घरसंपादकीयओपेडईडी ते सीडी..हमाम में सब नंगे !

ईडी ते सीडी..हमाम में सब नंगे !

Subscribe

विश्वामित्रांच्या तपश्चर्येला घाबरून इंद्राने त्यांच्या तपभंगासाठी मेनकेला पाठवले. मेनकाच्या सौंदर्याने विश्वामित्रांचा तपभंग झाला. त्यामुळे त्यांना महर्षिपद मिळू शकले नाही. पुराणातील हा संदर्भ कलियुगातही तंतोतंत लागू पडावा अशी स्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे. अर्थात कलियुगातील या संदर्भात किरीट सोेमय्यांचा तपोभंग झाला की, तेे तपाला बसण्याचे ढोंग करत होते, हे कथित सिडींच्या तपासानंतर पुढे येईलच.

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावर तुटून पडणारे, ईडीचा वापर हत्यारासारखा करणारे आणि हातोडा हातात घेऊन समोरच्यांना घाम फोडणारे किरीट सोमय्या अखेर अडकले.. त्यांची बोलती बंद केली गेली. त्यांना शरमेने मान खाली घालावी लागली.. त्यांची अश्लिल चित्रफीत व्हायरल झालीच; शिवाय विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी तब्बल आठ तासांच्या चित्रीकरणाची सिडीच सभापतींना देऊन खळबळ उडवून दिली. तर दुसरीकडे विधानसभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत ठोस पुरावे प्राप्त झाल्यास सखोल चौकशीची ग्वाही दिली.

या सिडीप्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे हे स्पष्ट होते. नैतिकतेच्या गप्पा मारणारे जेव्हा अनैतिकतेच्या डोहात डुबकी मारतात, तेव्हा त्यांच्या अब्रुचे लख्तरे उडणार हे विधीलिखीतच आहे. मात्र, प्रस्तुत प्रकरणात किरीट सोमय्यांनी खरोखरच कुणा महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले की, सोमय्यांना अडकवण्यासाठी काही कुभांड रचले गेले, असे प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत. अंबादास दानवेंनी विधान परिषदेतील आपल्या भाषणातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला की, सोमय्यांनी ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून काही महिलांना ब्लॅकमेल केले. त्यातून त्यांचे लैंगिक शोषण केले.

- Advertisement -

शिवाय त्यांच्याच पक्षातील काही महिलांना पदे देतो, जबाबदार्‍या देतो, महामंडळांवर नियुक्त्या करुन देतो असे आमिष दाखवत लैंगिक शोषण केले. महत्वाचे म्हणजे त्यांनी यासंदर्भातील अश्लील चित्रीकरणाची सिडीच सभापतींकडे सभागृहात सपूर्द केली. दानवेंंच्या भाषणात तथ्य असेल तर सोमय्यांवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचेच आहे. परंतु या आरोपात तथ्य नाही असे जर सिद्ध झाले तर हे षड्यंत्र ज्यांनी रचले त्यांनाही जनतेसमोर आणण्याचे कर्तव्य सभागृहातील लोकप्रतिनिधींना करावे लागेल. क्लिप व्हायरल झाल्यावर सर्वच विरोधी पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी एकमुखी प्रतिक्रिया दिली की, सोमय्यांना अडकवण्यात भाजपचाच हात आहे. गरज सरो वैद्य मरो, अशी भाजपची रणनीती असल्याने सोमय्यांना वापरुन सोडून देण्यात आले असाही आरोप करण्यात आला.

वरकरणी या बाजारगप्पा वाटत असल्या तरी भाजपची गेल्या काही वर्षांपासूनची कार्यप्रणाली बघता विरोधी पक्ष करीत असलेल्या आरोपांवर जनतेचा आता विश्वासही बसत आहे. अन्य पक्षांची घरे फोडण्याचा आसुरी आनंद घेणारे आणि ईडीचा वापर राजकीय अस्त्र म्हणून करणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍यांना अशा आरोपांनाही सामोरे जाण्याची सवय करून घ्यावी लागेल. भाजपच्या कार्यप्रणालीत सध्या ‘त्याग, सेवा आणि समर्थन’ या त्रिसूत्रीचा लवलेश तर दिसत नाहीच; परंतु ‘कुटनीती, कारस्थाने आणि षड्यंत्रे’ या त्रिसुत्रीला मात्र ‘भाजपेयीं’नी कडकडून मिठी मारल्याचीच अनुभूती काही काळांतील घटना- घाडमोडींवरुन येते. त्याची फार मोठी किंमत पुढील काळात भाजपला मोजावी लागेल असे दिसते.

- Advertisement -

किरीट सोमय्यांपासून या मालिकेला सुरुवात झाली आहे. अर्थात सोमय्यांची अश्लील क्लिप बाहेर आली म्हणून त्यांनी असंख्य नेत्यांवर केलेले आरोप खोटे ठरू शकत नाहीत. छगन भुजबळ, अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यासह अन्य नेत्यांना तुरुंगाची हवा केवळ आरोप केल्यामुळे खावी लागली असे कसे म्हणता येईल? तसे असते तर न्यायव्यवस्थेवर कुणाचा विश्वासच उरला नसता. तत्कालीन परिस्थितीत त्या आरोपांमध्ये संबंधित न्यायालयांना तथ्य वाटले होते म्हणून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलेे. त्यामुळे आरोप केले म्हणून सोमय्या खलनायक ठरत नाहीत. एक गोष्ट स्पष्ट आहे की, सोमय्यांनी आरोप केल्यानंतर जी मंडळी कमालीची अस्वस्थ झाली, त्यांनी भाजपशी घरोबा केलेला दिसतो.

म्हणजेच सोमय्यांमुळेच सत्ताकारणात भाजपाला सदस्यांची संख्या वाढवता आली. कर नाही तर डर कशाला? परंतु कमालीच्या घाबरलेल्या राजकारण्यांना चौकशी आणि त्यानंतरच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करावी लागते हेच सोमय्यांचे यश म्हणावे. सोमय्यांनी कदाचित पक्षाचे धोरण म्हणून ईडी, सीबीआयचा वापर अस्त्रासारखा केला. परंतु त्यांनी जे आरोप केलेत त्यात बिलकुलच तथ्य नव्हते, असेही आजवर सिद्ध झालेले नाही. त्यांनी केवळ महाविकास आघाडीला लक्ष्य केले हा राजकीय नीतीचा भाग झाला. त्यासाठी केवळ सोमय्यांना दोषी धरुन चालणार नाही, तर त्यात त्यांच्या पक्षाचाच हात आहे असे मानावे लागेल.

भाजपमध्ये गेल्यानंतर तपास बंद होत नसला तरी चौकशीवर त्याचा परिणाम झाल्याची बाब लपून राहत नाही. चौकशा बंद झाल्या नाहीत, परंतु कारवाईची गती मंदावल्याचे स्पष्टपणे दिसते. यात योगायोगाचा भाग असू शकत नाही. घोटाळेबाजांवर कारवाई झालीच पाहिजे यावर दुमत असण्याचे कारण नाही, मात्र घोटाळेबाज तुमच्याकडे आल्यावर स्वच्छ कसे काय होतात? याचे उत्तर आता भाजपला द्यावे लागणार आहे. भाजपच्या अशाच बदलत्या भूमिकांनी सोमय्यांची कोंडी केली. भाजपने अन्य पक्षांच्या ज्या- ज्या नेत्यांना जवळ केले त्या- त्या नेत्यांकडे सोमय्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे लागले.

सोमय्यांनी जर एकतर्फी प्रकरणे शोधून काढली तर दुतर्फी प्रकरणे कोणत्या राजकीय पक्षाने पुढे आणली? याचेही उत्तर विरोधकांना द्यावे लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तत्सम पक्षांच्या सत्ताकाळात जो भ्रष्टाचाराचा बकासुर वाढला त्याला रोखण्यासाठी कोणीही पुढे येऊ नये ही राजकीय नीती होऊ शकते का? निदान सोमय्यांनी विरोधी पक्षातील लोकांना लक्ष्य करीत तरी काही प्रमाणात घाण साफ करण्याचा प्रयत्न केला. हाच प्रयत्न विरोधकांनी सत्ताधार्‍यांच्या बाबतीत केला असता तर महाराष्ट्राचे राजकारण धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ झाले असते. परंतु त्यात रस कुणालाही नाही. प्रत्येकाला कमाईचे पडलेले आहे. हमाम में सब नंगे है.. सोमय्यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न झालाय.

तो कुणी केला हा संशोधनाचा विषय आहे. परंतु कुजलेल्या आणि बरबटलेल्या राजकीय वृत्तीतूनच सोमय्या उघडे पडले आहेत. सार्वजनिक जीवनात अधिक वावर असणार्‍यांनी वैयक्तिक आयुष्यात किती जपून रहायला हवे, नैतिकतेच्या केवळ गप्पा मारण्यापेक्षा नैतिकतेची चाड किती प्रभावीपणे जोपासायला हवी हे सोमय्या प्रकरणातून लक्षात घ्यायला हवेे. अर्थात क्लिपमध्ये जे दिसतेय ते दोघांच्या परस्पर सहमतीने झाले असेल तर इतरांना त्याची अ‍ॅलर्जी होण्यात काहीच हाशील नाही. एकूणच राजकारणाची खालावलेली पातळी पाहता महाराष्ट्रातील चारित्र्यहननाच्या राजकारणाची सुरुवात म्हणूनही सोमय्या प्रकरणाकडे पाहता येईल. आगामी निवडणुकांची ही नांदी म्हणावी लागेल.

भारतीय राजकारणात पैसे खाणे आणि हे असे उघडे-नागडे व्हिडिओ नेमक्यावेळी बाहेर येणे, हे काही नवे नाही. राजकीय घराण्यातील लोकांनी किती सजग रहायला हवे आणि तसे न राहिल्यास किती मोठे नुकसान सहन करावे लागते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलग संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. मात्र मुलाच्या कथित सेक्स स्कँडलमुळे त्यांच्या हातून चक्क पंतप्रधानपद गेले होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार हे नक्की झाल्यानंतर पंतप्रधानपदासाठी सर्वात मजबूत दावेदारी बाबू जगजीवन राम यांची होती.

पण त्यावेळी बाजी मारली मोरारजी देसाई यांनी. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी समजावून सांगितल्यानंतर शेवटी बाबू मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीपदावर रुजू झाले. सोबतच देशाचे उपपंतप्रधानदेखील झाले. पण याच काळात जगजीवन राम यांचे चिरंजीव रमेश कुमार यांचे सेक्स स्कँडल बाहेर आले. स्कँडल बाहेर आणण्यात आणि त्याला राजकीय रंग देऊन जगजीवन राम यांची कारकीर्द संपवण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ती इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी आणि सूनबाई मनेका गांधी यांनी. त्यावेळी मनेका गांधींच्या संपादनाखाली ‘सूर्या’ नावाचे मासिक निघायचे. जगजीवनराम यांचे चिरंजीव सुरेश कुमार यांचे दिल्ली विद्यापीठातील एका युवतीबरोबरचे नग्नावस्थेतील फोटो ‘सूर्या’ मासिकाच्या हाती पडले होते. या मासिकाने आपल्या ऑक्टोबर १९७८ सालच्या अंकात ‘द रिअल स्टोरी’ या शीर्षकाखाली एक रिपोर्ट छापला.

या रिपोर्टमध्ये रमेश कुमार यांच्यासोबत असणारी युवती ही आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांच्या संघटनेची सदस्य असल्याचा तसेच भारताची गुपित माहिती तिने चीनला दिली असल्याचा दावा करण्यात आला. या दाव्याला कुठलाही आधार नव्हता. याशिवाय या अंकात सुरेश कुमार आणि त्या युवतीचे ते सगळे नग्न फोटोज छापण्यात आले होते, जे त्यापूर्वी कुणीच छापले नव्हते. सुरेश कुमार यांचे हे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर देशाच्या संपूर्ण राजकारणात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरेश कुमार यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, आपले अपहरण करण्यात आले होते आणि त्यानंतर बेशुद्धीच्या अवस्थेत आपले हे फोटो घेण्यात आले होते. आपल्या अपहरणाचा आरोप त्यांनी त्यावेळचे दिल्ली विद्यापीठातील तरुण नेते के.सी. त्यागी यांच्यावर लावला होता. अर्थात सुरेश कुमार यांच्या या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नव्हते. त्यामुळे या प्रकरणामुळे जगजीवन राम यांच्या राजकीय कारकीर्दीचं व्हायचे ते नुकसान झालेच.

यापूर्वी अनेकांसोबत असे झाले आहे. माजी वनमंत्री संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून ते माजी आमदार विजय शिवतरे, सेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यापर्यंत कित्येक जणांवर अनैतिक प्रेमसंबंधांचे आरोप झाले. गेल्या वर्षी भाजप नेते गणेश नाईक यांचे लैंगिक शोषणाचे प्रकरणही चर्चेत आले. या आरोपांचा खरेखोटेपणा अजून सिद्ध झालेला नसला तरी हे आरोप महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नैतिकतेचा घसरता आलेख दर्शवित आहेत. सात वर्षांपूर्वी दिल्लीचे तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री संदीपकुमार यांची दोन महिलांसोबतची आक्षेपार्ह सीडी समोर आली होती. परिणामी, ‘आप’ने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

राजस्थानातील भाजप आमदार विजय बन्सल यांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यात ते एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत होते. कर्नाटकातील तत्कालीन उत्पादनशुल्क मंत्री वाय. एच. मेती यांनाही सेक्स स्कँडलच्या एका सिडीमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मदत मागण्यासाठी आलेल्या एका महिलेचा त्यांनी गैरफायदा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. सार्वजनिक जीवनातील साधनशुचिता आणि नीतिमत्तेचे म्हणाल, तर राजकारणात ती कधीचीच निर्वस्त्र झालीय ! राजकारणातील ‘विश्वामित्रां’ना यापुढे अधिक काळजी घ्यावी लागेल. अन्यथा समाजातील मेनका कधी त्यांना मोहपाशात ओढतील याचा नेम नाही !

ईडी ते सीडी..हमाम में सब नंगे !
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -