घरमनोरंजनवास्तुविशारद ते अभिनेत्री 'दीप्ती लेले'

वास्तुविशारद ते अभिनेत्री ‘दीप्ती लेले’

Subscribe

तिला आपण नेहमीच विविध जाहिरातींमधून पाहिलं आहे. तुझं माझं जमेना, लगोरी, आम्ही दोघे राजा राणी, ती फुलराणी, अबोली अशा मालिकांमधून काम करत असतानाच, काहींमध्ये तिने साकारलेली ग्रे शेड भूमिकाही नोंद घेण्यासारखी आहे. सोबतच तिला मराठी चित्रपट विश्वामध्ये सायकल, होम स्वीट होम, शिवाजी पार्क, पांघरूण, भाई व्यक्ति की वल्ली अशा दर्जेदार कलाकृतींमध्येही प्रवेश मिळाला. ती अभिनय करत असलेलं हरवलेल्या पत्त्यांचा बंगला हे नाटक रसिकांना भावत आहे.

अभिनेत्री दीप्ती लेले एका मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करून, संपूर्ण फॅमिली सोबत गोव्याला गेली होती. ज्या ठिकाणी ती उतरली होती तिथे नेटवर्क अजिबात नव्हतं. अशातच मोबाईल चाळत असताना दीप्तीला ‘चंद्रकांत कुलकर्णी’ असा एक मिस्ड कॉल दिसला, ज्यांना ती क्वचितच इतर काही कामासाठी भेटली होती. त्यामुळे ती घटनाच तिच्यासाठी अनपेक्षित होती. ते नाव पाहताच तिची तारांबळ उडाली!… दीप्ती सांगते की, मी अक्षरशः मरत होते की, मी कॉलबॅक कुठून करू त्यांना?… मग लक्षात आलं की, तिच्या बहिणीला थोडं थोडं नेटवर्क मिळत होतं. तिच्या नंबरवरून तिने चंद्रकांत कुलकर्णींना मेसेज पाठवला की, मी गोव्यावरून परवा परत येईन. कुलकर्णी म्हणाले येता क्षणीच मला भेट. कारण दुसऱ्या दिवशी मी लगेच अमेरिकेला जाणार आहे. ठरल्याप्रमाणे दीप्ती मुंबईला आली आणि चंद्रकांत कुलकर्णीच्या ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकातील महत्त्वाची भूमिका तिच्या वाट्याला आली.

- Advertisement -

गोष्ट इथेच संपत नाही. दीप्ती सांगत होती की, चंद्रकांत कुलकर्णींसारखे दिग्गज दिग्दर्शक आणि समोर वंदना गुप्तेंसारख्या वाकबगार अभिनेत्री म्हणजे तिच्यासमोर एक मोठ्ठं आव्हान होतं. चंदू सरांबरोबर काम करणं सोपं नाहीये. त्यांना तुमच्यातल्या कलाकाराकडून शंभर टक्के रिझल्टची अपेक्षा असते. त्यांचं वेगळेपण म्हणजे नाटक फ्लोअरवर येण्याआधी किंवा नाटकाच्या रीडिंगपूर्वी त्यांच्यातील दिग्दर्शकाने अंतःचक्षुने आख्खं नाटक पाहिलेलं असतं. त्यामुळे एक कलाकार म्हणून तुम्ही ते किती स्पीडने कॅच करता, ही खरी परीक्षा असते. मुळातच मी नाटकातून आले नाही. त्यामुळे नाटकातलं अगदी सूक्ष्मातलं सूक्ष्म डिटेलिंग ते ज्या पद्धतीने करायचे ते मी सर्वात प्रथम अनुभवत होते. मुख्य म्हणजे आपल्याला जर उत्तम कलाकार व्हायचं असेल तर नाटक करणं का गरजेचे आहे हे मला चंदू सरांमुळे कळलं. तर दुसरीकडे दीप्तीला नाटकात आपल्यासमोर वंदना गुप्तें सारख्या दिगज कलाकार उभ्या राहणार याचं दडपण आलं होतं. परंतू तिचं ते दडपण वंदनाताईंनी त्यांच्या लाघवी स्वभावाने दूर केलं. अगदी दीप्तीचा हात धरून तिला नाटकामध्ये कसं वावरायचं हे वंदनाताईंनी तिला शिकवलं. आजतागायत ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ चे जवळजवळ दोनशे च्या आसपास यशस्वी प्रयोग झाले आहेत.

Deepti Lele Biography, Age, Boyfriend, Family, Facts and More

- Advertisement -

आज अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःचा जम बसवणारी दीप्ती पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबामधून येते. तिचे बाबा सिव्हिल इंजिनियर तर आई केमिस्ट म्हणून काम करत होती. याबद्दल दीप्ती सांगते की, माझ्यासाठी माझे बाबाच आदर्श आहेत. त्यांचे प्रिन्सिपल्स, एथिक्स आणि मॉरलस् आणि ते ज्या पद्धतीने काम करतात त्याचा माझ्यावर प्रभाव आहे. ती पुण्यातल्या वाडा संस्कृतीमध्ये लहानाची मोठी झाली आणि हुजूरपागा शाळेमध्ये तिचं शालेय शिक्षण झालं. ‘बी एन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ मधून ती आर्किटेक्चर झाली. पुढे तीन वर्ष तिनं आर्किटेक्चर म्हणून नोकरी केली. कॉलेजच्या शिक्षणापर्यंत तिचा कधी अभिनयाशी संबंध आला नव्हता. त्यात करिअर करणं तर खूप लांबची गोष्ट होती. परंतू आवड म्हणून तिने ग्रॅज्युएशन नंतर प्रशांत दामलेंच्या ‘टी स्कूल’मध्ये अभिनयाचे पहिले धडे गिरवले. त्यानंतर तिने केलेल्या खुटवड सरांच्या अभिनय प्रशिक्षणानंतर तिची पावलं अभिनयाकडे गांभीर्याने वळली.

दीप्ती तिच्या अभिनयात पदार्पण करण्याची एक गमतीदार गोष्ट सांगते की, एका मित्राच्या सांगण्यावरून दीप्ती प्रवीण तरडेंच्या ‘तुझं माझं जमेना’ या मालिकेच्या ऑडिशनसाठी पोहोचली. अभिजीत केळकर सोबत तिचा सीन घाबरत घाबरतच पार पडला. तो झाल्यावर तिने प्रवीण तरडेंना फोन केला आणि माझं ऑडिशन झालं असं कळवलं. तेव्हा तिला पहिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण प्रवीण तरडे म्हणाले, दीप्ती ते ऑडिशन नव्हतं. आपण प्रत्यक्ष सीन शूट केला होता. परंतू तरीही दीप्तीचा विश्वास बसला नाही. ही गोष्ट ती कुणाकडे बोलली नाही. अचानक एक दिवस तो एपिसोड टेलिकास्ट झाला तेंव्हा तिचा विश्वास बसला. दीप्तीचा अभिनय प्रवास सुरू झाला.

दीप्ती सांगते की, माझा अभिनय प्रवास सुरू झाला खरा, पण घरच्यांसाठी मात्र तो शॉक होता. कारण आर्किटेक्चर म्हणून करिअर झाल्यानंतर मी अभिनय क्षेत्राकडे वळेन असं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. बाबांच्याही कन्सल्टन्सीमध्ये त्यावेळी मी त्यांना मदत करत होते. त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये हे होतं की, पुढे जाऊन मी कदाचित त्यांची कन्सल्टन्सी सांभाळेन. परंतु दीप्तीला अभिनय क्षेत्राने जी काही ओळख मिळवून दिली होती त्यामुळे तिचा आत्मविश्वास द्विगुणित झाला होता. आई बाबांच्या छत्रछायेखाली सुरक्षित राहण्यापेक्षा छोटं का होईना, पण या क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं अशी तिची तीव्र इच्छा होती. दीप्तीची पावलं पुण्याकडून मुंबईकडे वळली. काही जाहिराती मिळाल्या. पाठोपाठ मालिकांमध्ये तिला कामं मिळत गेली. काही दर्जेदार चित्रपटांमधील भूमिका तिच्या वाट्याला आल्या. परंतू इथं सोप्प काहीच नसतं याचाही अनुभव दीप्तीच्या पदरी आला. दीप्ती सांगत होती की, खरंतर सुरुवातीला मला काहीच संघर्ष करावा लागला नाही. सगळ्या गोष्टी योगायोगाने मला मिळत गेल्या. कोविड नंतरचा काळ माझ्यासाठी संघर्षाचा होता. कारण परिस्थिती बरीचशी बदलली होती. मला खूप चांगल्या माणसांकडून प्रोजेक्ट मिळत होते. त्यानुसार मी कामही करत गेले. जमेल तेवढं मी माझ्या चॉईसने काम करत होते. मला जेंव्हा ब्रेक हवा असायचा तेंव्हा मी माझ्या सवडीनुसार ब्रेकही घ्यायचे. परंतु कोविडमध्ये जी काही गणित बदलली त्यामुळे माझा आत्मविश्वासच गेला. इतर क्षेत्रातली मंडळी घरबसल्या ऑनलाईन काम तरी करू शकत होती. त्यांना काहीतरी पगार मिळत होता. मी मात्र त्यावेळी पैशांची चिंता प्रथमच अनुभवत होते. त्या काळामध्ये कामच नसल्यामुळे मी पुन्हा कॅमेरा फेस करू शकेन की, नाही एवढा माझा आत्मविश्वास ढासळला झाला होता. फार कमी ऑफर्स यायला लागल्या. चित्रपटातले कलाकार मालिका करायला लागले. सगळंच व्यस्त प्रमाण झालं होतं. सोशल मीडियावरले फॉलोवर्स बघून काम मिळायला सुरुवात झाली होती. मला हे काहीच कळत नव्हतं. आज मी काळाची गरज ओळखून सोशल मीडियावर असते. असा हा सारा संघर्ष होता. पण आता पुन्हा पूर्ववत सगळं होऊ लागलं आहे.

काळाच्या ओघात अनुभवाने येणारं शहाणपण दीप्तीला सद्ध करून गेलं. झगमगत्या सितार्‍यांच्या दुनियेमध्ये राहूनही व्यवहार चोख हाताळण्याचं तंत्र दिप्ती शिकत आहे. मुंबई नगरीत एकट राहून अभिनयामध्ये करिअर घडवण्याचं तिचं धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे. आज स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ती जे काही करत आहे त्याचा तिच्या आई-बाबांना सार्थ अभिमान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -