घरफिचर्ससारांशदिवाळी अंकांचे स्वागत २०२३

दिवाळी अंकांचे स्वागत २०२३

Subscribe

अक्षर

‘अक्षर’ दिवाळी अंकाने लिखाण आणि मांडणी याबाबत नेहमीप्रमाणे आपला दर्जेदारपणा कायम ठेवताना वाचकांसाठी नवे विषय पुढे आणले आहेत. यात प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘एआय’मुळे अनेक गोष्टी सोप्या होणार असे वाटत आहे, पण हे नवे तंत्रज्ञान मानवी समाजासमोर नवीन आव्हाने उभी करणार आहे. त्यामुळे त्या विषयाला धरून अंकाची सुरुवात करण्यात आली आहे. विजय तांबे यांनी या विषयावरील विविध लेखांचे उत्तम संपादन केले आहे. सामान्य वाचकाला तसा क्लिष्ट वाटणारा हा विषय आदित्य गोविलकर, डॉ. तपन निर्मला प्रदीप, अजय वाळिंबे, जयदीप हर्डीकर आदी लेखकांनी सोपा करून सांगितला आहे.

सतीश तांबे, वासिम मणेर, शिल्पा पाठक यांच्या दर्जेदार कथा आहेत. मीना कर्णिक, हेमंत कर्णिक, संजय पवार, गजू तायडे, प्रकाश अकोलकर यांचे लक्ष्यवेधी आणि विचार करायला लावणारे लेख आहेत. ‘शेजारी देशांमधले मुसलमान’ या लेखातून जतिन देसाई यांनी पाकिस्तानातील अहमदिया, म्यानमारमधील रोहिंगे आणि चीनमधील उईघुर यांच्यावर त्यांच्याच देशात होत असलेल्या अन्यायाचे जळजळीत वास्तव मांडले आहे. ‘कविता वेश्यांच्या’ या सदरात समीर गायकवाड यांनी संस्करण केलेल्या लक्ष्मी चेल्लूर, करुणा मोंगल, यल्लम्मा केंगनाळ आदींच्या कविता मनाला चटके लावून जातात.

- Advertisement -

-संपादक – मीना कर्णिक
-किंमत – ३०० रुपये
-पृष्ठे – २५८

अवतरण

सकाळ ‘अवतरण’ या दिवाळी अंकात अनेक उत्तमोत्तम वैचारिक लेख आहेत. जडवादी, विवेकनिष्ठ, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष अशा विविध विचार प्रवाहांना वाव देण्यात आला आहे. अंकाची सुरुवात दीपक करंजीकर यांच्या ‘महाराष्ट्राची विचारधारा’ या लेखाने झाली आहे. सुमारे २२०० वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची जडणघडण झाली. त्यात अनेक शूरवीरांसोबत संतांचे मौलिक योगदान आहे, पण तो महाराष्ट्र धर्म आणि ती विचारधारा आपण जोपासली आहे का, असा प्रश्न ते उपस्थित करतात. ‘मानसशास्त्रीय युद्धाच्या दिशेने’ या लेखात राहुल गडपाले यांनी विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते, त्यासाठी विचारांची ताकद वाढवावी लागते याविषयी सविस्तर मांडणी केली आहे.

- Advertisement -

प्राचीन आध्यात्मिक ग्रंथांचा चुकीचा अर्थ लावणे, त्यांचा अस्सलपणा नाकारण्याच्या वृत्तीवर आपल्या लेखातून डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी घणाघात केला आहे. ‘समताधिष्ठित समभाव हवा’ या लेखात हरीश सदानी यांनी सर्व प्रकारची लैंगिक ओळख असलेल्या व्यक्तींनी सौहार्दपूर्ण सहअस्तित्वाचा स्वीकार केला तर समताधिष्ठित समाजाच्या दिशेने वाटचाल करता येईल, असे प्रतिपादन केले आहे. मिलिंद बोकील आणि रामचंद्र गुहा यांचे महात्मा गांधी यांच्याविषयीचे लेख अतिशय वाचनीय आहेत. आशुतोष अडोनी, निळू दामले, माधवी कुंटे, संजीव चांदोरकर, अतुळ देऊळगावकर, डेबी गोयंका अशा विविध मान्यवरांच्या लेखांनी अंक वाचनीय झाला आहे.

-संपादक – राहुल गडपाले
-किंमत – १५० रुपये
-पृष्ठे – १९२

पुण्यभूषण

पुण्याचा इतिहास, वर्तमान आणि बदलत्या परिस्थितीचा विविध लेखांच्या माध्यमातून ‘पुण्यभूषण’ अंकातून वेध घेण्यात आला आहे. कलर पेंटिंगमधील आकर्षक मुखपृष्ठ असलेल्या अंकाची सुरुवात ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि मंदिरतज्ज्ञ गो. बं. देगलूरकर यांच्या लेखाने झाली आहे. मराठवाड्यातील छोट्याशा गावातून पुण्यात आल्यानंतर आपल्या कारकिर्दीला पुणे शहराने कसा आकार दिला हे सांगताना त्यांनी पुण्याचे विविध पैलू उलगडले आहेत. पुुणे शहरात काही लेणी आहेत. प्राचीन व्यापारी मार्ग पुण्यातून जात होता, त्याची साक्ष देणार्‍या या वैविध्यपूर्ण लेण्यांची सफर प्रणव पाटील यांनी आपल्या लेखातून घडवली आहे. राजीव साबडे यांनी आपल्या लेखातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या जडणघडणीची माहिती दिली आहे.

ऐतिहासिक आणि वास्तूशैलीच्या दृष्टीतून अनेक महत्त्वाच्या वास्तू पुण्यात आहेत. दीड-दोनशे वर्षांचा इतिहास असलेली चर्चेस अर्थात ख्रिस्ती मंदिरे हा त्या वारशाचा अविभाज्य भाग आहे. कामिल पारखे यांनी आपल्या लेखातून या चर्चेसचे वेगळेपण उलगडून दाखवले आहे. संघाच्या वाटचालीत नागपूरच्या रेशीमबागेबरोबरच पुण्यातील मोतीबागेचेही मोठे महत्त्व आहे. शनिवार पेठेतील या संघ कार्यालयाचा आढावा सूर्यकांत पाठक यांनी घेतला आहे. ‘राजेवाडी इथे उलगडतो इतिहास’ हा तुषार कलबुर्गी यांचा लेख अनेक सामाजिक स्थित्यंतरे दाखवून देणारा आहे. अंकुश काकडे, आेंकार भिडे, योगेश जगताप, प्रशांत कोठडिया, सविता कुर्‍हाडे, श्रेया केळकर यांचे दर्जेदार आणि वाचनीय लेख अंकात आहेत.

-संपादक – सुहास कुलकर्णी
-किंमत – ३०० रुपये
-पृष्ठे – १९९

आरोग्य ज्ञानेश्वरी

‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ हा दिवाळी अंक पूर्णपणे आरोग्य या विषयाला वाहिलेला असून त्यामध्ये विविध आजारांवर कुठल्या उपचार पद्धतीने यशस्वीरित्या मात करता येईल हे सचित्र दाखवण्यात आले आहे. हे मासिक नवे अमृत आहे. वाचणारा व त्याचे कुटुंब सुखी, निरोगी आणि दीर्घायुषी होईल, असे घोषवाक्य अंकाच्या मुखपृष्ठावर लिहिले आहे. अंकातील मजकूर पाहिल्यावर हे घोषवाक्य सार्थ करणारा हा अंक आहे असे लक्षात येईल. आरोग्यासोबत मुलांचे मनोबल वाढवून त्यांना जीवनात उच्च ध्येय गाठता यावे यासाठी प्रेरक ठरणार्‍या शूरवीरांच्या कथांचा समावेश अंकात आहे. माता, बाल आरोग्य, जखमा बर्‍या होण्यासाठी काय करावे, डोळ्यांची साथ आल्यावर कशी काळजी घ्यावी याविषयी माहिती देणारे लेख आहेत.

डग्लस मरे यांनी लिहिलेल्या ‘अभ्यासपूर्ण भाकिताची, युरोपचे विचित्र मरण या पुस्तकाची ओळख’ हा सविस्तर लेख असून सध्या जे काही युरोपमध्ये होत आहे त्याचे वास्तवदर्शी चित्रण यात करण्यात आले आहे. ‘गोष्ट आपल्या मधुमेहाची’ या लेखामध्ये डॉ. हेमंत जोशी, डॉ. अर्चना जोशी यांचा माहितीपूर्ण लेख आहे. ‘स्तनपानाच्या सहा महिन्यांच्या रजेचा कायदा करणार्‍या डॉ. जोशींची गोष्ट’ हा शिल्पा शिवलकर यांचा लक्ष्यवेधी लेख आहे. कोवळी पानगळ, चळवळींच्या गावातला स्वतंत्र शिलेदार असे विविध लेख अंकात आहेत. मुलांसाठी खास नाश्त्याचे वेळापत्रकही देण्यात आले आहे.

-संपादक – डॉ. रेणुका हिंगणे
-किंमत – ४०० रुपये
-पृष्ठे – १६०

नायक

बांधिलकी जनहिताची ‘नायक’ दिवाळी अंक माहितीचा परिपूर्ण साठा आहे. या अंकात साहित्याच्या अंगाने तसेच सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, प्रेरणादायी, ललित, कविता, चित्रपट, जीवनप्रवास, क्रीडा, राशीभविष्य अशा विविध विषयांवरील लेख वाचायला मिळतात. प्रकाशकाचा कवडसा, माझ्या लेखनाची प्रेरणा, ज्यांच्या हाती शून्य होते तसेच मी आणि माझी कविता असे या दिवाळी अंकाचे चार भाग करण्यात आले आहेत. अंकाची सुरुवात स्वप्निल पोरे यांच्या ‘आज फिर जिने की तमन्ना है…’ या लेखाने झाली आहे. यात वहिदा रहेमान यांचा जीवनप्रवास सांगण्यात आला आहेे.

राहुल नेहुलकर यांच्या लेखात ‘एक देश, एक निवडणुकीचा’ अट्टाहास कशासाठी आहे हे उधृत करण्यात आले आहे. याशिवाय विद्याधर शुक्ल यांचा ‘ऐका कहाणी डॉ. दीक्षित व्रताची’ हा लेखही वाचनीय आहे. माझ्या लेखनाची प्रेरणा भागात बाळासाहेब सौदागर यांचा ‘नव्हाळीतलं निळं पाणी’, श्रीकृष्ण राऊत यांचा ‘मनात रुतलेली कविता’, नागेश शेवाळकर यांचा ‘आवड माझी लेखनाची’, गीताराम नरवडे यांचा ‘माझा साहित्य प्रवास’, लक्ष्मण खेडकर यांचा ‘मी लेखक झालो’, सप्तर्षी माळी यांचा ‘एका लग्नाची गोष्ट’, शिवाजी तांबे यांचा ‘कथा एका अज्ञात स्वातंत्र्य सैनिकाची’, तर संदीप वाकचौरे यांचा ‘काकस्पर्शाचे विनोदचे फंडे’ या लेखांना स्थान देण्यात आले आहे.

-संपादक – गोरक्षनाथ मदने
-अतिथी संपादक – संदीप वाकचौरे
-किंमत- २०० रुपये
-पृष्ठे- १५२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -