घरफिचर्सचंदेरी दुनियेला कॅन्सरचा शाप

चंदेरी दुनियेला कॅन्सरचा शाप

Subscribe

चित्रपट कलाकारांची चंदेरी दुनिया दर्शकांना अतिशय सुखद वाटत असली तरी प्रत्यक्षात या दुनियेच्या मागे कमालीचे कष्ट, ताणतणाव असतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर होत असतो. चित्रपट निर्मितीच्या वेळी होणारी दगदग, शूटिंग ज्या ठिकाणी असते तेथील वातावरणाशी जुळवून घेताना होणारा त्रास आणि टिममधील अंतर्गत बेबनाव यांमुळे बहुसंख्य कलाकार तणावात असतात. खाण्यापिण्याच्या वेळाही वारंवार टळत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या प्रतिकारशक्तीवर होतो. ताणतणावांशी ज्यांना निडरपणे सामना करता येत नाही ते व्यसनांच्या आहारी जातात. आयुष्यातील एखाद्या दु:खदायक घटना, दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे कॅन्सर पेशींमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे सिनेसृष्टीला कलाकारांना आता आहार, विचार आणि आचार या तिन्ही गोष्टींवर लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे, कारण ही कारणे त्यांच्या जीवन - मृत्यूला कारणीभूत ठरू लागली आहेत.

दोन दिवसात चित्रपट क्षेत्रातील दोन महत्त्वाचे तारे निखळले. इरफान खान यांच्यापाठोपाठ ऋषी कपूर हे देखील जगण्याची लढाई हरले. या दोघांना ज्या आजाराने जर्जर केले होते तो कॅन्सर म्हणजे श्रीमंतांचा रोग असे म्हटले जाते, नर्गिस दत्तपासून इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासह बहुतांश कलाकारांनी कॅन्सरवरील उपचार परदेशात केल्याने या मुद्याला पुष्टीच मिळते, पण परदेशातील अत्याधुनिक उपचार पद्धतीही या कलाकारांना वाचवू शकली नाही. अन्य कोणत्याही क्षेत्रांपेक्षा चित्रपट क्षेत्रालाच कॅन्सरचा विळखा का पडतो याचा विचार आता या दोन बड्या अभिनेत्यांच्या निधनामुळे करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. बदलती जीवनशैली आणि व्यसनाधीनता या बाबी चित्रपट कलाकारांना कॅन्सरचे निमंत्रण देताना दिसतात. नर्गिस दत्त, फिरोज खान, विनोद खन्ना, टॉम अल्टर या कलाकारांना कॅन्सरने गिळंकृत केले आहे. या कलाकारांना झालेल्या कॅन्सरचे स्वरूप बघता त्यांच्या जीवनशैलीचा अंदाज येतो. ऋषी कपूर यांना ल्युकेमिया प्रकारचा कॅन्सर होता.

ल्युकेमिया साधारणत: अशा लोकांमध्ये आढळतो ज्यांचा कॅन्सरशी संबंधित कौटुंबिक इतिहास आहे. यासह, धूम्रपान केल्याने देखील ल्युकेमियाचा धोका वाढतो. इरफान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरने जखडले होते. बदलती जीवनशैली आणि अनुवंशिकता ही कारणे न्यूरोएडोक्राइन ट्यूमरची असू शकतात असे कॅन्सरतज्ज्ञ सांगतात, पण अजूनही या आजाराची ठोस कारणे शास्त्रज्ञांना समजू शकलेली नाहीत. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट काळातील ब्युटी क्वीन नर्गिस दत्त यांना पॅक्रिऑटिक प्रकारच्या कॅन्सरने पछाडले होते. न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. आनंद चित्रपटात कर्करुग्णाची भूमिका करणार्‍या राजेश खन्ना यांचा अंतही याच आजाराने झाला. कुर्बानी फेम फिरोज खान यांचे २००९ ला फुफुसाच्या कॅन्सरने निधन झाले, तर त्यांचा निकटचा मित्र तथा बॉलिवूडमधील मोस्ट हॅण्डसम हिरोंमध्ये ज्यांची गणना केली जात होती त्या विनोद खन्ना यांचे २०१७ मध्ये ब्लॅडरच्या कॅन्सरने निधन झाले.

- Advertisement -

ते अनेकवेळा उपचारासाठी जर्मनीला जाऊन आले होते. डिंपल कपाडिया यांची धाकटी बहीण सिंपल यांचाही कॅन्सरने बळी घेतला. ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचे त्वचेच्या कॅन्सरने निधन झाले. चित्रपटसृष्टीत एकेकाळी दादागिरी करणारे हे कलाकार कॅन्सरसमोर दुबळे ठरले. अर्थात सगळेच कलाकार कॅन्सरसमोर झुकले असे नाही. अनेकांनी कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली आहे. सोनाली बेंद्रे यांचे उदाहरण ताजे आहे. त्यांना हायग्रेड मेस्टास्टेटिस कॅन्सरने पछाडले होते. परंतु, न्युयॉर्कमध्ये उपचार घेऊन त्या गेल्या वर्षी भारतात परतल्या. मनीषा कोईराला गर्भाशयाचा कॅन्सरमधून मुक्तता मिळून नवे आयुष्य जगत आहे. २०१३ मध्ये अमेरिकेत तिच्यावर सहा महिने उपचार सुरू होते. व्यसनांच्या अति आहारी गेल्यानेच मनीषाला कॅन्सर झाल्याचे बोलले जाते. दुसरीकडे लिसा रे सध्या चंदेरी दुनियेतून लांब आहे.

कर्करोगावर मात करणारी लिसा सध्या महिला सबलीकरण, कॅन्सरवरील रुग्ण आणि योगाचा प्रसार यासाठी काम करताना दिसतेय. अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मात्र, आता या आजारातून ती पूर्णपणे बरी झाली आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला होता. मात्र, उपचारांती आता राकेश रोशन बरे झाले आहेत. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते असणार्‍या अनुराग बसू यांनाही कॅन्सर झाला होता. तुम्ही केवळ दोन महिने जगू शकता असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, इच्छाशक्तीच्या जोरावर अनुराग यांनी कर्करोगावर मात केली आहे. ब्युटी क्वीन नफीसा अली यांनी पॅरिटोनियल कॅन्सरशी झुंज दिली. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी गेल्या काही महिन्यांपासून चित्रपट, नाटक, मालिकांतून ब्रेक घेतला होता. गेल्या डिसेंबरपासून ते कर्करोगानं त्रस्त असून त्यावर उपचार घेत होते. औषधोपचार आणि किमोथेरपीने त्यांनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात करत पुन्हा रंगभूमीवर पुनरागमन केले आहे.

- Advertisement -

चित्रपट कलाकारांची चंदेरी दुनिया दर्शकांना अतिशय सुखद वाटत असली तरी प्रत्यक्षात या दुनियेच्या मागे कमालीचे कष्ट, ताणतणाव असतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर होत असतो. चित्रपट निर्मितीच्या वेळी होणारी दगदग, शूटिंग ज्या ठिकाणी असते तेथील वातावरणाशी जुळवून घेताना होणारा त्रास आणि टिममधील अंतर्गत बेबनाव यांमुळे बहुसंख्य कलाकार तणावात असतात. खाण्यापिण्याच्या वेळाही वारंवार टळत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या प्रतिकारशक्तीवर होतो. ताणतणावांशी ज्यांना निडरपणे सामना करता येत नाही ते व्यसनांच्या आहारी जातात. अर्थात सगळेच व्यसनी कलाकार तणावात असतात असेही नाही. अनेकांनी पाश्चिमात्य जीवनशैलीचा स्वीकार करताना त्यातील अवगुणांना कवटाळलेले दिसते.

त्यातून नित्याच्या पार्ट्या त्यांच्या अंगवळणी पडलेल्या असतात. त्यातूनच मग धूम्रपान आणि मद्यपानाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढते. धूम्रपान हे कॅन्सरचे प्रमुख कारण मानले जाते. यामुळे फुफ्फुसांबरोबर घसा, तोंड, अन्ननलिका, श्वसननलिका, मूत्राशय आदी प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. भारतात ४० टक्के पुरुष आणि २० टक्के महिलांचे मृत्यू सिगारेट ओढल्याने होतात. दिवसातून दोन किंवा अधिक पाकिटे सिगारेट ओढणार्‍यांना कॅन्सर होण्याची शक्यता २० पटीने वाढते. धूम्रपान आणि मद्यपान यामुळे घसा आणि तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण ७५ टक्के झाले आहे. हार्ड लिकर आणि बिअर सेवन करणार्‍यांना वाईन पिणार्‍यांपेक्षा जास्त कॅन्सर होण्याची शक्यता असते. याशिवाय पाश्चिमात्य खाद्यपदार्थ व आहार एका निश्चित प्रमाणापुरते का होईना, कर्करोगास पोषक आहेत. अन्नपदार्थात स्निग्ध पदार्थांचे (चरबी) प्रमाण जास्त असते. स्तन व मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्यास यामुळे मदत होते. काही पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन आणि पालेभाज्या व फळे कमी खाणे याचा कॅन्सरशी संबंध जोडला जातो.

बहुतांश कलाकार आठवडा-आठवडा पालेभाज्यांच्या वाटेलाही जात नाहीत. जास्त प्रमाणात साखरयुक्त, चरबीयुक्त पदार्थ व मांसाहार करणार्‍यांना कॅन्सरची जास्त रिस्क असते. पिझ्झा, बर्गरसारखे जंकफूड आणि कोल्ड्रिंक तसेच पॅक केलेले व साठवलेले अन्नही कॅन्सरला निमंत्रण देते. कलाकारांच्या शूटिंगच्या वेळाही निश्चित नसतात. जास्त प्रमाणात सूर्यकिरणांचा प्रभाव, अतिप्रमाणात सूर्यकिरणांशी संपर्क येण्याची व त्यातच सनबर्नचा त्रास असणार्‍यांना त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. गोर्‍या माणसांना याचा धोका अधिक असतो असे तज्ज्ञ सांगतात. शूटिंग ज्या ठिकाणी आहे तेथील वातावरणातील केमिकल्स, किटकनाशके, गॅस, इलोक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे कॅन्सर पेशींमध्ये वाढ होऊ शकते. याशिवाय असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरणार्‍या एचआयव्ही व एचपीसीच्या व्हायरसमुळे कॅन्सर होऊ शकतो. कलाकारांचे आयुष्य हे ताणतणावांनी युक्त असते. आयुष्यातील एखाद्या दु:खदायक घटना, दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे कॅन्सर पेशींमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे सिनेसृष्टीला कलाकारांना आता आहार, विचार आणि आचार या तिन्ही गोष्टींवर लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे, कारण ही कारणे त्यांच्या जीवन – मृत्यूला कारणीभूत ठरू लागली आहेत.

चंदेरी दुनियेला कॅन्सरचा शाप
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -