घरफिचर्ससारांशतीन तलाकविरोधात पाच जणींची झुंज!

तीन तलाकविरोधात पाच जणींची झुंज!

Subscribe

मुस्लीम महिलांसाठी जाचक ठरणारी तीन तलाकची प्रथा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली. शायराबानो आणि इतर चार स्त्रियांनी त्यासाठी प्रदीर्घ झुंज दिली. लेखिका हिनाकौसर खान-पिंजार यांनी या पाच महिलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यातूनच ‘तीन तलाक विरुद्ध पाच महिला’ हे पुस्तक आकाराला आले. सुरुवातीला याविषयीचा रिपोर्ताज ‘साधना’ साप्ताहिकात प्रकाशित झाला. मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे प्रणेते हमीद दलवाई यांचा वैचारिक आणि कृतिशील वारसा यानिमित्ताने पुढे आणण्याचा प्रयत्न आहे, असे साधनाच्या संपादकांनी पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे. 

-प्रवीण घोडेस्वार

पत्रकार-लेखिका हिनाकौसर खान-पिंजार यांचं ‘तीन तलाक विरुद्ध पाच महिला’ हे छोटेखानी पुस्तक पुण्याच्या साधना प्रकाशनाने ३ मे २०१८ रोजी सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनी प्रकाशित केलं. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मुस्लिमांमधली ‘तीन तलाक’ ही प्रथा कुराण आणि भारतीय राज्यघटना या दोन्हीनुसार २२ ऑगस्ट २०१७ रोजी अवैध ठरवण्यात आली. तसेच संसदेने याबाबत कायदा करावा, असेही निर्देश न्यायालयाने दिलेत. शायराबानो आणि इतर चार स्त्रिया विरुद्ध भारत सरकार व काही संस्था-संघटना या दोन वर्षे चाललेल्या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. यास्तव लेखिकेने शायराबानो आणि इतर चार स्त्रियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्याशी झालेल्या संवाद-चर्चेची निष्पत्ती म्हणजे हे पुस्तक.

- Advertisement -

हा रिपोर्ताज साप्ताहिक ‘साधना’मध्ये ८ मार्च २०१८च्या महिला दिन विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आला. या अंकात जागेअभावी वगळावा लागलेला मजकूर सदर पुस्तकात समाविष्ट केलाय. मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे प्रणेते हमीद दलवाई यांचा वैचारिक आणि कृतिशील वारसा यानिमित्ताने पुढे आणण्याचा प्रयत्न असल्याचं साधनाच्या संपादकांनी पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हटलंय. हिना यांनी २९ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ यादरम्यान जयपूर, सहारनपूर, काशीपूर इथं भेटी दिल्या. तसेच ४ आणि ५ फेब्रुवारी २०१८ रोजी कोलकाता-हावडा इथं गेल्या. या पाचही स्त्रियांशी त्यांनी संवाद साधला. हिना खान अभ्यासू, स्त्री प्रश्नांबाबत संवेदनशील असलेल्या महाराष्ट्रातल्या धडाडीच्या तरुण पत्रकार-लेखिका आहेत. त्यांनी विविध प्रतिष्ठित माध्यमांमध्ये काम केलं असून अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

पुस्तकाच्या सुरुवातीला तीन तलाक प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला आहे. काशीपूर (उत्तराखंड) इथल्या शायराबानो, जयपूरच्या आफरीन रेहमान, सहारनपूर (उत्तर प्रदेश) इथल्या अतिया साबरी, हावडाच्या इशरत जहाँ आणि गाझियाबादच्या (दिल्ली) गुलशन परवीन यांच्या मुलाखतींवर आधारलेलं हे लेखन अतिशय हृदयस्पर्शी झालंय. त्याचप्रमाणे हा खटला लढवणारे वकील बालाजी श्रीनिवासन यांचाही परिचय लेखिकेने करून दिलाय हे महत्त्वाचं.

- Advertisement -

शायराबानोचा पती रिझवान अहमदने एकतर्फी तोंडी तलाक दिला. त्यांच्या लग्नाला १५ वर्षे झाली होती. एका कागदाच्या तुकड्याने विवाहबंधन संपुष्टात आणलं. अशा परिस्थितीत खचलेल्या-खंगलेल्या-आत्मविश्वास हरवलेल्या-नैराश्य आलेल्या शायराबानोने कुटुंबाच्या सहाय्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यांमधल्या तोंडी तलाक-बहुपत्नीत्व-हलाला यामुळे राज्यघटनेनं दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग होतो, म्हणून या प्रथांवर बंदी आणावी, अशी मागणी तिने याचिकेतून केली. यामुळे तोंडी तलाकचा प्रश्न माध्यमांच्या अग्रस्थानी आला. कायदेशीर मार्गाने लढा देऊन या प्रथेला असंविधानिक म्हणत या देशातून ही प्रथा नष्ट करण्यासाठी लढा देणारी शायराबानो ही पहिली महिला ठरली. केवळ आपल्या तलाकपुरता विचार न करता या याचिकेतून तोंडी तलाकला आव्हान द्यायचं साहस तिने दाखवलं. किती खडतर घटना आणि प्रसंगांना तिला सामोरं जावं लागलं हे वाचून अस्वस्थ व्हायला होतं.

गुलाबी शहर जयपूरची आफरीन रेहमान आधुनिक राहणीमान असलेली उच्चविद्याविभूषित तरुणी. तिला विवाहाचा प्रस्ताव परंपरागत पद्धतीने आला नव्हता. ‘शादी डॉट कॉम’ संकेतस्थळावरून त्यांचे प्रस्ताव एकमेकांनी मान्य केले. तिचे सासरचेही सुशिक्षित होते. सासरे पोलीस खात्यात उच्च पदावर होते. नवरा अशहर वारसी पटियालाच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर झाला होता. तरीही त्याने हुंडा घेतला होता. आफरीनच्या घरच्यांनीही लग्न अतिशय थाटामाटात लावून दिलं. तिच्या आईचं एका अपघातात निधन झालं. याच अपघातात तीही जखमी झाली.

काही दिवस नवर्‍याने तिची खूप काळजी घेतली. तिला मानसिक आधार दिला. नंतर मात्र काय झालं कुणास ठाऊक, आफरीन माहेरी असतानाच त्याने स्पीड पोस्टने तलाकनामा पाठवला. हे तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक नि अनपेक्षित होतं. जयपूरच्या उलेमांनी तिचा तलाक वैध ठरवला. या लढाईत तिची आतेबहीण नसीम अख्तरची खंबीर साथ लाभली. या लढ्याला यश मिळालं, पण यासाठी कारणीभूत ठरलेल्या पाच जणींपैकी कोणालाही सरकारने नोकरी देऊ केली नाही, अशी रास्त खंत आफरीनने व्यक्त केली. घटस्फोटीत असल्याने तिला कोणी नोकरीही देत नव्हतं.

अतियाच्या पालकांना तीन मुले होती, पण त्यांना मुलगी हवी होती म्हणून तिचा जन्म झाला. सहाजिकच तिचं बालपण फार लाडाकोडात गेलं. तिने समाजशास्त्र आणि उर्दू साहित्यात एमए केलं. तिचं लग्न सख्ख्या मावशीच्या मुलगा वाजिद अलीशी झालं. सख्खी मावशीच सासू असल्याने तिला काही त्रास होईल असं घरच्यांना वाटलं नव्हतं. तिला पहिलं अपत्य मुलगी झाली. दुसर्‍या वेळेस सासरच्यांनी अतियाला गर्भपात करायला सांगितलं, पण तिने यास नकार दिला. थातूरमातूर कारणं सांगून तिला तलाक देण्यात आला. तिच्या नवर्‍याने दुसरा विवाह केला, पण १५ दिवसांतच दुसरी बायको त्याला सोडून गेली. याचिका दाखल केल्याने समाजातल्या लोकांनी तिला खूप विरोध केला. मजहब के खिलाफ जा रही हो, हिंदू बन गयी हो, अपनेमे ऐसाही तलाक होता है… असं हिणवण्यात आलं. अशा टोमण्यांमुळे ती कणखर बनली.

इशरत जहाँ १४-१५ वर्षांची असताना दुुप्पट वयाच्या मुर्तुजा अन्सारीसोबत तिचं लग्न झालं. तो दुबईत कामगार होता. तिचं सासर खूपच मागास विचारांचं होतं. मुलाच्या हट्टापायी त्यांना तीन मुली झाल्या. दीर, सासू प्रचंड त्रास द्यायचे. फक्त तीन महिन्यांसाठी दुबईतून येणारा नवराही मारहाण करायचा. असह्य झाल्यावर इशरतने ४९८ कलमाखाली गुन्हा नोंदवला. हे प्रकरण सुरू असतानाच त्याने तलाक दिला. गुलशन परवीनची कहाणी पण वेगळी नाही. इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या गुलशनने खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरीही केली. गुलशन यांना भेटण्यासाठी लेखिकेला खूप प्रयत्न करावे लागले.

चेहरा नसलेल्या, आकार-उकार नसलेल्या एका अमूर्त व्यवस्थेच्या विरोधात पाच सर्वसामान्य स्त्रिया एकजूट होऊन लढल्या. त्यांचं साहस, त्यांचा निर्धार, त्यांचा त्याग, त्यांचा संघर्ष, त्यांचा आत्मविश्वास, त्यांची चिकाटी केवळ अद्भुत आणि विलक्षणच म्हणता येईल. त्यांना आलेला अनुभव भयंकर होता. त्यांच्या नवर्‍यांनी मनमानी करून एकतर्फी तलाक दिला. त्या भेदरल्या, खचल्या, कोलमडल्या, नैराश्यात गेल्या. हळूहळू आपलं विस्कटलेपण त्यांनी सावरून घेतलं. त्या उभ्या राहिल्या. जमातवादात भर पडलेली असताना, धर्माची मूळं खोलवर रुजलेली असताना आणि वास्तव जीवनात सारं टोकदार झालेलं असताना या पाच स्त्रियांनी एल्गार पुकारला. काही चूक नसताना त्यांचं संसारसुख हिरावून घेण्यात आलं. त्यांच्या लेकरांना बापाच्या छत्रछायेपासून वंचित राहावं लागलं. तीन तलाकविरोधात या पाच जणींचं अनमोल योगदान विशद करणारं हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -