घरफिचर्सआबादादा

आबादादा

Subscribe

आबाला गावात येऊन इतकी वर्षे झाली; पण आबाचं कोणाशी भांडण झालेलं माझ्या ऐकिवात नाही. वाडवडिलांनी ठेवलेली जमीन वर्षानुवर्षे कसत होता. मुंबईला धाकटा भाऊ नोकरी करत होता, त्याचा त्याला आधार होता. सकाळी शेतीभातीत, संध्याकाळी तबला, रात्री कुठे सुपारी असेल तिथे भजन नाहीतर कधी दशावतारी नाटकात तबल्याच्या साथीला. तबल्यावर बोटं लावली की त्यातून गुदगुल्या व्हाव्या तसा उमटणारा आवाज, सर्वच अवर्णनीय.

कधी कोणी विचारलं की तुला आवडणारे आवाज कोणते तर क्षणाचादेखील विलंब न लावता मी म्हणेन, क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना बॅटच्या मधोमध चेंडू बसल्यावर येणार्‍या फटाक्यांचा आवाज आणि मनासारखा तबला लावल्यावर आबादादाची बोटं तबल्यावर घुमल्यावर येणारा तो कर्णमधूर आवाज. हे दोन्ही फटके तसं बघितलं तर तालासुराशी साधर्म्य साधणारे म्हणून मला ते विशेष आवडायचे.

- Advertisement -

यातील पहिल्या आवाजाशी नातं जोडायचा मी प्रयत्न केला; पण हे आवाजाच्या लहरीपणाचं वारं कोवळ्या वयातच अंगावरून वाहून गेलं त्यानंतर त्या आवाजाच्या आजूबाजूला फिरायचा प्रश्न कधी आला नाही. दुसर्‍या आवाजाची जादू काय असते हे त्या आवाजाला कानात बसवल्याशिवाय नाही कळणार. त्या आवाजाची महती काय हे आबादादाने समजावले. आबादादा म्हणजे आमच्या गावच्या भजनात तबल्याची साथ करणारा तबलजी. कोकणात पारंपरिक भजनात टाळ, मृदुंग आणि तबला एवढीच महत्त्वाची साधनं किंवा वाद्य. तळकोकणात तबल्याबरोबर मृदुंग किंवा नाल वाजवली जाते (आजही बहुतेक ठिकाणी हीच प्रथा आहे). माझ्याही गावात तेच, पारंपरिक भजन म्हटलं की तबला आणि नाल; पण चाळीस वर्षांपूर्वी वीस बावीस वर्षांचा कोणी पोरगेलासा तरुण गावात आला नि गणपतीच्या दिवसात मांडावरच्या भजनात नालीएवजी डग्गा घेऊन बसला. मंडळीत चर्चा सुरू झाली .” रे ह्यो पावनो कोण?”
चर्चेअंती कळलं की, हा पोरगा सुधा गावकरचा मुलगा, रमाकांत. घरगुती नाव आबा.
” ह्यो व्हाजवता काय?”
“व्हय तर मुंबयसून शिकआनं ईलो हा”
” पण गावच्या भजनात नाय टिकाचो, हय कसा तबल्याबरोबर नाल व्हॅयीं, असला बारक्या साधन टिकाचा नाय”.

पण बुवाने भजन सुरू झाल्यावर गण संपवून भजनाला सुरुवात केली आणि आबादादाने तबल्यावर बोटं मारायला सुरुवात केली. डग्यावर बोटं गुदगुल्या करू लागली. आबांच्या तबला वाजवण्याची कल्पना लोकांना आली. लोकांचा आबांच्या तबला आणि त्याबरोबर डग्गा वाजण्याच्या अंदाजाला सुखद तडा गेला. कंदिलाच्या प्रकाशात बुवाने भजनाची बारी सुरू केली की आबा तबला डग्गा घेऊन बुवांच्या डाव्या बाजूला बसून साथ करायचा. त्यावर्षीचा गणपती उत्सव संपला. लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं. ” अरे ह्यो सुधा गावकाराचो झिल गेली सातआठ वर्सा हुतो खय? कदी पत्र नाय की काय नाय. एकदम उगावलो खयसून?” आबादादा सातवीपर्यंत गावच्या शाळेत होता, त्याच्या बरोबरच्या मित्रांनी त्याला विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं, सातवीच्या परीक्षेनंतर आबा मुंबईला आपल्या चुलत्यांकडे गेला तिकडेच तो तबला शिकला. नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले; पण नोकरीत जम बसला नाही म्हणून पुन्हा गावी आला.

- Advertisement -

भजनाचे सर्व साहित्य म्हणजे तबला, पेटी, टाळ हे आमच्या घरातच ठेवलेले असायचे. कोणाकडे भजन असेल तर यजमानांनी ते साहित्य वाद्य घेऊन जायची असा नियम. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो तेव्हा टाइमपास म्हणून सहजच तबल्यावर बोटं उमटवत होतो आणि उगाचच डग्गा घेऊन वाजवायचा प्रयत्न करत होतो. तबल्याच्या वाजवण्याने कुठेतरी कर्कशपणा निर्माण झाला होता. मी तबला आणि डग्गा जोरजोरात बडवत होतो, तेवढ्यात आबादादा घरात आला नि मला म्हणाला, ” कोण तू व्हाजवत हंस, तरी म्हणतंय कोण ईला तुमच्या घरात, वायच तबल्यार हलको हात मार, असो हात कडक ठेय नको”, असं म्हणत माझा हात तबल्यावर ठेऊन आबादादाने मला तबल्यावर हात कसा ठेवावा याचा पहिला धडा दिला. आणि त्यानंतर तबल्यावर बोटं कशी मारावीत म्हणजे ताल निर्मिती कशी होते हे सांगत होता. डग्गा वाजवताना बोटं कशी दुमडायची हे त्यादिवशी आबाने शिकवलं.

आबाने वाडीत खूप जणांना तबला वाजवायला शिकवलं, भजनात तयार केलं. मी दहावीची परीक्षा देऊन लवकर गावी गेलो तेव्हा आबादादा दर दुपारी आमच्या घरी यायचा, कधी मूडमध्ये असला की तबला वाजवून दाखवायचा, खूप किस्से सांगायचा. आबाच्या तबला वाजवण्याची त्यापेक्षा डग्गा वाजवण्याची कीर्ती पंचक्रोशीत पसरली होती. कधी हा बुवा डबलबारीला घेऊन जायचा तरी कधी तमका बुवा बारीला घेऊन जायचा. मे महिन्यात आबा दर संध्याकाळी कुठे ना कुठे तबला वाजवायला जायचा. मग दुपारी कोणाच्यातरी खळ्यात बसून हा भजनीबुवा कसा, तो भजनीबुवा कसा याचे एकेक किस्से रंगायचा. मला तबला शिकवायला आबाने सुरुवात केली तेव्हा आबा तिशीत पोचला होता. मी साधारण दहाएक वर्षांचा असेन. मे महिना आला की मग आबा, “काय कित पर्यात झाला शिकान”, मुंबईत शाळा, क्लास यात तबला कधी वाजवणार तरी दोन चार कायदे, चारपाच ताल झालेले असायचे तेवढे आबाला वाजवून दाखवायचे की मग मे महिना सुखाचा जायचा. बारावीनंतर थोडीबहुत समज यायला लागली तसा विचार यायला लागले, की आबा एवढा चांगला कलाकार; पण त्याने ही कला पैदा केली कशी? आणि केली ती केली मग इथे गावात शेती का करतो. चांगला मुंबईत स्थायिक झाला असता तर तिकडे चांगला जम बसवला असता.

आबाला गावात येऊन इतकी वर्षे झाली; पण आबाचं कोणाशी भांडण झालेलं माझ्या ऐकिवात नाही. वाडवडिलांनी ठेवलेली जमीन वर्षानुवर्षे कसत होता. मुंबईला धाकटा भाऊ नोकरी करत होता, त्याचा त्याला आधार होता. सकाळी शेतीभातीत, संध्याकाळी तबला, रात्री कुठे सुपारी असेल तिथे भजन नाहीतर कधी दशावतारी नाटकात तबल्याच्या साथीला. तबल्यावर बोटं लावली की त्यातून गुदगुल्या व्हाव्या तसा उमटणारा आवाज, सर्वच अवर्णनीय. भजनाच्या वेळी त्याने वाजवलेला धुमाळीचा ठेका एवढा स्पष्टपणे ऐकू यायचा की धुमाळीचा बोल त्याचा ठेका बोलतोय असा भास व्हायचा. मी शिक्षकी पेशात आलो त्याचा घरातल्यापेक्षा आबाला आनंद झाला.

मी त्यानंतर त्याला भेटलो तेव्हा मला म्हणाला,”आता पयल्यासारखो मे महिन्यात गावाक येशी”, मी देखील त्याच्या प्रश्नाला समर्पक उत्तर दिले. पन्नाशीनंतर वय झालं हे कारण सांगून आबा भजनात तबला वाजवत नसे की बाहेर सुपारीला जात नसे. पूर्वी कोणीना कोणी त्याच्याकडे तबला शिकायला बसलेला असे, हल्ली चारेक वर्षात हेसुद्धा कोण येत नसत. गावी गेल्यावर त्याच्या घरी गेलो तेव्हा आबादादा नुकताच शेतातून येऊन बसला होता. आबाचा मोठा मुलगा पण घरात होता. तो मुंबईला नोकरी करत होता. मला बघितल्यावर आबा खूश झाला. बायकोला चहा करायला सांगून माझ्याशी गप्पा ठोकत बसला,” बाबू ! आता माका दगदग नाय. ह्यो पोरगो बँकेत नोकरी करताहा, बारको हय शेती करताहा”. एकंदरीत आबाच्या आयुष्याची संध्याकाळ सुखात चालली होती. गप्पा मारता मारता विचारलं, ” हल्ली तबलो शिकाक कोण येयत नाय वाटता ?”

“रे फुकट गावता तेची किंमत नसता, म्हैन्याक तीनचारशे घेवन जे शिकवतत ते लोकांक मोटे वाटतत”, आबा हे चिडून बोलत होता.

कधी नव्हे तो आज आबा काही तिरकस बोलतो आहे असं वाटत होतं. कुठेतरी काही जळतं आहे. एवढ्या वर्षात आबाचं हे रूप आम्ही कधीच बघितलं नव्हतं. आबा बोलू लागला त्याच्या संपूर्ण आयुष्याची फरफट तो सांगत होता. आबा लहानपणी गाव सोडून गेला तो मुंबईत चुलत्यांकडे शिक्षणासाठी राहू लागला. चुलते राहत होते त्यांच्या बाजूलाच कोणीतरी गायन-वादन क्लास काढला होता. त्या क्लासची चावी आबाच्या चुलत्यांकडे असायची. गायन मास्तर यायच्या आधी आबा क्लास उघडत असे. रूम साफ करत असे. मग मास्तर रोज त्याला तबला शिकवत असत. असे जवळपास पाच सहा वर्षे झाले.

दहावी पास होऊन आबा नोकरी शोधत असताना त्या क्लासच्या मास्तरांनी त्याला एका शाळेत संगीत शिक्षक म्हणून चिटकवून दिले. इतर वेळी त्या क्लासमध्ये मास्तर नसताना मुलांचा गायन आणि तबला वादनाचा सराव घ्यायचा. त्याच दरम्यान त्या क्लासमध्ये गायनासाठी येणार्‍या एका मुलीवर आबाचं प्रेम जडलं. त्या मुलीचंदेखील आबावर प्रेम होतं. थोड्या दिवसांनी मास्तरांना ह्या गोष्टीचा सुगावा लागला. त्यांनी सरळ त्या मुलीच्या वडिलांना आणि आबाच्या चुलत्याना बोलावलं. चुलत्यांनी आबाची रवानगी पुन्हा गावी केली. गावी आल्यावर आबा गावात रमला. पुढे आबा गावातल्या मुलांना तबला शिकवू लागला. मुलं तयार होतं होती. आता गाववाल्याना आबा नको होता, मग निरनिराळ्या प्रकारे राजकारण करून आबाचा पाणउतारा कसा करता येईल याची संधी लोक शोधू लागले. आबाच्यादेखील हे लक्षात आलं; पण गावात राहून उगाच क्लेश नको म्हणून आबाच भजनात तबला वाजवत नसे. ह्या भूमीला हा कोणता शाप आहे हे कळत नाही. आबाचा तबला ज्यांनी ऐकला असेल त्यांना माहीत आहे, तो तबला नुसता वाजवत नसे तर तबल्याला बोल बोलायला लावत असे. आबा म्हणजे नादी कलावंताचा अस्सल नमुना होता.

गेल्या मे महिन्यात मी काही कामानिमित्त कणकवलीला माझी गाडी घेऊन निघालो, वाटेत आबा रस्त्याने जात होता . मी विचारले, “आबादादा खंय चललं”
“वायच बरा नाय कांबळ्याकडे जावून येतय”
“चल मी तुका सोडतय “

असं म्हणून मी त्याला गाडीत घेतलं, वाटेत खूप गप्पा झाल्या. मला तबल्याची नवीन सीडी आली आहे त्याची माहिती दिली. गावात आणि पंचक्रोशीत कोण नवीन तबलजी तयार होत आहेत त्यांची माहिती दिली. तबल्याचा विषय निघाला की स्वारी खुलायची. गप्पा मारता मारता नांदगाव आलं. कांबळी डॉक्टरच्या दवाखान्याजवळ आबाला उतरवलं. मलाही कांबळी डॉक्टरांना भेटायचं होतं. त्याच्याबरोबर निघालो. डॉक्टरांच्या दवाखान्यात खूप गर्दी होती. मी डॉक्टरांना नंतर भेटतो म्हणून आबाचा निरोप घेण्यासाठी त्याच्याजवळ आलो, तर आबा म्हणाला “ह्या डाकटरान ह्या नांदगावातल्या लोकांवर लिवल्यान तसा माझ्यावर पण लिव रे एकदा ….”

मी हसलो, मनात म्हटलं आबा तुझ्यासारख्या कलावंतावर मी काय लिहिणार. तू तर लिखाणाच्या पलिकडचा आहेस. तुला फक्त संधी मिळाली नाही. आबा माझा गुरू होता, मित्र होता ….

एकदिवस गावाहून फोन आला की, आबादादा गेला. सकाळी नेहमीप्रमाणे उठून चहा घेऊन गुरं सोडणार एवढ्यात तो खाली कोसळला तो पुन्हा उठलाच नाही. आबाची इच्छा होती मी त्याच्यावर काही लिहावं… एका नादी कलावंताच्या कलेबद्दल आपण सर्वसामान्यांनी काय लिहावं…एवढं मात्र खरं आबाच्या जाण्याने तबल्याचा तो घुमणारा ताल पुन्हा ऐकू येणार नाही…

-प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -