घरमनोरंजनलक्षा’त राहणारा अभिनय

लक्षा’त राहणारा अभिनय

Subscribe

मराठी चित्रपटात विनोदाची परंपरा ही आजची नाही. प्रत्येक अभिनेत्याने स्वत:चे विनोदातले वैशिष्ट्य दाखवून काही दशके ही त्या अभिनेत्याने गाजवलेली आहेत. बबन प्रभू, राजा गोसावी, शरद तळवळकर, गणपत पाटील, दादा कोंडके, राम नगरकर अशी काही नावे सांगता येतील. लक्ष्मीकांत बेर्डे यानेसुद्धा काही दशके गाजवलीच नाहीत तर ती संस्मरणीय होतील याची दक्षताही घेतलेली आहे. योगायोग म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे हा लक्ष्मीकांतचे जीवनपट उलगडून सांगणारा लक्ष्यातल्या गोष्टी हा कार्यक्रम करत आहे. अशा स्थितीत त्याचा चिरंजीव अभिनय बेर्डे याची मुख्य भूमिका असलेला ‘अशी ही आशिकी’ प्रदर्शनासाठी सज्ज झालेला आहे. बाप-लेकाच्या कारकिर्दीमागची गोष्ट.

ठरवले म्हणजे चित्रपटात काम मिळेलच असे नाही. पण लक्ष्मीकांत बेर्डेला नाटकात मात्र काम करण्याची इच्छा होती. साहित्य संघात रमला तो तेवढ्यासाठीच. कुठल्या एका नाटकाला आयत्यावेळी कलाकार आला नाही. ती भूमिका लक्ष्मीकांतने निभावली. यानिमित्ताने कलावंतांच्या ग्रूपमध्ये तो सहभागी झाला. छोटी-मोठी कामे करत असताना अभिनयही केला. या प्रवासात मुख्य कलाकारांरोबर बॅकस्टेज कलाकारांची प्रचंड धावपळ होते, हे त्याने जवळून पाहिले होते. काही झाले तरी सगळ्यांना सहकार्य करायचे हा फक्त निर्णय घेतला नाही तर त्याने ते कृतीत उतरवले. बरेचसे कलाकार एकदा का चित्रपट करायला लागले की त्यांना रंगमंचाचा विसर पडतो. अलीकडे मालिकेला वेळ देऊन मधल्या काळात नाटक करण्याला बरेचसे कलाकार प्राधान्य देतात. पण लक्ष्मीकांतचे गणित त्यावेळी थोडे वेगळे होते. तो सकाळ, रात्री चित्रपटाचे शुटींग करून मधल्या काळात खास नाटकासाठी खास वेळ देत होता. त्याच्या पाठीमागचे कारण म्हणजे एका नाटकावरती पंचवीस-तीस माणसे अवलंबून असायची. त्यांना वेळच्या वेळी मानधन मिळावे हे त्यापाठीमागचे विचार होते. विशेषकरून बॅकस्टेज आर्टीस्टना लागलीच मानधन कसे मिळेल यावर लक्ष्मीकांतचा भर होता.

लक्ष्मीकांतने फक्त बॅकस्टेज आर्टीस्टला जपले नाही तर निर्माते, दिग्दर्शक यांच्यामागे सुद्धा तो खंबीरपणे उभा होता. प्रेक्षकांच्या दृष्टीने लक्ष्मीकांत हा महेश कोठारेचा हक्काचा कलाकार आहे, असे बोलले जात असले तरी त्यावेळी सचिन पिळगावकरलाही त्याने तेवढाच वेळ दिलेला आहे. दोघांच्याही चित्रपटामध्ये काम करण्याला त्याने प्राधान्य दिलेले आहे. सचिन, महेश या दोघांनी जरी चित्रपटाचा कायापालट केला असला तरी त्यांच्या या प्रयत्नात लक्ष्मीकांतचा तेवढाच मोठा वाटा आहे. अशोक सराफने सुद्धा या कामी त्यांना सहकार्य केलेले आहे. खरंतर चित्रपट सृष्टी ही भुलभुलय्याची आहे. जोपर्यंत कलाकार सानिध्यात आहे तोपर्यंत निर्माते, दिग्दर्शकाने सहकलाकाराचे कौतूक केलेले आहे. पण लक्ष्मीकांतच्या बाबतीत तसे झालेले नाही. सचिन, महेश, अशोक हे तिघे आजही लक्ष्मीकांतविषयी भरभरून बोलतात, त्यांचे डोळे पाणवतात.

- Advertisement -

अभिनय बेर्डे हा लक्ष्मीकांतचा चिरंजीव आहे, हे आता जगजाहीर झालेले आहे. अभिनय हा कुमार अवस्थेत असताना लक्ष्मीकांत दिवंगत झाला. अभिनयापलीकडे त्याने फारसे काय पाहिले नव्हते, अनुभव घेतला नव्हता. प्रिया बेर्डे ही त्याची आई. प्रियाचे वडील अरुण कर्नाटकी, आई लता यांच्याकडून प्रेरणा घेऊन अभिनयाची कारकीर्द सुरू केली. मामी माया जाधव यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. हाच काहीसा वारसा अभिनयने उचलला. कॉलेजमध्ये शिकत असताना एकांकिका काय आहे हे क्षेत्र त्याने आजमावले. सतीश राजवाडेने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटामध्ये सर्वप्रथम संधी देऊन त्याला रुपेरी पडद्याची दारे मोकळी करून दिलेली आहेत. आर्या आंबेकर ही त्याची या चित्रपटात नायिका होती.

अभिनय आता चित्रपटामध्ये छान रुळला आहे म्हणताना लक्ष्मीकांतचे कट्टर दोस्त सचिन आणि महेश यांनी अभिनयला चित्रपटात घेण्याची तयारी दाखवलेली आहे. अशी ही आशिकी हा चित्रपट सचिन पिळगावकरने दिग्दर्शित केलेला आहे. त्यात अभिनय बेर्डे हा मुख्य भूमिका निभावणार आहे. खर्‍या अर्थाने स्वतंत्रपणे नायक म्हणून हा त्याचा पहिला चित्रपट आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतले निर्माते, कॅसेट वितरक भूषण कुमार, किसन कुमार यांचे सहकार्य या चित्रपटाला लाभलेले आहे. त्यामुळे त्याची प्रसिद्धीही तेवढीच मोठी होणार आहे. महेश, सचिन यांनी पुढाकार घेतल्यामुळे ‘लक्षा’त राहणार अभिनय असे काहीसे त्याच्या बाबतीत घडणार आहे.

- Advertisement -

मानधन दिले का?

पडद्याच्या मागे काम करणार्‍यांसाठी लक्ष्मीकांत बेर्डे हा देव होता. त्याची चलती असताना या कलाकारांना वेळच्यावेळी मानधन मिळेल, असे तो पाहत होता. ठरलेली रक्कम हाती लागावी हाही त्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. कोणी कलाकाराने लक्ष्मीकांतला ‘मानधन दिले नाही’ असे सांगितले तर तो स्वतः पाठपुरावा करत होता. अगोदर पडद्यामागच्या कलाकारांचे पैसे द्या, नंतरच मी शुटींगला येईन असे तो सांगत होता. असे बरेचसे किस्से लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या लक्ष्यातल्या गोष्टी या कार्यक्रमात ऐकायला आणि पहायला मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -