Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

Related Story

- Advertisement -

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुबारी १६३० रोजी मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई यांच्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते. शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेले. शिवाजी आणि जिजामाता यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजीराजांनी त्यांची पुण्याला पाठविली.

जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभावून जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली. त्यातूनच भविष्यातील हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

- Advertisement -

शिवाजी महाराजांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले आणि देशमुख, देशपांडे, वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी हस्तगत केला. महाराजांना येऊन मिळालेल्या अनुयायांत पुढे प्रसिद्धीस आलेली कान्होजी जेधे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इ. नावे आढळून येतात.

राज्यविस्तार करताना शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार यांच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली.

- Advertisement -

राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अफझलखान भेटीचा प्रंसग हा मोठा आणीबाणीचा समजला जातो. प्रतापगडच्या युद्धात लष्करी डावपेच, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना तसेच अनुकूल रणांगणाची निवड आणि प्रसंगावधान हे शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचे महत्त्वाचे विशेष आढळतात. महाराज केवळ शूर आणि युद्ध निपूणच नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते.

धर्माच्या नावाखाली त्यांनी कधीही कुणासोबत पक्षपात केला नाही. त्यांच्या दरबारातील काही अधिकारी आणि अंगरक्षक मुस्लीमदेखील होते. त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रिचा अनादर केला नाही. इतकेच नाही तर युद्धात हरलेल्या शत्रूच्या स्त्रियांनादेखील सन्मानपूर्वक परत पाठवत असत. 3 एप्रिल 1680 मधे प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवाजी महाराजांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -