घरफिचर्समायमहानगर ब्लॉगप्रतिमाभंजन करणारी ट्रोलधाड

प्रतिमाभंजन करणारी ट्रोलधाड

Subscribe

राज्यातील ट्रोलिंगचा लंबक हा पूर्ण उलटा फिरलेला मागच्या वर्षभरात दिसला. याआधी विरोधात असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते ट्रोल होताना दिसत होते. भाजपने जी डिजिटल यंत्रणा उभी केली, त्यासमोर इतर पक्षांना टिकाव धरता यायचा नाही. मात्र हळूहळू डेटा स्वस्त होत गेल्यानंतर विरोधकांमध्येही अनेक कार्यकर्ते डिजिटली ट्रोलर्स म्हणून तयार झाले. आज अशी परिस्थिती आहे की, महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र येऊन भाजपच्या नेत्यांना ट्रोल करतात. त्यांच्या वक्तव्यांना, फोटोंना एडिट करुन दाखवतात. लोकांचीही करमणूक होत असते. एकूणच राजकीय जीवनात ट्रोलिंगच्या माध्यमातून होणारे प्रतिमाभंजन हा पुढार्‍यांसाठी चिंतेचा विषय असणार आहे.

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे दोन शब्द आता सर्वांनाच परिचयाचे झालेत. हल्ली कुणावर साध्या शब्दात जरी टीका केली तरी ट्रोलिंग करतायत, असा शिक्का मारला जातो. लोकांनाही हल्ली टीकात्मक काही वाचण्यापेक्षा ट्रोलिंग किंवा मिम्स पाहण्यातच जास्त रस असतो. तर विषय असा आहे की, राजकारणात हल्ली ट्रोलिंगचा स्तर हा करमणुकीची पातळी ओलांडून पुढे गेलाय. फेसबुक किंवा युट्यूब वापरणारी मंडळी तर आता वाहिन्यांचे व्हिडिओ पाहण्याऐवजी राजकीय ट्रोलिंगचे व्हिडिओ पाहण्यातच अधिक वेळ घालवितात. राजकारणात लोकांचे मुद्दे काही उरलेले नाहीत. लोकाभिमुख नेतेही अपवादाने कमीच (अशी लोकांची समजूत झालेली आहे.) असल्यामुळे उरलेल्या नेत्यांचे एडिटेड व्हिडिओ पाहणे, त्यांना विशेषणे लावून ट्रोल करणे, यातच सोशल मीडियावरील कार्यकर्ते धन्यता मानत असतात. बरं हे ट्रोलिंगचे लोन कार्यकर्त्यांच्या वर्तुळाबाहेरही पोहोचलं आहे. अमृता फडणवीस सारख्या अराजकीय व्यक्तीदेखील राजकीय ट्रोलिंगच्या बळी पडत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सध्या ट्रोलिंगच्या बळी पडल्या आहेत. तशा त्या याआधीही ट्रोलिंगला सामोरे गेल्या होत्या. मात्र यावेळी त्यांचा विषय अराजकीय होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गुरुवारी आपण आणखी एक गाणं युट्यूबवर टाकणार असल्याचे सूतोवाच केले. त्यांचे हे वक्तव्य इतके व्हायरल झालं की, त्याच्यावरही मिम्सचा पाऊस पडायला लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ असे ब्रीदवाक्य दिल्यानंतर ट्रोलर्सनी ‘आपले कान, आपली जबाबदारी’, अशी नवी टूम काढत अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा विरोध सुरू केला. अर्थातच या ट्रोलिंगला थट्टामस्करीची किनार लाभलेली असली तरी त्याची प्रेरणा मात्र राजकीयच आहे.

- Advertisement -

मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपल्याला चंपा आणि फडणवीसांना टरबूज्या, अशी संबोधने सोशल मीडियावर वापरली जात असल्याचे बोलून दाखवले. चंद्रकांत पाटील हे तसे आधीच्या पिढीतले नेते. तंत्रज्ञान, सोशल मीडियापासून ते अजूनही फारकत घेऊन आहेत. तरीही ट्रोलर्सचे ते तितकेच आवडते नेते. त्यांचे व्हिडिओ आणि फोटो ट्रोलर्सनी जणू संग्रहीच करुन ठेवलेले असावेत. नुकतेच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांचा निकाल जाहीर झाला. भाजप पक्ष चार जागांवर पराभूत झाला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा निकालाच्या दोन दिवस अगोदरचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओतील भाषणात पाचही जागेवर भाजप कसे कसे जिंकणार, याचा तपशील ते देत होते. अर्थात पक्षीय कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अशी वक्तव्ये करावीच लागतात. पण निकाल विपरीत लागल्यानंतर विरोधक हीच भाषणे घेऊन त्याला ट्रोल करतात.

असाच एक अनुभव सध्या राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार घेत आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात सुधीरभाऊंनी भाजपची खिंड एकहाती लढवली. विधेयकांवर आणि पुरवणी मागण्यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. भाषणाच्या ओघात त्यांनी एका आमदाराला आव्हानच दिले. माझ्या भाषणादरम्यान मला टोकल्यास पुढच्या वेळी टोकणारा आमदार निवडून येत नाही. हे वाक्य ऐकताच अर्थमंत्री अजित पवार यांनी मध्येच उठून मुनगंटीवारांचे हे आव्हान स्वीकारत असल्याची घोषणा केली. मला पुढच्या निवडणुकीत पाडून दाखवाच, असे ठासून सांगितल्यानंतर सुधीरभाऊंचा चेहरा किचिंतसा पडला. या प्रसंगाची व्हिडिओ क्लिपही दादांच्या कार्यकर्त्यांनी एडिट करुन जबरदस्त व्हायरल केली. कुणाचा तरी पचका होत असताना इतरांना त्याचा आनंद होतोच. शिवाय पचका होणारा हा मोठा नेता असेल तर सामान्यांना अधिकच आनंद होतो. हाच आनंद लुटण्यासाठी सुधीरभाऊंना ट्रोल केलं गेलं.

- Advertisement -

वास्तविक राज्यातील ट्रोलिंगचा लंबक हा पूर्ण उलटा फिरलेला मागच्या वर्षभरात दिसला. याआधी विरोधात असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते ट्रोल होताना दिसत होते. भाजपने जी डिजिटल यंत्रणा उभी केली, त्यासमोर इतर पक्षांना टिकाव धरता यायचा नाही. मात्र हळूहळू डेटा स्वस्त होत गेल्यानंतर विरोधकांमध्येही अनेक कार्यकर्ते डिजिटली ट्रोलर्स म्हणून तयार झाले. आज अशी परिस्थिती आहे की, महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र येऊन भाजपच्या नेत्यांना ट्रोल करतात. त्यांच्या वक्तव्यांना, फोटोंना एडिट करुन दाखवतात. लोकांचीही करमणूक होत असते. त्यामुळे लोकांकडून अशा मिम्स, व्हिडिओंना प्रतिसाद मिळतो.

मात्र ट्रोलिंगचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे एखाद्याचे प्रतिमाभंजन करणे. यामध्ये आपल्या राजकीय विरोधकांचा बाजार उठवण्याचे काम होते. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू म्हणून सादर करणे. ते निर्बुद्ध असल्याचे दाखविण्यासाठी विविध प्रचारतंत्राचा वापर करणे, यामुळे राहुल गांधी यांचे प्रतिमाभंजन झाले हे कुणीही नाकारू शकणार नाही. आपल्या राजकीय कारकिर्दीचा विस्तार करण्यात या ट्रोलिंगमुळे अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागला आणि अजूनही करावा लागत आहेत. सिरीयस नेतृत्वाला मस्करीत घेण्याची ताकद ट्रोलिंगमध्ये असते. त्यामुळेच कदाचित चंद्रकांत पाटील यांना चंपा आणि टरबूज्या हा शब्द खटकत असावा. म्हणूनच त्यांनी जाहीरपणे यावर नाराजी व्यक्त केली.

ट्रोलिंग जोपर्यंत दुसर्‍याची होते, तोपर्यंत त्याची दाहकता आपल्याला समजू शकत नाही. पण विषय स्वतःवर येतो, त्यावेळी तुम्हाला रात्रीची झोपही येणार नाही. कसं ते बघा. समजा तुमच्याबद्दल कुणीतरी फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आणि त्याचे स्क्रिनशॉट तुम्हाला इतरांकडून मिळाले, तर तुमच्या मनाला किती लागलेले असेल. तुमच्या फोटोंचा एखादा मस्करी करणारा व्हिडिओ बनवल्यास काय होईल? आपण सामान्य माणूस म्हणून याचा विचारही करु शकत नाही. पण आपल्याबरोबर खरंच असं झाल्यास आपली झोप नक्कीच उडेल. मग विचार करा सतत ट्रोल होणार्‍या या नेत्यांचे काय होत असेल? ते सतत आपण ट्रोल होतोय, याचा विचार करत असतील का? की त्यांना या सर्वांची सवय म्हणजे ट्रोलिंग अंगवळणी पडले असेल का?

भारतात आपण लोकशाही आहे, असं म्हणतो. मात्र या लोकशाहीसमोर सोशल मीडिया आणि त्याच्यासोबत आलेले ट्रोलिंग ही एक मोठे संकट असल्याचे दिसते. राजकीय मुद्दे, विकासाचे मुद्दे यावर चर्चा होण्याऐवजी हल्ली कोण कोणाला कसा बोलला? कशी जिरवली? यामध्ये लोकांना जास्त रस असतो. तसेच एखाद्याची राजकीय गती कमी करायची असल्यास त्याला सांघिकपद्धतीने ट्रोल केले जाते. 2014 ते 2019 च्या काळात ट्रोलिंगचा स्तर हा कमालीचा घसरलेला दिसला होता. 2019 नंतर या बाजूचेही लोक ट्रोलिंगला तेवढेच सरावले. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी ट्रोलिंग सुरुये. भाजपशी जवळीक असणारे लोक सध्या शेतकरी आंदोलनाला ट्रोल करतायत. तेथील व्यवस्थेचे फोटो व्हायरल करुन हे आंदोलन कसे फाईव्ह स्टार पद्धतीने सुरू आहे, याचे दाखले देत आहेत. ऐनकेन प्रकारे आंदोलनाची बदनामी करुन त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बदनामी करणे हा भारतीय दंड विधान संहितेनुसार गुन्हा असला तरी सांघिक ट्रोलिंगमुळे एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणून सिद्ध करता येते का? याबाबत सध्यातरी अनेक शंका आहेत. अद्याप एखाद्या नेत्याने किंवा संघटनेने ट्रोलिंगच्या विरोधात कायदेशीर लढाई लढलेली नाही. कंगना राणावत प्रकरण किंवा पायल घोष यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. मात्र दिलगिरी व्यक्त केल्यानंतर असे प्रकरण लगेच मिटते. मात्र सांघिक ट्रोलिंगमधून एखाद्याला विशिष्ट नावच देणे किंवा त्याला त्याच्या कामात कुचकामी ठरवणे यावर कुणी चंद्रकांत पाटील यांच्या एवढा आवाज उचललेला नाही. एकूणच राजकीय जीवनात ट्रोलिंगच्या माध्यमातून होणारे प्रतिमाभंजन हा पुढार्‍यांसाठी चिंतेचा विषय असणार आहे.

-किशोर गायकवाड 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -