घरफिचर्सखगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे

खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे

Subscribe

टायको ब्राहे हे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1546 रोजी स्कॅनिया इथे अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. टायको यांचे वडील खूप श्रीमंत होते आणि डॅनिश राजाच्या दरबारात त्यांना मान होता. टायको दोन वर्षांचे असताना जॉर्गन ब्राहे या त्यांच्या निपुत्रिक काकाने पुत्रप्रेमापोटी टायकोला चक्क पळवून नेले आणि त्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्याने टायको यांची कोपनहेगन आणि लिपझिग येथे तत्त्वज्ञान आणि कायदा यांचे उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळण्याची सोय केली. आपल्या पुतण्याने राजकीय कारकीर्द करावी असे त्यांच्या मनात होते. हे शिक्षण घेत असताना वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी, टायको यांनी २१ ऑगस्ट १५६० रोजी, खंडग्रास सूर्यग्रहण होईल असे भाकीत केले आणि विशेष म्हणजे त्यांचे हे भाकीत खरे ठरले. या घटनेमुळे त्यांना खगोलशास्त्रात रुची वाटायला लागली आणि त्यांनी स्वत:ला खगोलशास्त्राला जणू वाहून घेतले. शनी आणि गुरु हे ग्रह १५६३ साली एका रेषेत आले होते. टायको यांनी केलेले हे पहिले वैशिष्ठ्यपूर्ण निरीक्षण ठरले. टायको हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते.

१५७२ साली टायको ब्राहे यांचे लक्ष कॅसिओपिया तारकापुंजामध्ये दिसणार्‍या एका ठळक तार्‍याकडे गेले. यापूर्वी हा तारा इतका ठळकपणे ब्राहे यांच्या नजरेला पडला नव्हता. १४ महिने दिसणारा हा तारा म्हणजे अतिशय तेजस्वी असा अतिनवतारा होता. या तार्‍याला ब्राहे यांनी नोव्हा म्हणजे नवजात तारा असे संबोधले. ब्राहे यांनी या तार्‍याचा सखोल अभ्यास केला आणि आपल्या निरीक्षणांवर आधारित डी नोव्हा स्टेला नावाचे पुस्तक लिहिले. आपल्या निरीक्षणांवरून सूर्यमालेच्या बाहेरही तारे असावेत असा महत्वाचा निष्कर्ष ब्राहे यांनी काढला. टायको ब्राहे हे कोपर्निकसच्या कोष्टकांनी प्रभावित झाले होते. ग्रहांच्या हालचाली कशा होतात हे या कोष्टकांमध्ये लिहिले होते. खगोलशास्त्रातल्या निरीक्षणासाठी लागणारी उपकरणे त्यांनी स्वत: तयार केली.

- Advertisement -

यानंतरची वीस वर्षे म्हणजे सन १५७२ ते १५९२ या काळात टायको ब्राहे यांनी अखंडपणे निरीक्षणे केली. त्यांनी तब्बल ७७७ तार्‍यांचा अभ्यास केला आणि आश्चर्य म्हणजे या सगळ्या तार्‍यांची स्थिती त्यांनी निश्चित केली. त्यांनी केलेल्या निरीक्षणांची अचूकता एका अंशाच्या सहाव्या भागाइतकी म्हणजे १० मिनिटे इतकी होती. ती वाढवत वाढवत २ मिनिटे इतकी सूक्ष्म करण्यात त्यांना यश आले. त्याकाळी उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या उपकरणांच्या सहाय्याने अचूक निरीक्षणे घेण्यात ब्राहे यांनी आपल्या आयुष्याच्या अनेक रात्री व्यतीत केल्या. ब्राहे यांनी युरानीबोर्ग इथे उभारलेली वेधशाळा तीस वर्षं चाललेल्या एका युद्धामध्ये नष्ट झाली. परंतु आपल्या कार्यामुळे टायको ब्राहे हे नाव अजरामर झाले आहे. १५७२ साली त्यांनी अभ्यास केलेल्या तार्‍याला टायकोचा तारा म्हणून संबोधण्यात आले. अशा या महान शास्त्रज्ञाचे २४ ऑक्टोबर १६०१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -