घरसंपादकीयओपेडमाणसाचं जगणं एका सरळ रेषेत नसावं!

माणसाचं जगणं एका सरळ रेषेत नसावं!

Subscribe

माणसाचं जगणं एका सरळ रेषेत नसावं, नसतंच कधी. झाडं सरळ रेषेत वाढत नाहीत, फुलं सरळ रेषेत उमलत नाहीत, पाणी सरळ रेषेत वाहत नाही. विस्कळीतपणा हा जगण्याचा स्थायीभाव असावा. आयुष्याला शिस्त असू शकते, जीवनाला नाही. जीवन शिस्तीत बसवण्याचा प्रयत्न होता कामा नये. त्यातला विस्कळीतपणा हाच त्याचा स्वभाव म्हणता येईल. जीवनाला शिस्त असते म्हणजेच निसर्गाचे काही विधिनियम म्हणायला हवेत. या नियमांना बांधिल निसर्गातले घटक असू शकतात, समग्र निसर्ग नाही.

संपूर्ण जग हे अनित्यवादाच्या सिद्धांताचा परिपाक असून परिवर्तन विश्वाचा नियम असल्याचं तत्त्वज्ञान भारतात सर्वमान्य झालेले आहे. बदल ही जगण्याची पद्धत आहे. मानवी शरीरात सातत्याने बदल होत आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा बदल न टाळता येण्यासारखा आहे. शरीरातील मानवी पेशी सातत्याने बदलत आहेत. जुन्या पेशींची जागा नव्या पेशी घेत आहेत. यातील एकच चैतन्य विश्वात विद्यमान असल्याने त्याला ऊर्जा असेही म्हटले जाते. ही ऊर्जा सातत्याने बदलत आहे. विजेच्या ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत होणारे रुपांतरण भौतिकशास्त्रात सिद्ध होते, ही प्रकाशऊर्जाही पुढे उष्णता किंवा इतर ऊर्जेत बदलली जाते. ही निसर्गातली शिस्त म्हणता येईल, मात्र ऊर्जेच्या प्रवाहाला शिस्तीत बांधणे मानवी प्रगतीसाठी हितावह आहे, त्यावरील नियंत्रणही योग्यच हवे, परंतु या ऊर्जेचा मालक समजण्याची चूक माणसाने करता कामा नये, पण अशी चूक तो वारंवार करत असतो. त्याचे परिणाम त्याला सोसावे लागतात.

भौतिक जगात प्रश्न आणि त्याची उत्तरे असे त्याचे स्वरुप नाही. इथं कोणतेही प्रश्न नाहीत, त्यामुळे त्याची उत्तरेही नाहीत, एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास त्या उत्तराचा नवा प्रश्न बनतो, हे तत्त्व सातत्याने निसर्गात विद्यमान आहे. त्यामुळे विज्ञानाने निसर्ग आणि जीवनाचे तत्त्व शोधून त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करायला नको, ही दिशा विनाशाकडे जाणारी आहे, मात्र हा धोका माणूस पत्करणारच आहे, तेसुद्धा निसर्गनियमानुसारच म्हणायला हवे, क्षय आणि निर्मितीच्या तत्त्वाकडे जाणारा हा प्रवास आहे. पृथ्वीवरील अनैसर्गिक अवस्था वाढून त्यातून संभवणारा विनाश अटळ असावा. त्यासाठी लागणारा कालावधी हा कोट्यवधी वर्षांचा जरी मानला तरी या विनाश म्हणजेच शून्यातून पुन्हा निर्मिती आणि पुन्हा विनाशाकडे सुरू होणारा प्रवास असे हे चक्र आहे.

- Advertisement -

या चक्रातून सुटका नसल्याचं सर्वधर्म मान्य आहे. याच चक्राला धार्मिक तत्त्वज्ञानाच्या संकल्पनेत भौतिक अर्थाने भवचक्र म्हटले आहे. माणसाच्या मोक्षाची इच्छा, आमिष दाखवल्यासारखी जवळपास सर्वच धर्मातून मांडली गेली आहे. द्वैतवादी धर्मात याची चर्चा कल्पनाविलासातून किंवा संकल्पनांच्या जाणिवांनुसार केली गेलेली आहे. मोक्ष ही प्रत्येक जीवाला गरजेची गोष्ट असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. मानवी जीवनातले दु:ख संपत नसते. दु:खाच्या कारणांचा शोध घेतल्यावर त्या कारणांना समजून घेणे आणि त्या कारणांकडे तटस्थपणे पाहणे एवढेच मानवाच्या हातात आहे. ही कारणे निर्माण होऊच नयेत यावर माणसांचे नियंत्रण नाही. कारणे आणि घटना निसर्गात विद्यमान आहेत.

दु:खाची कारणे ही सुखाचा अभाव या अर्थाने इथं घ्यायला हवीत. प्रकाशाचा अभाव म्हणजेच अंधाराचे कारण हे असेच आहे. अंधार सातत्याने विद्यमान आहेच. अंधार ही वस्तू नाही, प्रकाश ही वस्तुनिष्ठ संज्ञा असू शकते. प्रकाशाला वजन असल्याचे विज्ञानाने स्पष्ट केले आहेच. प्रकाशासाठी सूर्य, वीज, दिवा, अग्नी असे माध्यम आवश्यक आहे, परंतु अंधारासाठी माध्यमाची गरज नाही. मुळात अंधाराला अस्तित्वच नाही. अंधाराची स्वतंत्र अशी व्यक्तीनिष्ठ व्याख्या म्हणूनच करता येत नाही. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव असेच म्हणता येईल. याचाच अर्थ जीवनातही दु:ख विद्यमान आहे. दु:ख म्हणजेच ज्ञानाचा अभाव, करुणेचा किंवा या समस्त निसर्गनियमांचे आकलन न झाल्याने तयार झालेले अज्ञान यातून दु:ख समोर येते. वेगळे दु:ख किंवा अंधार तयार करता येत नाही, जसा प्रकाश किंवा सुख आणि सुखाची कारणे तयार करता येऊ शकतात.

- Advertisement -

सुखासाठी कारणे शोधावी लागतात, दु:खाला कारणे सहज साध्य होतात. जगात दु:ख आहेत. मनाजोगती नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, लग्न, लैंगिकता, अन्न, आरोग्य या सगळ्या गोष्टी निश्चित गरजेनुसार आयुष्यात असाव्या लागतात, मात्र या गोष्टी सामाजिक नियमानुसार उपलब्ध करून दिल्या जातात. बरेचदा त्यामुळे समाजासोबत माणसांचा संघर्ष घडतो. अधिकाराची आसक्ती हे दु:खाचे कारण मानले जाते, परंतु आसक्तीशिवाय आयुष्याची कल्पना करता येणे सामान्यजनांसाठी शक्य नसते. निसर्गात ज्या घटना घडतात, जी सुख-दुःखे येतात ती घटनांच्या बदलत्या स्वरुप, गरजेमुळेच. नातेसंंबंधातील अधिकार आणि व्यक्तीगत अवकाश यातील संघर्षामुळे नाती अडचणीत येतात. त्याचे संतुलन राखण्यासाठी संवाद आणि समंजसपणा आवश्यक असतो, मात्र आसक्ती असतेच, जे होते चांगल्यासाठीच.

निसर्ग त्याच्या नियमात कधीही चुकू शकत नाही, मात्र कुटुंबातील सदस्याचा अवेळी मृत्यू चांगला म्हणता येणार नसतो. अचानक संकटामुळे निर्माण झालेले दु:ख माणसाच्या आयुष्यात असतातच, मात्र हे तुकडे आहेत, संपूर्ण जीवन नाही, असे बोलून व्यक्तीगत आयुष्यात आसक्तीविरहित जगणे सामान्य माणसांना शक्य नसते. इच्छा बाळगणे गैर किंवा गुन्हा नसतो. माणूस म्हटल्यावर इच्छा असणारच, त्यांचे दमन व्हावे, अशी रचना भवतालची असते, ज्याला आपण समाज म्हणतो. बरेचदा समाजाचे नियमन माणसांवर लादले जाते, ज्यावेळी ते समूहात्मक असते त्यावेळी ती शोषणाची व्यवस्था असते. एकाचे शोषण हा दुसर्‍याच्या जगण्याची गरज असते. प्राण्यांमध्ये शोषणाचे हे नियम निसर्गचक्रानुसार नियमित सहज प्रक्रिया म्हणून समोर येतात.

अलमारीतल्या कप्प्याप्रमाणे जगण्यातल्या प्रत्येक गोष्टी जिथल्या तिथे निटनेटक्या ठेवता येणं ज्यांना शक्य होतं त्यांच कौतुक वाटतं. आयुष्य निटनेटकं असतं का? ते तसं असावं का? तसं करणं माणसांना शक्य असतं का तर नाही, पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब मिळवूनही समाज समुदायात अतिरेक, आत्महत्या, हत्या होतातच. याचा अर्थ मानवी जगण्याच्या इच्छा संपवणे माणसांच्या हाती नसते. पूर्ण झालेल्या इच्छांचा छोटा कप्पा वेगळा डावीकडे. तरीही उजव्या बाजूला हाताला चटकन लागतील अशा अपेक्षा एकावर एक नीट रचून ठेवलेल्या. वरच्या बाजूला हँगरला लावलेल्या सुखावह आठवणी एका ओळीत ओवलेल्या अधांतरी, माणूस भविष्य किंवा आठवणीत जगतो आणि रमतो, या आठवणी दोन पद्धतीच्याच असतात. एक सुखावह आणि दुःख देणार्‍या.

अमुक एक गोष्टी माझ्यासोबत चांगली झाली नाही, ती व्हायला नको होती, भूतकाळाचा विचार करून माणूस दु:खी होतो, तर अमुक एक गोष्ट भविष्यात अमुक पद्धतीने झाली नाही तर दु:ख होईल अशा आठवणी किंवा भविष्यातील कल्पनाविलास दु:खच आणतो, तर सुखावह आठवणींच्या बाबतीत अमुक एखादी गोष्ट किती आनंददायी होती किंवा असायला हवी, या कल्पनेत तो सुखाचे तरंग अनुभवतो. माणूस सुख किंवा दुःख दोन्ही बाबतीत भूत आणि भविष्यात रमत असतो, परंतु या दोन्ही गोष्टी अस्तित्वात नाहीत, जे अस्तित्वात आहे तो हा क्षण. गेलेल्या भूतकाळाची चिंता वर्तमानातल्या क्षणात आणून माणूस वर्तमानही दूषित करून टाकतो. पुन्हा आजचा वर्तमान उद्याचा भूतकाळ होत असल्याने दु:खाशिवाय त्याच्या जगण्यात काहीही उरत नाही.

मानवी जगण्यात अडचणी येतात, त्याला माणसांचा नाईलाज असतो. प्रेम, जिव्हाळा, आत्मियता या गोष्टी जगण्याला पूरक असतात. यातून जगण्याची ऊर्जा मिळते, परंतु यावर माणूस अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करू लागल्यावर या गोष्टी त्याच्यापासून दूर होत जातात. कर्म करावे फळाची अपेक्षा करूच नये, हे तत्त्वज्ञान सन्यस्तांसाठी योग्यच असावे, मात्र व्यावहारिक जगात फळानुसारच कर्म तयार होते. फळाची अपेक्षा हीच कर्माची ऊर्जा असते. कुटुंबात कुटुंबप्रमुखाच्या कर्मानुसार मिळणार्‍या फळातील वाटेकरी असतात. चांगले किंवा वाईट फळ त्यानुसार त्यांच्याही वाट्याला येते. कर्म झाले की फळ तयार होते, त्याचा विचार कर्मकर्त्यांनी करताच कामा नये हे तत्त्वज्ञान व्यावहारिक जगात उपयोगाचे नसते. इथे कर्माचा अर्थ फायद्यात नेणारी उत्पादकता असा घेतला जातो.

शेत नांगरले जाते म्हणून पीक येते. शेतकर्‍याने शेत नांगरताना पिकाची अपेक्षा ठेवणे गैर नसते. जर ही अपेक्षाच ठेवली नाही तर शेत नांगरण्यामागील प्रेरणा किंवा ऊर्जाच नाहीशी होईल हे स्पष्ट असते. अगदी नोकरीच्या ठिकाणीही पगार, बोनस, पैशांची अपेक्षा वाईट नसते, मात्र कोणत्याही गोष्टीचा हव्यास अतिरेक हा विनाशाकडेच नेणारा असतो. अगदी चहा, कुठलंही व्यसन, मैत्री, प्रेम, सुख, संवेदना या सर्व घटकांचा अतिरेक दु:ख देणाराच ठरतो. म्हणजेच संतुलित जीवन हा जगण्याचा आधार असावा. संतुलन ठेवून जगण्यामध्येच खरे सुख असते. राजाला दिवाळी ठाऊक नसते. त्यामागील टोकाचं सुखही माणसाला नकोसंच असतं. त्याचप्रमाणे टोकाचा आदर-तिरस्कार, टोकाचं प्रेम-राग, टोकाचं आनंद-दुःख, टोकाची आसक्ती-विरक्ती या दोन्ही परस्परविरोधी घटकांमध्ये योग्य संतुलन ठेवल्यास आयुष्याची गाडी सुरळीत सुरू राहते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -