Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश मुलांना पाजा आर्थिक साक्षरतेचे बाळकडू!

मुलांना पाजा आर्थिक साक्षरतेचे बाळकडू!

Subscribe

सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आर्थिक सबल आणि साक्षर असणे गरजेचे आहे. यासोबतच आपल्या मुलांनादेखील योग्य वयात आल्यानंतर आर्थिक साक्षर बनवता आले तर फार चांगले. आपण सर्व पालक मुलांना पॉकेट मनी म्हणजे महिन्याचा खर्च देताना पाहिला असेलच. हे सर्व सुरू असताना आता शिक्षण पद्धतीमध्येदेखील खरच बदल होणे आपल्याकडे गरजेचे झाला आहे. बाहेरच्या देशामध्ये १५ वर्षांच्या मुलांना आर्थिक साक्षरतेबाबत शालेय विषय आणि परीक्षादेखील आहे. २०२२ मध्ये अमेरिकेमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये असे सांगण्यात आले होते की, अमेरिकेतील पाचपैकी फक्त एकाच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे.

– राम डावरे

अजय जरा थोडा आर्थिक अडचणीतच होता. त्याने नुकेच एक नवीन घर घेतले होते आणि एक कार पण घेतली होती. त्याच्या पगारातून घर व कारचे हप्ते हे दर महिन्याला खूप सार्‍या प्रमाणात जात होते आणि फार कमी पैसे त्याला कुटुंबासाठी उरत होते. दुर्दैवाने त्याचा नुकताच एक अ‍ॅक्सिडेंट झाला आणि त्याला बर्‍यापैकी मार लागला आणि हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले आणि त्याचा खूप सारा खर्च होणार होता. सुदैवाने ज्या कंपनीमध्ये तो कामाला होता, तिथे कंपनीने त्याची मेडिक्लेम पॉलिसी काढलेली होती आणि त्या पॉलिसी अंतर्गत त्याचा होणारा उपचाराचा सर्व खर्च त्या पॉलिसीमध्ये कव्हर झाला होता.

- Advertisement -

त्याची मुलगी नुकतीच बारावीला होती आणि तिला पण शिक्षणासाठी खूप खर्च लागणार होता. घरातीला धावपळ व आर्थिक ओढातान तिला माहीत होती वडिलांचा अ‍ॅक्सिडेंट झाल्यानंतर आता खूप सारे पैसे लागतील म्हणून ती खूप टेन्शनमध्ये होती, पण तिला जेव्हा तिच्या आईने सांगितले की बाळा हा सर्व खर्च आपण मेडिक्लेममधून करणार आहोत. आपल्याला एक पैसासुद्धा खर्च करावा लागणार नाही. त्यावेळेस तिला आश्चर्य वाटले आणि मग तिने हा मेडिक्लेम काय प्रकार आहे याची माहिती घ्यायला सुरुवात केली, तोपर्यंत तिला याबाद्दल काहीही माहिती नव्हते. थोडक्यात ती मुलगी अर्थनिरक्षर होती.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भारतातील फक्त ३५ टक्के नागरिक हे अर्थसाक्षर आहेत. मुले अर्थसाक्षर असणे ही तर फार दूरची गोष्ट. एखाद्या दीड वर्षाच्या मुलाला कागदाचा तुकडा दिला, तर तो त्याकडे पाहतसुद्धा नाही आणि हातातसुद्धा घेत नाही, परंतु त्याला १० रुपयांची नोट दिली, तर तो किंवा ती त्याचा हातातून परत देत सुद्धा नाही. सबसे बडा रुपया हे त्या लहान मुलाला समजते, पण अर्थसाक्षरतेबद्दल काय. अर्थात हे एक पैसे प्राणप्रिय असल्याचे एक उदाहरण मी दिले. मुले थोडी मोठी झाली तर त्यांना अर्थसाक्षर करणे हे काम पालकांनाच करावे लागेल.

- Advertisement -

सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आर्थिक सबल आणि साक्षर असणे गरजेचे आहे. यासोबतच आपल्या मुलांनादेखील योग्य वयात आल्यानंतर आर्थिक साक्षर बनवता आले तर फार चांगले. आपण सर्व पालक मुलांना पॉकेट मनी म्हणजे महिन्याचा खर्च देताना पाहिला असेलच. हे सर्व सुरू असताना आता शिक्षण पद्धतीमध्येदेखील खरच बदल होणे आपल्याकडे गरजेचे झाले आहे. बाहेरच्या देशामध्ये १५ वर्षांच्या मुलांना आर्थिक साक्षरतेबाबत शालेय विषय आणि परीक्षादेखील आहे.

२०२२ मध्ये अमेरिकेमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता या सर्व्हेमध्ये असे सांगण्यात आले होते की, अमेरिकेतील पाचपैकी फक्त एकाच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे, किंबहुना भारतात आर्थिक साक्षरता असा लहान मुलांच्या बाबतीत काही प्रकारच नाही. आपल्या पाल्यांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी आपल्याकडे कोणतेही फायनान्सची डिग्री अथवा काही विशेष ज्ञान असणे गरजेचे नाही. काही मूलभूत आर्थिक गोष्टींचे नियम आपण पाल्यांना शिकवल्यास मुले हे सर्व ज्ञान आरामशीरपणे समजू शकतात.

मुलांचा पहिला पॉकेट मनी किती असावा? आपल्या घरातील पैशाचे बजेट बघता मुलांनाही त्या प्रमाणातच पैसे द्यायला हवे. आपली परिस्थिती एक आणि आपल्या मुलांना पैसे देतो अनेक असे व्हायला नको. मुलांना पैशाच्या बाबतीत काही अनुभव देण्यास सुरुवात करायला हवी, तर त्यांच्यात आर्थिक साक्षरता आणायची असेल, तर तशी शिकवणही द्यावी लागेल. मुलांना ज्यावेळी पहिल्यांदा आपण पॉकेट मनी खर्च करण्यासाठी देतो तो अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. यामधून त्यांच्यात परिपक्वता वाढते आणि पालकांचादेखील त्यांच्यावर विश्वास बसण्यास मदत होते. जेव्हा आपण मुलांना पैसे देतो, तेव्हा ते एखादी आनंददायी वस्तू,खेळणी व इतर गोष्टींसाठी पुरतील इतके असायला हवेत. जर आपण वीस किंवा दहा वर्षांपूर्वीचा काळ आठवल्यास आपल्याकडे लहान मुले छोट्या लाकडी गल्ल्यांमध्ये पैसे साठवायचे. एखाद्या नातेवाईकाने किंवा घरच्यांनी पैसे दिल्यावर मुले गल्ल्यामध्ये पैसे टाकून बचत करायचे. सध्या पिगी बँक किंवा काही ऑनलाईन अ‍ॅप्सचादेखील मुले वापर करतात.

जपानमधील बँकांनी लहान मुलांना समजण्यासाठी बँकिंग सुविधांमध्ये खूप चांगले बदल केले आहेत. आपल्याकडे असे काही अस्तित्वात नसेल तरीदेखील आपण पिगी बँक किंवा ऑनलाईन काही अ‍ॅपच्या माध्यमातून मुलांना बचत करायला शिकवू शकतो. यातून आपल्या मुलांच्या व्यवहारांवरदेखील लक्ष ठेवू शकतो. मुलांना पैशाची बचत करायची आणि पैसे योग्य ठिकाणी खर्च करायची सवय यामुळे लागते. आपल्या आवडीनिवडी मुलांवर लादू नका, जर समजा मला लहानपणी खेळण्यात कार आवडायची, तर माझ्या मुलाला कार आवडेलच असे नाही.

त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे काहीही आवडू शकते. त्याने कोणती खेळणी घ्यावी किंवा काय करावे याबाबत मी माझे मत लादू शकत नाही. योग्य गोष्टीची समज मी त्याला देऊ शकतो. छोटे छोटे निर्णय घेण्यास मुलांना मोकळीक द्या, मुलांना छोटे निर्णय त्यांच्या पद्धतीने घेऊ द्या, त्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरण द्या आणि त्यांना व्यवहार नीट शिकवा. एक उदाहरण द्यायचे झाल्यास आपण फळांच्या खरेदीचे उदाहरण घेऊ शकतो. एखादी गोष्ट किती प्रमाणात आणायची, तिच्या दर्जा कसा हवा, किंमत किती हवी या गोष्टीमुळे फळे खरेदी करण्याच्या उदाहरणातून मुले शिकू शकतात. जसजसे मुले मोठी होतील तसतसे त्यांना आर्थिक तुलना करायला जमेल.

छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींमधून आपण मुलांना चांगले व्यवहार व त्याची पारख करणे शिकवू शकतो. त्यांच्या ऐच्छिक भावनांवर काही गोष्टी झाल्यास निश्चित त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते. अशाप्रकारे उद्याचे नागरिक असणार्‍या आजच्या लहान मुलांना आर्थिक साक्षरता शिकवणे फार महत्त्वाचे आहे. यासंदर्भात पालकांनी खालील गोष्टी केल्या तर मुले नक्कीच अर्थसाक्षर होतील. इथे मी अगदीच लहान मुलांबद्दल सांगत नाही. साधारणपणे मुलांना कळू लागण्याचे वय हे पाचवीपासून सुरू होते, तर त्याचे लग्न होऊपर्यंतचा काळ हा अर्थसाक्षरतेसाठी फार महत्त्वाचा आहे.

खालील काही गोष्टी पालकांनी केल्या, तर मुलेसुद्धा अर्थसाक्षर होतील :

१. सोशल मीडियाच्या तुलनात्मक जाळ्यात मुलांना अडकू देऊ नका :
आजकाल आपली सर्वांची मुले ही फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अगदी आठवी-नववीची मुलेसुद्धा सोशल मीडिया वापरतात. त्यातील चंगळवादाच्या जाहिरातीला ते नक्की बळी पडतात. त्यांच्या मित्रांनी काही गोष्टी खरेदी केल्यानंतर ते सोशल मीडियावर टाकले की, इतर मुलांनासुद्धा आपल्याकडे ती वस्तू नाही याची तुलना सुरू होते. मुलांना पालकांची आर्थिक परिस्थिती तुमचे उत्पन्न व खर्च याची योग्य समज देणे गरजेचे आहे.

२. पालकांनी आर्थिक निर्णय घेताना मुलांसोबत पण चर्चा करावी :
भारतात शक्यतो मुलांना पालकांच्या आर्थिक निर्णयात सहभागी करून घेतले जात नाही. उलट पालकांना आर्थिक विषयांबाबत काही चर्चा करायची असेल, तर मुलांना बाजूला जायला सांगितले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यांना निर्णयात सामील करून घ्या. तुमचे महिन्याचे उत्पन्न किती व खर्च किती याची योग्य कल्पना मुलांना द्या.

३. मुलांना बचतीची सवय लावा :
मुलांचे बचत खाते बँकमध्ये उघडा. त्यांना बँकेत जायची सवय लावा. माझ्याकडे अनेक अशी उदाहरणे आहेत की, अगदी बी कॉम झालेली मुले बँकेत जाऊन कुणाला न विचारता स्वतःचे बँक अकाऊंट ओपन करण्याचा फॉर्म स्वतः भरू शकत नाहीत. चेकबुक, डिपॉझिट स्लिप, डिमांड ड्राफ्ट, आरटीजीएस, नॉमिनी या सर्व कंसेप्ट मुलांना समजावून सांगा.

४. गुंतवणूक आणि बचत यातील फरक समजून सांगा.

५. गरजा व चैनीच्या वस्तू यातील फरक मुलांना समजावून सांगा. म्हणजे प्रत्येक खरेदी केली जाणारी वस्तू गरज आहे की, चैनीची वस्तू आहे हे बघण्याची सवय त्याना लागेल.

६. घरात आणलेल्या वस्तूवरील किमतीचे स्टिकर, प्रॉडक्टचे एक्सपायरी तारीख, उत्पादन कंपनी याबद्दल मुलांसोबत पालकांनी सामूहिक चर्चा करावी. यातून मुलांना त्याबद्दल माहिती होईल. काही दिवसानंतर घरात लागणार्‍या छोट्या छोट्या वस्तू आणायची जबाबदारी मुलांवर टाका.

७. आयुर्विमा, मेडिक्लेम यातील फरक मुलांना समजावून सांगा. त्याची गरज काय हेसुद्धा समजावून सांगा. विमा पॉलिसी मुलांना वाचायला लावा त्यातील माहिती, अटी शर्ती मुलांना समजावून सांगा.

८. स्थावर मालमत्तेबाबतसुद्धा मुलांना अवगत कराः
मालमत्तेचे खर्च जसे की, लाईट बिल, महापालिका कर किंवा इतर कर याबाबद्दल माहिती द्या, ते भरले नाही तर त्याचे काय परिणाम होतील याचीसुद्धा माहिती द्या. लाईट बिल, कर पावती मुलांना वाचायला लावा. त्यांना त्यातील माहिती समजावून सांगा.

९. चिट डे सोबत अर्थसाक्षर डे पण करा की :
डायट जे लोक करतात त्यांना एक दिवस चिट डे पण करण्याची मुभा असते. म्हणजे त्यादिवशी ते काही पण खाऊ शकतात. जसा चिट डे तुम्ही करतात, तसा हफ्त्यातून एक दिवस मुलांच्या अर्थसाक्षरतेवर पण घालवा. फार काही नाही हफ्त्यातून एक दिवस एक तास दिला तरी खूप झाले.

१०. मुलांना दिलेल्या पैशाचा हिशोब लिहायला लावा :
पालक मुलांना पैसे देतात व मुले खर्च पण करतात. झालेल्या खर्चाचा हिशोब मुलांना लिहायला लावा. यातून नक्की पैसे कुठे खर्च होतात हे त्यांनासुद्धा समजेल. खर्चाचे व उत्पन्नाचे हिशोब लिहिण्याची आज अनेक अ‍ॅप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहेत.

थोडक्यात मुलांची आर्थिक साक्षरता ही पालकांचीच खरी जबाबदारी आहे. उगाचच तो किंवा ती अजून खूप लहान आहे मोठी झाली की समजेल आपोआप या भ्रमात राहू नका. पोस्टाच्या पाकिटावर रिव्हेनु स्टॅम्प लावणारे खूप जण आहेत, भारतात त्यात तुमचा मुलगा किंवा मुलगी असू नये असे वाटत असेल, तर त्यांना योग्य अर्थ साक्षर करा.

- Advertisment -