घरफिचर्ससारांशपक्ष्यांचा पारा चढतोय!

पक्ष्यांचा पारा चढतोय!

Subscribe

उष्ण कटिबंध क्षेत्र म्हणजे पक्ष्यांच्या सर्व प्रजातींपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रजातींचे माहेरघर! शतकाच्या मध्यापर्यंत जगातील ५० टक्के मानवी लोकसंख्येला उष्ण कटिबंध आधार देऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे, परंतु या जीवसृष्टीने भरलेल्या प्रदेशांमध्ये पारा प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याविषयी आपल्याला फारसे माहीत नाही. या विषयावर इकोटॉक्सिकोलॉजी या जर्नलमध्ये नवीन अभ्यास प्रकाशित झाला आहे.

-सुजाता बाबर

संशोधकांनी मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील नऊ देशांमधून गोळा केलेल्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे विश्लेषण केले आणि या विश्लेषणात सॉन्गबर्ड्समध्ये कधीही न सापडलेल्या प्रमाणात सर्वाधिक पारा सापडला. हिरव्या किंगफिशरमध्ये सुरक्षित पातळीच्या ३० पट अधिक पारा सापडला आणि ही नक्कीच धोक्याची सूचना आहे. यातील बहुतेक समस्यांमागे सोन्यासाठी केलेले खाणकाम कारणीभूत आहे.

- Advertisement -

या अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा होता की कारागीर आणि लहान-मोठ्या सोन्याच्या खाणकामांमुळे प्रभावित झालेल्या ठिकाणी पार्‍याची सांद्रता जवळपास चारपट जास्त होती. सोन्याच्या कलात्मक कारागिरी आणि लहान-मोठ्या प्रमाणात होणारे सोन्याचे खाणकाम हे दोन घटक पारा प्रदूषणाचे जगातील एकमेव सर्वात मोठे स्त्रोत आहेत, जे मानवनिर्मित पारा प्रदूषणाच्या जवळजवळ ३८ टक्के आहे. या ऑपरेशन्समध्ये माती आणि गाळातील सोन्याच्या लहान तुकड्यांना गोळा करण्यासाठी पारा वापरला जातो. पारा सोन्याला गोळा करतो आणि एक मिश्रण तयार होते. यामधून तयार होणारे गोळे गरम केल्याने पार्‍याची वाफ होते आणि सोने वेगळे होते. या प्रक्रियेत पारा जमिनीत आणि पाण्यात टाकाऊ पदार्थ म्हणून टाकला जातो आणि वातावरणात बाष्प स्वरूपात राहतो.

अशा लहान-मोठ्या खाणकामांचे निरीक्षण करणे कठीण आहे आणि खाण कामगारांचे म्हणणे आहे की, जलद आणि कार्यक्षमतेने खाणकाम करण्यासाठी पार्‍याचा वापर आवश्यक आहे. पर्यावरणीय पारा प्रदूषणाचा आणखी एक मानवी स्रोत म्हणजे वनस्पती जाळून शेतीसाठी जंगले साफ करणे हा आहे.

- Advertisement -

ज्वालामुखी आणि ज्वालामुखीजन्य खडकांमधून उत्सर्जित होणारा नैसर्गिक घटक म्हणून बाहेर पडणारा पारादेखील वातावरणात आढळतो आणि भूगर्भीयदृष्ठ्या सक्रिय उष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात आढळतो. या प्रदेशांमधील तीव्र पर्जन्यवृष्टीमुळे समस्या वाढू शकते. यामुळे जमिनीवर आणि नदीच्या पात्रात स्थिर झालेला पारा ढवळून निघतो आणि पक्षी-प्राणी ते खाण्याची शक्यता वाढते.

संशोधकांना मांसाहारी पक्षी प्रजाती आणि जलचर अधिवास असलेल्या पक्ष्यांमध्ये उच्च पातळीमध्ये पारा आढळला. मांसाहारी प्राण्यांमध्ये पारा अधिक जमा होतो. कारण ते ज्या लहान पक्ष्यांची शिकार करतात त्या पक्ष्यांमधून पारा शिकारी पक्ष्यांच्या शरीरात जमा होतो. पक्षी आणि प्राणी अन्नसाखळीत पारा जितक्या जास्त प्रमाणात असेल तितका पार्‍याच्या पातळीचा धोका जास्त असतो. जलचर अधिवासात राहणारे पक्षीदेखील अतिरिक्त पार्‍याच्या संपर्कात येतात. कारण विषारी धातू नदीपात्रात जमा होतात.

सात देशांतील ३७ संशोधकांनी केलेला हा अभ्यास उष्ण कटिबंधीय पक्ष्यांमधील पार्‍याच्या पातळीचा आजपर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास आहे. संशोधकांनी ३२२ पक्ष्यांच्या प्रजातींमधून रक्त आणि पंखांच्या २३१६ नमुन्यांचे विश्लेषण करून जगातील उष्ण कटिबंधीय पक्ष्यांमध्ये पार्‍याच्या सांद्रतेचा सर्वात विस्तृत डेटाबेस आहे हा निष्कर्ष काढला आहे.

या निष्कर्षांचे परिणाम उष्ण कटिबंधीय पक्ष्यांपुरते मर्यादित नाहीत तर त्यांच्या पलीकडे आहेत. पर्यावरणशास्त्रज्ञ प्रदूषणाप्रति असलेल्या पक्ष्यांच्या संवेदनशीलतेमुळे, त्यांच्या अधिवासांशी संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे आणि त्यांचा अभ्यास सहज करता येण्याजोग्या असल्याने संपूर्ण पर्यावरणीय आरोग्यासाठी प्रॉक्सी म्हणून वापरतात. जर एखाद्या परिसंस्थेमधील पक्ष्यांमध्ये पार्‍याची पातळी वाढली असेल तर कदाचित इतर प्रजातींमध्येदेखील पार्‍याची पातळी वाढली असण्याची शक्यता असते.

यामध्ये मानव प्रजातीदेखील समाविष्ट आहेत. मानवी समुदाय आणि विशेषत: सोन्याच्या खाणकामातून मासेमारी करणारी गावे विशेषकरून पारा प्रदूषणास बळी पडू शकतात. ज्या पक्ष्यांच्या शरीरात उच्च पातळीचा पारा आहे त्यांना रोगप्रतिकारक समस्यांमध्ये त्रास होऊ शकतो आणि यामुळे त्यांना रोग होण्याची अधिक शक्यता असते. यापैकी काही रोग मानवामध्ये संक्रमित होऊ शकतात.

यापूर्वी असे अभ्यास झाले आहेत. विषारी धातूच्या जागतिक प्रवाहाच्या विश्लेषणानुसार जवळजवळ अर्धा पारा हा जागतिक व्यापारात अंतर्भूत पार्‍यापासून येतो. पारा हे न्यूरोटॉक्सिन आहे आणि अगदी लहान डोसमध्येदेखील मानवी आरोग्यास हानी पोहचवतो. जग दरवर्षी सुमारे १८०० मेगाग्रॅम (१ मेगाग्रॅम म्हणजे १००० किलोग्रॅम) पारा उत्सर्जित करते. यापैकी बहुतेक जागतिक उत्सर्जन नॉन-फेरस धातूंची गळती आणि प्रेसिंगशी संबंधित आहे. हे विशेषत: कारागीर आणि लहान-मोठ्या सोन्याच्या खाणकामामध्ये दिसते. या प्रक्रियेत वापरलेला पारा खाली प्रवाहात सोडला जातो.

हा पारा हवा, माती, नद्या आणि महासागराचे काही भाग प्रदूषित करू शकतो. नंतर स्त्रोताजवळील आणि स्त्रोतापासून हजारो मैल दूर असलेले लोक समुद्री अन्न, गोड्या पाण्यातील मासे किंवा तांदूळ खातात, ज्याद्वारे त्यांच्या शरीरात पारा प्रवेश करतो. अमेरिका आणि जपानसह बर्‍याच विकसित देशांना पार्‍याचे बाह्यस्रोत म्हणून वर्गीकृत केले आहे. कारण विकसित देश हे सोने, इलेक्ट्रिक उपकरणे, यंत्रसामुग्री आणि इतर उत्पादनांचे अंतिम ग्राहक आहेत, ज्यांच्या उत्पादनामुळे पारा प्रदूषण होते, परंतु अशा देशांना वाचवले जाते.

पार्‍याच्या प्रदूषणाचे मानवावर होणारे परिणाम माहीत असले तरी या प्रदूषणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. इतर प्राणी आणि पक्षी यांनादेखील पारा प्रदूषणापासून धोका आहे, परंतु हा भाग बराचसा दुर्लक्षित आहे. यात अधिक संशोधनाची गरज आहे. तसेच सोन्याच्या खाणीतून फायदा मिळविणार्‍या स्थानिक समुदायांना खाणकामामुळे त्यांच्या पर्यावरणाला होणार्‍या दीर्घकालीन नुकसानाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती देणे आवश्यक आहे.

सोने मोठ्या प्रमाणात दागिन्यांमध्ये वापरले जाते हे तर सर्वांना माहीत आहेच. शिवाय अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये जसे स्मार्टफोनपासून ते जीवरक्षक वैद्यकीय उपकरणांपर्यंत सोने हा अत्यावश्यक घटक आहे. जरी जगभरातील सरकारांनी खाणकामांना अधिक शाश्वत बनवणारी धोरणे अवलंबली असली तरी सोने उद्योगाच्या चढउताराने यापैकी अनेक प्रयत्नांना अडथळा आणला आहे. ग्राहक केवळ प्रमाणित शाश्वत सोने असलेली उत्पादने खरेदी करून मदत करू शकतात.

या अभ्यासात स्थानिक संशोधकांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश असल्यामुळे पारा प्रदूषणामुळे समस्या उद्भवू शकते अशी ठिकाणे अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यात मदत झाली. हे संशोधन म्हणजे निओट्रॉपिक्समध्ये पक्षी संवर्धनासाठी धोक्याची घंटा आहे. यासाठी स्थानिक भागधारकांसह विचारशील आणि न्याय्य सहकार्य हे उत्तम प्रभाव टाकू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -