घरफिचर्ससारांशबेधड मुले आणि अपराधी पालक !

बेधड मुले आणि अपराधी पालक !

Subscribe

आताच्या मुलांना वडिलधार्‍यांनी काही सांगावं तर तुम्हाला आताचं काही कळतं नाही. तुमच्या आणि आमच्या जमान्यात खूप फरक आहे, असे ही मुले अतिशय ठासून सांगतात. अतिशय कमी वयात, कमीत कमी श्रमात आपले करियर पटकन घडावे आणि लगेच सेटल होऊन स्वतःचं घर, गाडी घेण्याची आणि उच्च जीवनशैली जगण्याची यांना झालेली अतोनात घाई हे आजचं सामाजिक चित्र आहे. याला काही अपवाद नक्कीच आहेत, पण समुपदेशनादरम्यान भेटणारे अनेक पालक मुलांच्या या अतिरेकी गोंधळलेल्या मानसिकतेमुळे त्रस्त असल्याचे जाणवते. बरं काहीही करताना ही मुले एकदम बिनधास्त आणि बेधडक असतात, त्याचवेळी पालकांना मात्र अपराधी वाटत असतं.

जन्मताच हातात मोबाईल, घरातून सहजासहजी उपलब्ध झालेली हाय फाय जीवन शैली, लॅपटॉप, विविध इलेक्ट्रॉनिक गॅझेट मिळालेली, धूम स्टाईल बाईक हातात असलेली आणि फाटक्या तुटक्या जीन्स घालून, कानात हेडफोन घालून रस्त्याने मोकाट उधळलेली, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रिम, चायनीज या सर्व हाय फाय ब्रॅण्डच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे उत्पन्न धडाधड वाढवणारी, घरातील कोणाचीही परवानगी अथवा सल्ला न घेता ऑनलाईन शॉपिंगची मजा घेणारी, फॅशन बदलल्यावर लगेच घेतलेली वस्तू अथवा कपडा अडगळीत टाकून देणारी आजकालची पोरं..

अधिक उचभ्रू कुटुंबातील असतील तर सेलिब्रेशन, पार्टी, नाईट लाईफ, पिकनिक, ट्रेकिंग, वीकएंड आणि या प्रकारच्या जीवनशैली सोबतच येणारी विविध व्यसनं यामध्ये बर्‍यापैकी तरुणाई गुरफटलेली आढळते. पालक आपापल्या कामात व्यस्त आणि मुलांप्रती फक्त कर्तव्य, जबाबदारी म्हणून आर्थिक सहाय्य करण्याची त्यांची मानसिकता मुलांना शिस्त आणि संस्कारांपासून वंचित ठेवते. आज डान्स, उद्या गाणं, परवा नाटक तर त्यानंतर स्पर्धा परीक्षा, मध्येच स्पोर्ट्स तर अचानक सिन्सिअरपणे फक्त अभ्यास. अचानक स्टार्ट अपच्या भन्नाट कल्पना तर त्यानंतर विदेशात नोकरीची स्वप्न. अनेकांनी दाखवलेली विविध स्वप्नं आणि त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले असंख्य पर्याय. दहावी, बारावी आणि पदवीनंतर उपलब्ध असलेले शिक्षणाच्या असंख्य शाखा! हजारो क्लासच्या जाहिराती, महाविद्यालयाच्या जाहिराती यामुळे भरकटलेली ही लेकरं… मित्रांमध्ये मैत्रिणीमध्ये कोण काय करतंय त्यात किती यश मिळतंय, घरातले काय सांगतायेत त्यांना काय अपेक्षित आहे, शिक्षक काय मार्गदर्शन करतात, खासगी क्लासमध्ये काय चाललंय कस चाललंय आणि या सगळ्यामध्ये आपलं निश्चित ध्येय काय यामध्ये प्रचंड गोंधळलेली आजची पिढी. त्यातून सातत्याने लक्ष विचलित करणारी आजची फास्ट फॉरवर्ड सामाजिक स्थिती.

- Advertisement -

वडिलधार्‍यांनी काही सांगावं तर तुम्हाला आताच काही कळतं नाही, तुमच्या आणि आमच्या जमान्यात खूप फरक आहे हे अतिशय ठासून सांगणारी ही मुलं. अतिशय कमी वयात, कमीत कमी श्रमात आपले पटकन करिअर घडावे आणि लगेच सेटल होऊन स्वतःचं घर, गाडी घेण्याची आणि उच्च जीवनशैली जगण्याची यांना झालेली अतोनात घाई हे आजच सामाजिक चित्र आहे. याला काही अपवाद नक्कीच आहेत, पण समुपदेशनादरम्यान भेटणारे अनेक पालक मुलांच्या या अतिरेकी गोंधळलेल्या मानसिकतेमुळे त्रस्त असल्याचे जाणवते. बरं काहीही खरेदी करताना हजारात बोलताना एकदम बिनधास्त! घरात कपड्यांचा शुज, सॅन्डल, चप्पल, कॉस्मेटिकचा महापूर तर मोबाईलमध्ये विविध अ‍ॅप्लिकेशनची गर्दी. मोबाईलला चित्र विचित्र रिंगटोन, पासवर्ड पॅटर्न स्वतःची प्रायवसी जपण्यासाठी चाललेली अतोनात धडपड. काय लपवतात, कोणापासून आणि का लपवतात. मुळात लपवावं लागेल असं का वागतात हे पालकांना पडलेले प्रश्न.

पालक पण बिचारे आपल्याला नाही मिळालं असं जगायला, आपण काढले गरिबीत दिवस म्हणून मुलामुलींना हवं ते पुरविण्याचा अतोनात प्रयत्न करतात. बरं यांना कधी कशाला नाही म्हणावं, रागवावं तर यांना डिप्रेशन यायला, विचित्र वागायला, आत्महत्या करायला, घर सोडून जायला, टोकाचे निर्णय घ्यायला पण वेळ लागत नाही. आई-वडील पण कसे चुकीचे होते किंवा आहेत यावर परखड आणि स्पष्ट मत मांडण्यात पण ही पिढी कमी नाही. एकतर भरमसाठ फी भरून, हॉस्टेल, मेस तसेच इतर शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी मारेमाप पैसा खर्च करुनसुद्धा पालकांना हेच ऐकायला मिळत की हे तुमचं कर्तव्यच आहे, सगळेच पालक करतात त्यात काय विशेष आहे. अतिशय प्रॅक्टिकल विचार, जास्तच स्पष्ट वक्तेपणा, काही ठिकाणी अतिशहाणपणा त्या सोबतच उद्धटपणा आणि फाजील आत्मविश्वास या पिढीसाठी धोकादायक ठरू शकतो हे त्यांच्या ध्यानीमानी नसते. स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे, मध्ये कोणाचीही लुडबुड नको, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करत बसण्यात रस नाही तर स्वतःच आयुष्य स्वतःच्या मनाने जगण्यात स्वारस्य असलेली ही अर्धवट वयाची मुलं आज सगळ्याच पालकांसमोर एक आव्हान आहेत. आपल्या आवाक्याबाहेरील स्वप्न पाहणे, त्यासाठी वाटेल ती जोखीम पत्करणे, मान मर्यादा सोडून वागणे याचे दुरागामी परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतात. याबाबत आताच्या मुलामुलींना पुसटशीपण कल्पना नसते.

- Advertisement -

अनेक मुलंमुली स्वतःच ध्येय गाठून यशस्वी होतात सुद्धा, आपल्या अपेक्षेनुसार मार्गाला देखील लागतात. पण शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असलेली, स्मार्ट आणि हुशार असलेली अनेक मुलं तीव्र स्पर्धा आणि स्वतःच्याच सातत्याने बदलणार्‍या अपेक्षा, वैचारिक गोंधळ, त्यांच्या बुद्धिमत्ता अत्याधुनिक शिक्षण पद्धती याच्याशी मेळ बसवू शकतं नाहीत आणि अतिशय सर्वसामान्य नोकरी अथवा व्यवसाय पत्करून आयुष्य स्वीकारतात. अत्यंत कमी मोबदल्यातदेखील काम करायला तयार होतात आणि नैराश्याने ग्रासली जातात. वर्षानुवर्षे अभ्यास करुन, करिअरसाठी धडपड करुन, नोकरीसाठी प्रयत्न करुन पण त्यांच्या पदरी जेव्हा निराशा पडते, जसजसे वय वाढते तसतसे घरचेदेखील कामाधंद्याला लागण्यासाठी, उत्पन्नासाठी तगादा लावतात तेव्हा ही मुलं प्रचंड खचून जातात. आपण पाहिलेली स्वप्न, आपल्यातील गुणवत्ता याला अनुसरून काम उद्योग न मिळाल्यामुळे केवळ पैसे कमविण्यासाठी त्यांना तडजोड करुन मिळेल ते काम करावे लागते तेव्हा ते मानसिक दृष्टीने असाह्य होतात. हिच असह्यता, हिच तडजोड स्वीकारून आयुष्य काढणं त्यांना त्रासदायक ठरू शकत. आता हा टप्पा पार केल्यावर पुढे उभा राहतो लग्नाचा प्रश्न.

आताच्या मुलांना आणि मुलींना लग्नाबद्दल नेमकं काय वाटतं, लव्ह मॅरेज करणार की ठरवून लग्न करणार हा अजून एक विषय. बरं कोणत्याही स्वरूपचं लग्न करा ते शेवटपर्यंत टिकणार का, हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहेच. शेवटी यांची लग्न यशस्वी होणं यांच्या शालेय, महाविद्यालयीन जीवनापासून यांनी उपभोगलेलं स्वातंत्र्य, मनमानी, धडाडीचे धाडसी विचार, एकलकोंड आयुष्य, कुटुंबापासून असलेली अलिप्त भूमिका, सगळ्याच गोष्टी अत्यंत लाइटली घेण्याची लागलेली सवय पुढे आयुष्यात खूप ठिकाणी नडते आणि कोणासमोर, कोणासाठी नमतं न घेणं, जुळवून न घेणं, स्वतःचाच खरं करणं यामुळे या पिढीमध्ये लग्नानंतर लगेचच विभक्त होण्याचे प्रमाण वाढताना दिसते.

यासारख्या नानाविध समस्या, तक्रारी, शाळा महाविद्यालयातील मुलांबाबतीत येत असतात. यावर आपण काय उपाययोजना करु शकतो याबाबत अनेक पालक स्वतःदेखील समुपदेशनासाठी येत असतात. मुलांचं समुपदेशन करण्यापेक्षा आम्हालाच समजावून सांगा, यांच्यासोबत कसे वागायचे, कसे बोलायचे. आम्ही पालक म्हणून कुठे कमी पडत आहोत का? मुलांना हवं ते देतोय, फी भरतोय, विविध क्लास लावून देतोय, खाण पिणं, हिंडणं फिरणं सगळेच लाड पुरवतोय, त्यांना मित्र मैत्रिणीमध्ये जायला स्वातंत्र्य दिला आहे, अभ्यासाला स्वतंत्र खोली आहे तरी हे बिनसलेले का असतात? उशिरापर्यंत जागतात, रात्रभर मोबाईल हातात असतो, पहाट, सकाळ म्हणजे काय याबद्दल हे अनभिन्य आहेत. स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवत नाहीत, इथपासून ते जेवण्याचेदेखील खूप नखरे आहेत इतपर्यंत पालक वैतागून गेलेले असतात. घरातल्यांशी बोलत नाहीत, मिसळत नाहीत, नातेवाईकांकडे जात नाहीत, घरात राहायला यांना आवडत नाही, कुठे जाताना नीट सांगून जात नाहीत, जाण्यायेण्याचे काही वेळापत्रक नाही, बाहेरगावी, मोठाल्या शहरात शिकायला जाण्याचा हट्ट धरतायत, हॉस्टेलवर राहायचं म्हणतात, मैदानी खेळ खेळत नाहीत, घरातील सण वार यांना आवडत नाहीत, देवाधर्मावर विश्वास नाही, काटकसर शब्द तर यांच्या संग्रहात नाहीच! अशी असंख्य दुखणी पालकांच्या मनात असतात. आपणच संस्कारात शिस्तीत कुठे कमी पडतोय का? असं आजकाल अनेक पालकांना वाटायला लागले आहे.

मीनाक्षी जगदाळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -