घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचे नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांना मानाची मानसरंग शिष्यवृत्ती

नाशिकचे नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांना मानाची मानसरंग शिष्यवृत्ती

Subscribe

नाशिक : प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगशील दिग्दर्शक सचिन शिंदे यांना सातारा येथील परिवर्तन संस्थेच्या मानसरंग नाट्य शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी ठरले आहेत. शिंदे यांच्या सोबतच अभिजीत झुंजारराव, कल्याण आणि क्षितीज दाते, पुणे) यांनाही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. ‘मानसरंग’ संकल्पक आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, मनोविकार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर आणि आरोग्य संवादक राजू इनामदार यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.

अतुल पेठे म्हणाले की, ‘परिवर्तन’ संस्थेमार्फत गेली पाच वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी ’मानसरंग’ नावाचा मंच चालवला जातो. ह्या ‘मानसरंग’ मंचाचा एक कार्यक्रम म्हणून या वर्षीपासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकाच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या नाट्य-शिष्यवृत्तीसाठी निवडलेले तीनही दिग्दर्शक आजच्या रंगभूमीवर कार्यरत असून, ह्या नाट्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते मानसिक आरोग्याच्या विषयी भाष्य करणारे नाटक बसवणार आहेत. त्याकरता त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

- Advertisement -

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले कि, मानसिक आरोग्याचा प्रश्न हा सध्याच्या कालखंडात एक महत्वाचा प्रश्न म्हणून समोर येत आहे. कोरोनानंतरच्या कालखंडात त्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. अजूनदेखील आपल्या समाजात मानसिक आजारांच्या विषयी पुरेशी माहिती नाही. मानसिक आजारांकडे कलंकाच्या नजरेतून बघितले जाते. पालकत्व, पती-पत्नी मधील ताण-तणाव, कामाच्या ठिकाणचे ताण, मोबाईलचा वाढता वापर असा एक मोठा मानसिक आरोग्य आणि आजार यांचा पट आपल्या समोर आहे. या प्रश्नांना नाटकाच्या माध्यमातून भिडण्याचा ‘मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती’ आणि नाट्य-महोत्सव हा प्रयत्न आहे.

तीनही नाटकांचा ५ नोव्हेंबरला नाट्य महोत्सव

शिष्यवृत्ती अंतर्गत बसवण्यात आलेल्या तीनही नाटकांचा ‘मानसरंग’ नाट्य-महोत्सव हा ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिवशी पुणे येथील ‘द बॉक्स’ ह्या रंगमंचावर केला जाणार आहे. या उपक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मोहन आगाशे, नाटककार आणि समीक्षक डॉ.राजीव नाईक, लेखिका डॉ.अंजली जोशी आणि नाटककार डॉ.चंद्रशेखर फणसळकर मार्गदर्शक म्हणून सहभागी असणार आहेत.

नाट्यक्षेत्रात विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवर केलेल्या कामाचे समाधान वाटते. यामुळे आणखी १० वर्षे नाट्यक्षेत्रात काम करण्याची ऊर्जा मिळेल, अशी खात्री आहे. हा केवळ माझा बहुमान नसून, नाशिकमधील सर्व रंगकर्मींचा सन्मान आहे. नाशिककर नाट्यकर्मी व रसिक यांच्या साथीने नाशिकचे नाव जगभर पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याचीच ही पावती आहे. : सचिन शिंदे, नाट्यदिग्दर्शक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -