घरसंपादकीयओपेडशिवसेना फोडून भाजपने काय मिळवले?

शिवसेना फोडून भाजपने काय मिळवले?

Subscribe

भाजपबरोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती करून मते मिळवलेल्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा राग भाजपला असणे सहाजिक आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठबळ देऊन ठाकरे सरकार पाडून राज्यात शिंदे आणि भाजप यांचे सरकार स्थापन करणे इथपर्यंत देखील सर्वसामान्य जनतेला कसलाही आक्षेप असण्याचे कारण नव्हतेच. सर्वसामान्य शिवसेनाप्रेमी मराठी माणसाला जो राग आहे तो एकसंध शिवसेनेला संपवण्याचा भाजपने केलेला प्रयत्न हा सर्वसामान्यांच्या पचनी पडलेला नाही.

महाराष्ट्राचे राजकारण सध्या कधी नव्हे तितके अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेले आहे. शिवसेनेतील अंतर्गत फुटीला पाठबळ दिल्यामुळे भाजपदेखील या अस्थिरतेच्या वातावरणात गटांगळ्या खात आहे. शिवसेनेतील अंतर्गत फुटीला पाठबळ देऊन राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे सरकार पाडल्याचे समाधान जरी भाजपला मिळाले असले तरीदेखील हे तात्पुरते समाधान आहे. राज्यातील अन्य तीनही प्रमुख राजकीय पक्ष मग ते राष्ट्रवादी असो काँग्रेस असो अथवा भाजपा असो हे तिन्ही पक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकाधिक कमजोर कसे करता येईल या दृष्टीने डावपेच टाकत आहेत. त्यामुळेच पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दोन्ही शिवसेना जर कमजोर झाल्या तर त्याचा फटका हा शिवसेनेला तर बसणार आहेच मात्र त्याच बरोबर भाजपही यातील एक भाग असणार आहे. कर्नाटकच्या निवडणूक निकालानंतर जी काही देशात राजकीय समीकरणे प्रस्थापित होऊ पाहत आहेत ती जर लक्षात घेतली तर महाराष्ट्रात दोन्ही शिवसेना कमजोर होणे हे भाजपला देखील राष्ट्रीय राजकारणात परवडणारे नाही.

या जून महिन्याच्या अखेरीस राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राज्यात सत्तेवर येऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होईल. बरोबर साधारणपणे वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेवर आल्यानंतर ते नेमके किती काळ हे सरकार चालवतील याबाबत मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता होती आणि आजही त्याबाबत अनिश्चितता आहेच. तथापि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतक्या प्रतिकूल आणि अस्थिर तिच्या वातावरणातही राज्यातील सरकार भक्कम ठेवले आणि केवळ ठेवले नाही तर त्यांना राज्याच्या विकासाचे जे जे काही निर्णय घ्यायचे होते ते त्यांनी अत्यंत सक्षमपणे घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी देखील करून दाखवली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती हे आजवरच्या जवळपास सर्वच पूर्वाश्रमीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा अत्यंत वेगळ्या धाटणीची आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेपासून ते अगदी कार्यकर्ते पदाधिकारी अशा जवळपास सर्वांनाच सर्वाधिक वेळ देऊन त्यांना भेटणारे आणि सर्वसामान्य जनतेची कामे तत्काळ मार्गी लावणारे एकनाथ शिंदे हे त्या अर्थाने पहिलेच मुख्यमंत्री असावेत.

- Advertisement -

त्यामुळे त्या अर्थाने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही. मंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून त्यांनी ज्या प्रकारे लाखो गोरगरीब गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे तो तर यापूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या फार पुढचा आहे. २०१४ ते २०१९ च्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यांचे देव असल्याचे म्हटले होते. त्या दृष्टीने बोलायचे झाल्यास कोणत्याही गरजवंत आणि गरजू माणसासाठी सध्या तरी एकनाथ शिंदे हे देवाच्या रूपात आहेत असे म्हटल्यास कोणाला आश्चर्य वाटू नये. अर्थात ही झाली एकनाथ शिंदे यांची सर्वसामान्य जनतेमधील प्रतिमा. मात्र राज्याचे राजकारण हे काही केवळ या एकाच पाठबळावर चालत नसते. त्यामुळे या स्थिरतेच्या काळातही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सरकार केवळ चालवण्याचेच नव्हे तर धावण्याचे अवघड कार्य या वर्षभरात करून दाखवले हे निश्चितच एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अन्य प्रस्थापित नेत्यांच्या तुलनेत ज्युनिअर असलेल्या राजकीय नेत्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ही राजकारणात शिवसेनेला आणि शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला एक स्वतंत्र आणि वेगळे स्थान आहे. आणि याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांची किंवा अगदी सरळ सोप्या भाषेत मराठी माणसाने मराठी माणसासाठी चालवलेली ही अत्यंत जुनी आणि निष्ठावंत सैनिकांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या दोन शिवसेना कागदोपत्री अस्तित्वात आहेत. शिवसेना प्रेमी मराठी माणसे या दोन्ही शिवसेनेत विभागली गेली आहे. ज्यांना एकनाथ शिंदे यांचे बंड योग्य वाटते व ज्यांना सरकारच्या माध्यमातून विविध कामे करून घ्यायची आहेत असा वर्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला मुंगळ्यासारखा चिकटून बसला आहे. तर दुसरीकडे ज्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्यावर आहे अथवा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जे निष्ठावंत आहेत ते आजही कोणतीही अपेक्षा न करता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत.

- Advertisement -

त्यामुळे वर्षभरापूर्वी शिवसेनेतील बंडाला पाठबळ देऊन भाजपला तसेच त्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद घालवण्याचे आणि राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पाडण्याचे समाधान यातून निश्चितच मिळालेले आहे. मात्र हे सरकार पाडून शिवसेनेचा अथवा उद्धव ठाकरे यांचा आणि ठाकरे कुटुंबाला मानणार्‍या किंबहुना एकसंध शिवसेनेला मानणार्‍या वर्गाचा जो रोष भाजपने स्वतःच्या अंगावर ओढवून घेतला आहे त्यातून भाजप आगामी काळात स्वतःची सुटका कशी करून घेणार हा खरा आगामी निवडणुकांमधला कळीचा मुद्दा आहे. कारण शिवसेना फोडण्यासाठी भाजपने ज्या पद्धतीचा वापर केला ती राज्यातील सारासार विचार करणार्‍या नागरिकाला पटणारी नव्हते. भाजपने आपल्याकडे असलेल्या केंद्रीय सत्तेचा वापर करून केंद्रीय तपास यंत्रणांचा आपल्या सोयीसाठी वापर केला.

सुरुवातीला शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून त्यांना हैराण करण्यात आले. हे नेते जेव्हा शिवसेनेतून भाजपमध्ये आले तेव्हा त्यांच्यामागील चौकशी बंद करण्यात आली. इतकेच नव्हे तर शिंदे त्यांच्या बंडामागे आमचा काहीच हात नाही, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सांगत होते, पण जेव्हा शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार त्यांना गुवाहाटीवरून विधान भवनात आणण्यात आले तेव्हा या सगळ्यामागील सूत्रधार देवेंद्र फडणवीस होते, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ते ऐकल्यावर फडणवीस खुसूखुसू हसत होते, हे सगळ्यांनी पाहिले. त्यामुळे भाजपचा हा दुटप्पीपणा सगळ्यांसमोर उघडकीस आला आहे. या वागणुकीमुळे भाजपने लोकांच्या मनात चीड जागी केली आहे. त्याचा फटका आपल्याला बसणार याची त्यांना कल्पना आहे.

भाजपबरोबर २०१९ च्या निवडणुकीमध्ये युती करून मते मिळवलेल्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा राग भाजपला असणे सहाजिक आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठबळ देऊन ठाकरे सरकार पाडून राज्यात शिंदे आणि भाजप यांचे सरकार स्थापन करणे इथपर्यंत देखील सर्वसामान्य जनतेला कसलाही आक्षेप असण्याचे कारण नव्हतेच. सर्वसामान्य शिवसेनाप्रेमी मराठी माणसाला जो राग आहे तो एकसंध शिवसेनेला संपवण्याचा भाजपने केलेला प्रयत्न हा सर्वसामान्यांच्या पचनी पडलेला नाही. भाजप सरकार राष्ट्रीय पक्षाचे त्यामागील डावपेच आडाखे अथवा राजकीय हेतू काहीही असू शकतील. राजकारणात ते एक वेळ क्षम्य असतील मात्र केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपसारख्या चारित्र्यवान साधनशुचिता धारण केलेल्या एका जबाबदार राष्ट्रीय पक्षाने स्वतःच्याच एका छोट्या हिंदुत्ववादी मित्र पक्षाची अशी केलेली वाताहत ही महाराष्ट्रातील जनतेला सहन होणारी नाही.

शिवसेनेच्या या वाताहातीमध्ये उद्धव ठाकरेंना लोकसभेमध्ये किती जागा मिळतात अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती जागा जिंकता येतात हा प्रश्न गौण आहे. कारण निवडणुकांच्या पलीकडे शिवसेनाप्रेमी मराठी माणसांच्या जडण घडणीमध्ये शिवसेनेचे वेगळे स्थान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच प्रसार माध्यमांचे जे सर्व पब्लिक ऑपिनियन पोल याबाबतीत येत आहे ते विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात जाणारे आहेत. याचा परिणाम जसा दोन्ही शिवसेनांवर होऊ शकतो तसाच त्याचा राजकीय लाभ हा काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणे हे भाजपसाठी अधिक धोक्याचे आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता आणि राजकीय नेत्यांमधील वाढलेली मोठ्या प्रमाणावर कटुता कमी करण्यात जर भाजपला काही प्रमाणात यश येऊ शकले तरच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या भाजपला या प्रतिकूल परिस्थितीतूनही अनुकूल परिस्थितीकडे येऊ शकतात एवढेच या निमित्ताने म्हणता येऊ शकते.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -