सोनाली बेंद्रेला कॅन्सर असल्याचं साधारण महिन्यापूर्वी तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितलं होतं. फ्रेंडशिप डे च्या निमित्तानं सोनाली बेंद्रेनं आपल्या मैत्रिणी गायत्री जोशी आणि सुझान खान यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करून एक भावनिक पोस्टदेखील शेअर केली आहे. कॅन्सरसारख्या आजाराशी लढत असणाऱ्या सोनालीनं पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक विचार ठेवत पोस्ट शेअर केल्या आहेत. या नव्या फोटोमध्ये सोनालीनं आपला लुक बाल्ड अर्थात टक्कल केल्याचं दिसत आहे. मात्र तिचं सौंदर्य कुठंही कमी झालेलं न दिसता आपला हा लुकदेखील ती तितक्यात आत्मविश्वासानं सावरत असल्याचं दिसत आहे. तिच्या या स्थितीत तिच्याबरोबर तिचं कुटुंब, नातेवाईक आणि सगळाच मित्रपरिवार आहे हे सतत दिसून येत आहे.
काय दिला संदेश?
सोनालीनं कॅन्सरमुळं टक्कल केलं आहे. मात्र ‘डोक्यावर केस नसल्यामुळं आता तयार व्हायला वेळ लागत नाही आणि केसदेखील सावरावे लागत नाहीत, म्हणून बाल्ड इज ब्युटिफूल’ अशा प्रकारचा सकारात्मक संदेश तिनं आपल्या पोस्टमधून दिला आहे. हा फोटो अभिनेता ह्रतिक रोशन यानं न्यूयॉर्कमध्ये काढला आहे. गायत्री जोशी आणि सुझान खान या दोघीही सोनालीच्या जवळच्या मैत्रिणी असून सध्या त्या दोघीही तिच्याबरोबर तिला साथ देत आहेत. सोनालीवर सध्या हायग्रेड कॅन्सरवरील उपचार न्यूयॉर्कमध्ये चालू असून तिच्या फोटोमधून ती प्रत्येक क्षण कॅन्सरशी लढा देत असूनही आनंदानं जगत असल्याचं आणि सकारात्मकतेनं जगत असल्याचं दाखवून देत आहे. यामध्ये तिला तिच्या कुटुंब आणि मित्रांची पावलोपावली साथ मिळत आहे. आपल्याला झालेल्या कॅन्सरचं सत्य पचवून यातून बाहेर येण्यासाठी हीच सकारात्मकता मदत करेल असा विश्वास सोनालीच्या पोस्टमधून तिच्या चाहत्यांना दिसत आहे.