घरफिचर्सनेत्यांच्या जिभेला काही हाड!

नेत्यांच्या जिभेला काही हाड!

Subscribe

राज्यात निवडणुकीची धामधूम अधिकच वाढते आहे. प्रचाराने आता रूप घेतलं असून, गल्लोगल्ली प्रचाराची राळ उठते आहे. येत्या शनिवारपर्यंत हा धुरळा असाच उडणार आहे. कोणतीही निवडणूक असो, तो एक दिवसाचा उत्सव असतो. लोकशाहीचा मानबिंदू म्हणून एका दिवसात खूप काही साध्य करायचं असतं. ही मोहीम सरासरी ४० दिवसांची असली तरी अखेरच्या दिवशी या मोहिमेचं कर्तव्य पूर्ण करायचं असतं. ते मतदार करतील, पण यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या कर्तव्यात पूर्णत: उतरावं, अशी अपेक्षा असते. ते खरोखरच ही अपेक्षा पूर्ण करतात काय? की कर्तव्याच्या नावाने ते मतदारांना चिथावणी देतात, हे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आदर्श निवडणुकीची आचारसंहिता या मंडळींनी पाळायची की नाही, पाळायची तर ती कोणी? याचा परिपाठ नेत्यांनी स्वत:च घालून दिला पाहिजे.

तोंडात येईल ते बोलणं आणि आपण खूप काही तारे तोडले, अशी त्यांची धारणा होणं, हे आदर्श आचारसंहितेत बसत नाही आणि सजग प्रचाराचं ते चांगलं लक्षण नाही. अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, रावसाहेब दानवे काय आणि पंढरपूरचा प्रशांत परिचारक काय यांच्यासारखी माणसं जमावापुढे अद्वातद्वा बोलतात तेव्हा समोरचे श्रोते टाळ्या वाजवतात. छिंदम छत्रपती शिवरायांचा अवमान करूनही तो भाजपला जवळचा होता आणि सैनिकांच्या नावाने त्यांच्या पत्नींची बदनामी करणारा प्रशांत परिचारक आपल्यात आहे, याचं भाजपला काहीही वाटत नाही. किमान आपल्याला दोष येणार नाही, असं जबाबदारीने वागावं इतकी जाणीव त्यांनी ठेवायला हवी.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या बोलघेवड्यांनी असा काही उच्छाद मांडला की कसं आणि कोणी कोणाला आवरावं, असं झालं होतं. आज सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्राचारातही त्यात फारसा फरक पडलेला नाही. तेव्हा परिचारक आणि गिरीश महाजनांसारखे नेते तोंड घालायचे आज ती जागा नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, चंद्रकांत पाटील यंच्यासारख्या बुजूर्गांनी घेतली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या वायफळ बडबडीचा आता उबग आला आहे. एकवेळ महाजन आणि परिचारकांकडे दुर्लक्ष करणं समजू शकतं. कारण त्यांची पातळीच ती मानली जाते, पण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष तर समजदार आणि राज्याच्या आणि पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी असलेले नेते आहेत. आपण केलेल्या वायफळ बडबडीचा हाताखालचे कार्यकर्ते गैरफायदा घेतात आणि तेही बडबडीचा तोच मार्ग अवलंबतात, हे या नेत्यांच्या लक्षात येत नाही. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपल्या सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्यात कोणती विकासकामं केली. यापुढे काय करणार आहोत, याची माहिती देणं अपेक्षित आहे.

त्याऐवजी शरद पवारांसारख्या बुजूर्ग नेत्यांवर अश्लाघ्य टीका करत भाजपचे हे नेते स्वत:चं हसं करून घेत आहेत. पवार हे शोले चित्रपटाचे जेलर शोभतात, असं वक्तव्य करत फडणवीस हे स्वत:ची कमजोरी लपवतात की काय, असा प्रश्न पडतो. पाच वर्षांचा हिशोब मागितला म्हणून पवारांना जेलर संबोधणं हे सुशिक्षित मुख्यमंत्र्याला शोभत नाही. टीका ही केलीच पाहिजे, पण त्यासाठी किती खाली यावं याला काही मर्यादा असावी. पवार यांचं वय काय, त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा काळ किती आणि आपलं वय किती इतका फरक जरी मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतला असता तरी त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं. सत्ता डोक्यात शिरली की सारा विसरभोळेपणा येतो. पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा काळ आणि मुख्यमंत्र्यांचं आजचं वय हे एकसारखं असूनही मुख्यमंत्री पवारांना शोलेच्या जेलरच्या रूपात मोजत असतील, तर मर्यादा कोण ओलांडतेय, याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवली पाहिजे.

- Advertisement -

राज्याच्या ज्या गृहखात्याची जबाबदारी फडणवीस यांनी आपल्याकडे घेतलीय त्या गृहविभागाचे आजवर कधी निघाले नसतील इतके वाभाडे गेल्या पाच वर्षात निघाले आहेत. फडणवीसांच्या जन्मभूमी नागपुरात त्यांनी गृहखातं स्वीकारल्यापासून झालेल्या हत्या आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेची झालेली स्थिती लक्षात घेता नागपुरात कायदा आणि सुव्यवस्था टिकून आहे, हे कोणीच मान्य करणार नाही. एका दिवसात चार चार हत्या त्यातली एक तर मुख्यमंत्र्यांच्या इलाख्यात होत असेल तर मुख्यमंत्र्यांविरोधात कोणी टीका करणार नाही? अशावेळी नागपूरकरांना चिथावणी देऊन प्रत्येक नागपूरकराला पवार गुन्हेगार समजत असल्याचा आरोप फडणवीस कोणत्या तोंडाने करत आहेत?

फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले आणि त्यांच्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षत्व पाळणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांच्याही जिभेला हाड राहिलेलं नाही. लोकसभा निवडणुकीत ते बारामतीतून सुप्रिया सुळे यांना हरवण्याच्या मागे लागले होते. सुळे यांचा पराभव झाला नाहीच आणि वायफळ बोललो म्हणून या पाटलांनी शास्तीही घेतली नाही. आता हेच पाटील पवारांना राजकीय आणि सामाजिक जीवनातून संपवण्याच्या मागे लागले आहेत. ज्या नेत्याला स्वत:च्या जन्मभूमीतून निवडणूक लढवता येत नाही, तो प्रदेशाध्यक्ष पवारांसारख्या नेत्याला सामाजिक आणि राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करायला निघाला तर त्याची किंमत कोण ठेवेल? पवारांसारख्या प्रचंड अनुभवी नेत्याला असं घरी बसवणं हा एकट्या पवारांच्या कर्तृत्वाचा अवमान नाही तर देशाच्या प्रगतीलाच आव्हान म्हटलं पाहिजे. देशाचे आपलेच पंतप्रधान ज्या पवारांच्या कर्तृत्वाला सलाम करत कौतुक करण्यासाठी त्यांच्या बारामतीत येतात त्या पवारांचं पाटलांसारख्या नेत्याला महत्त्व वाटू नये, इतका कद्रूपणा पाटलांनी स्वत:त जोपासला आहे.

एका मोठ्या आणि सत्तेतल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या हे अकलेचेच दिवाळे म्हटले पाहिजे. भाजपचे दुसरे नेते नितीन गडकरी यांनी नागपूरच्याच सभेत विरोधकांना उद्देशून त्यांच्या हातात घंटा द्या, असं वक्तव्य केलं होतं. गडकरी हे केवळ भाजपचे नेते नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील सर्वात कर्तृत्ववान मंत्री म्हणून त्यांचा गौरव स्वत: सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी मोठ्या मनाने केला. सरकारमधले जाणकार मंत्री म्हणून गडकरी सर्वपरिचित असताना तेच विकलांग झालेल्या विरोधकांच्या हाती घंटा द्या, असं जेव्हा सांगतात तेव्हा त्यांनाही सत्तेचा माज रोखता येत नाही असा अर्थ निघतो. गडकरी हे काही भाजपचे नवखे नेते नाहीत. एकेकाळी लोकसभेत भाजपच्या खासदारांची संख्या केवळ दोन होती तेव्हा गडकरी राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळत होते. इतकी कमजोरी असताना सत्ताधार्‍यांनी भाजपची अशा शब्दात हेटाळणी केली नव्हती. आज लोकसभेत काँग्रेसच्या नावावर किमान ५० खासदार तरी आहेत.

आज काँग्रेस नेभळी झाली असली तरी ती होण्याला जी काही कारणं आहेत ती लक्षात घेतली तरी विरोधकांच्या हातात घंटा देण्यापेक्षा आपल्या हातातील सूत्रं गैरप्रकारे चालवण्याची मात्रा त्या पक्षाने रोखली तरी पुरेसं आहे. याच गडकरींनी स्वामी विवेकानंद यांची तुलना एकदा दाऊदशी केली हेती. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आणि आज गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणार्‍या अमित शहांनीही निवडणुकीतील प्रचाराच्या फैरींचा गैरअर्थ काढत पवारांवर ते पाकिस्तानचे पुरस्कर्ते असल्याचं म्हटलं. शहांच्या या वक्तव्याचा पवारांच्या नातवानेच समाचार घेतला आणि शहा यांना तोंड झाकावं लागलं. पाकिस्तानचा पुरस्कर्ता असलेल्या पवारांना आपल्याच पक्षाच्या सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने गौरवलं, हा तेव्हा अमित शहा यांना अवमान कसा वाटला नाही? आपण बोलतो किती आणि काय बोलतो, याचं भान भाजपच्या नेत्यांना राहिलेलं नाही. टीकेची ही साटमारी पाहिली की भाजप नेत्यांच्या जिभेला हाड राहिलेलं नाही हेच खरंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -