ते गाणं, नव्हे नाणं!

केशवा माधवा... हे गाणं निराधारांचं आधार बनलं. लोकलमधल्या भिकार्‍यांचं तारणहार बनलं. हे केवळ गाणं नाही तर त्यामागे एक नाणं आहे, हे असं या गाण्याचे गीतकार रमेश अणावकर म्हणत असत. तोपर्यंत गरीबो की सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा, हे लोकलमधल्या भिकार्‍यांचं खास गाणं होतं, पण ‘केशवा माधवा’ आल्यानंतर हे गाणं भिकार्‍यांच्या लेखी पिछाडीवर पडलं.

केशवा माधवा… हे गाणं आहे आणि त्या गाण्यामागे एक नाणंही आहे, हे मला ते गाणं लोकप्रिय होईपर्यंत माहीत नव्हतं. गीतकार रमेश अणावकरांना या गाण्याबद्दल कधी छेडलं की त्यांचा हा अनुभव ते नेहमी ऐकवायचे.
…आणि अणावकरांचं ते म्हणणं खरंही होतं. भिकारी कितीही बेसूर गायला तरी त्याचा कटोरा कधीही रिता न ठेवणारं असं ते गाणं होतं, किंबहुना केशवा माधवा हे गाणं भिकार्‍याच्या जीवनाचं भागभांडवल होतं. अनेक दीनदुबळ्यांना तारणारं हे गाणं ज्या एका क्षणाने माझ्याकडून लिहून घेतलं त्या क्षणाचा आजन्म मी ऋणी आहे, असं त्या गाण्याची कुणीही आठवण छेडली की अणावकर हे बोलून दाखवायचे.
गीतकार रमेश अणावकर, संगीतकार दशरथ पुजारी आणि गायिका सुमन कल्याणपूर असं एकेकाळी छान त्रिकुट जमून आलेलं असताना या गाण्याचा जन्म तसा अपघातानेच झाला.
झालं असं की सुमन कल्याणपूर यांचे पती रमेश अणावकरांशी गप्पागोष्टी करत होते. त्या गप्पागोष्टी करत असतानाच सुमन कल्याणपूर यांचे पती सहज म्हणाले, ‘अणावकर, तुम्ही एखादं असं भक्तिगीत लिहा की जे उद्या प्रत्येकाच्या ओठांवर आपसुक आलं पाहिजे’.
योगायोग पहा कसा, ज्या दिवशी सुमनताईंच्या पतींनी रमेश अणावकरांना ही सूचना केली त्याच दिवशी रमेश अणावकर आणि दशरथ पुजारींनी एक गाणं करण्यासाठी बैठक ठोकली. त्या बैठकीत पुजारींनी त्यांच्या मनातल्या एक-दोन चाली हार्मोनियम काढून अणावकरांना ऐकवल्या. त्यातली एक चाल अणावकरांनी ऐकली आणि त्या चालीकडे अणावकरांचं लक्ष जरा जास्तच वेधलं गेलं. दशरथ पुजारींच्याही ते लक्षात आल्यावाचून राहिलं नाही.
‘अणावकर, ही चाल तुम्हाला जरा जास्त आवडली आहे का?’ पुजारींनी अणावकरांना थेट प्रश्न केला.
अणावकरांनी गालातल्या गालात हसत मान डोलावली.
‘मग पहा या चालीवर काही शब्द सुचतात का?’ पुजारींनी सरळ गाणं लिहिण्याचीच मागणी केली.
अणावकरांना दशरथ पुजारींच्या हार्मोनियमवर वाजलेली ती सहजसोपी चाल अतिशय भावली होती. दशरथ पुजारींनी ती हार्मोनियमवर वाजवून दाखवल्यानंतर ती चाल अणावकरांच्या मनात वाजत राहिली होती. या चालीत नेमके कोणते शब्द लपलेले आहेत याचा ते विचार करत होते. हा विचार करत असतानाच त्यांना आपण सकाळी सकाळी देवघरात करत असलेला पूजापाठ आठवला. तो करत असताना आपण उच्चारत असलेला केशवायणम: माधवायणम: नारायणम: या शब्दांमधला गोडवा आणि त्यासोबत येणारा नाद आठवला. त्यांनी लागलीच पेन आणि कागद हातात घेतला आणि दुसर्‍याच क्षणी झरझर शब्द लिहिले – केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा.
अणावकरांनी ते शब्द पुजारींना वाचून दाखवले.

पुजारींनी तो कागद त्यांच्या हार्मोनियमवर ठेवला आणि त्या कागदावरचे शब्द वाचत गायला सुरूवात केली. पुजारींच्या त्या चालीत ते शब्द चपखल बसले होते, जणू त्या चालीत तेच शब्द दडले होते आणि अणावकरांनी ते अगदी अचूक हुडकले होते. पुजारींना ते शब्द आवडले होते.

त्या एका काळात पुजारी, अणावकर आणि सुमन कल्याणपूर या त्रिकुटाचे सूर छान जुळलेले होतेच. यथावकाश हे गाणं आकाराला आलं. सुमन कल्याणपूरांच्या आवाजात रेकॉर्ड झालं.
हे गाणं जेव्हा लोकांसमोर आलं तेव्हा रेडिओच्या त्या भक्तवत्सल काळात प्रचंड गाजलं, प्रचंड वाजलं, अगदी सर्वदूर पोहोचलं. अणावकर, पुजारी आणि सुमन कल्याणपूर या त्रिकुटाच्या अनेक लोकप्रिय गाण्यांच्या यादीत आणखी एका लोकप्रिय गाण्याची भर घालून गेलं.
गंमत अशी की केशवा माधवा हे गाणं निराधारांचं आधार बनलं. लोकलमधल्या भिकार्‍यांचं तारणहार बनलं. हे केवळ गाणं नाही तर त्यामागे एक नाणं आहे, हे असं जे त्या गाण्याचे गीतकार रमेश अणावकर म्हणाले ते खर ंठरलं.
…तोपर्यंत गरीबो की सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा, हे लोकलमधल्या भिकार्‍यांचं खास गाणं होतं, पण ‘केशवा माधवा’ आल्यानंतर हे गाणं भिकार्‍यांच्या लेखी पिछाडीवर पडलं.
असो, एखादं गाणं त्याची वेगळी खासियत घेऊन जन्माला येतं ते असं…
आजही लोकलमध्ये एखादा भिकारी केशवा माधवा गात असतो आणि आपला कटोरा पुढे करत असतो तेव्हा लक्षात येते ते त्या गाण्याचं आजही टिकून राहणं !