घरफिचर्समागे उभे जॉर्ज, पुढे उभे जॉर्ज!

मागे उभे जॉर्ज, पुढे उभे जॉर्ज!

Subscribe

जॉर्ज हे राजा होते. पहिले, दुसरे आणि तिसरे. माझ्या मते ते मागे उभे आहेत आणि पुढेही उभे आहेत… वरही आहेत आणि आपल्यासोबत खालीही आहेत. श्रमिकांचा आवाज आहेत, शोषितांचे अश्रू पुसणारे प्रेक्षितही आहेत. कार्यकर्त्यांच्या घरी आंघोळ, जेवण करून, त्याच्या घरातील भाग होणारे ते माणुसकीचा झरा आहेत. लेंगा, सदरा, पायात चप्पल, काखेत झोळी, झोळीत पुस्तक, अशा वेषात वावरणारे तुमच्या आमच्यासारखे माणूस आहेत. संरक्षणमंत्रीही झाल्यावर आपले कपडे आपण धुणारे, जेवल्यावर ताट उचलून धुवून ठेवणारे ते साधे सरळ आहेत. मोजकेच सदरे सतत घातल्यामुळे ते विरले गेले तरी फाटेपर्यंत घालणारे ते सर्वसामान्य आहेत. ते आज नसूनही असल्यासारखे आहेत. कारवार ते मुंबई आणि नंतर दिल्ली ते बिहार असा थक्क करणारा प्रवास करणारे ते अजब रसायन आहेत.

गिरणी कामगारांचा मुलगा असल्याने मला डॉ. दत्ता सामंत यांच्याबद्दल जेवढा आदर आहे, तेवढाच आदर जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयी आहे; पण, या आदरापलीकडे जॉर्ज यांच्यावर निस्सीम प्रेम आहे आणि प्रेम आले की ८० पलीकडच्या जॉर्ज यांना आदर राखूनही एकेरी बोलताना आपण कुठे मर्यादा पार करतो असे वाटत नाही. ते आपल्या घरातले मोठे भाऊ, शाळा कॉलेजमधील मित्र वाटतात… कधीही खांद्यावर हात ठेवून म्हणतील, चल इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊ, कटिंग चहा पिऊ. आज ते आपल्यात नाही. खरंतर, दहा वर्षांपूर्वीच ते या जगापासून दूर गेले होते. शरीर जिवंत होते; पण मेंदू मेला होता. आता त्यांचे शरीरही या जगातून दूर गेले आहे.

- Advertisement -

‘आवाज कुणाचा’ (ही मूळ घोषणा जॉर्ज यांच्या कामगार आंदोलनातील आहे आणि नंतर ती शिवसेनेने आपल्या नावावर खपवली) या आपल्या एका शब्दावर आडवी मुंबई उभी करणारे जॉर्ज हे अजब रसायन होते. त्यांना तुम्ही शब्दात बांधू शकत नाही, साखळीने जखडू शकत नाही, विचारांच्या चौकटीत बांधू शकत नाही… जॉर्ज हे राजा होते. पहिले, दुसरे आणि तिसरे. माझ्या मते ते मागे उभे आहेत आणि पुढेही उभे आहेत… वरही आहेत आणि आपल्यासोबत खालीही आहेत. श्रमिकांचा आवाज आहेत, शोषितांचे अश्रू पुसणारे प्रेक्षितही आहेत. कार्यकर्त्यांच्या घरी आंघोळ, जेवण करून, त्याच्या घरातील भाग होणारे ते माणुसकीचा झरा आहेत. लेंगा, सदरा, पायात चप्पल, काखेत झोळी, झोळीत पुस्तक, अशा वेषात वावरणारे तुमच्या आमच्यासारखे माणूस आहेत. संरक्षणमंत्रीही झाल्यावर आपले कपडे आपण धुणारे, जेवल्यावर ताट उचलून धुवून ठेवणारे ते साधे सरळ आहेत. मोजकेच सदरे सतत घातल्यामुळे ते विरले गेले तरी फाटेपर्यंत घालणारे ते सर्वसामान्य आहेत. ते आज नसूनही असल्यासारखे आहेत. कारवार ते मुंबई आणि नंतर दिल्ली ते बिहार असा थक्क करणारा प्रवास करणारे ते अजब रसायन आहेत.

समाजवादी विचारांचे निस्सीम पाईक असणार्‍या जॉर्ज यांनी नंतर भाजपची सोबत केली म्हणून आजही समाजवादी त्यांच्यावर खार खाऊन आहेत. ते हे जग सोडून गेल्यावरही भाजपला पाठिंबा देण्याचा त्यांचा निर्णय किती चुकीचा होता, असे सांगून उर बडवणार्‍या, पण कधी स्वतःच्या खिशात हात घालून दुसर्‍याला साधा चहा पाजायची माणुसकी नसणार्‍या आणि फक्त मी मी करणार्‍या ढोंगी समाजवाद्यांना (विचार ढोंगी नसतात, माणसे लबाड असतात) आजही जॉर्ज यांचे भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय हा सैद्धांतिक कुपोषण वाटतो. त्यांना आयुष्यभर काँग्रेसचे लांगुलचालन करून घराणेशाहीच्या आरत्या ओवाळणार्‍या खोटारड्या धर्मनिरपेक्षवाद्यांच्या माकडउड्या चालतात; पण जॉर्ज चालत नाहीत. म्हणून ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी म्हणतात ते मनाला भावते. ‘जॉर्ज यांचे धोरण चुकले असे आपण म्हणू शकतो, पण त्यांच्या इतका अफाट बुद्धिमत्तेचा, सामान्यांची कणव असलेला आणि असिम परिश्रमाची तयारी असलेला दुसरा नेता मी पाहिलेला नाही. अशी माणसे समाजात वारंवार जन्माला येत नसतात. एखाद्यात असे गुण असले तर भांडवलशाही व्यवस्था त्यांना उचलून घेते. जॉर्ज यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रेम आणि आदर राहील’.

- Advertisement -

म्हणूनच जॉर्ज यांची दखल न घेता भारतीय राजकारणाच्या इतिहासात पुढे जाता येणार नाही. जॉर्ज यांनी समता पक्षाची स्थापना केल्यावर बिहारचे जंगलराज करणार्‍या लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात उभे राहावे, असे त्यांनी डाव्या पक्षांच्या नेत्यांना सांगितले होते. पण, डाव्यांनी कच खाल्ली. शेवटी जॉर्ज यांनी सीताराम येच्युरी यांना सुनावले, ‘मीदेखील एक राजकीय व्यक्ती आहे. राजकारणात अस्तित्व टिकवण्याचा सिद्धांत किंवा रणनीती असते आणि तुम्ही मला साथ दिली नाही तर नाईलाजाने मला अन्य कोणत्या तरी पक्षाबरोबर हातमिळवणी करून राजकारणात माझ्या पक्षाचे अस्तिव टिकवावे लागेल. तुम्ही मला दुसरीकडे ढकलत आहात’. येच्युरी जॉर्ज यांना आश्वासन देऊ शकले नाहीत आणि सरतेशेवटी जॉर्ज यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवले. जॉर्ज लबाड नाहीत हे माहीत असूनही त्यांच्यावर त्यावेळीही विश्वास ठेवला गेला नाही आणि आजही.

ज्या मार्क्सवाद्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर लालूप्रसादांचे जंगलराज खपवून घेतले होते आणि जॉर्ज यांना साथ नाकारली होती, त्यांनीच नंतर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून लालूप्रसाद यांची साथसंगत सोडली होती, हे लक्षात घ्यायला हवे. विश्वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार स्थापन करण्यासाठी जॉर्ज यांचा पुढाकार होता. अर्थातच हे सरकार चालवण्यासाठी काँग्रेसची मदत मिळणार नव्हती. त्यामुळे या सरकारला संघ, भाजप आणि कम्युनिस्टांची मदत लागणार होती. विशेष म्हणजे व्हीपींनी याची सर्व जबाबदारी जॉर्ज यांच्यावर सोपवली. व्हीपी हे सरकार स्थापन झाल्यावर कारभारात सुसूत्रता राहावी यासाठी भाजप आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांना भोजनाला बोलावून चर्चा करत. हा संदर्भ देत जॉर्ज म्हणाले होते, ‘तेव्हा सेक्युलर आणि नॉन सेक्युलर वाद कुठे गेला होता’.

यानंतर जॉर्ज यांनी समता पक्षाला भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील केले म्हणून समाजवादी परिवारातून पुन्हा एकदा टीकेचा भडिमार केला गेला. मोठा गदारोळ केला; पण त्याचवेळी व्हीपी यांच्या एका बाजूला भाजप आणि दुसर्‍या बाजूला डावे असताना त्यांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. तीच गोष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अनेक मंडळी चंद्रशेखर यांच्या जवळ होती, तरीही चंद्रशेखर यांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल शंका घेतली गेली नाही. तेलगू देशमने एनडीएला बाहेरून पाठिंबा दिलेला होता आणि तरीही त्यांच्या धर्मनिरपेक्षतेविषयी कोणी शंका घेतली नाही. मग फक्त जॉर्ज यांनीच एनडीएमध्ये सामील होताच एवढा गदारोळ का? असा प्रश्न निश्चितपणे निर्माण होतो. जॉर्ज यांच्या मनात कायम ही खंत राहिली.

गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमध्ये महाभयंकर दंगल उसळली. जॉर्ज यांनी संरक्षणमंत्री म्हणून त्यांच्या अधिकारात लष्कर पाठवण्याचा निर्णय घेतला. यावर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रचंड नाराज होते. याचदरम्यान राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनाही रोखण्याचा प्रयत्न मोदींनी केला. मोदींच्या असहकाराचा विचार न करता आणि हातावर हात ठेवून न बसता जॉर्ज यांनी गुजरातमध्ये शांतता मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावर दगडफेकही झाली आणि त्यांच्यावर पडलेले दगड हे मोदी यांच्या सत्ताधारी भाजपवाल्यांनी मारले होते. ओरिसातील स्टेन्स प्रकरण मात्र जॉर्ज यांच्या अंगावर आले आणि तेसुद्धा त्यांच्या नेहमीच्या अति साहसवादी भूमिकेमुळे. बजरंग दलाच्या दारासिंगने फादर स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या केल्याने देशभरात गहजब झाला होता. प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपवाल्यांनी आपले नेहमीचे जॉर्ज नावाचे हुकूमी अस्त्र बाहेर काढले. अशा परिस्थितीत खरेतर जॉर्ज यांनी दोन पावले मागे येत भाजपच्या तंगड्या त्यांच्या गळ्यात अडकवायला हव्या होत्या. पण, जॉर्जने तसे केले नाही आणि उगाच नेहमीप्रमाणे साहसी उडी मारली. यातील गंभीर बाब म्हणजे ओरिसावरून आल्यानंतर दारासिंगला त्यांनी क्लीन चिट दिली. ही मोठी चूक तसेच नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल विष्णू भागवत यांना तडकाफडकी काढून टाकण्याचा त्यांचा निर्णयही वादग्रस्त ठरला.

जॉर्ज हे भाजपच्या अतिजवळ जात असतानाच काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाल्यानंतर जॉर्ज यांच्यातील गांधी-नेहरू घराणेशाही विरोधात आवाज उठवणारा नेता पुन्हा एकदा मोठ्याने जागा झाला. काँग्रेसनेही मग त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. शवपेटीकांच्या सौद्यातील कथित भ्रष्टाचार, त्यांच्या निकटच्या सहकारी जया जेटली यांच्या विरोधातील स्टिंग ऑपरेशन, संसदेत काँग्रेसवाल्यांचा जॉर्ज विरोधात असहकार या सर्व प्रकारांमुळे जॉर्ज एकाकी पडत गेले आणि त्यातच त्यांना प्रकृतीने दगा देण्यास सुरुवात केली. त्यांचा मेंदू निकामी होत गेला. रेल्वे संपकाळात तसेच आणीबाणीत पोलिसांनी गुरासारखी जॉर्ज यांना प्रचंड मारहाण केली होती, त्याचाच हा परिणाम होता. हडापेराने मजबूत आणि इच्छाशक्तीने दांडगा असलेला हा माणूस खरंतर काँग्रेसने केलेल्या अमानुष हालाने त्याचवेळी मेला असता… पण, ते जॉर्ज होते. सहजसहजी मृत्यूलाही जवळ न येऊ देणारे!

कामगार संघटना, चळवळी आणि आंदोलने यांना नवी दिशा देत श्रमिकांचा आवाज बुलंद करणारे आणि जनतेचा आवाज संसदेच्या सर्वोच्च व्यासपीठावर धगधगत ठेवणारे जे काही मोजके नेते या देशाने पाहिले त्यात जॉर्ज यांचे स्थान अव्वल होते. राम मनोहर लोहिया यांच्या ‘रचनात्मक काम, आंदोलन आणि मतपेटी’, या त्रिसूत्रीने त्यांनी शेवटपर्यंत काम केले. विशेष म्हणजे त्यांनी राजकीय फायद्यासाठी आपल्यातला संवेदनशील माणूस शेवटपर्यंत मरू दिला नाही. जॉर्ज लौकिकार्थाने आज आपल्यात नाही; पण ते या अवकाशात भरून उरले आहेत. सर्वसामान्यांसाठी जेव्हा जेव्हा

वादळ, आक्रमण रस्त्यावर दिसेल आणि माणुसकीचा झरा वाहत असेल तिथे आमचे जॉर्ज असतील… मागे असतील आणि पुढेही असतील!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -