घरसंपादकीयओपेडजिथे सत्तेसाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व वापरले जाते...

जिथे सत्तेसाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व वापरले जाते…

Subscribe

सत्ता हेच सत्तेचे राजकीय उद्दिष्ट असते. घटना, न्याय, कायदे, कल्याणकारी राज्य या संकल्पनाही सत्तेसाठीच वापरल्या जातात. पुन्हा सत्ता टिकवण्यासाठी सत्ताच वापरली जाते. राजनीतीमध्ये नीती म्हणजेच नैतिकतेचा बिलकुल संबंध नसतो. धर्म, जात, समाज विघटनातील इतर घटक सत्तेला सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. जिथे सत्तेसाठी स्वातंत्र्य, सत्तेसाठी समता आणि सत्तेसाठी सोयीनुसार बंधुत्व वापरले जाते त्या राज्यात अराजक, हुकूमशाहीपेक्षा धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.

युद्ध आणि सत्तेसाठी दैव आणि धर्माचा वापर झाल्याने आणि तीच संस्कृती म्हणून रुजवली गेल्याने त्यातून सांस्कृतिक कलहाला सुरुवात झाली. येथील दैववादी कारणांमागेही युद्धांचा चेहरा आहे. युद्धांची ही परंपरा इतकी जुनी आहे नव्हे काही अंशी ती युद्ध संस्कृतीच आहे. युद्ध आणि निसर्गातील द्वंद्व यात मूलभूत फरक आहे. हाच फरक आयुष्य आणि जीवनातही आहे. असाच फरक खरे आणि सत्य यातही आहे आणि हाच फरक धर्म आणि कर्म यातही आहे. या फरकातील संकल्पना समजून घेण्यात बहुसंख्य समकाळात माणसांना अपयश आले आहे. अनेकांनी हा फरक समजावून सांगितला, मात्र त्यांची पूजा बांधून त्यांना मानवी विचारांतून काढून वास्तूतील दगडात सोयीस्करपणे बसवण्यात आले.

त्यामुळे सत्याच्या शोधाचा मूळ विषय बाजूला पडला आणि कर्मकांडाला महत्त्व आले. धर्म आणि कर्मकांडातून सामाजिक नियम अस्तित्वात आले. या नियमांना धर्माचे अधिष्ठान असल्याने ते मोडल्यास पापाचरणाची भीती दाखवली गेली. इथं कायदे राबवणार्‍या संस्था नव्हत्या. हुकूमशाही, वर्चस्ववाद आणि शोषणाची ही सुरुवात होती. या शोषणाचा पायाच मुळात धर्मसंस्था असल्याने सामाजिक संस्थेमध्ये या रुढी परंपरा उदात्त दैववादी तत्त्वांच्या आधारे बसवल्या गेल्या. त्यासाठी वेगळ्या राजकीय संस्थांची गरज नव्हती. धर्मसंस्थाच राज्य आणि सामाजिक संस्थांना नियंत्रित करत असल्याने या शोषणातून बाहेर पडण्याचा मार्गही बंद होतो.

- Advertisement -

या फसवणुकीतून माणूस निसर्गसत्य आणि विश्वातील असीम आनंदाला पारखा झाला. यातून निर्माण झालेल्या दुःखांची कारणे शोधण्यासाठी त्याने विज्ञान, तत्त्वज्ञान या नाविन्याचा शोध घेतला. हे शोध लागत राहिले, नवे गवसत गेले आणि जुने निकालात निघू लागले. या बदलणार्‍या संकल्पनातून सुखाचा भ्रम निर्माण झाला. या भ्रमाचा भोपळा कधीतरी फुटणारच होता. तसा तो वेळोवेळी फुटलाही आणि माणसाला या अनंत सृष्टीसमोर तो किती किरकोळ असल्याचे जाणवले. तो व्यक्तिगत होता म्हणून किरकोळ, सामान्य होता. या असीम निसर्गाचा भाग झाल्याचे समजल्यावर तो स्वतःच सृष्टी झाला.

त्याच्या सामान्यपणापासून त्याला निसर्गाच्या असीमतेकडे नेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना मात्र माणसाने समकाळात ठार वेडे ठरवले. काही अंशी त्यांना गुन्हेगारही ठरवले किंवा त्यांच्या आयुष्याचा अधिकार काढून घेतला. येशू, सॉक्रेटीस, गॅलिलिओपासून ते नरेंद्र दाभोलकर यांच्यापर्यंत ही यादी आहे. या मरण्यामारण्याला सोयीनुसार युद्ध, लढाया, चळवळी, स्वातंत्र्यलढे अशी नावेही दिली गेली. या बनावाच्या इतिहासाच्या खोल खोल गर्तेत माणूस बुडून गेला. त्याला यातून बाहेर काढणार्‍यांवरही त्याचा विश्वास नव्हता. त्यातही त्याने गट तट बनवले आणि त्याला विविध नावे दिली. या बेमालूम फसवणुकीमुळे सुरू झालेलं दुष्टचक्र अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही.

- Advertisement -

सत्ता हेच सत्तेचे राजकीय उद्दिष्ट असते. घटना, न्याय, कायदे, कल्याणकारी राज्य या संकल्पनाही सत्तेसाठीच वापरल्या जातात. पुन्हा सत्ता टिकवण्यासाठी सत्ताच वापरली जाते. राजनीतीमध्ये नीती म्हणजेच नैतिकतेचा बिलकुल संबंध नसतो. धर्म, जात, समाज विघटनातील इतर घटक सत्तेला सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. जिथे सत्तेसाठी स्वातंत्र्य, सत्तेसाठी समता आणि सत्तेसाठी सोयीनुसार बंधुत्व वापरले जाते त्या राज्यात अराजक, हुकूमशाहीपेक्षा धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.

सत्याच्या नावाखाली धर्माचे वाढलेले महत्त्व हे मांजर आणि मठाच्या झेन कथेतील आहे. एका मठात एक मांजर ध्यानाच्या साधनेत व्यत्यय आणत असे. त्यामुळे ध्यानसाधना सुरू होण्याआधीच ही मांजर बांधून व्यत्यय थांबवून भिख्खू ध्यानाला बसत होते. ही वार्ता कानोकानी पोहचली. त्यातून ध्यानसाधनेत मांजरीला कमालीचे महत्त्व आले. कुठल्याही धार्मिक कारणात मांजर शुभसंकेत मानली जाऊ लागली. मांजरीला मारणे पापाचरण ठरले. पुढे कुठल्याही प्रार्थना आणि धार्मिक कर्मकांडाआधी त्या ठिकाणी मांजर बांधली जाऊ लागली. मांजराचे रंग, जात आणि वय याचाही विचार होऊ लागला. कर्मकांडातील मार्जारकथेतून साहित्याची शाखा निर्माण झाली. बरीच ग्रंथसंपदा उदयास आली, पैकी कुठल्याही पुस्तकात मांजर हे केवळ ध्यानसाधनेत व्यत्यय आणणे रोखण्यासाठी बांधले जात होते, असे लिहिलेले नव्हते.

माणसांच्या समूहांना सत्य माहीत नव्हते. त्यामुळे केवळ परिणाम पाहणे, अनुभवणे आले. त्यातून कल्पनेचे जग उभे राहिले. या कथा कल्पनांचे आकलन न झाल्यामुळे त्याच्या सत्य आणि तथ्याचा शोध घेतला जाऊ लागला. सत्य आणि तथ्य यातील धूसर सीमारेषा पुसली गेली. आशय आणि विषय यातला भेदही संपुष्टात आला. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मावेळी निसर्गात फुले फुलली होती. सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाल्यावर त्यांच्या पावलाखाली कमलपुष्पे उमलली, अशी कथा सांगितली जाते. तथ्याचा विचार करता हे केवळ अशक्य आहे, परंतु निसर्गात एवढ्या मोठ्या सत्याचे आकलन झाल्यावर त्यासाठी कारण असलेल्या महामानवाबाबत अशी घटना घडायला हवी, हे तथ्य जरी नसले तरी ते असं व्हायला हवं, हाच उद्देश कवी आणि लेखकांचा होता.

दुसरीकडे बुद्धांना सद्धम्माचे आकलन होण्याआधी त्यांच्यावर माराने आक्रमण केल्याचा उल्लेख आहे. हा मार कुठलाही भौतिक अर्थाने राक्षस नव्हता, तर तो मानवी मनातील आसक्ती, इच्छा, लोभ, हव्यास, वासना या मानवी मूलभूत जाणिवांचा देहरुप असल्याचे स्पष्ट व्हावे, हा कवी आणि साहित्यिकांचा कल्पनाविलास असावा. इथं तथ्यापेक्षा सत्य समजण्याची गरज लक्षात घ्यावी. तथ्यात अडकून पडणे आणि तथ्य नाकारणे हीसुद्धा यातील दोन परस्परविरोधी टोके आहेत. हे दोन्ही घटक म्हणूनच धर्म आणि सद्धर्माच्या मार्गाने संपूर्ण सत्य समजण्यास कुचकामी ठरतात. धर्म सत्याचा शोध घेण्याचा मार्ग असू शकतो. धर्म म्हणजे सत्य नाही. धर्म राजकीय व्यवस्थेत सत्तेची सोय असते.

धर्म सत्तेची गरज असतो, सत्याची नाही. देशातील सगळ्याच धर्मात तत्त्वज्ञान असते. हे तत्त्वज्ञान सत्याच्या मार्गावर जाण्यास सहाय्यक ठरू शकते, मात्र हेच सत्य नाही, असे सत्य ज्याचे त्यालाच अनुभवावे लागते. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर म्हणूनच पसायदानातून विश्वात्मक देवाची आळवणी करतात. हे संपूर्ण सत्य म्हणजेच स्वयंप्रकाशित होणे होय. हा प्रकाश धर्माचा नसतो तर सत्याचा असतो आणि सत्यावर कुठल्याही धर्माची मालकी नसते. धर्म म्हणजे वाट तर कर्म म्हणजे संपूर्ण सत्य. धर्माचा पाया हाच कर्मसिद्धांत असल्याने धर्मसिद्धांतावर आधारित राजकारण आणि कर्मसिद्धांतावर आधारित समाजव्यवस्था यात कायम संघर्ष सुरू असतो. मग समुदाय एकाच धर्माच्या अनुयायांचा का असेना, संघर्ष टाळता येणार नसतो. अंधारातून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल म्हणजेच धर्माचा मार्ग म्हणता येईल.

या प्रकाशाचं अस्तित्व दृष्य असतं. त्यासाठी माध्यम लागतं दिवा, सूर्य वगैरे. त्यामुळे ते भौतिक आहे. प्रकाश कणांचा बनलेला असतो का, हा प्रश्न आहे, मात्र असं कोणतं साधन किंवा माध्यम आहे ज्यातून अंधार बाहेर पडतो? तर नाही. कारण अंधार हा पोकळीत कायम असतो. प्रकाशामुळे तो झाकला जातो इतकंच, मात्र त्याचं अस्तित्व नाकारून चालत नाही. दु:ख, वेदना, नकारात्मक जाणिवा याही अशाच मनाच्या खोल अंधारात दडून बसलेल्या असतात, जो ज्या परिस्थितीतून, अनुभवातून आलेला असतो, त्यावरून हा काळोख किती घनदाट असावा हे ठरतं. अंधार म्हणजे अस्तित्वाचा जाणिवेचा पूर्ण अभाव. हा अभाव जेवढा गडद आणि विस्तारित तेवढ्या पोकळीत प्रकाशाचा लवलेश नाही. मग अभावातून निर्मिती शक्य आहे का? अभावग्रस्तांचे साहित्य, कला, रचना किंवा त्यातून विकसित झालेली प्रकाशाच्या दिशेने निघालेली जाणीव अशी ही मोघम बाब नाही, तर मुळातच यामागे नैसर्गिक प्रकाशाची तीव्र ओढ हीच आहे. ही प्रकाशाची ओढ सकारात्मक जाणिवेतूनच आली आहे.

वाट चुकलेल्या धर्मानुयायांकडून खरं म्हणजे सत्य अशी ढोबळ व्याख्या केली जाते. भौतिक इंद्रियांच्या आकलनाची मर्यादा खर्‍याला असते. अनेकदा जे वस्तुतः खरे असते किंवा दिसते ते सत्य असेलच असं नाही. खर्‍याचे ठोकताळे लावून सत्य शोधता येत नाही. धर्माचा आधार हेच वस्तुनिष्ठ खरे असते. अनेकदा या खर्‍याचाही भासच दाखवला जातो. भासच असल्याने खरेच पूर्ण पकडीत येत नाही, सत्य फार दूरची गोष्ट होते. या कथित खर्‍यावरच धर्माची दुकानदारी, कट्टरवादी, हिंसेच्या समर्थनाची मदार असते. सत्य समजल्यावर किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी या तकलादू गोष्टींची गरज राहत नाही आणि हो धर्म आणि त्या अनुषंगाने येणार्‍या जात, विभाजन किंवा इतर घटकांचीही माणसाला गरज राहत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -