घरसंपादकीयओपेडमेगा सिटी मुंबईतील अशोभनीय पाणीबाणी!

मेगा सिटी मुंबईतील अशोभनीय पाणीबाणी!

Subscribe

अंधेरी पूर्व येथील जलवाहिनी दुरुस्तीला तब्बल 4 दिवसांचा कालावधी लागला. खरेतर गुरुवारी ही घटना घडल्यानंतर शुक्रवारीच जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती, परंतु सोमवारपर्यंत हे काम सुरू राहिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. जलवाहिनीला मोठे भगदाड पडल्याने दुरुस्तीचे काम लांबल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले, परंतु मेगा सिटी म्हणवल्या जाणार्‍या मुंबईत लोक पाण्यासाठी भांडी घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे दृश्य अख्ख्या जगाला दिसले. हे खचितच शोभनीय नाही.

नजर हटी और दुर्घटना घटी, ही म्हण सर्वत्र प्रचलित आहे. कोणतेही कार्य करताना सावधानता बाळगणे गरजेचे असते हा संदेश देणारी ही म्हण. सावधानता न बाळगल्यास अनेकदा नको त्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्या दुर्घटनांमधून सावरणे कधी कधी इतके अवघड होऊन बसते की हा प्रश्न सोडवायचा तरी नेमका कसा, याचा पेच सुटता सुटत नाही. अंधेरी येथे मेट्रो कामासाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटून मध्य मुंबई भागातील अनेक उपनगरांमध्ये पाणीपुरवठा 4 दिवसांपर्यंत बंद राहिल्याची नुकतीच घडलेली घटनाही काही यापासून वेगळी नाही. येथील दुर्घटनेमुळे लाखो नागरिकांना जो त्रास व्हायचा होता तो झालाच, परंतु अशी घटना पुन्हा इतरत्र कोठे घडू नये यासाठी ज्या उपाययोजना होणे अपेक्षित आहे, त्याबद्दल प्रशासन तितके गंभीर असल्याचे दिसत नसल्याची ओरड ही स्थानिकांची आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सावधानता बाळगून उपायजोजना करण्यासाठी प्राधान्य दिल्यास ते अधिक शहाणपणाचे लक्षण ठरेल, अन्यथा सध्या पाणीपुरवठ्याच्या सेवेवर परिणाम होत आहे. आगामी काळात तो अन्य सेवांच्या बाबतीत नाही झाला म्हणजे मिळवले. कारण याबाबत काहीच शाश्वती देता येत नाही. कोणती दुर्घटना कधी घडेल याचा काही नेम नाही. मुंबईत विविध ठिकाणी खोदकामे सुरू असून पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला तर यासाठी जबाबदार कोण असणार? अंधेरीत जो प्रकार घडला तो पाणीपुरवठ्याबाबत होता, परंतु देव न करो पुन्हा जर खोदकामांदरम्यान असे काहीसे पुन्हा घडल्यास काय परिणाम भोगावे लागतील? मुंबईत अनेक ठिकाणी वीज, गॅस आणि दूरध्वनी तसेच इंटरनेट सेवांचा पुरवठा हा भूमिगत मार्गांनी झालेला आहे. खोदकामांदरम्यान काळजी न बाळगता या सेवांच्या वाहिन्यांना बाधा पोहचल्यास त्याचे काय परिणाम होणार? याचाही विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अंधेरी येथील दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने या घटनेसाठी कारणीभूत असणार्‍या कंत्राटदाराला 1.34 कोटींचा दंड भरण्याबाबत नोटीस बजावली आहे, ते चांगलेच केले. दंडवसुली होईल तेव्हा होईल, परंतु या घटनेमुळे अनेकांची जी गैरसोय झाली त्याचे काय, ते नुकसान कोण भरून देणार, असे विविध प्रश्न कायम आहेत. 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने आम्हाला पाण्याचे बिल कमी येणार का किंवा आमच्या बिलात किमान सवलत तरी मिळणार का, असे विविध प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत. त्याची उत्तरे सध्या तरी स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन दरबारी नाहीत. सलग चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने येथील नागरिकांना आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी ज्या पद्धतीने भटकंती करावी लागली ती पाहून वाईट वाटत होते. मुंबईसारख्या शहरात राहूनही अनेक स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना हंडा आणि बादलीभर पाणी मिळविताना धावाधाव करावी लागली. सर्वसाधारणपणे दुष्काळी भागात मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात असे चित्र असते. हंडाभर पाण्यासाठी तेथील नागरिकांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत असल्याचे चित्र अनेकदा आपण पाहतो, परंतु मुंबईसारख्या मेगा सिटीमध्ये हे पाहावे लागावे हे दुर्दैव.

- Advertisement -

गुरुवारी रात्री अंधेरीत मेट्रो कामाच्या खोदकामादरम्यान जलवाहिनीला भगदाड पडल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शुक्रवारी या भागामध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. याआधी काही प्रमाणात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यातून कशीबशी एका दिवसाची तहान भागली, परंतु खरी वणवण सुरू झाली ती शनिवारपासून. दुसर्‍या दिवशीही पाणीपुरवठा न झाल्याने पाण्याअभावी गैरसोयीत आणखी भर पडली. काही प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला, परंतु सर्व ठिकाणी पाणी टँकर्सद्वारे पोहचविण्यासाठी जे नियोजन करणे महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित होते ते न झाल्याने अनेक भागामध्ये पाणीच पोहचले नाही. खासगी टँकरवाल्यांनी तर या संधीचे सोने केले. वाटेल त्या पद्धतीने पाण्यासाठी पैसे घेण्याचे प्रकार सुरू राहिले. अशांवर कारवाई कधी होणार? लोकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाणी वाहून आणण्यासाठी पायपीट तसेच बाटलीबंद पाण्यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागले ते वेगळेच. शनिवारनंतर रविवार आणि सोमवारीही असाच काहीसा प्रकार सुरू राहिल्याने अनेकांचा पारा चढत होता.

मुंबई महापालिका प्रशासनाने यापेक्षाही अधिक आव्हानात्मक आणि कठीण जबाबदारी पेलत जलवाहिन्या दुरुस्तीचे काम शीघ्रगतीने केल्याचा इतिहास आहे, परंतु का कुणास ठाऊक येथील जलवाहिनी दुरुस्तीला तब्बल 4 दिवसांचा कालावधी लागला. खरेतर गुरुवारी ही घटना घडल्यानंतर शुक्रवारीच जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती, परंतु शनिवार, रविवार आणि त्याहूनही नंतर सोमवारपर्यंत हे काम सुरू राहण्याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खोदकामादरम्यान जलवाहिनीला मोठे भगदाड पडल्याने दुरुस्तीचे काम इतके लांबल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते, परंतु स्थानिक नागरिकांकडून याबाबत शंका उपस्थित केली जाते, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डिसेंबर हा वर्षातील अखेरचा महिना असल्याने अनेकदा सरकारी कर्मचारी हे आपल्या उर्वरित सुट्ट्या संपविण्यासाठी प्रयत्नशील असतात. आठवड्याच्या अखेरीस शनिवार आणि रविवार असल्याने अनेकदा कर्मचार्‍यांकडून शनिवार, रविवारला जोडून सुट्टी घेतली जाते. यामुळे अनेकदा मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतो. गुरुवारी रात्री ही घटना घडल्यानंतर शुक्रवारपर्यंत जलवाहिनी दुरुस्ती न होण्यामागे महापालिका प्रशासनाकडे आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ नव्हते का, अशी शंका उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही, असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. कारण वर्षाखेरीस अनेकदा कर्मचारी सुट्ट्यांवर असताना शासकीय कामे ही संथगतीने चालत असल्याचा अनुभव अनेकदा येतो. असेच काहीसे जलवाहिनी दुरुस्तीदरम्यान घडले असावे, असा अंदाजही अनेक जण व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

मेट्रोच्या खोदकामादरम्यान पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाल्याने हा विषय चर्चेत आला, परंतु विविध ठिकाणी या ना त्या दुरुस्तींच्या कामांसाठी खोदकाम हे सुरूच असते आणि खोदकामांदरम्यान अनेकदा काही ना काही दुर्घटना या घडतच असतात. मुंबईत अनेकदा चुकीच्या पद्धतीने खोदकाम करताना जलवाहिन्यांना अथवा गॅस पुरवठा वाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. जलवाहिनी फुटल्यानंतर लाखो लिटर पाणी वाया जाते. कधी कधी तर गॅस वाहिन्या खोदकामात फुटल्यावर दुरुस्ती होईपर्यंत संबंधित भागातून माणसे आणि वाहनांची ये-जाही बंद करावी लागते. अंधेरीच्या घटनेपाठोपाठ मंगळवारी दहिसर येथे वीजवाहिनीच्या दुरुस्तीदरम्यान जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. रस्त्यावर अनेकदा अशा प्रकारे खोदकाम या ना त्या कारणाने करण्यात येते, परंतु दुरुस्तीचे काम झाले की तेथील सफाई केली जात नाही. माती आणि दगडांचा ढिगारा तेथे तसाच सोडून दिला जातो. अनेक वाटसरूंच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होतात. असे प्रकार वारंवार घडत असले तरी याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. कारण रोज मरे त्याला कोण रडे, या म्हणीप्रमाणे असे प्रकार सातत्याने घडत असले तरी तेथे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.

खोदकामांदरम्यान सावधानता बाळगणे खरेतर गरजेचे आहे. कामगारांच्या सुरक्षेसह इतर कोणत्याही वाहिन्यांना धोका पोहचणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी खरी तर शासन दरबारी नियमावली हवी. कारण चुकीच्या पद्धतीने अनेकदा खोदकाम केल्याचेच फलित हे दुर्घटनांना निमंत्रण देते. म्हणूनच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियमावली ही हवीच. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यामधील सिलक्यारा बोगद्यात 41 मजूर अडकण्यामागेही तेथे खोदकामाच्या वेळी न बाळगण्यात आलेली सावधानता आणि सुरक्षिततेसाठी योग्य प्रमाणात न करण्यात आलेल्या उपाययोजनाच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. म्हणूनच यापुढे आगामी काळात कोणत्याही प्रकारच्या खनन कामांसाठी योग्य प्रकारे काळजी घेणे ही आता काळाची गरज बनत चालली आहे. शासन स्तरावर यासाठी नियमावली असेल तरच याची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाईल, अन्यथा याकडे दुर्लक्ष होत राहिले तर याउलट दुर्घटनांना निमंत्रणच मिळत राहील, मग त्या मजूर अडकण्याच्या असोत किंवा जलवाहिनी फुटण्याच्या. दुर्घटना घडण्याचे प्रकार वेगळे असले तरी यामुळे हानी ही झालीच आहे. केवळ त्याची व्याप्ती वेगळी असली तरी घटना घडण्यामागची कारणे ही काही वेगळी नाहीत. म्हणून अशा घटना घडू नयेत यासाठी कायम खबरदारी घेणे गरजेचे आहे.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -