घरफिचर्सरेडीमेड संसार का हवाय?

रेडीमेड संसार का हवाय?

Subscribe

स्वत:ची नोकरी, त्यातील ताण, आर्थिक ओढाताण हे जर सत्य असेल तर तेच पुरुषांच्याबाबतही लागू होणार आहे. वयाची पंचवीशी गाठलेली मुलगी जर तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात स्ट्रगल करत असेल तर तीच परिस्थिती मुलांच्याबाबतही सारखीच असणार आहे, पण इथं मुली स्त्रीवाद, समतेचा विचार सोयीनं विसरतात. एकतर आयुष्यात माणूस कधीही सेटल होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाला आयुष्याचा एक टप्पा, एक लक्ष्य गाठलं की नव्या गोष्टींचे वेध सुरू होतात. त्यामुळे आयुष्यात सेटलमेंट नावाची अशी काहीही भानगड नसते.

माझ्या एका परिचयातील मुलीचं नुकतंच लग्न ठरलंय. लग्नाला तसा डिसेंबरपर्यंतचा अवकाश आहे. तिचं सासर एकीकडं आणि तिचा होणारा नवरा अन्य एका शहरात राहतो. त्यामुळं लग्नाआधी साहजिकच त्यांना संसारोपयोगी सामानाची जुळवाजुळव करणं स्वाभाविक आहे. मुलाच्या आईनं सहज प्रस्ताव ठेवला की मुलांना लागणार्‍या वस्तू आत्तापासूनच घेऊयात. त्या प्रस्तावात अर्थातच मुलीकडच्यांनी रुखवातात संसारोपयोगी गोष्टी द्यावात असं अभिप्रेत होतं, पण यावर मुलीच्या आईनं झटदिशी म्हटलं, ‘आपली मुलं जर स्वत:चा संसार उभा करू शकत नसतील, तर मग कशाला करायचं त्यांचं लग्न..दोघं मिळून स्वत:साठी लागणार्‍या वस्तू घेऊ शकत नसतील, तर इतकं शिकवलं, पायावर उभं केलं त्यातून त्यांनी काय मिळवलं. त्यापेक्षा राहू दे आपापल्याच घरी. आपल्यावरच अवलंबून असतील, तर आपणच सांभाळू की, लग्न कशाला करून द्यायचं..’

मुलीच्या आईचं म्हणणं किती रास्त होतं. लग्नाळू मुलं जर स्वत:च्या संसारासाठी जर आर्थिक तरतूद करू शकत नाहीत, तर त्यांनी लग्न तरी का करावं.. हा किती महत्त्वाचा विचार त्या नकळत मांडत होत्या. बहुतांश लग्नात वधू-वर दोघांनाही रेडिमेड संसार हवा असतो. आपल्या आईवडिलांनी कमावलेला सारा पैसा मुलांचा संसार उभा करण्यात त्यांनी खर्चावा, अशी उघडउघड अपेक्षा असते. केवळ वरपक्षाकडून अपेक्षा ठेवल्या जातात. त्याबाबत तर नेहमीच बोललं जातं. मात्र, दुर्दैवानं खुद्द मुलीदेखील अशाप्रकारची अपेक्षा आणि मागणी आपल्याच आईवडिलांकडून करतात. आपल्या संसारासाठी आपण झटावं, आपल्याला लागणारी लहानातील लहान वस्तू ते मोठी वस्तू आपण कष्ट करून खरेदी करावी, असा भाव मुलींकडेही आढळत नाही तेव्हा तर फारच आश्चर्य वाटतं. काही वेळा पालकांना कर्जबाजारी व्हावे लागते तरीही मुली याकडे कानाडोळा करून आपल्या संसाराच्या सोयी पाहत राहतात.

- Advertisement -

माझ्याच पाहण्यात एक उच्च मध्यमवर्गीय आणि एक आर्थिक निम्न वर्गातील दोन मुलींची लग्नं झाली. त्यातील उच्च मध्यमवर्गीय मुलीनं स्वत:साठी, स्वत:च्या होणार्‍या नवर्‍यासाठी आणि सांसारिक गोष्टींसाठी कुठलीही तडजोड करण्याची तयारी दाखवली नाही. याउलट आपण आता लग्न करून जाणारच आहोत तेव्हा आपल्याला जे जे काही आपल्या आईवडील, भावंडांकडून घेता येईल तितकं घेण्याचा तिचा प्रयत्न होता. आपली खर्च करण्याची ऐपत असली तरीही त्या खर्चाला कुठेतरी मर्यादा, मुरड घालण्याची गरज आहे, ही बाब भावानं बहिणीला सांगायचा प्रयत्न केला, तर त्यावरून वितंडवाद सुरू झाला. आर्थिक निम्न वर्गातील मुलीच्याही घरची परिस्थिती फार वेगळी नव्हती. बापानं कर्ज काढलं होतं ही बाब मुलीपासून लपून नव्हती तरीही तीदेखील महागड्या वस्तूंची मागणी करत होती.

भांडीकुंडी किंवा जीवनावश्यक वस्तूच नव्हे तर फ्रिज, वॉशिंग मशीनसारख्या अगदी महागड्या वस्तूंचीदेखील मागणी करत होती. वैतागून तिच्या वहिनीनेच तिला सांगितलं की, अगं आमच्या आईबाबांची बरी परिस्थिती होती तरी आम्ही हे काही आणलं नाही, स्वत: कष्ट करून खरेदी केलं आणि आपल्या घरात आपण कष्ट न करताच आयतं काहीतरी घेणं हे बरं तरी वाटतं का? आपलं घर आपल्या आवडीच्या, कष्टाच्या वस्तूंनी सजलं तर ते अधिक चांगलं नाही का! यावर त्या नवर्‍या मुलीचं उत्तर होतं, आम्ही चांगली माणसं आहोत म्हणून तुम्ही काहीही घेऊन आल्या नाहीत तरी इथं तुम्हाला कुणी काही म्हटलं नाही, पण गावात लोकं नावं ठेवतात. मुलीच्या बापानं काहीच दिलं नाही म्हणतात. इज्जत ठेवत नाहीत, त्यामुळं मला हवं ते मी सारं घेऊन जाणार आणि आता गेले तर परत मला तरी कोण विचारणार आहे.

- Advertisement -

या दोन्ही वर्गातील मुलींचा विचार साधारण सारखाच होता. आपला संसार चांगला सजून यावा, लोकांनी नाव काढावं ही जशी आनंदाची भावना होती तशीच आपल्या माहेरी आपल्याला आता कुठल्याच प्रकारची जागा उरणार नाही, अशी असुरक्षिततेची भावनादेखील होतीच. ती नाकारता येणारच नाही. लग्नानंतरही तू माहेरच्या कुटुंबाचा हिस्सा आहेस ही भावना वाढीस लावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याची गरज आहे. तरीदेखील शिकल्यासवरल्या मुलीही आपल्या कुटुंबाचा विचार न करता मागण्या करत सुटतात तेव्हा आपण नेमकं काय बोलावं आणि कसं वागावं हेच मुळी कळत नाही.

अगदी स्वत:ला आधुनिक, मोकळ्या विचारांच्या, कोणत्याही प्रकारचा लिंगभेद न मानणार्‍या, समतेचं मूल्य ध्यानात घेऊन स्त्रीवादी असणार्‍या मुली/बायकाही अनेकदा अशा चमत्कृत वागतात. त्या मांडत असलेला विचार आणि त्या वागत असलेला विचार यात इतकी तफावत असते की यांना आपण खुल्या, मोकळ्या विचारांचं तरी कसं मानावं, असा प्रश्न पडतो. आपण स्त्री आहोत आणि अन्यायकारक पितृसत्ता आपण नाकारतो तेव्हा त्यासोबतच त्या व्यवस्थेचे असणारे प्रिव्हिलेजेसही नाकारायला हवेत, हे मात्र विसरतात.

त्यातूनच मग होणारा नवरा हा ‘वेल सेटल्ड’ असावा, अशी काहीतरी अपेक्षा असते. त्याची उत्तम नोकरी असावी, पाच आकडी पगार असावा, स्वत:चं घर असावे, जमल्यास गाडीही असावी…थोडक्यात एका रेडीमेड घरात त्यांना प्रवेश करायचा असतो. जे घर मुळातच सेट आहे तिथं जाऊन यांना यांचा संसार मांडायचा असतो. लग्न करताना मुलाच्या घरची परिस्थिती चांगली असावी, अशी अपेक्षा ठेवण्यात चूक काहीच नाही. मात्र, आपण अपेक्षांचा भडीमार करताना स्वीकारलेल्या समतेच्या मूल्याला नकळत तिलांजली देतो. स्वत:ची नोकरी, त्यातील ताण, आर्थिक ओढाताण हे जर सत्य असेल तर तेच पुरुषांच्याबाबतही लागू होणार आहे. वयाची पंचवीशी गाठलेली मुलगी जर तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात स्ट्रगल करत असेल, तर तीच परिस्थिती मुलांच्याबाबतही सारखीच असणार आहे, पण इथं मुली स्त्रीवाद, समतेचा विचार सोयीनं विसरतात. एकतर आयुष्यात माणूस कधीही सेटल होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाला आयुष्याचा एक टप्पा, एक लक्ष्य गाठलं की नव्या गोष्टींचे वेध सुरू होतात. त्यामुळं आयुष्यात सेटलमेंट नावाची अशी काहीही भानगड नसते. फार तर, आपण आपला संसार चालवणं, आरोग्याची काळजी घेणंं जमू शकेल का हे पाहणं संयुक्तिक ठरू शकतं. मात्र, सेटलमेंट नावाच्या भुलाव्यात अडकून आयुष्याचे निर्णय घेण्यात हशील काय असते.

आजही जर मुलगा मुलीपेक्षा कमी शिकलेला असेल, त्याची कमाई मुलीपेक्षा कमी असेल तरी लगेच त्या गोष्टी मुलांच्या दुर्गणाच्या खात्यात जातात, असं का? सहजीवनामध्ये समानता, समता, बरोबरी अपेक्षित असेल तर तिथं मुलींना मुलांचं कमी शिक्षण अगर कमी कमाई ही कमीपणाची भावना का होते. मुलींना तिथं कमीपणा वाटण्याचं कारण काय असतं. आपला साथीदार हा एकवेळ कमी कमावता असेल, पण माणूस म्हणून तो कसा आहे हे महत्त्वाचं का नसतं. पितृसत्तेच्या व्यवस्थेतून स्वत:ला मोकळ्या करणार्‍या स्त्रिया एका अर्थानं पुन्हा अशा विषमतेच्या मुळांना खतपाणी घालतानाच दिसतात तेव्हा फारच त्रास होतो. मुलांनी समतेनं वागावे, अशी अपेक्षा करत असताना आपणही नकळतपणे बायस्ड तर होत नाहीयोत ना, हेही पाहण्याची गरज आहे. अजूनही मुलींबाबत अनेक ठिकाणी विषमता आहे हे मान्यच आहे, पण जे कुणी त्या विषमतेच्या चौकटीबाहेर पडत आहेत. किमान जरा बर्‍या घरात जन्मून काही चांगल्या सोयीसुविधांसह प्रिव्हीलेजेससह जगत आहेत, त्यांनी तरी हा विचार करणं गरजेचंच आहे की, आपण नकळतपणे विषमता तर पेरत नाहीयोत. शेवटी स्त्री असो वा पुरुष दोघांनाही माणूसपणाकडे प्रवास करायचा आहे.

-हिनाकौसर खान पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -