घरसंपादकीयओपेडदलित पँथर लढ्याच्या धगधगत्या ज्वाळांचा लेखाजोखा!

दलित पँथर लढ्याच्या धगधगत्या ज्वाळांचा लेखाजोखा!

Subscribe

‘दलित पँथरचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, ज्यांचे काहीच योगदान नव्हतं, जे कधीच रस्त्यावर उतरले नाहीत, पण ज्यांना चांगलं बोलता येतं, लिहिता येतं अशांनी मात्र काही संदर्भ नसताना आपलं पुस्तक लिहिलं. मग मात्र मी लेखक नसलो तरी माझ्यातला लेखक जागा झाला आणि खरी वस्तुस्थिती मांडण्यासाठी पुस्तकाची निर्मिती आवश्यक वाटू लागली,’ असे ‘पँथर हा दरारा आमुचा’ या ग्रंथाचे लेखक प्राचार्य रमेश जाधव म्हणतात. एकूणच पँथरच्या चळवळीचा वास्तवदर्शी लेखाजोखा त्यांनी मांडला आहे.

—प्रदीप जाधव

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदीय लोकशाही अंमलात आली. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत अन्याय, अत्याचाराची मालिका सुरूच आहे. त्यामुळे ५०-७५ वर्षांपूर्वीच्या देशात आणि महाराष्ट्रात परिस्थिती काय असेल? याचं चित्र डोळ्यासमोर न आणलेलंच बरं. अन्याय, अत्याचाराला ऊत आला होता. शिकार होणारा वर्ग दलित, आदिवासी, भटके, वंचित, उपेक्षित, मजूर, कष्टकरी, शेतकरी, भूमिहीन हा होता. अन्याय, अत्याचाराला कुठेतरी रोखलं पाहिजे, हा रोष समग्र दलितांच्या मनात निर्माण झाला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर स्वार्थी नेत्यांच्या कंपूने राजकीय हातमिळवणी करून राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्यानंतर व्यक्तिगत स्वार्थापायी समाजाला कुणाच्या तरी दावणीला बांधण्याचं काम सुरू होतं.

- Advertisement -

याची प्रचंड चीड, राग, द्वेष सर्वांच्या मनात खदखदत होता. त्याचा उद्रेक होऊन नक्कीच ज्वालामुखी होईल हे मात्र सत्य असतानाच समाजाला योग्य दिशा देऊन सामाजिक न्याय भूमिका मांडणारा अराजकीय नेता पुढे येईल, त्याच्या मागे सर्व जनता एकसंध उभी राहील अशी अवस्था होती. नेमक्या याच वेळेस १९७२ साली दलित पँथर उदयास आली. अवघ्या दोन-अडीच वर्षांमध्ये दलित पँथरने संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर आपला ठसा उमटवला. आपली व्याप्ती वाढवली. सर्वसामान्यांना हीच आपली हक्काची संघटना जी आपल्याला स्वाभिमान प्राप्त करून देईल अशी आपुलकीची, चैतन्याची भावना निर्माण झाली होती. कशाचीही पर्वा न करता सामाजिक परिवर्तनासाठी अन्यायाविरुद्ध लढणार्‍यांची लाटच आली. असंख्य तरुण पँथरमध्ये सामील झाले.

प्राचार्य रमेश जाधव असाच एक झपाटलेला, तळमळीचा प्रामाणिक तरुण याच ध्येयाने चळवळीत सामील झाला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरालगत गोरसई हे त्यांचं जन्मगाव सांस्कृतिक चळवळीचं मोठं केंद्र होतं. या गावाने अनेक नेते, कार्यकर्ते चळवळीला दिले. या गावापासून किमान आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर असणार्‍या कुकसा या गावी दलित सवर्णांचा विहिरीवरून संघर्ष निर्माण झाला. त्याची पाहणी करण्याकरिता रमेश जाधव आपले सहकारी यशवंत गायकवाड, राजाभाऊ गायकवाड यांना घेऊन अशा अविर्भावात विहिरीचे पंचनामे केले, नकाशे काढले की तिथल्या लोकांना कोणीतरी मोठे अधिकारी असावेत या पद्धतीने वचक बसला. काहीही न करता यांच्या दबावातून गावात समेट झाला. गाव शांत झालं. इथे मात्र रमेश जाधव यांच्या अंगात हत्तीचं बळ आलं आणि त्यांना वाटलं आपण आता पँथरसाठी झोकून दिलं पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डोक्याला कफन बांधून उतरले. चळवळीचं कथन करता करता ते स्वकथन कधी झालं हे त्यांनाही कळलं नाही.

- Advertisement -

ते मनोगतात लिहितात, दलित पँथरचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे, ज्यांचे काहीच योगदान नव्हतं, जे कधीच रस्त्यावर उतरले नाहीत, पण ज्यांना चांगलं बोलता येतं, लिहिता येतं अशांनी मात्र काही संदर्भ नसताना आपलं पुस्तक लिहिलं. मग मात्र मी लेखक नसलो तरी माझ्यातला लेखक जागा झाला आणि खरी वस्तुस्थिती मांडण्यासाठी मला या पुस्तकाची निर्मिती करावी लागली. ‘पँथर हा दरारा आमुचा’ हा ग्रंथ म्हणजे प्राचार्य रमेश जाधव यांच्या अखंड सामाजिक कारकिर्दीचा, योगदानाचा अनमोल ठेवा आहे. ती ऊर्जा आहे पुढच्या पिढीतील तरुणांना प्रेरणा घेऊन चळवळीत झोकून काम करण्यासाठी. ‘पँथर हा दरारा आमुचा’ हे त्यांचं पहिलंच पुस्तक असलं तरी या पुस्तकाची मांडणी, शब्द, समजावून सांगण्याची भाषा, लेखनशैली आणि छोटी छोटी प्रकरणे वाचताना ते प्रतिथयश लेखक असावेत असं वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण पुस्तक वाचताना हातात घेतल्यावर पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत हातून सोडूच नये अशी वाचकांची अवस्था होते.

एकूण ४३ प्रकरणातील प्रसंग, संदर्भ, घटना आपल्याशी संबंधित आहेत असंच प्रत्येकाला वाटतं. प्राचार्य रमेश जाधव दलित पँथर ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष होते म्हणून त्यांनी फक्त ठाणे जिल्हा हाच केंद्रस्थानी ठेवून लिहिलं. काहींनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहिला, मात्र लिहिणार्‍यांनी ठाणे जिल्हा वगळून लिहिला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यावर हा अन्याय आहे असा त्यांचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक चळवळीचे स्वरूप, त्यातील सत्य समाजासमोर येण्यासाठी ही केलेली धडपड असंही म्हणता येईल. या ग्रंथाला अनेक संदर्भ देता येतील. पँथरच्या निर्मितीपासूनच एक दरारा निर्माण झाला होता समाजामध्ये आणि स्वतःमध्येसुद्धा. निर्भीडपणे उपेक्षितांच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्याची ताकद दिली होती. मग तो अन्याय दलितांवर असो अथवा दलितेतर समाजावर. त्याविरुद्ध प्रकर्षाने लढा उभारणे ही एकमेव भूमिका पँथरची होती.

‘ऐक्यासाठी नेत्यांना जिल्हाबंद’ या प्रकरणात प्राचार्य रमेश जाधव लिहितात, भैय्यासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर सर्व नेते एकत्र येतील अशी जनतेची अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पँथरने निर्णय घेतला की जोपर्यंत नेते एकत्र येत नाहीत, तोपर्यंत एकाही नेत्याला महाराष्ट्रात पाय ठेवू द्यायचा नाही. महाराष्ट्रात वसंतदादांच्या नेतृत्वाखालील सरकार अंतर्गत स्पर्धेमुळे अस्थिर झाले होते. ठिकठिकाणी होणार्‍या अन्याय, अत्याचारामुळे आंबेडकरी समाजही काँग्रेसवर प्रचंड चिडलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाज माझ्यामागे आहे हे रा. सु. गवईंना काँग्रेसला दाखवणे क्रमप्राप्त होते. कारण त्यांना काँग्रेसबरोबर सत्तेची फळे चाखायची होती. म्हणून त्यांनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध आंदोलन, निदर्शने न करता बौद्धांच्या सवलतींचा भावनिक मुद्दा घेऊन तुरळक ठिकाणी कानाकोपर्‍यात सभा घेण्यास सुरुवात केली.

अशीच एक सभा सुभाष टेकडी उल्हासनगर येथे २७ सप्टेंबर १९७७ ला आयोजित केली होती. ही सभा आपण उधळायची असा आम्ही चंग बांधला होता. जेव्हा गवई यांचे राईट हॅण्ड पुण्याचे आमदार अ‍ॅड. बाजीराव कांबळे बोलायला उभे राहिले, तेव्हा मी बाजीराव कांबळे यांचा माईक पकडला. सोबत एकनाथ जाधव, अमीन, गांगुर्डे आदी कार्यकर्ते होते. बाजीराव कांबळे यांचा माईक पडताच गवई आक्रमक झाले, तर बाजीरावने आमच्यावर पिस्तूल रोखले. हे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता अमीनने बाजीराव कांबळेच्या हातावर सायकलच्या चैनचा फटका मारला. त्या सरशी पिस्तूल खाली पडले ते आम्ही उचलले. त्यामुळे प्रचंड गोंधळ, घबराट झाली. गवईंची सभा उधळली. पोलिसांनी आम्हाला विनवणी केली आणि प्रकरण मिटलं. १२ ऑक्टोबर १९७७ ला उल्हासनगरमध्ये पुन्हा सभा आयोजित केली.

गवईंनी पुन्हा पँथरला चिथावणी दिली. आम्हाला आव्हान दिलं की तुमच्यात धमक असेल तर सभा उधळून दाखवा. पुन्हा सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि ही सभासुद्धा उधळून लावली. त्याचा परिणाम असा झाला की न्यायालयात अनेक वर्षे हे खटले चालले. ज्यांच्यावर खटले होते ते बहुसंख्य सरकारी नोकरीत होते. सगळेच कार्यकर्ते धास्तावले होते, परंतु ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अत्यंत हुशार होते. त्यांनी माणुसकीच्या नात्याने चेंबरमध्ये बोलावून समजावून सांगितलं की, या खटल्यात तुम्हाला शिक्षा होईल आणि तुमच्या नोकरीवर गदा येईल. तसं नको असेल तर हे खटले शासनाने मागे घेतले पाहिजेत यासाठी प्रयत्न करा. त्यानुसार आठवलेसाहेब मंत्री असताना भाई संगारेंच्या मदतीने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना फोन करून ते प्रकरण मिटवण्यात आले.

या संपूर्ण प्रवासामध्ये दलित पँथर संघटनेला वर्तमानपत्रांनी फार मोठी साथ देऊन त्यांची बाजू उचलून धरली. शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांची, वृत्तपत्रांची साथ अत्यंत मोलाची ठरली याचा रमेश जाधव आवर्जून उल्लेख करून कृतज्ञता व्यक्त करतात. ७ ऑक्टोबर १९७७ रोजी पँथरने भिवंडी शहरातील झोपडपट्टी प्रश्नांवर आणि नोकर्‍यातील अनुशेष भरण्यासाठी मोर्चा काढला होता. तत्कालीन नगराध्यक्ष परशुराम टावरे यांनी ऑफर दिली, तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देतो. गरज असतानाही आम्ही ऑफर नाकारली आणि इतरांना नोकरी द्या असं ठरलं. हा सामाजिक त्याग आहे.

पँथरच्या प्रवासात ज्यांनी संधी दिली त्या ज्येष्ठ नेत्यांचे ते ऋण मान्य करतात. त्याचबरोबर साथ देणारे असंख्य कार्यकर्ते, सहकारी यांना धन्यवाद देतात. या ग्रंथाचं स्वागत होईल. ठाणे जिल्ह्यातील सामाजिक चळवळीचा अभ्यास करताना या पुस्तकाच्या संदर्भाशिवाय तो अभ्यास पूर्ण होणार नाही किंबहुना भविष्यात कोणाला ठाणे जिल्ह्यातील सामाजिक चळवळीवर पीएचडी करावीशी वाटल्यास या ग्रंथाचा अत्यंत मोलाचा उपयोग होईल. या ग्रंथाला ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी प्रस्तावना लिहिली असून मुखपृष्ठ आकर्षित करून घेतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -