घरमनोरंजनहा तर छोटा विक्रम

हा तर छोटा विक्रम

Subscribe

रंगभूमीचा ध्यास घेतलेला रंगकर्मी म्हणून सुहास कामतचे नाव घेतले जाते. परळ येथे वास्तव्य करत असताना इथल्या सांस्कृतिक चळवळीला बहर कसा येईल हे त्याने पाहिले होते. इथल्या कितीतरी संस्थांशी तो निगडीत होता. नाट्यदर्पणच्यावतीने ‘कल्पना एक, अविष्कार अनेक’ ही जी स्पर्धा घेतली जात होती, त्याची संकल्पना सुहासची होती. पुढे हा सुहास बोरिवलीकर झाला आणि तिथेसुद्धा त्याने नवनवीन संकल्पना लढवायला सुरू केल्या. या सगळ्या गोष्टी तो अधिकारवाण्याने करीत होता. त्याला कारण म्हणजे व्यावसायिक, प्रायोगिक रंगभूमीवर जी सात-आठ नाटके आली त्याच्या बर्‍याचशा नाटकांचे लेखन-दिग्दर्शन सुहासने केलेले आहे.

‘सिर्फ चार दिन’, ‘देवाची घंटा’, ‘झुंझ’, ‘संगीत रंगसम्राट’, ‘उंबरठा’, ‘मुजरा घ्या सरकार’, ‘अपराधी कोण?’, ‘द्विधाता’ आदी अनेक त्याचा सहभाग असलेल्या कलाकृती प्रेक्षकप्रिय ठरलेल्या आहेत. आता त्याचा हा प्रवास एवढ्यापुरताच मर्यादीत न राहता नाट्य प्रशिक्षणाचे कार्य तो गेली अनेक वर्षे करत आहे. यानिमित्ताने नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना यांचेसुद्धा अनमोल मार्गदर्शन तो करतच असतो. प्रेक्षक आणि नवकलाकार यांना सामावून घेता येईल असे अनेक कार्यक्रम त्याने केलेले आहेत. हास्य नारायणाची महापूजा, ऑडिशन ऑडिशन, लघुनाट्य, गबला, सांस्कृतिक अमावास्या असे कितीतरी उपक्रम सांगता येतील. नवकलाकारांना मार्गदर्शक ठरू शकतील अशी पुस्तकेही त्याने लिहिलेली आहेत. हे सर्व कार्य तो वैयक्तिक पातळीवर करत असला तरी बोरिवली नाट्य परिषदेच्या शाखेतही तो सक्रिय राहिलेला आहे.

- Advertisement -

सुहासचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याने आपल्या कार्यात कधीही व्यावसायिक दृष्टीकोन ठेवलेला नाही. आपल्याला जे ज्ञान अवगत आहे ते दुसर्‍याला दिले पाहिजे या मताचा तो आहे. ‘कलासुगंध’ या त्याच्या स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून त्याने हे ज्ञानदानाचे कार्य केलेले आहे. बदलत्या काळाला आपण स्वीकारले पाहिजे याही मताचा तो आहे. सध्या सोशल नेटवर्कचे प्रस्थ वाढलेले आहे. नव्याने येणार्‍या कलाकारांना या माध्यमाचे आकर्षण आहे. हे लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी ‘ए एस के क्रिएशन’ या संस्थेची स्थापना केली. व्हिडिओची निर्मिती या माध्यमातून करण्याचे त्याने ठरवले. दोन वर्षांचा एकंदरीत निर्मिती प्रवास लक्षात घेतला तर टीझरसह एकूण ११५ व्हिडिओची निर्मिती केल्याचे सुहासच्या लक्षात आले. हा बहुदा छोटेखानी विक्रमच असावा असे त्याचे म्हणणे आहे. ‘शातंम्मा टिंब टिंब’, ‘बॉलिवूड हास्य’ ‘नारायणची महापुजा’, ‘मुखवटे’, ‘कविता मनामनातली’, ‘प्रेशियस गिफ्ट’, ‘आऊट ऑफ रेंज’ या त्या व्हिडिओ मालिका सांगता येतील ज्यात नवकलाकारांबरोबर सेलिब्रिटी कलाकारांचा सहभाग आहे. संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन २४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता बोरिवलीतल्या अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर येथे साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने ‘गणराज आले हो आले’ हा गीत, संगीत आणि नृत्याला प्राधान्य देणारा कार्यक्रम होणार आहे. गीत, संगीत सुहासचे आहे. किशोर खानविलकर हा या कार्यक्रमाचा निर्माता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -