घरमनोरंजनवर्षारंभाचे साक्षीदार

वर्षारंभाचे साक्षीदार

Subscribe

नव्या वर्षात संकल्प करा, कामाचे नियोजन करा असे सांगितले जात असले तरी ठरवल्याप्रमाणे वर्षभरात त्याची अंमलबजावणी होईलच याची खात्री देता येत नाही. पण वर्षाच्या सुरुवातीला आपल्या वाट्याला काही छान आले तर ते कायम लक्षात राहते. कलाकारांच्या जीवनातही असे काहीसे घडत असते. वर्षभर काम करत असताना कामाचाच एक भाग म्हणून काही गोष्टी हाती लागतात; पण त्या खर्‍या अर्थाने मार्गी लागतात ते नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच. रमेश भाटकर, निवेदिता सराफ, मधुरा वेलणकर यांच्या बाबतीत असे काहीसे घडलेले आहे. वर्षारंभाचे ते साक्षीदार आहेत

सध्या महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारत काव्याने, संगीताने, साहित्याने भारावून गेलेला आहे. इतकेच काय तर वर्षभर हा आनंद टिकून राहणार आहे. सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी वर्षभर साजरी केली जात आहे. या त्रयींवर अतोनात प्रेम असलेल्या संस्थांनी फक्त एका दिवसापुरती कार्यक्रमाची निर्मिती न करता वर्षभर प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता यावा यादृष्टीने कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे. दिग्दर्शन, संयोजन, लेखन करणार्‍या सर्वांनीच या त्रयींची जुजबी माहिती न पुरवता संदर्भग्रंथ, या त्रयींच्या सान्निध्यात आलेले महनीय व्यक्ती यांच्याशी सुसंवाद साधून प्रत्येकाने आपला कार्यक्रम मनोरंजक, प्रभावी कसा होईल हे पाहिलेले आहे. इतकेच काय तर काही आयोजकांनी या त्रयींच्या कुटुंब सदस्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतलेले आहे. या त्रयींच्या जन्मशताब्दीमुळे कार्यक्रमांची रेलचेलही वाढलेली आहे. एकंदरीत रंगमंचावर आलेल्या वाद्यवृदांचा मागोवा घेतला तर बर्‍याच जणांनी या तिन्ही महनीय व्यक्तींना आपल्या कार्यक्रमात प्राधान्य दिलेले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे याबाबतीत आभार मानावे लागतील. अर्थात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची संकल्पना यापाठीमागे आहे हे नाकारता येणार नाही. सप्टेंबर महिन्यातच या त्रयींची जन्मशताब्दी साजरी करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. महाराष्ट्रात त्याप्रमाणे कार्यक्रम करणे सुरू झालेले आहे. या प्रयत्नात आनंद जसा अनुभवायला मिळतो तशी खंतही ऐकायला मिळते. हिंदी-मराठी चित्रपटांना, गाण्यांना स्नेहल भाटकर यांनी स्वरसाज चढवून रसिकांना फक्त मंत्रमुग्ध केलेले नाही तर गाण्याच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षक समृद्ध कसा होईल हे पाहिलेले आहे. ‘रूप पाहता लोचनी’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘कशी होती ते माझी आई’, ‘आखों में तेरी याद लिये’, ‘कभी तनहाईयों में यू’ ही गाणी जरी आठवली तरी स्नेहल भाटकर यांच्या संगीताची मोहिनी आपल्या लक्षात येते. अनावधानाने महाराष्ट्र शासनाला या दिग्गज संगीतकाराचा विसर पडलेला आहे. म्हणून अन्य संस्थांनी त्यांची दखल घेणे काही थांबवलेले नाही. ‘ग्रंथाली’ ने आपल्या वाचक दिनी या त्रयींबरोबर स्नेहल भाटकर यांची संगीत कारकीर्द उलगडून सांगितली होती.

- Advertisement -

अभिनेता रमेश भाटकर यांच्यासाठी हे नवे वर्ष वडिलांची स्मृती जागवणारे असणार आहे. मराठी वाद्यवृंदात ज्यांची हुकूमत आहे अशा अशोक हांडेंनी स्नेहल भाटकर यांची संगीतमय जीवनगाथा रंगमंचावर आणण्याचे ठरवलेले आहे. ‘स्वर स्नेहल’ असे या कार्यक्रमाचे शिर्षक असणार आहे. संकल्पना, लेखन, दिग्दर्शन अशोक हांडे यांची आहे. संगीत संयोजनाची जबाबदारी महेश खानोलकर यांच्यावर सोपवलेली आहे. ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’, ‘गंगा जमुना’, ‘माणिकमोती’, ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ अशा कितीतरी कार्यक्रमांची निर्मिती हांडे यांनी केलेली आहे. यात त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबर त्यांच्या स्वरमयी प्रवासाचा मागोवा घेतलेला आहे. स्नेहल भाटकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘स्वर स्नेहल’ हा कार्यक्रम असाच काहीसा मोहवून टाकणारा असणार आहे.

अभिनेत्री निवेदिता सराफ हिच्यासाठीही हे वर्ष कायम स्मरणात राहणारे असणार आहे. फक्त चित्रपटाला प्राधान्य न देता नाटकातही त्यांनी आपले योगदान दिलेले आहे. ‘केसरी नंदन’ या हिंदी मालिकेच्या निमित्ताने त्यांचा अभिनय प्रवास पुन्हा हिंदीत सुरू झालेला आहे. यात नोंद घ्यावी असा एक प्रयत्न त्यांच्याबाबतीत झाला आहे. यापूर्वी मराठी मालिकेच्या निर्मितीत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. या नव्या वर्षात त्यांच्याकडून ‘व्हॅक्यूम क्लिनर’ या मराठी नाटकाची निर्मिती होत आहे. संज्योत वैद्य, श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव यांचासुद्धा या नाटकाच्या निर्मितीत सहभाग आहे. चिन्मय मांडलेकर यांच्यासाठीसुद्धा हे नवे वर्ष खास असणार आहे. त्यांच्या लेखन, दिग्दर्शनात हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर येत आहे. निर्मिती सावंत आणि अशोक सराफ हे यात मुख्य भूमिका निभावत आहेत. आजवर चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे कलाकार एकत्र आलेले आहेत. ‘अष्टविनायक’ या नाट्य संस्थेने या नाटकाची निर्मिती केलेली आहे. निर्मिती सावंतने आजवर जेवढी म्हणून नाटके केली, लोकप्रिय झाली ती बरीचशी नाटके ‘अष्टविनायक’ची होती. मधल्या काळामध्ये रिअ‍ॅलिटी शोमुळे नाटकाला वेळ देणे त्यांना जमले नाही. नव्या वर्षात या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा तो योग जुळून आलेला आहे.

- Advertisement -

मधुरा वेलणकरसाठी हे वर्ष भाग्यशाली असणार आहे. प्रसाद कांबळीने ‘भद्रकाली’ च्यावतीने जी ५७ व्या नाट्यकृतीची निर्मिती केलेली आहे, त्यातल्या ‘गुमनाम है कोई’ या नाटकात मधुरा मुख्य भूमिका निभावते आहे. नाटकात काम करणे नित्य नियमाचे असले तरी यातली तिची भूमिका थोडीशी हटके आहे. याने ती प्रभावित झालेली आहे. कारण संवादाबरोबर अभिनयाचा कस दिसायलाच हवा अशी ही भूमिका आहे. शिल्पा नवलकरकडून एक वेगळे नाटक लिहिले गेलेले आहे हेही विशेष म्हणावे लागेल. यावेळी मीरा वेलणकर ही तिची बहीण या नाटकाच्या वेशभूषेच्या निमित्ताने तिच्या सोबत आहे. ‘एकच निर्णय’ हा चित्रपट १८ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्यात विक्रम गोखले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, वडील प्रदीप वेलणकर यांच्याबरोबर तिही मुख्य भूमिका निभावत आहे.

स्वर स्नेहल रमेश भाटकर ने प्रभावित 
रमेश भाटकर सांगायला अभिनेता असला तरी तो गायकही आहे. अनेक नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात किंवा मोठ्या सोहळ्यात त्याला काही कला सादर करायला सांगितले तर त्याने वडिलांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिलेली आहेत. पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, ग.दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीबरोबर वडिलांचीही नोंद घेतली जावी असे त्याला वाटत होते. सध्या कोणती संस्था वडील स्नेहल भाटकर यांच्यावर संगीतमय कार्यक्रम करण्याची तयारी दाखवते. त्या कार्यक्रमाला रमेशने आवर्जून उपस्थिती दर्शवलेली आहे. कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणात त्रयींबरोबर वडिलांचीही गाणी ऐकायला मिळणार या एका हेतूने तब्येत बरोबर नसतानासुद्धा कुटुंबासह तो हजर राहिला होता. अशोक हांडेंच्या ‘स्वर स्नेहल’ या कार्यक्रमासाठी रमेशचे विशेष मार्गदर्शन लाभलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -