घरमनोरंजन`मुंबई मेरी जान’ : मानवी भावभावनांचा कोलाज

`मुंबई मेरी जान’ : मानवी भावभावनांचा कोलाज

Subscribe

कुठल्याही राष्ट्रावर एखादी आपत्ती आली, एखादं संकट उद्भवलं की त्याचे त्या राष्ट्रातील जनमाणसावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे पडसाद उमटत असतात. त्यातही पुन्हा ती घटना आतंकवादी हल्ला, परकीय शक्तींचे आक्रमण अशा बाह्य स्वरूपाची असेल तर अशावेळी संपूर्ण राष्ट्र त्याविरोधात एकत्रितपणे उभं राहतं. त्याचा एक सकारात्मक परिणाम असा की अशावेळी त्या राष्ट्राची एकता आणि एकात्मता दिसून येते. तर काहीवेळा (मुख्यत्वे आतंकवादासारख्या मुद्यावर बोलायचं झाल्यास) जनमाणसातील भीती आणि त्या विशिष्ट घटनेकडे पाहण्याचे वेगवेगळे विचार दिसून येऊन समाजाचं वेगवेगळ्या विचारधारांच्या रूपात विभाजन होतं. अशावेळी समाजाचं, त्यातही पुन्हा व्यक्ती, समूहाच्या योग्य-अयोग्य सर्वच अंगांचं चित्रण करणारं माध्यम या नात्याने चित्रपट आणि मालिका अशा घटना आणि त्यांचे पडसाद अशा सर्व बाजूंना समोर आणण्याची ताकद बाळगत असतात. त्यातूनच अशा घटनांचं, अगदीच वास्तववादी ते काहीसं हाइटन्ड रियालिटी प्रकारात मोडणारं, डॉक्युमेंटेशन पहायला मिळण्याची शक्यता असते.

जागतिक महायुद्धांच्या काळात आणि त्यानंतरही वेळोवेळी त्यांची पार्श्वभूमी वापरत निर्माण झालेले चित्रपट, किंवा शीतयुद्धाच्या काळात हेरपटांचं वाढलेलं प्रमाण यापासून ते या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेला हादरवून टाकणारा ९/११ च्या ‘वर्ल्ड ट्रेंड सेंटर’वरील हल्ल्यावरील चित्रपट अशी अनेक उदाहरणं देता येऊ शकतात. अर्थात युद्धाचं चित्रण आणि देशातील महत्त्वाच्या स्थळावर झालेल्या, नागरिकांच्या आयुष्याची घडी विस्कटवून टाकणार्‍या हल्ल्याचं चित्रण या दोन्हींच्या स्वरूपात बराच फरक आहे. सदर हल्ला ते त्या घटनेचा समावेश असलेल्या चित्रपटाच्या निर्मितीचं वर्ष यात बराच काळ जाऊ द्यावा लागणं यावरूनच सदर घटनेचे परिणाम लक्षात येतात. याखेरीज विशिष्टपणे ९/११ बाबत बोलायचं झालं तर त्यापश्चात जनतेमध्ये दिसून येणारा (भलेही त्याचं प्रमाण कमी का असेना) मुस्लीमद्वेष्टेपणा आणि भीती या गोष्टीही सदर घटनेच्या दूरगामी परिणामाच्या द्योतक आहेत. अगदी ट्रम्पची भूमिकादेखील याकडे बोट दाखवतेच.

- Advertisement -

भारतातही २००६ मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेले, ७/११ चे साखळी बॉम्बस्फोट किंवा २००८ मधील २६/११ चा हल्ला या घटना विसरता येण्याजोग्या नाहीत. अशावेळी त्यांच्यावर आधारित चित्रपट बनवणं आणि तो उत्तमही असणं हे आपल्या चित्रपटसृष्टीकडे पाहता काहीसं असाध्य वाटत असलं तरी (यातील पहिल्या घटनेवर आधारित) निशिकांत कामतचा ‘मुंबई मेरी जान’ (२००८) ही जबाबदारी उचलणं आणि ती व्यवस्थितपणे निभावणं, या दोन्ही गोष्टी साध्य करतो.

अमेरिकेचा आणि मुस्लीमद्वेष्ट्या प्रवृत्तीचा दाखला देण्याचं कारण हे, की ‘मुंबई मेरी जान’मध्ये प्रातिनिधिक स्वरूपाची पाच कथानकं समांतरपणे चालतात. ज्यातील एका कथानकात अशा घटनेच्या पश्चात अधिक प्रकर्षाने दिसणारा हिंदू-मुस्लीम वाद हा मध्यवर्ती मुद्दा दिसून येतो. याखेरीज इतर कथानकांच्या मदतीनेही चित्रपट पोलीस यंत्रणा, माध्यमं, समाजाची वेगवेगळी टोकं या बाबींकडे कुठल्याही प्रकारच्या पूर्वग्रहदूषित नजरेतून न पाहता, आपला उद्देश फक्त ही कथासूत्रं पडद्यावर आणण्यापुरता मर्यादित ठेवतो. या पाचही कथासूत्रांमधील पात्रांवर आणि त्यांच्या हल्ल्याचे जे काही बरे-वाईट परिणाम होत आहेत याची गोष्ट साधारण आठवड्याभरात घडणार्‍या घटनांच्या माध्यमातून सांगितली जाते. आठवड्याभरात निवृत्त होणारा एएसआय तुकाराम पाटील (परेश रावल) आणि त्याचा तरुण सहकारी सुनील कदम (विजय मौर्य) यांचं कथानक हल्ल्यानंतर अधिक सतर्क झालेली पोलीस यंत्रणा आणि या दोघांच्या जगाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा आढावा घेतं. एका न्यूज चॅनलची अँकर असलेल्या रुपाली जोशीचं (सोहा अली खान) दोनेक महिन्यांत लग्न होणार असतं, मात्र हल्ल्यानंतर तिचं वैयक्तिक आणि व्यावसायिक, अशी दोन्ही आयुष्यं काहीशी अस्थैर्यपूर्ण होतात. तर आधी उल्लेख केल्याप्रमाणे मुस्लीमद्वेष्टा सुरेश (के. के. मेनन) आणि त्याच्या काही मित्रांचा एका व्यक्तीवर संशय आहे. ज्यामुळे ते स्वतःच त्याचा तपास करत आहेत. मुंबईत जागोजागी सायकलवर चहा विकणारा थॉमस (इरफान खान) आणि उच्चपदस्थ नोकरदार निखिल (आर. माधवन) हे दोघेही समाजातील वर्गांची दोन टोकं आहेत.

- Advertisement -

‘मुंबई मेरी जान’ कमी अधिक फरकाने सर्व पात्रांना सामान महत्त्व देण्याच्या प्रयत्नात असला तरी पाटील-कदम आणि सुरेशच्या कथानकांना आपसूकच त्यांच्या विषयामुळे आणि चांगल्या लेखनामुळे अधिक महत्त्व मिळतं. तर इतर कथानकं मर्यादित पातळीवर परिणामकारक ठरतात. चित्रपटातील महत्त्वाची बाब अशी की तो या संवेदनशील घटनेला तितक्याच संवेदनशील प्रकारे समोर आणतो. असं करताना कुठल्याही गिमीक्सचा आधार न घेता मानवी भावनांचा परिणामकारक कोलाज मांडतो. अशावेळी मुंबई हे शहर चित्रपटातील महत्त्वाचं पात्र बनतं आणि त्याच्या अनुषंगाने गर्दीतील कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे भासणार्‍या चेहर्‍यांना तो केंद्रस्थानी आणतो. असं करताना तो सुरुवातीच्या काहीच मिनिटांत प्रत्यक्ष हल्ल्याची घटना दाखवतो, आणि या घटनेची पार्श्वभूमी वापरून कथानकात त्यातील पात्रांच्या त्या घटनेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला महत्त्व मिळते. ज्यामुळे त्याला आपल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या पात्रांवर आणि त्यांच्या सभोवतालावर लक्ष केंद्रित करता येतं. शिवाय, तो अगदी सुरेश आणि त्याचे मित्र किंवा भ्रष्टाचारी व्यवस्थेतील एक घटक असणारे पोलीस किंवा इतरही कुणाला तो आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करण्याच्या भानगडीत न पडता मानवी स्वभावाच्या निरनिराळ्या बाजू उलगडू पाहतो. ही सगळी पात्रं आणि त्यांची कथानकं संकल्पनात्मक पातळीवर चित्रपटाच्या विषयाशी प्रामाणिक राहतात. त्यामुळेच देशप्रेम किंवा तत्सम भावनांचे उमाळे न आणता केवळ एक परिणामकारक गोष्ट सांगण्याच्या दृष्टिकोनातून बनवलेला हा चित्रपट एक कौतुकास्पद ठरतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -