घरफिचर्ससारांशस्वाभिमानाचा सौदा करू नका!

स्वाभिमानाचा सौदा करू नका!

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत स्वाभिमानी जीवन जगले. बाबासाहेब म्हणत, आपल्या वैयक्तिक व राजकीय स्वार्थासाठी स्वाभिमानाचा सौदा करू नका, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार बाबासाहेबांच्या नावाने दुकान उघडून स्वाभिमान गहाण ठेवून दुसर्‍यांच्या दावणीला बांधलेले दिसतात. बाबासाहेब प्रखर राष्ट्रभक्त होते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात आड येणार्‍यांची ते गय करीत नव्हते. बाबासाहेब म्हणत, हा देश बलवान, एकात्म, एकसंध राहावा हे माझे स्वप्न आहे. मी देशापेक्षा कोणालाही मोठा मानत नाही. या राष्ट्राच्या संस्कृतीला बाधा पोहचेल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून होणार नाही. इतर कोणत्याही राष्ट्रभक्तापेक्षा या देशावर माझे तसूभरही कमी प्रेम नाही. राष्ट्राच्या कल्याणासाठी, समृद्धीसाठी, स्वातंत्र्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत झटले पाहिजे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.

-प्रदीप जाधव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगभरात थोर समाज क्रांतिकारक आणि अत्यंत विद्वान व्यक्ती म्हणून परिचित आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना असं म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं.

- Advertisement -

याचाच अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पृथ्वीवरील एक प्रज्ञासूर्य आहेत, ज्यांच्या तेजस्वी किरणांनी संपूर्ण वंचित, शोषित, उपेक्षित, कष्टकरी आणि महिलांच्या आयुष्यातील अंधार नष्ट झाला आहे. अंधार नष्ट करण्याची ताकद फक्त सूर्याच्या उजेडात आहे, तशीच बाबासाहेबांच्यात होती. कोणतीही रक्तरंजित क्रांती न करता केवळ विद्वत्ता आणि लेखणीच्या जोरावर समाज परिवर्तनाची क्रांती करणारा पृथ्वीतलावरचा एकमेव महामानव असंही त्यांना संबोधलं जातं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्त्व. भौगोलिकदृष्ठ्या खंडप्राय असणारा भारत देश सांस्कृतिकदृष्ठ्या विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, वर्ण, वर्गसमूह असतानाही भारत आज एकसंध सार्वभौम राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभा आहे. त्याचं सर्व श्रेय बाबासाहेबांच्या भारतीय संविधानालाच जाते. २ वर्षे ११ महिने १८ दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून या देशाला ३९५ कलमे आणि ८ परिशिष्ट असणारं जगातील सर्वोत्तम संविधान अर्पण करताना शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, ‘संविधान कितीही चांगले असो त्याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले असतील तरच ते संविधान श्रेष्ठ ठरेल.’

- Advertisement -

भारतीय स्वातंत्र्य आणि संविधानापूर्वीचा कालखंड याचा विचार केल्यास या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाला तत्त्वत: मान्यता नव्हती. एका विशिष्ट समूहाच्या हाती सत्ता आणि अधिकार तर दुसरीकडे सामाजिक गुलामगिरी अशी अवस्था होती. संविधानाच्या माध्यमातून सर्वार्थाने बुद्धानंतर लोकशाहीच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय प्रस्थापित होऊन मानवाचा कल्याण साधणार्‍या राष्ट्राची निर्मिती झाली. संविधानामुळे उपेक्षित घटकांना समान संधी मिळाली. सामाजिक समतेबरोबर संविधानाने दिलेल्या आरक्षणानुसार आर्थिक विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या.

आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नसून सामाजिक समतोल राखण्यासाठी कायद्याने केलेली तरतूद आहे. आरक्षणामुळे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष घटक, भटके विमुक्त यांना सामाजिक, राजकीय आरक्षण मिळाले. ते मुख्य आर्थिक प्रवाहात आले. अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाने अधिक गतीने लाभ घेत विकास साधला. बाबासाहेबांना मानणार्‍या बौद्ध समाजाने आरक्षणाचा फायदा घेतला हे तितकच सत्य असलं तरी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अनुसरले. बाबासाहेबांचा ‘शिका’ हा संदेश त्यांनी आत्मसात केला.

बाबासाहेबांनी सांगितलेल्या विज्ञान युगाच्या दिशेकडे वाटचाल केली. बुद्धाचा धम्म अनुसरला, कर्मकांड नाकारले. कर्मकांडातून मुक्ती मिळाल्याने आर्थिक अपव्यय टळला. त्यामुळे सहाजिकच वैचारिक पातळीबरोबर आर्थिक स्तरही उंचावला. तुलनेने इतरांची कमी प्रगती झाली. चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान राहील अशा प्रकारची ग्वाही राजकीय नेतेमंडळी देत असली तरी त्यांचा आरक्षणाला आणि संविधानाला छुपा विरोध आहे. एका बाजूला आम्ही संविधानाचे रक्षक आहोत असं भासवायचं आणि दुसर्‍या बाजूने संविधान आणि आरक्षण कसे संपुष्टात येईल याची खेळी ते खेळत आहेत.

‘पोटात एक आणि ओठावर दुसरं’ असा दुटप्पी डाव टाकत आहेत. आम्ही लोकसभेत ४००चा आकडा पार केला की संविधान बदलू, अशा प्रकारची भाषा खासदार बोलून दाखवतात. त्यामुळे त्यांना ४०० पार का हवा आहे हे स्पष्ट होतं. त्या खासदारांना तुम्ही चुकीचे बोलत आहात, आपला तो अजेंडा नाही, अशी कोणीही समज दिली नाही. ‘खाउजा’ अर्थात खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या नावाखाली आरक्षण बंद करण्याचा डाव आखला जात आहे. बहुमताच्या जोरावर संविधानातील काही मूलभूत कलमांना छेद दिला जातो म्हणजेच संविधान बदलल्यासारखंच आहे.

संविधानाला अपेक्षित भारताची निर्मिती होत नाही. हंटर कमिशनपुढे निवेदन सादर करताना महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की, किमान १२ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळालच पाहिजे. त्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे आग्रह धरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांच्या याच मागणीचा विचार करून शिक्षणाचा मूलभूत अधिकार संविधानामध्ये अंतर्भूत केला आहे. बाबासाहेब म्हणतात, माझ्याकडे जर दोन रुपये असतील तर मी एक रुपयाची भाकरी घेऊन दुसर्‍या रुपयाचं पुस्तक खरेदी करेन.

शिक्षणाविषयी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण सम्राटांनी आज शिक्षणाची अवस्था अत्यंत बिकट करून ठेवली आहे. महागड्या खासगी शिक्षण संस्थांमध्ये गोरगरीब मध्यमवर्गातील मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत. बेरोजगारांची संख्या वाढली आहे. भारतात शिक्षण घेणारा तरुण त्याच्या शिक्षणाचा फायदा होत नसल्याने मोठ्या पगारासाठी परदेशात जाऊन त्याच्या ज्ञानाचा फायदा परकीयांना देतो. नोकरी आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यास परदेशात जाणार्‍यांची संख्या कमी होईल. त्यांच्यात देशाविषयी प्रेम निर्माण होईल.

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. आताच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजाराला ऊत आला आहे. संविधानाने आदर्श आचारसंहिता देशाला दिली, परंतु कटपुतळीसारख्या सनदी अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे तिची अंमलबजावणी होत नव्हती. टी. एन. शेषन यांनी आचारसंहितेचे पालन केल्याने थोडासा अंकुश निर्माण झाला असला तरी राजकारणी त्यालाही फाटा देत साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून यंत्रणा खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे देशातील नागरिकांना मतदानाचा समान अधिकार बहाल केला. निष्पक्षपाती निवडणुका लोकशाहीचा गाभा समजला जातो.

विधिमंडळ संसदेमध्ये चारित्र्यवान लोकप्रतिनिधी असणे महत्त्वाचे असते, परंतु आज पैशांअभावी प्रामाणिक माणूस निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही. आताच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि जात फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. निवडणुका आताच्या राजकारण्यांनी धंदा केला आहे. ज्याप्रमाणे एखादा व्यावसायिक भाग भांडवलासाठी गुंतवणूक करून त्यातून नफ्याची अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे उमेदवार करोडो रुपये खर्च करून निवडून आल्यावर त्याच्या काही पिढ्यांची सोय करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अशा प्रकारच्या निवडणुका मान्य नव्हत्या. पैशांच्या जोरावर चाललेल्या स्पर्धेने एकाधिकारशाही माजली असून ‘विरोधकमुक्त भारत’ ही वाटचाल हुकूमशाहीकडे जाणारी आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती परकाल प्रभाकर म्हणतात, मोदी पुन्हा निवडून आल्यास बाबासाहेबांचे संविधान संपुष्टात येईल. देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. याचा स्पष्ट संकेत असा आहे की हुकूमशाही निर्माण होईल. कोणी गाणे गात आहे तर कोणी कविता करीत आहे. कोणी अप्रत्यक्षपणे छुप्या मार्गाने समर्थन देत आहे. मग प्रश्न पडतो की संविधान आणि लोकशाही वाचवण्याची जबाबदारी कुणाची? निवडणुकांचा माहोल असल्याने सध्याचे सर्वच राजकीय पक्ष बाबासाहेबांची विचारसरणी मान्य असो वा नसो आपल्या स्टेजवर आपल्या बॅनरच्या बाजूला निळा झेंडा, बाबासाहेबांचा फोटो लावून आम्ही बाबासाहेबांचे खरे वारसदार आहोत असं भासवत आहेत.

भारतीय संविधानापूर्वी मनुस्मृतीच्या कायद्याने स्त्रियांना उंबरठा ओलांडता येत नव्हता. संविधानाने सर्व महिलांना समान अधिकार बहाल करून समता प्रस्थापित केली. आज सर्व स्त्रिया पुरुषांच्या बरोबर सर्व क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. ही बाबासाहेबांची आणि संविधानाची देण आहे. हिंदू कोड बिलाचा आग्रह धरणार्‍या बाबासाहेबांचं ऋण महिलाही विसरल्या आहेत. संविधान आणि लोकशाही धोक्यात असताना आपल्याला मिळालेल्या भौतिक सुखात लोळणारा स्वप्नवादी समाज आजही निद्रित अवस्थेत आहे. आज संपूर्ण भारत देश जातीयतने पोखरला आहे.

बाबासाहेबांनी जातीअंताची लढाई लढली. त्या लढाईत सर्व समाजाचे नेते होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चवदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन. बाबासाहेबांनी कधीही जातीभेद केला नाही. मुंबई व मुंबई इलाख्यातील ११४ संस्थांच्या वतीने २९ जानेवारी १९३२ रोजी दामोदर हॉल, मुंबई येथे डॉ. पी. जी. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ. आंबेडकर म्हणाले की, माझा जरी महार जातीत जन्म झाला असला तरी मी सर्वस्वी महार लोकांसाठीच प्रयत्न करीन असे कधीच होणार नाही.

उलट माझ्या समाजाला काहीच मिळाले नाही तरी चालेल, परंतु इतरांसाठी मी वाट्टेल ते करू शकेन. बाबासाहेब शेवटपर्यंत स्वाभिमानी जीवन जगले. बाबासाहेब म्हणतात की, आपल्या वैयक्तिक व राजकीय स्वार्थासाठी स्वाभिमानाचा सौदा करू नका, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार बाबासाहेबांच्या नावाने दुकान उघडून स्वाभिमान गहाण ठेवून दुसर्‍यांच्या दावणीला बांधलेले दिसतात. बाबासाहेब प्रखर राष्ट्रभक्त होते.

राष्ट्रउभारणीच्या कार्यात आड येणार्‍यांची ते खैर करीत नव्हते. बाबासाहेब म्हणतात, हा देश बलवान, एकात्म, एकसंध राहावा हे माझे स्वप्न आहे. मी देशापेक्षा कोणालाही मोठा मानत नाही, समजत नाही. या राष्ट्राच्या संस्कृतीला बाधा पोहचेल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून होणार नाही. इतर कोणत्याही राष्ट्रभक्तापेक्षा या देशावर माझे तसूभरही कमी प्रेम नाही. बाबासाहेब पुढे असेही म्हणतात की, राष्ट्राच्या कल्याणासाठी, समृद्धीसाठी, स्वातंत्र्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत झटले पाहिजे.

स्वतःला राष्ट्रभक्त समजणारे या देशातील राष्ट्रीय संपत्तीचे खासगीकरण करीत आहेत. उदारीकरणाच्या नावाखाली देशातील लोकशाही आणि संविधानविरोधी कृत्य करीत आहेत. वल्गना मात्र संविधान, लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करतात. आपण बाबासाहेबांचे कोणते गुण घेऊन वारसा मिरवणार आहोत? बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याची खरी गरज आहे.

बाबासाहेबांच्या संविधानाची जर देशाने अंमलबजावणी केली तर सर्वच समस्या सुटतील. भारत महासत्ताही होईल. ज्या संविधानाने आम्हाला आत्मभान दिले त्या संविधानाचे पालन आणि संरक्षण करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. या देशात लोकशाही आणि संविधान संस्कृती रुजवण्यासाठी कटिबद्ध असणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी संविधानाचा जागर व्हायला हवा.

-(लेखक साहित्याचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -