घरफिचर्सयकृताचा कॅन्सर - आयुर्वेदीय द़ृष्टीकोन

यकृताचा कॅन्सर – आयुर्वेदीय द़ृष्टीकोन

Subscribe

सतत व अधिक धूम्रपान, मद्यपान, गुटखा, तंबाखू, सुपारी या सारखी व्यसने यकृताचे कार्य बिघडवतात. मधुमेह, स्थौल्य, लिव्हर सिरॉसिस, हिपॅटायटिस बी व सी, फॅटी लिव्हर हे आजार असलेल्या व्यक्तींत यकृताचा कॅन्सर होण्याची संभावना बळावते. आजकाल कृषिक्षेत्रात अतिरिक्त प्रमाणात वापरली जाणारी रासायनिक खते व कीटकनाशके हेही यकृताच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे संभाव्य कारण आहे. त्यावर आयुर्वेदीय उपचार प्रभावी ठरू शकतात.

मागील सदरात आपण आमाशयाच्या कॅन्सरबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या सदरात आपण यकृताच्या कॅन्सरबाबत जाणून घेणार आहोत.

यकृताचा कॅन्सर हा जगभरात आढळणा-या कॅन्सर प्रकारांपैकी सहाव्या क्रमांकाचा कॅन्सर आहे. तसेच मृत्यूला कारणीभूत कॅन्सर प्रकारांपैकी दुस-या क्रमांकाचा कॅन्सर आहे.

- Advertisement -

यकृत हा अन्नपचन प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग असणारा अवयव आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार यकृताची निर्मिती रक्तधातूपासून झाली आहे. यकृत हे रक्तवह स्त्रोताचे मूलस्थान असल्याने रक्ताची दुष्टी करणारा आहार-विहार यकृताच्या कॅन्सरला कारणीभूत ठरतो.

इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोलीच्या गेल्या अनेक वर्षातील संशोधनातील निरीक्षणांनुसार वारंवार व अधिक प्रमाणात चिंच, टोमॅटो सॉस, व्हिनेगार यासारखे अतिशय आंबट पदार्थ सेवन, खारवलेले मासे-वेफर्स- फरसाण-पापड-लोणचे असे अधिक मीठ असलेले पदार्थ सेवन, हिरवी मिरची-ठेचा-गरम मसाला असे अतितिखट पदार्थ सेवन करणे यामुळे रक्तदुष्टी होऊन यकृताचे विकार होण्याची संभावना वाढते. याशिवाय श्रीखंड, पेढे, बर्फी, बासुंदी, पनीर, चीज असे दूधाचे आटवलेले व पचनास जड पदार्थ मोठ्या प्रमाणात व सतत आहारात असणे, मांसाहार, शिकरण, फ्रुट सॅलड, मासे व दुग्धजन्य पदार्थ एकत्र सेवन करणे, भजी, वडे, सामोसे असे तळलेले पदार्थ वारंवार सेवन करणे यामुळे पचनाची क्रिया बिघडून यकृताचे कार्यही मंदावते.

- Advertisement -

याशिवाय सतत व अधिक धूम्रपान, मद्यपान, गुटखा, तंबाखू, सुपारी या सारखी व्यसने यकृताचे कार्य बिघडवतात. मधुमेह, स्थौल्य, लिव्हर सिरॉसिस, हिपॅटायटिस बी व सी, फॅटी लिव्हर हे आजार असलेल्या व्यक्तींत यकृताचा कॅन्सर होण्याची संभावना बळावते. आजकाल कृषिक्षेत्रात अतिरिक्त प्रमाणात वापरली जाणारी रासायनिक खते व कीटकनाशके हेही यकृताच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे संभाव्य कारण आहे.

पोटाच्या उजव्या कुशीत दुखणे, जडपणा जाणवणे, यकृताचा आकार वाढून पोटाच्या उजव्या बाजूला यकृत स्पर्शगम्य होणे, प्लीहेचा आकार वाढणे, पोटात पाणी होणे, भूक मंदावणे, तोंडाला चव नसणे, उलट्या होणे. संपूर्ण शरीराला खाज सुटणे, डोळे-जीभ व त्वचेचा रंग पिवळा होणे, वजन कमी होणे अशी लक्षणे अधिक दिवस दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन, एम्.आर्. आय., पेट स्कॅन , लिव्हर स्कॅन, बायोप्सी, अल्फा फिटोे प्रोटिन हा ट्युमर मार्कर (रक्ताची तपासणी) यापैकी योग्य त्या तपासण्या करुन घेणे हितकर ठरते.

– वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -