घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ना तरी उद्यानी माधवी घडे / तेथ वनशोभेची खाणी उघडे / आदिलापासोनि अपाडें / जियापरी //
किंवा ज्याप्रमाणे बागेत वसंत ऋतु निघाल्यावर वनशोभेची जणू काय खाणच उघडून पहिल्यापेक्षा विशेष शोभा देते.
नाना घनीभूज सुवर्ण / जैसें न्याहाळितां साधारण / मग अळंकारीं बरवेपण / निवाडू दावी //
अथवा सोन्याच्या लगडी पाहिल्या असता दिसण्यास साधारण दिसतात, पण त्यांचेच दागिने बनविले म्हणजे त्यांची शोभा ज्याप्रमाणे काही निराळीच दिसते.
तैसें व्यासोंकीं अळंकारिलें / आवडे ते बरवेपण पातलें / तें जाणोनि काय आश्रयिलें / इतिहासीं //
त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीने भारती कथा सांगण्याचे पत्करिले व तिला जशी हवी तशी शोभा आल्यामुळेच की काय, इतिहासांनी आपण होऊनच त्या कथेचा आश्रय केला.
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं / सानीव धरनि आंगी / पुराणें आख्यानरूपें जगी / भारता आलीं //
किंवा पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणून अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरूपाने भारतात येऊन जगात प्रसिद्धीस आली.
म्हणौनि महाभारती नाहीं / ते नोहेचि लोकीं तिहीं / येणें कारणें म्हणिपे पाहीं / आसोच्छिष्ट जगत्त्रय //
म्हणून भारतात जी कथा नाही ती त्रैलोक्यातही नाही. यावरून सर्व जगात ज्या कथा आहेत, त्या व्यासांच्या उष्ठ्या आहेत असे म्हणतात.
ऐसी जगीं सुरस कथा / जे जन्मभूमि परमार्था / मुनि सांगे नृपनाथा / जनमेजया //
अशी ही गोड व केवळ परमार्थाच्या उत्पत्तींचे स्थानच अशी कथा वैशंपायन हे जनमेजय राजास सांगतात.
जें अद्वितीय उत्तम / पवित्रैक निरूपम / परम मंगलधाम / अवधारिजो //
ती कथा अद्वितीय, उत्तम, पवित्र, उपमारहित आणि अतिकल्याणकारक अशी आहे, ती ऐका.
आतां भारतकमळपरागु / गीताख्यु प्रसंगु / जो संवादला श्रीरंगु / अर्जुनेसी //
आता भारत हेच कोणी कमल व भगवंतांनी स्वतः अर्जुनास सांगितलेला गीताविषय हाच त्यातील पुष्परेणू होय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -