घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तंव श्रीकृष्ण म्हणती ऐसें । हें उत्सृंखळ बोलणें कायसें । आम्हीं सांगतसों आपैसें । वरि पुशिलें तुवां ॥
तेव्हा कृष्ण म्हणाले, आम्ही स्वतःहून तुला सांगत असताना मग प्रश्न करण्याचा इतका उतावीळपणा का करतोस?
तरी विशेषें आतां बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पहावें ॥
तर आता आम्ही तुला स्पष्टपणे सांगतो, पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग घडेल, म्हणून तशा रीतीच्या योगाभ्यासाकरिता एक जागा शोधून काढावी.
जेथ अराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखिलिया जें ॥
ती जागा अशी असावी की, ज्या ठिकाणी करमणुकीची हौस पुरी होत असल्यामुळे, बसल्यावर उठू नये, असे वाटावे; आणि जी पाहताक्षणीच वैराग्य दुप्पट व्हावे.
जो संतीं वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥
ती जागा पूर्वी सत्पुरुषांनी वसविलेली असावी व तिच्यापासून मनाच्या संतोषाला साहाय्य व्हावे व धैर्याचा उत्कर्ष व्हावा.
अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभवु वरी । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥
त्या जागेत अभ्यास करण्यास उत्तेजन यावे आणि मनाला अनुभवाने माळ घालावी अशी त्या जागेची रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता असावी.
जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥
पार्था, त्या जागेच्या जवळून गेले असता पाखंड्याचेही मनात तपश्चर्या करण्याबद्दल आस्था निर्माण व्हावी.
स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां । तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥
एखादा मनुष्य सहज वाट चालत असता जर अवचित त्या ठिकाणी येईल, तर जरी तो कामेच्छु असून आपल्या घरी जात असला, तरी ते ठिकाण सोडून जाऊ नये, असे त्याला वाटावे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -