घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥
म्हणून ज्याने मनातील मी व माझे हा संकल्प वाढविला आहे, तो आपणच आपला शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, पण जो पुरुष आत्मानुभवी आहे तो वृथा अभिमान धरीत नाही.
तया स्वांत:करणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥
ज्याने आपले मन जिंकले आहे व ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत, त्याला इतरांप्रमाणे परमात्मा लांब नाही,
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपीं ॥
सोन्याचा हिणकटपणा तावून नाहीसा झाल्यावर तेच जसे उत्तम सोने होते, तसेच मनातील संकल्प नाहीसे होताच जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्धच आहे.
हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळों जाणें आकाशा । आना ठाया ॥
घटांतील आकाशाला, घटाचा नाश झाल्यावर जसे महाकाशाला मिळण्याकरिता दुसरे ठिकाणी जावे लागत नाही,
तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥
तसा ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे.
आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुखाची कडसणी । इयें नसमाती कांहीं बोलणीं । मानापमानांची ॥
अशा स्थितीत शीत किंवा उष्ण, सुख किंवा दुःख, मान किंवा अपमान प्राप्त झाले असताही ज्याचे ठिकाणी त्याचा विचार संभवत नाही.
जे जिये वाटा सूर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व होये । तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणौनी ॥
कारण ज्या वाटेने सूर्य जातो, त्या वाटेतील तेवढेच विश्व प्रकाशित होते. त्याचप्रमाणे जो परमात्म्याला प्राप्त होतो, तो परमात्माच असल्यामुळे साक्षात ब्रह्मच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -