काम वेगाने करण्यात येत असून आतापर्यंत जवळपास ५० टक्के मोहीम महापालिकेने फत्तेही केली आहे.

आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टनाहून अधिक गाळ नद्या, नाल्यांमधून काढण्यात आला असून एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. नद्या आणि नालेसफाईचे काम महापालिका प्रशासनाकडून कदाचित हे काम वेळेत किंवा वेळेआधीही पूर्ण होईल, परंतु ज्या उद्देशाने हे काम करण्यात येत आहे, तो उद्देश सफल होईल का, याची मात्र शाश्वती देता येत नाही. कारण मुंबईतील नद्या, नालेसफाईंची कामे काही यंदाच होताहेत, असे नाही.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत नद्या, नालेसफाईंची कामे प्राधान्याने महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतात, परंतु अधिक पाऊस शहरात झाल्यानंतर मुंबईची तुंबई होणे काही थांबत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकरांच्या गाठीशी हाच अनुभव कायम आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च नद्या आणि नालेसफाईसाठी केल्यानंतरही पावसाळ्यात मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जाणारच असेल, तर दरवर्षी इतका खर्च का करावा, असा प्रश्न मुंबईकरांना पडल्याशिवाय राहत नाही.

शिवाय नद्या आणि नालेसफाईच्या कामात होणार्‍या आर्थिक गैरव्यवहारांबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमधील होणार्‍या आरोप-प्रत्योरापांच्या फैरीमुळे नद्या, नालेसफाईतील गाळापेक्षा भ्रष्टाचाराचाच दुर्गंध शहरात अधिक पसरतो. उदाहरण घ्यायचेच झाल्यास मिठी नदीच्या सफाईचे घेता येईल. मिठी नदीच्या सफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याबाबत विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याचा निर्णय अलीकडेच राज्य सरकारने घेतला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मिठी नदीच्या साफसफाईचा मुद्दा उपस्थित केला.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून मिठी नदीच्या सफाईचे काम सुरू असून यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत, मात्र ज्याप्रमाणात खर्च झाला त्या तुलनेत साफसफाई झाल्याचे पाहायला मिळत नाही. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सभागृहात लावून धरल्यानंतर याबाबत एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. एसआयटी चौकशीतून आर्थिक भ्रष्टाचाराच्या रहस्याचा उलगडा होईल की नाही, हे आत्ताच सांगणे कठीण आहे, परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिठी नदीच्या सफाईबाबतचा जो मुद्दा उपस्थित करण्यात आला, त्यावर खरेच विचार होणे गरजेचे आहे.

केवळ मिठी नदीच नाही, तर मुंबईतील इतर नद्या आणि नालेसफाईबाबत इतक्या वर्षात कोट्यवधींचा खर्च करूनही मुंबईतील नद्या कधीच पूर्णपणे स्वच्छ आणि नाल्यांची योग्यरित्या सफाई झाल्याचे पाहायला मिळत नाही. असे का होते, याचे उत्तर मुंबईकरांना कोण देणार? आणखी किती वर्षे हाच सिलसिला सुरू राहणार? साफसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वर्षानुवर्षे यात खर्ची घालायचे, परंतु त्याबदल्यात मुंबईकरांना काय मिळणार? मुंबईची तुंबई होऊन पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी? अस्वच्छ नद्या आणि गलिच्छ नाले हे आणखी किती काळ मुंबईकरांनी सहन करायचे?

नदी आणि नाल्यांतील गाळ काढल्यानंतर काही काळासाठी येथून पाण्याचा प्रवाह व्यवस्थित होताना दिसतो, मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात याठिकाणी कचरा फेकला गेल्याने नाले तुंबतात. येथील पाण्याचा प्रवाह थांबल्याने दुर्गंधी पसरते. परिणामी रोगराईला निमंत्रण. मुंबईत हे काही नवीन नाही. पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यानंतर तुंबलेल्या नाल्यांमधील कचरा आणि प्रदूषित सांडपाणी हे अनेकदा रस्त्यावर येते. यामधूनच वाट काढण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागते. अगदीच मोठा पाऊस आला, तर नाल्यांमधील घाण वाहून जाऊन पाण्याचा प्रवाह पुन्हा एकदा सुरू होतो, परंतु अनेकदा स्थानिक नागरिकांकडून येथे सवयीप्रमाणे कचरा टाकण्यास सुरुवात होताच पुन्हा परिस्थिती जैसे थे होते.

जोपर्यंत येथून गाळ काढण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर होत नाही, तोपर्यंत मुंबईतील बहुतांश नाले हे तुंबलेल्या अवस्थेतच राहणार. मुंबईतील नाल्यांबाबत सांगायचे झाल्यास बहुतांश वेळी दोनदाच त्यांची सफाई झाल्याचे आढळते. एक तर महापालिकेकडून येथे गाळ काढला जातो तेव्हा, अन्यथा मोठा पाऊस येतो तेव्हा. याखेरीज नाल्यांची सफाई झाल्याचे मुंबईकरांच्या दृष्टीस पडणे मुश्कीलच. रोगराई पसरू नये म्हणून दर आठवड्याला अथवा किमान महिनाभरातून तरी एकदा नाल्यांमधील गाळ उचलण्याची कार्यवाही गरजेची आहे.

सफाई होण्याच्या प्रक्रियेसोबतच नाल्यांमध्ये स्थानिक नागरिकांकडून कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. मुंबईत नाले असणार्‍या परिसरात ठिकठिकाणी कचरापेट्या असाव्यात जेणेकरून नागरिक कचरा नाल्यामध्ये न फेकता तेथील कचरापेट्यांमध्ये फेकतील. तसेच या कचरापेट्यांमधील कचरा उचलण्याची कार्यवाहीदेखील वेळोवेळी होणे गरजेचे आहे, अन्यथा तोे वेळीच न उचलला गेल्यास कचरापेट्यांची क्षमता संपते आणि मग कचरा हा पेट्यांमधून बाहेर पडून तो नाल्यात फेकण्यास सुरुवात होते. परिणामी दुर्गंधी आणि रोगराईला निमंत्रण तर मिळतेच शिवाय नालेही तुंबण्यास सुरुवात होते. म्हणूनच नाला परिसरात कचरापेट्या असणे आवश्यक आहे.

नाल्यांप्रमाणेच अनेकदा मुंबईतील नद्यांमध्ये अनेकांकडून निर्माल्य तसेच इतर टाकाऊ घटक, कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी, अनेकांच्या घरातील प्रदूषित सांडपाणी सर्रासपणे सोडले जाते. त्यामुळे नद्याही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. मुंबईत तर परिस्थिती इतकी भयानक आहे की, नाले कुठले आणि नद्या कुठल्या हेसुद्धा कळेनासे झाले आहे. नाल्यांची स्थिती ही कचराभूमीप्रमाणे झाली असून नद्या या नाल्यांसारख्या झाल्या आहेत. येथे होणारे प्रदूषण वेळीच न रोखले गेले तर नद्यांची जागाही भविष्यात कचराभूमी झाल्याशिवाय राहणार नाही, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. अलीकडेच वृत्त होते की, नद्या आणि नाल्यांमधील दिवसेंदिवस वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन उपाययोजना करण्यासाठी येथे लोखंडी जाळ्या बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जेणेकरून येथे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालता येईल. नद्या, नाले आदी परिसरांमध्ये लोखंडी जाळ्या, अथवा संरक्षण भिंती बांधल्या गेल्या तर येथे टाकण्यात येणारा कचरा हा नदी, नाल्यांमध्ये पडण्यापासून वाचवता येईल.

तसेच निर्माल्य कलशांची संख्यादेखील याठिकाणी वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. नदी आणि नाल्यांमध्ये कचरा आणि निर्माल्यामुळे होणार्‍या समस्येवर महापालिका प्रशासनाकडून तोडगा काढण्यात येत आहे. महापालिकेच्या या प्रयत्नांना किती प्रमाणात यश मिळेल, हे येणारी वेळच सांगेल, परंतु किमान यासाठी प्रयत्न होत आहेत, हीच काय ती एक जमेची बाजू.

कचरा आणि निर्माल्याबाबत महापालिकेने प्रयत्न केले आहेत. तसेच नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी मलनिःसारण केंद्राकडे वळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यावर काही प्रमाणात प्रक्रिया करून ते समुद्रामध्ये सोडले जाईल. असे केले तर नद्यांमधील प्रदूषण रोखता येईल. एकदा का प्रदूषण रोखले गेले तर नद्यांचे स्वरूपही बदलण्यास सुरुवात होईल. हे सर्व बदल काही तातडीने होताना दिसणार नाहीत, परंतु या पद्धतीने जर प्रयत्न झाले तर नक्कीच नद्यांमधील प्रदूषण निवळण्यास सुरुवात होईल.

एकदा प्रदूषण घटण्यास सुरुवात झाली तर पुन्हा त्या मोकळा श्वास घेतल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच नदी असो वा नाले यामधील प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असले तरी त्यांना नागरिकांचे सहकार्य मिळणेही तितकेच गरजेचे आहे. अन्यथा महापालिकेने कितीही प्रयत्न केले तरी जर नागरिकांनी सहकार्य केले नाही तर परिस्थिती विदारक झाल्याशिवाय राहणार नाही. आपली मुंबई, स्वच्छ मुंबई ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग यात तितकाच महत्वाचा आहे. कारण टाळी एका हाताने वाजत नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रदूषणाला रोखूया, मुंबईला स्वच्छ बनवूया, महापालिकेच्या या आवाहनाला नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा, हीच अपेक्षा…

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -