घरफिचर्ससारांशक्रिकेट वर्ल्डकपची ‘फटाके’बाजी...

क्रिकेट वर्ल्डकपची ‘फटाके’बाजी…

Subscribe

दिवाळीच्या मोसमात वर्ल्डकपचे धडाकेबाज सामने सुरू आहेत. भारताची विजयी वाटचाल अशीच फायनलपर्यंत सुरू राहील असे एकूणच आतापर्यंतच्या प्रत्येक मॅचमध्ये विपक्षी टीमच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजात फुटलेल्या आपल्या अकरा फटाक्यांमुळे वाटत आहे. तसे बाकी टीममधील काही फटाकेही धडाक्यात फुटून इतरांना जखमा देताहेत हेही खरे; पण एकट्या दुकट्याच्या फुटल्याने काही फरक पडत नसतो. इकडे संपूर्ण पेटलेली लड सॉरी टीम मात्र आपलीच आहे! सो होप फॉर द बेस्ट!! एकूणच या क्रिकेट वर्ल्डकपच्या दिवाळीमध्ये सहभागी झालेल्या काही ‘टिपिकल’ अ‍ॅज वेल अ‍ॅज ‘क्रिटिकल’ ‘फटाक्यां’ची आज आपण ओळख करून घेऊ. बुरा न मानो दिवाली हैं.

-अमोल जगताप

एकूणच या क्रिकेट वर्ल्डकपच्या आंतरराष्ट्रीय दिवाळीमध्ये आतापर्यंत बरेच फटाके ‘फुटले’. काही ‘फोडले’ गेले. काही नुसतेच ‘उडाले’. काहींनी लोकांच्या कानठळ्या फोडल्या, तर काही फुटतील फुटतील म्हणता म्हणता ‘फुस्स’ झाले…! काहींनी तर प्रमाणापेक्षा जास्त ‘फाऽऽट-फूट’ करत डेसिबलच्या मर्यादा मोडल्या. हार्दिक पांड्या नावाचा डबलबार यावेळी फुटू शकणार नाही म्हणून या दिवाळीत भारताचा आवाज कमी होईल असे सर्वच देशांना वाटले होते, पण झाले उलटेच! काही जुने ‘न वापरले गेलेले’ फटाके एवढे खतरनाक धडाऽऽमधूम आवाज करत फुटायला लागलेत की त्यामुळे त्या डबलबारची कमतरता जाणवत नाही.

- Advertisement -

यालाच म्हणतात वर्ल्डकपची धडाकेबाज सुरुवात. भारताची विजयी वाटचाल अशीच फायनलपर्यंत सुरू राहील असे एकूणच आतापर्यंतच्या प्रत्येक मॅचमध्ये विपक्षी टीमच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजात फुटलेल्या आपल्या अकरा फटाक्यांमुळे वाटत आहे. तसे बाकी टीममधील काही फटाकेही धडाक्यात फुटून इतरांना जखमा देताहेत हेही खरे; पण एकट्या दुकट्याच्या फुटल्याने काही फरक पडत नसतो. इकडे संपूर्ण पेटलेली लड सॉरी टीम मात्र आपलीच आहे! सो होप फॉर द बेस्ट!!

एकूणच या क्रिकेट वर्ल्डकपच्या दिवाळीमध्ये सहभागी झालेल्या काही ‘टिपिकल’ अ‍ॅज वेल अ‍ॅज ‘क्रिटिकल’ ‘फटाक्यां’ची आज आपण ओळख करून घेऊ. विनंती फक्त एवढीच की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व अगदी ‘लाईटली’ घ्या.

- Advertisement -

रोहित शर्मा – आयपीएल असो की इंटरनॅशनल सामने असोत हा फटाका त्याचं स्टँडर्ड कधी सोडत नाही. समोरच्या टीमच्या कानाखाली आवाज काढावा अशा आवेगात हा नेहमी फुटत असतो. सोबत समोरच्याला ‘फोडत’ असतो. त्याचे आरामात बाऊंड्रीपार जाणारे सिक्सर बघून हा नेमका फुटणारा, उडणारा की फोडणारा फटाका आहे हे समोरच्या टीमला हारेपर्यंत समजूनही येत नाही.

विराट कोहली – हा फटाका समोरच्याकडे आहे नुसते हे समजले तरी विरोधी टीमचे काही फटाके ‘वात टाकतात’, ‘साधळून’ जातात. कॅप्टनने बळजबरी वात पेटवून यांच्या हातात बॉल दिला तर समोर याला बघून ते फेकायचा म्हणून बॉल फेकतात. एरव्ही बॅटिंग असो की फिल्डिंग असो, हा विराट फटाका सदासर्वदा नेहमी ‘पेटलेलाच’ असतो आणि शक्यतो मॅच जिंकेपर्यंत तो विझतही नाही हे वेगळं सांगायला नकोच! बाकी मेरा नाम हैं लखन म्हणत हा सदासर्वदा इंडियन टीममधल्या रामाच्या सॉरी रोहितच्या मागे खंबीरपणे उभा असतो.

रशीद खान – हा ‘मेड इन इंडिया’ फटाका नसला तरी तो इंडियात ‘मेड इन इंडियाच’ आहे असे वावरत असतो.
मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय फटाक्यांना हा फुटण्याआधीच आपल्या जादूगार बोटांनी विझवू शकतो. आतंकवादी पार्श्वभूमी असलेल्या देशातून येऊनही हा मात्र फक्त प्रेमाच्या आयटम-बॉम्बसारखा फुटत जखमा न देता देशाला सुखद धक्का देत असतो. बाकी याची ब्रॅण्डिंग बाहेरची असली तरी या सॉलिड फटाक्याचा जन्म पवित्र जन्मभूमी शिवाकाशी येथे झाला असावा असे राहून राहून वाटत राहते.

शुभमन गिल – हा फटाका खेळताना ‘सारा’सार विचार करून मगच खेळतो. नुसते फुटणेच नाही तर सोबत बॉलला धक्का लागून पळणेही या फटाक्याला प्रचंड आवडते. हा बायचान्स फुटलाच तर ‘अंगणाबाहेरील प्रेक्षकांचे’ प्रचंड मनोरंजन करतो. याच्या बॅटमधून ‘विथाऊट ताकद’ निघालेले अग्निबाण गोलंदाजांना चटके देत अन् फिल्डरला आपल्या मागे घेऊन जात शेवटी सीमापार जाता म्हणजे जातातच.

डेव्हिड वॉर्नर – खास ‘झुकेगा नही साला’ कॅटेगिरीतला हा एक विदेशी फटाका असला तरी अगदी उदबत्तीऐवजी मेणबत्तीने जरी याची वात पेटवली तरी हा बर्‍याचदा ‘फुटेगा नहीं साला’ टाईपचे वागतो. नक्की ऑफसाईडला फुटायचे की लेगसाईडला हे तो स्वत: शेवटच्या क्षणी ठरवतो अन् त्या अनुषंगाने स्वत: ‘फुटतो’ किंवा समोरच्याला ‘फोडतो’.

शाकीब अल हुसेन – हा एक चिमणी बार आहे. हा शक्यतो बॅट आणि बॉलने त्याचे टॅलेंट दाखवणे सोडून डोक्यात ठासून भरलेले बाकीचे ‘गुण’ ग्राऊंडवर उधळत असतो. तो चिडतो, तडफडतो अन् प्रसंगी काहीही बडबडतो. बाकी काहीही असो, पण जर मॅच एकतर्फी होत असली तर मग याच्या ग्राऊंडमध्ये असल्याने लोकांचे मनोरंजन मात्र शंभर टक्के होत असते.

के. एल. राहुल – अंगणात सॉरी पिचवर आला की हा फटाका आधी बूड टेकून व्यवस्थित स्थिरस्थावर होतो. याला फुटण्याची अजिबात घाई नसते. सोबतचे फटाके फुटत असतील तर हा स्वतः फुटायचे सोडून त्यांची गंमत पाहत बसतो. आपल्या घरातले असो की समोरच्या घरातले या सर्वच फटाक्यांची फुटून राखरांगोळी झाली की मग हा त्याचा कानठळ्या बसवणारा आवाज काढत खेळ खल्लास करतो.

क्लिंटन डी कॉक – दक्षिण आफ्रिकेचा हा फटाका ‘अलवेज’ फुटतो, पण त्याच्या अशा महाभयंकर स्वरूपात फुटण्याचा त्याला तिळमात्रही गर्व नसतो. तो ग्राऊंडमध्ये फुटतो आणि बाहेर असला की चिडीचूप शांत बसतो. काही निर्णायक सामन्यांच्या क्षणी मात्र हा ग्राऊंडमध्येही शांत बसतो अन् तेव्हा मात्र उगाचच या फटाक्यासाठी पदरचे पैसे मोडले, असे वाटून तो त्याला घेणार्‍याला निराश करून टाकतो.

ग्लेन मॅक्सवेल – नावाप्रमाणे हा फटाका खरंच ‘मॅक्स’ आहे. समोरच्या टीमचे संपूर्ण बाराही फटाके व्यवस्थित वाजून हवा करून गेले असतील तरी हा एकटा त्या सर्वांची हवा काढू शकतो. हा अगदी ‘सावधान’ पोझिशनमध्ये उभा राहूनही कडक सिक्स मारू शकतो. याला बॅटिंग द्या, बॉलिंग द्या किंवा याला महत्त्वाच्या जागेवर फिल्डिंग करायला उभे करा, हा समोरच्याचे ‘दिवे’ लावतो म्हणजे लावतोच. सेमीफायनल-फायनलमध्ये याची धास्ती सर्वांनी आताच घेऊन ठेवली आहे.

मोहम्मद शमी – ‘फुटणार नाही’ म्हणून किंवा ‘जुना झालाय’ म्हणून वा बाजारातून ‘लेटेस्ट माल’ आणलाय म्हणून हा फटाका घरात तसाच ठेवलेला असला तरी याची कमाल निराळीच आहे. बाकी सर्व फटाके संपले म्हणून हा सहज फोडायला घ्यावा तर हा त्याच्या आवाजाने समोरच्यांच्या कानठळ्या फोडतो. मग उगाचच का आपण ऐन ‘दिवाळीत’ याला फोडलं नाही? याची हळहळ दिवाळीत सारखी मनाला टोचत राहते.

टेंबा बाऊमा – ‘मेड इन आफ्रिके’च्या लडीमधील हा सर्वात छोटा फटाका. त्यात एकूणच या वर्ल्डकपमधील त्याच्या फुटण्याचा आवाज ऐकून छोटा पॅकेट मोठा धमाका असेही याच्याबद्दल बोलता येणार नाही, पण संपूर्ण दक्षिण आफ्रिकेच्या ‘लडी’तल्या बाकी फटाक्यांनी केव्हा आणि कसे फुटायचे हे मात्र तो स्वत: ठरवतो. बाकी त्याची स्वत:ची फुटण्याची वेळ आली की तो मात्र नेहमीच फुस्स् जातो हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे एवढे चांगले फटाके उपलब्ध असताना याला टीममध्ये घेणार्‍यांचे चरणस्पर्श करावे असे वाटते.

रवींद्र जडेजा – हा फटाका नक्की कोणत्या कॅटेगरीतला आहे हे खरंतर वेळच ठरवते. हा त्याच्या गोलंदाजीने कधी समोरची टीम ‘फोडतो’ तर कधी स्वत:च्या फलंदाजीने आडवा-तिडवा, धडाकेबाज ‘फुटतो’. अगदीच काही नसले तरी हा त्याच्या फिल्डिंगच्या चपळाईने विरोधी संघाला हंड्रेड पर्सेंट घाम फोडतो.

पाकिस्तान टीम – या टिपिकल लडीमधील सर्वच फटाके शक्यतो सारखेच असतात. सारखेच दिसतात अन् सारखेच वागतात, सॉरी सारखेच फुटतात. हे फक्त समोरच्या टीमवरच जाऊन फुटतात असे नाही तर ते अधूनमधून अंपायरवरही फुटून त्यांना चटके देतात. एरवी तडतडी लवंगी माळ फुटावी अशी त्यांची ‘फुटा-फुटी’ असते. हे ग्राऊंडमध्ये पाहिजे त्या आवाजात फुटू शकले नाहीत तर ग्राऊंडबाहेर कित्येक पट जास्त डेसिबल आवाजात फुटतात. महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे ग्राऊंडमध्ये मनसोक्त फुटले नाहीत तर मग यांच्या देशातले ‘टीव्ही’ मात्र हमखास फुटतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -