उदंड पाहिला ‘यानी’

पाठीशी हिरव्यागार पाचूसारखा भूमध्य समुद्र, समोर लांबच लांब पसरलेली लेबनॉन पर्वतरांग, त्यापुढे झगझगतं ‘मध्यपूर्वेचं पॅरिस’ म्हणजेच बैरूत... या सगळ्या वातावरणात यानीने त्याच्या आईच्या स्मरणार्थ संगीतबद्ध केलेल्या ‘फेलित्सा’ची सुरावट जादू करत होती...

संगीत ही अशी दौलत आहे की, ती जेवढी तुम्ही उधळता तेवढे तुम्ही समृद्ध होत जाता. त्यासाठी तुम्हाला सुरात गाता यायला हवं, अशीही अट नाही. चांगला कान असला, तरी तुम्ही हा संगीताचा दौलतजादा करू शकता. फक्त मग ती दौलत जादा करून कानात साठवली जाते आणि गळ्यावाटे बाहेर पडलीच, तरी इतरांची दौलत जादा होईलच याची शाश्वती नसते. सुरांचा झरा जसा कोणाच्या गळ्यात फुटेल, हे सांगता येत नाही, तसंच कानसेन कुठे निर्माण होतील, हेदेखील उमगणं कठीण असतं.

संगीताची ही दौलत अगदी लहानपणापासून मनसोक्त लुटत आलोय. इथे हीन-उच्च असं काही नाही. आहेत ते फक्त स्वर! म्हणूनच भीमसेन अण्णांची भैरवी जेवढी वेड लावते, तेवढाच नाद प्रल्हाद शिंदेंच्या ‘नवीन पोपट हा’ मधल्या एखाद्या हरकतीचा लागतो. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, फिल्मी, व्होकल, इन्स्ट्रूमेंटल वगैरे कोणत्याही पोटजातीभेदात न शिरता मिळेल तेवढं ऐकत आलो.

असंच ऐकता ऐकता कॉलेजमध्ये असताना इंग्रजी गाणी आणि कॉन्सर्ट्स ऐकण्याचा छंद लागला आणि यानी नावाच्या अवलियाशी भेट झाली. त्याचं नाव यान्नीस ख्रिस्सोमालिस! मुळचा ग्रीकचा असलेल्या या यानीच्या अनेक कॉन्सर्टस ऐकल्या आणि त्याचा फॅनच झालो. यानीपेक्षाही मोठे आणि श्रेष्ठ संगीतकार असतील यात वादच नाही. किंबहुना यानी हा श्रेष्ठ संगीतकार आहे, असा दावाही नाही. पण त्याची सादरीकरणाची पद्धत प्रचंड हटके होती. तो त्याची कॉन्सर्ट सादर करताना प्रेक्षकांशी इतक्या सहज संवाद साधतो की, हा आपल्यातलाच कोणीतरी एक आहे, असं वाटून जावं. त्या वयात पडलेलं यानीचं गारूड आजही कायम आहे.

दोन वर्षांपूर्वी साधारण याच सुमारास कामानिमित्त लेबननला गेलो होतो. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अजस्र विमानातून मध्यरात्रीच्या सुमारास कधीतरी आकाशात झेपावलो होतो. झोप येतेय-नाही येत या अशा सीमेवर असताना मनात नव्या देशाबद्दल अनेक विचारांचं काहूर उठलं होतं. डोक्यात काय विचार होते माहीत नाही, पण पटकन स्वत:शी बोलून गेलो, ‘लेबननमध्ये यानीची कॉन्सर्ट लाईव्ह बघायला मिळाली, तर काय मजा येईल!’ या विचारात असताना कधीतरी झोप लागली तेव्हा बाहेर पहाट फटफटत होती.

पहाटेची स्वप्नं खरी होतात म्हणे! कारण बैरूतला पोहोचल्यानंतर दोन-तीन दिवसांनी तिथल्या वॉटरफ्रंटवरून चक्कर मारताना समोर चक्क यानीचा बोर्ड दिसला. अरेबिक भाषेतल्या मजकुरासोबत इंग्रजी मजकूरही होता. आठवडा-दीड आठवड्यात यानी तिथे परफॉर्म करणार होता.

काहीही झालं, तरी ही संधी सोडायची नाही, या विचाराने चांगलंच झपाटलं होतं. भारतात पत्रकारांना अशा कार्यक्रमांच्या प्रवेशिका मिळतात. त्यामुळे लेबननमध्ये ती सोय होते का, असा अस्सल भारतीय विचार मनात डोकावला. ऑफिसमध्ये थोडीशी चाचपणी केली, पण त्या आघाडीवर अपयश आलं. मग तिकिटांचे दर बघायला सुरुवात केली आणि कंबरच खचली. सगळ्यात कमी तिकीट 80 डॉलर्सचं होतं. ज्या देशात पाच डॉलर्समध्ये भरपेट जेवण मिळतं, तिथे महिनाभर राहायला गेल्यानंतर 80 डॉलर्स खर्च करणं जीवावर आलं होतं. हो-नाही करता करता दोन दिवस गेले आणि त्या दोन दिवसांत 80 डॉलर्सची सगळी तिकिटं विकली गेली. शेवटी आणखी वेळ न दवडता 120 डॉलर्स मोजून बर्‍यापैकी पुढलं तिकीट घेतलं. आजही ते तिकीट अगदी जपून ठेवलंय.

अखेर तो दिवस उजाडला. संध्याकाळी आठची कॉन्सर्ट होती. चार वाजता ऑफिसमधून बाहेर पडलो आणि थोडा वेळ हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन निघू, या विचाराने हॉटेलला गेलो. सहा वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो, तर तिथे लोकांचा घोळका जमला होता. सगळेच अरब! एकापेक्षा एक सुंदर मुली आणि तेवढेच देखणे पुरूष! तिथे उभी असलेली एक मुलगी तिच्या बाजूच्या मुलाला फोटो दाखवत होती. ती लवकर आली होती आणि यानी आणि त्याच्या संपूर्ण टीमसोबत फोटो काढण्याची संधी तिला मिळाली होती. कपाळावर हात मारून हॉटेलमध्ये जायच्या निर्णयाला शिव्या देत मी चरफडत माझ्या खुर्चीत जाऊन बसलो.

120 डॉलर्सच्या मानाने खुर्ची चांगलीच मागे होती. पण आता तक्रार करण्यात अर्थ नव्हता. लेबननमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये चांगला आठपर्यंत सूर्यप्रकाश असतो. तरी सूर्यास्त झाला, तरा प्रकाश थोडा कमी झाला. बैरूत झगमगायला लागलं. समोरच्या स्टेजवरही दिव्यांचे खेळ सुरू झाले. आणि काहीही कळायच्या आत अचानक ‘फॉर ऑल सीझन’ ही यानीची अत्यंत प्रसिद्ध कॉन्सर्ट सुरू झाली आणि त्या तालावर नाचत नाचत यानी प्रकटला. माझ्यासह तिथे जमलेले सगळेच लोक टाळ्या, शिट्या वाजवून बेधुंद झाले.

पुढले अडीच ते तीन तास तिथे जमलेले सगळे प्रेक्षक वय, वंश, जात, धर्म, राष्ट्रीयत्व, वर्ण विसरून फक्त यानीच्या सुरावटींमध्ये चिंब झाले होते. अशा कार्यक्रमांना मध्यंतर नसतो. पण तरीही दोन कॉन्सर्ट्सच्या मध्ये लेबनीज लोकांतर्फे यानीला पुष्पगुच्छ देण्यासाठी एक पिटूकली स्टेजवर आली. त्यानेही सराईतपणे तिला उचलून तिचं चुंबन घेतलं. आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच मला त्या पोरीचा हेवा वाटला.

या कॉन्सर्टदरम्यान घडलेला एक प्रसंग अगदी कायम मनावर कोरलाय. बैरूतच निशाजीवन सुरू झालं होतं. जवळच्याच एका हॉटेलच्या रूफटॉपवर अरबी संगीत जोरजोरात वाजत होतं. अर्थातच त्यामुळे कॉन्सर्टचा रसभंग होत होता. यानीने त्यावर एकदा-दोनदा टिपण्णीही केली. आवाज कमी व्हायचं नाव घेत नव्हता. यानीने माईक हातात घेतला आणि तो म्हणाला, ‘म्हटलं तर फक्त माझा ड्रमर यांच्यापेक्षा जास्त आवाजात वाजवू शकतो. पण आपण इथे स्पर्धा करायला नाही, प्रेम करायला आलो आहोत. संगीत हेच तर शिकवतं. तेदेखील याच अवकाशात आहेत आणि आपणही…’ टाळ्यांचा कडकडाट झाला आणि यानीची बोटं पियानोवर फिरू लागली.

अडीच-तीन तासांनी ती जादुभरी मैफिल संपली. त्या मैफिलीचा बादशाह मानवंदना स्वीकारण्यासाठी पुन्हा स्टेजवर आला. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यातली एक टाळी मीदेखील वाजवली. तो स्टेजवर सूर्यासारखा झगमगत होता आणि प्रेक्षागारातले आम्ही त्याच्या तेजाचे कण अंगावर झेलून तेवढ्या प्रकाशातही मिणमिणत होतो.

बाहेर पडलो आणि चालत हॉटेलच्या दिशेने निघालो. वॉटरफ्रंटवरून चालताना भूमध्य समुद्रावरून येणारा खारा वारा अंगाला भिडत होता. मगाशी यानीने त्याची हातखंडा ‘द स्टॉर्म’ सादर केली होती. आता एक वादळ माझ्या मनात सुरू होतं. त्या कॉन्सर्टनंतर यानी कदाचित त्या रात्रीपुरता रिता झाला होता, मी मात्र भूमध्य समुद्राएवढाच आकंठ भरलो होतो. यानीच्या सुरांनी, त्याच्या लाघवी बोलण्याने आणि त्याच्या अस्तित्वानेही…