Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयओपेडखरं काय आणि खोटं काय?

खरं काय आणि खोटं काय?

Subscribe

राज्यासह देशात राजकीय आणि सामाजिक पातळींमधील बदलाचे हिंदोळे पहायला मिळत आहेत. सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अबालवृद्धांपासून सगळेच आलेले दिसतात. म्हणूनच या हिंदोळ्यांमुळे अनेकांची डोकी गरगरायला लागली आहेत. त्यात आता भर पडली आहे ती, नव्या तंत्रज्ञानाची. हातात स्मार्टफोन येऊन आपण तितके ‘स्मार्ट’ बनलेलो नाहीत, हेच वास्तव आहे. आधीच सर्वसामान्यांची अवस्था ‘अर्जुना’सारखी झालेली असताना नव्या-नव्या घडामोडींमुळे तो आणखी संभ्रमित होत आहे.

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना अलीकडेच एका व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी रश्मिका नसून झारा पटेल नावाची तरुणी असल्याचेही नंतर उघड झाले. त्यापाठोपाठ अभिनेत्री कतरिना कैफ आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर यांचीदेखील अशीच एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. एका पाठोपाठ एक अशा क्लिप व्हायरल होत आहेत. मुळात हे सर्व उद्योग आर्टिफिशल इंटलिजन्स (एआय) या नव्या तंत्रज्ञानाचे आहेत. अशा व्हिडीओंना ‘डीपफेक व्हिडीओ’ म्हटले जाते. डीप लर्निंग आणि फेक या दोन शब्दांपासून हा शब्द तयार झाला आहे. एआयचे अल्गोरिदम आणि मशीन लर्निंग यांचा वापर करून फोटो किंवा व्हिडीओत बदल केला जातो. मशीन लर्निंग टूल हे एआयचे अल्गोरिदमच्या मदतीने चेहर्‍याचे स्कॅनिंग करते, त्यातून त्या चेहर्‍याची ठेवण आणि हावभाव जाणून घेतली जाते. त्यानंतर ते दुसर्‍या कोणत्यातरी चेहर्‍यावर ते लावले जाते. त्यातून असे फोटो आणि व्हिडीओ तयार होतात आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात. सुरुवातीच्या काळात आर्टिफिशल इंटेलिजन्सचे कौतुक सर्वत्र झाले, पण कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे याचा गैरवापरदेखील होत आहे.

बारकाईने बघितल्यावर असे डीपफेक व्हिडीओ किंवा फोटो लगेच ओळखता येतील. त्या व्हिडीओ किंवा फोटोतील प्रकाशाचा फरक, व्हिडीओत दिसणार्‍या संबंधित व्यक्तीच्या हालचाली व्यवस्थित बघितल्यास ते फेक असल्याचे लक्षात येऊ शकते. त्याबरोबरच तो व्हिडीओ किंवा फोटो पाठवणार्‍याच्या सवयी किंवा पूर्वेइतिहास लक्षात घेणेसुद्धा गरजेचे आहे. जाणूनबुजून फॉर्वर्ड करणारा किंवा जे येईल ते पुढे पाठवायचे, अशी सवय असलेल्यांकडून असे फेक व्हिडीओ किंवा फोटो येण्याची शक्यता अधिक असते. याच्याबरोबरच आपण आपले वैयक्तिक व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, सेलिब्रिटींचे डीफफेक व्हिडीओ किंवा फोटो तयार केले जातात आणि त्यासाठी ज्या मूळ व्हिडीओ किंवा फोटोचा वापर केला जातो, तो सर्वसामान्यांचाही असू शकतो. मुख्य प्रश्न हा आहे की, असे व्हिडीओ किंवा फोटो तुमच्याकडे आले तर, तुम्ही काय करणार? सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम ठरले आहे, पण त्याच्या आहारी बहुतेकजण गेले आहेत. त्यातही सोशल मीडियावर आलेल्या पोस्टची सत्यता न तपासता, ते फॉर्वर्ड करणार्‍या महाभागांची संख्या जास्त आहे. त्यांच्याबरोबरीने त्यावर शाब्दिक खल करणारेदेखील आहेत. यातील खरे काय आणि खोटे काय, याच्याशी या लोकांना काहीही देणेघेणे नसते. ही झाली सामाजिक स्तरावरची फसवणूक.

- Advertisement -

थेट संवादाचे प्रभावी माध्यम बनलेला मोबाईल ज्याच्या त्याच्या हाती दिसू लागला आणि कालांतराने तो स्मार्टफोन बनला. इंटरनेटचे जाळे आणि नानाविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे जगाच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत सर्वांना कनेक्ट करणे सुलभ झाले, पण या नव्या तंत्रज्ञानातील बारकावे ओळखण्याइतपत आपण तयार झालो का? तर नाही. आपण मोबाईल आणि त्यातील विविध अ‍ॅप्स वापरायला शिकलो, पण ते सावधगिरीने वापरायला शिकलो नाही.

संरक्षण मंत्रालयात प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत असणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांनी स्मार्टफोनला स्टेनगनची उपमा दिली होती. स्टेनगनमधून एकावेळी गोळ्या सुटण्याला मर्यादा असते, परंतु स्मार्टफोन त्याच्याहूनही धोकादायक आहे. एखादी पोस्ट काही सेकंदात व्हायरल होते आणि त्याचे पडसाद लगेचच उमटतात. यातील खरे काय आणि खोटे काय? या पोस्टमध्ये असलेला कंटेन्ट कधीचा आहे? तो आपल्या देशाशी संबंधित आहे का? त्याचे पुढे काय झाले? हे त्याच इंटरनेटवरून पडताळण्याचा प्रयत्न केला जात नाही. महत्त्वाचे म्हणजे, ही पोस्ट फॉर्वर्ड केल्यावर काय घडू शकते, याची सामाजिक जाणीव अनेकांना नसते. त्यातूनच काहीतरी विपरीत घडण्याची भीती निर्माण होते. मणिपूर धुमसत राहिले ते सोशल मीडियावरील अशाच पोस्टमुळे.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या नादात देशाची सुरक्षितता पणाला लागते, ती वेगळी. सोशल मीडियाचे बहुतांश प्लॅटफॉर्म हे विदेशी आहेत. त्यांना आपण आपला डाटा अर्थात वैयक्तिक माहिती सहज उपलब्ध करून देतो. याशिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला जातो. तीन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला याच प्रकारे हवा दिली होती. त्यावेळी ‘टूलकिट’ प्रकरण समोर आले होते. तंत्रज्ञानाचा हा धोका आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या निमित्ताने नव्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची संभ्रमित अवस्था आणखी वाढून, खरे काय आणि खोटे काय? हा प्रश्न आणखी गहन बनला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, फसगत करणारे इंटेलिजन्स केवळ ‘आर्टिफिशल’च असते असे नव्हे, तर ते ‘ह्युमन’ अधिक असते. आर्टिफिशल इंटेलिजन्स वापरणारी बुद्धीदेखील मानवीच असते आणि ही मानवी बुद्धी समोरच्याची फसवणूक करण्यासाठी नवनव्या ‘क्लुप्त्या’ शोधतच असते. कधी एखादी ‘लोभसवाणी स्कीम’ घेऊन, एखादे ‘पेमेन्ट’ केले नसल्याचे सांगत, एखाद्या गोष्टीची ‘केवायसी’ बाकी असल्याची सबब देत, तुमच्या क्रेडिट अथवा डेबिटकार्डचे ‘व्हेरिफिकेशन’ करायचे असल्याचे सांगत सर्वसामान्यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जाते. त्यातील कॉल्स किती खरे आणि किती खोटे? हे सुद्धा इंटेलिजन्सच आहे.

आपला नंबर या सर्वांना मिळतो कसा? त्यातही आपण फसवले गेलो असतो. कुरिअर घेताना, सुपरमार्केट तसेच मेडिकल स्टोअरमध्ये बिल बनवताना अशा अनेक वेळा आपण अनाहूतपणे आपला नंबर शेअर करत असतो आणि हाच मोठा व्यवसाय बनला आहे. वस्तुत: याला मनाई करता आली पाहिजे. पूर्वी मोबाईल नव्हता, तेव्हाही आपण कुरिअर स्वीकारत होतो, औषधे विकत घेत होतो, किराणा वस्तू विकत घेत होतो, मग आताच नंबर कशासाठी पाहिजे? हा प्रश्न कोणालाही पडत नाही. म्हणूनच, सातत्याने येणार्‍या अशा फोन कॉल्स आणि मेसेजेसनी आपण हैराण होतो. नंबर ब्लॉक तरी किती करणार?

हे झाले आर्थिक फसवणुकीचे, राजकीय फसवणूक तर परंपरागत चालत आली आहे. लोकांना हातोहात फसवण्याची चलाखी या राजकारण्यांकडे असते. एखादा वाद निर्माण करायचा किंवा एखाद्या प्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवायचे आणि वेळोवेळी त्याला हवा देत राहायचे, यात या राजकारण्यांचा हातखंडा असतो. त्यांचे यात व्यवस्थित चाललेले असते. भरडला जातो तो सामान्य नागरिकच. इतकी आश्वासने देऊन आणि विकासाचे इतके दावे करून आपण कोठे आहोत? आपल्या सभोवतालीचे प्रश्न तेच आहेत. आपली दिनचर्या तीच आहे. काय बदल झाला. गुलजारलिखित आणि दिग्दर्शित 1971 सालच्या ‘मेरे अपने’ चित्रपटातील एक संवाद आताही चपखल बसतो. त्यात मेहमूद (अनोखेलाल) हा शत्रुघ्न सिन्हाला (छेनू) देशातील सत्तांतराचा इतिहास समजावून सांगतो. ‘राजे-महाराजांना जहागीरदारांनी हटवले. जहागीरदारांना भांडवलदारांनी हटवले आणि आम्ही या भांडवलदारांना हटवले. पण गंमत पहा, जनता जिथे होती तिथेच उभी आहे…’ असे मेहमूद सांगतो. एकमेकांना शह देत, सरकार खाली खेचत सत्तेत नवनवीन पक्ष येत आहेत, पण आपल्या सर्वांचे प्रश्न तसेच आहेत.

सध्या राज्यात आरक्षणावरून वातावरण तापले आहे. हा मुद्दाही ठराविक काळातच का उपस्थित होतो? हा प्रश्न इतकी वर्षे का तडीस गेला नाही? हे समजू शकलेले नाही. ‘आपण सारे अर्जुन’ या पुस्तकात प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात – ‘धर्म आणि विज्ञान यांचे मार्ग भिन्न नाहीत. सत्याची प्रचिती जशी धर्मातून येते, तशीच विज्ञानातून येते, अर्थात, धर्म याचा राजकीय पातळीवरचा अर्थ इथे अभिप्रेत नाही. ‘निधर्मी’च्या नावाखाली धर्मांधता थयाथया नाचत आहे. ‘राखीव जागा’ मागासवर्गीयांसाठी हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाचावे लागतेय. हे प्रमाण चौतीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांपर्यंत आले आहे. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली. मागासवर्ग राहिलाच कसा? राखेतून वर आलेला जपान आज जगावर राज्य करतोय, ते ज्ञानमार्गाच्या आधारावर आणि अथक कष्टावर.’ एकूणच, या ना त्या माध्यमातून, विविध प्रकारे आपला बुद्धीभेद केला जात आहे आणि आपणही काही वेळेस गाफिल क्षणी त्याला बळी पडतो. त्यात आता ‘आर्टिफिशल इटेलिजन्स’ या नव्या तंत्रज्ञानाची भर पडली आहे. परिणामी खरं काय आणि खोटं काय? ही संभ्रमावस्था निर्माण होण्याचा आणखी एक मार्ग तयार झाला आहे. तशा अवस्थेत आपण सर्वसामान्य राहतो. पण आता वेळ आली आहे, आपला ‘इंटेलिजन्ट’पणा दाखवण्याची.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -