घरफिचर्ससारांशनव्वदनंतरची मराठी कादंबरी

नव्वदनंतरची मराठी कादंबरी

Subscribe

साहित्यिक हा संवेदनशील असल्यामुळे आपल्या अवतीभवती घडणार्‍या अनेक घटनांना साद-प्रतिसाद देण्यातून आणि मानवी वर्तनव्यवहारातून आपले आशयद्रव्य शोधत असतो. नव्वदनंतरच्या कादंबरीचा विचार करता या काळात लिहित्या झालेल्या नव्या कादंबरीकारांची संख्या जाणवण्या इतकी अधिक आहेच, पण त्यांच्यापैकी काही लेखक त्यांच्या लेखनातून साध्य करू पाहत असलेल्या गोष्टींमधलं वेगळेपणही अधोरेखित करण्यासारखं आहे. आधीच्या काळापासूनच लेखन करत असणार्‍या काही कादंबरीकारांनी काही जाणिवांचा नव्याने शोध घेतला.

कादंबरी हा उशिरा उदयाला आलेला वाङ्मय प्रकार असला तरी आज संपूर्ण साहित्यविश्वाला व्यापून राहिलेला आहे. मानवी जीवनातील गुंतागुंत, संघर्ष, व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समाज यांचे सहसंबंध, आधुनिकीकरण आणि इतर अनेक घटक यांची व्यामिश्रता आणि ती व्यक्त करण्याची अपरिहार्यता यामुळे अनेक साहित्यिकांना हा प्रकार जवळचा वाटला. विशाल अवकाशाला समग्रतेने गवसणी घालण्याची शक्यता असल्यामुळे तो आपलासा केला गेला. मराठी कादंबरीचा विचार केला तर ‘यात्रिकक्रमण’ (अनुवादित)-‘यमुनापर्यटन’ या कादंबर्‍यापासून सुरू झालेला हा प्रवास आज वेगवेगळी वळणे घेत मराठी भाषिक अवकाश अधिक समृद्ध करत गेलेला आहे. हरिभाऊ, नाथमाधव, फडके, खांडेकर, केतकर, वामन मल्हार, माडखोलकर, दिघे, दांडेकर, पेंडसे, माडगूळकर, आण्णा भाऊ अशा अनेक महत्वपूर्ण लेखकांनी साठपूर्वीच्या कालखंडात भरीव योगदान दिलेले आहे.

साठनंतरच्या काळात मात्र मराठी कादंबरीत परिवर्तन घडून आले. ज्याचे श्रेय भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ या कादंबरीला द्यावेच लागते. केवळ आशयाच्या बाबतीतच नव्हे तर आविष्काराच्या बाबतीतही प्रचलित रूप संकल्पनांना धक्के देऊन नव्या रूपबंधाचा आविष्कार नेमाड्यांनी केला. त्याचा परिणाम असा झाला की, एका बाजूला समीक्षकांना आपले प्रचलित मापदंड बदलावे लागले आणि दुसर्‍या बाजूला त्यानंतरच्या कालखंडातील कादंबरी लेखकांवर कोसलाचा प्रभाव पडल्याचे दिसते. या प्रभावातून मराठी लेखक जवळपास तीस वर्षे इतका प्रदीर्घ काळ बाहेर पडू शकले नाहीत. या सार्‍या प्रभावातून बाहेर पडून स्वतःची वाट चोखाळण्यासाठी नव्वदचे दशक यावे लागले. नव्वदच्या दशकात आणि त्यानंतर कादंबरी लेखनात प्रयोगशीलता अधिक ठळक होत गेली. कारण कादंबरी हा साहित्यप्रकार शेवटी कलाकृती असल्याने आशयाबरोबरच त्याच्या आविष्कार तंत्राचे म्हणजेच कलात्मकतेचे भान अधिक सजग होणे गरजेचे वाटले.

- Advertisement -

साहित्यिक हा संवेदनशील असल्यामुळे आपल्या अवतीभवती घडणार्‍या अनेक घटनांना साद-प्रतिसाद देण्यातून आणि मानवी वर्तनव्यवहारातून आपले आशयद्रव्य शोधत असतो. नव्वदनंतरच्या कादंबरीचा विचार करता या काळात लिहित्या झालेल्या नव्या कादंबरीकारांची संख्या जाणवण्या इतकी अधिक आहेच, पण त्यांच्यापैकी काही लेखक त्यांच्या लेखनातून साध्य करू पाहत असलेल्या गोष्टींमधलं वेगळेपणही अधोरेखित करण्यासारखं आहे. आधीच्या काळापासूनच लेखन करत असणार्‍या काही कादंबरीकारांनी काही जाणिवांचा नव्याने शोध घेतला. रंगनाथ पठारे यांच्या टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, दुःखाचे श्वापद, नामुष्कीचे स्वगत अशा महत्त्वपूर्ण कादंबर्‍यांमधून राजकीय वृत्तीप्रवृत्ती, शोषणाच्या नव्या व्यवस्था साक्षात करतानाच देशीयता आणि प्रयोगशीलता यांचाही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.

श्याम मनोहर यांच्या कळ, खूप लोक आहेत, उत्सुकतेने मी झोपलो या कादंबर्‍यातून प्रयोगशीलता तर आहेच, पण नैतिक जाणिवेचे तीव्र भान ठेवत वाचकांनाही अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला आहे. राजन गवस त्यांच्या चौंडकं, भंडारभोग, तणकट या कादंबर्‍यांतून वेगळा अवकाश उभा करतात. तर त्यांच्या ‘ब बळीचा’ या कादंबरीत आशयाची सशक्तता असताना तंत्रशैली वरचढ ठरते. याशिवाय डांगोरा एका नगरीचा (त्र्यं.वि.सरदेशमुख) मन्वंतर, कबीरा खडा बाजार मे, रोबो, सीमांत (दीनानाथ मनोहर), गौतमची गोष्ट (अनिल दामले) अंताजीची बखर, बखर अंतकाळाची, उद्या (नंदा खरे), अच्युत आठवले आणि आठवण, ऑपरेशन यमु (मकरंद साठे) या आणखी काही महत्वाच्या कादंबर्‍यांची नोंदही आपल्याला येथे घ्यावी लागते.

- Advertisement -

ज्या सामाजिक पर्यावरणात लेखक वावरत असतो, जगत असतो त्या पर्यावरणाचा गुंता त्याला अस्वस्थ करत असतो. ग्रामीण समाजजीवनात वावरणार्‍या लेखकांनी जो भोवताल चित्रित केला त्याचे पैलू पारंपरिक ग्रामीण कादंबरीसारखे एकरेषीय राहिले नाहीत. निशाणी डावा अंगठा (रमेश इंगळे-उत्रादकर), तहान, बारोमास, चारीमेरा (सदानंद देशमुख), गावठाण, झडझिंबड, रौंदाळा, रिंगाण (कृष्णात खोत), देशोधडी, भुई भुई ठाव दे (सीताराम सावंत), अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट (आनंद विंगकर) या कादंबर्‍यांमधून समाजवास्तवाची जी विविधता आली ती लक्षणीय आहे. शैली आणि कथानकाचे नवेपण देणारे या काळातील आणखी एक महत्वाचे कादंबरीकार म्हणजे प्रवीण बांदेकर हे होत. ‘चाळेगत’ मधून त्यांनी तळकोकणावर झालेले भौतिक आक्रमण मांडले. त्यासाठी दशावतार खेळाच्या आणि संकासुराच्या माध्यमाचा वापर केला. कळसूत्री बाहुलीनाट्याच्या कथनतंत्राचा अवलंब करत ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीतून वास्तवाचे प्रतीरुपण केले. धर्मसंस्था, बुद्धीजीवी वर्ग, सामान्य माणूस यांच्यातील विविध पातळ्या दाखवण्यासाठी आणि जाणिवांमधील विविधता ठळक करण्यासाठी बाहुल्यांच्या संभाषितांचा उपयोग केला. आविष्काराचे एक अलक्षित तंत्र बांदेकरांनी साक्षात केले. त्यामुळे ते या काळातील महत्वाचे कादंबरीकार ठरतात.

या काळातील दलित कादंबरीने केवळ जातवास्तव साक्षात न करता आणि व्यक्ती दुःखाचे पैलू कवटाळत न बसता त्या पलीकडे जाऊन आपले आशयद्रव्य शोधले. राघववेळ (नामदेव कांबळे), अभिसरण, रोबोट (जी.के.ऐनापुरे), भडास (कुमार अनिल), विसकट (धम्मपाल रत्नाकर), सुंभ आणि पीळ (ल.सि.जाधव) या काही उल्लेखनीय कादंबर्‍या आहेत. तर स्त्रीजाणिवा मुखर करणार्‍या ज्या महत्त्वाच्या कादंबर्‍या आहेत त्यामध्ये रीटा वेलिणकर, त्या वर्षी (शांता गोखले), प्रतिद्वंद्वी, भूमी, मुद्रा (आशा बगे) या कादंबर्‍यांचा उल्लेख करावा लागतो. या काळातील महानगरीय कादंबरी उच्चभ्रू-मधमवर्गीय चित्रणाचा भरताड भरणा करण्याऐवजी गरीब आणि झोपडपट्टीतील जीवनाचे चित्रण करताना दिसते. हे चित्रण करताना केवळ महानगरीय वर्णनाने अवकाश भरून काढण्याचे काम न करता भाषेच्या सशक्त वापरातून बहुस्तरीय सांस्कृतिकता साक्षात करते. महानगरेच झपाट्याने बदलत असल्यामुळे निर्माण झालेले नवे प्रश्न कादंबर्‍यातून येणे स्वाभाविक आहे.

समकाळातील विविध जीवनजाणिवांना क्रिया-प्रतिक्रिया देण्याच्या धडपडीतून मराठी कादंबरी अवतीर्ण होत असताना आणि आपली स्पेस निर्माण करू पाहात असतानाच दरम्यानच्या काळात भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू’ प्रकाशित झाली. आशयाच्या बाबतीतली विविधता, अफाट कथाबीजे, विशाल अनुभवांचा अवकाश आणि खुद्द नेमाडे यांच्या जीवन जाणिवांच्या अभिव्यक्तीचे कथनरूप, त्याला अनुरूप शैली, सजग भाषाभान यामुळे हिंदूला बृहदकादंबरीचे रूप लाभते. तिचे आवाहकत्त्व अनेक पातळ्यांवरचे आहे. एकूणच मराठी कादंबरीविश्वात नेमाडे यांची प्रतिभा आणि कलाविषयक जाणिवांची भर खूप मोलाची आहे. प्रदीर्घ सांस्कृतिक इतिहास उलगडणारी ही ज्ञानपीठ विजेती कादंबरी भावी काळातील मराठी कादंबरी विश्वाला अधिक सक्षम बनण्यास निश्चितच उपयोगी ठरणारी आहे.

समकालाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे कथाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली असतानाही काही कथाकारांना कादंबरीसारख्या व्यापक अवकाश असणार्‍या लेखनप्रकाराची आवश्यकता वाटली आणि ती त्यांनी तितकीच सशक्तपणे पेललीही. मेघना पेठे यांनी ‘नातिचरामी’ या कादंबरीतून स्त्री-पुरुष संबंधाच्या विविध पातळ्या उभ्या केल्या. शेती प्रश्नाबरोबरच कामगार, शेतमजूर यांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत हे आसाराम लोमटे यांनी ‘तसनस’ या कादंबरीतून अधोरेखित केले. किरण गुरव यांची ‘जुगाड’ ही कादंबरी उद्योगविश्वात भरडल्या जाणार्‍या तरुणाचे चित्रण करते तर प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीतून फ्लॅशबॅक तंत्र आणि शेवटी वर्तमान अशा तंत्राचा वापर करत अनेक कहाण्या, किरकोळ गोष्टी आशयद्रव्य होतात. या काळातील कादंबर्‍यांतून जीवनाच्या बदललेल्या आयामांतून साकार झालेले समाजवास्तव आणि तत्कालीन वास्तवाने मूल्यांबाबत निर्माण केलेले प्रश्न वाचकांना अस्वस्थ करून सोडतात तसेच वाचकांना एक सजग भानही आणून देतात.

प्रत्येक काळाचे म्हणून काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांना योग्य प्रकारे चिमटीत पकडणे हे कलावंताचे कौशल्य असते. एका बाजूला बाजारू संस्कृती स्थिर होत असतानाच खेडी आणि शेतीसमूह अस्थिर झाला आहे. औद्योगीकरण, नागरीकरणाचा झपाटा सगळ्या मूल्यांवर वरवंटा फिरवत आहे त्यामुळे आता ग्रामीण, दलित, महानगरी, स्त्रीवादी अशा भेदभिंती न राहता, काटेकोर सीमारेषा न आखता मानवी जगण्याला व्यापून असणारा सारा भोवताल कवेत घेण्याचा प्रयत्न मराठी कादंबरी करताना दिसत आहे. व्यक्तीत्व हे एकरेषीय नसते, त्याला बहुस्तरीयता असते. व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समाज, व्यक्ती-निसर्ग यांच्यातील आंतरसंबंध अशा विविध अवकाशातून कादंबर्‍या अवतीर्ण होत आहेत त्यामुळे आजच्या साहित्याला सृजनाचे नवे आयाम लाभू शकतात. शोषितांच्या, उपेक्षितांच्या सांस्कृतिक धारणा पारंपरिक पद्धतीने चित्रित न करता वर्तमान वास्तवाचा उभाआडवा छेद घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. आज धर्मापासून ते माणसाची नातीगोती, संस्कृती या सगळ्यांचा वापर नफेखोरीसाठी केला जात आहे.

शेतीची मरणासन्न अवस्था झालेली आहे, ग्रामरचनेच्या केंद्रस्थानी असणारा शेतकरी परिघाबाहेर फेकला जात आहे. कृषी व्यवस्था ज्या सहकारावर उभी राहिली होती ती व्यवस्थाच भांडवलशाहीने आणि नव्या राजव्यवस्थेने उद्धस्त करून टाकली आहे. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, त्यामुळे गावाचे गावपण संपत जाणे आणि गावातील युवकांचा शहराकडे कल वाढणे तसेच व्यक्तीच्या, समाजाच्या जगण्याला प्राधान्य देण्याऐवजी वस्तूला प्राधान्यक्रम दिला जाणे, ही सारी नव्या कादंबरीची कथाबीजे आहेत. एकूणच नव्वदनंतरच्या काळातील कादंबरी आमूलाग्र बदललेली आहे. ग्रामीण वास्तव वेगळ्या प्रकारे आविष्कृत होत आहे, वेगवेगळ्या जातसमूहातील लेखक लेखन करत असल्यामुळे भाषिक अवकाश व्यापक होत आहे. कादंबरीच्या शक्यता अधिक उंचावत असताना त्याला आवश्यक असणारी आशयसंपृक्तता आणि अभिव्यक्तीसाठीच्या प्रचंड शक्यता मराठी साहित्यविश्वाला भविष्यात अधिक समृद्ध करत जातील असा विश्वास वाटतो.

-नीलेश केदारी शेळके 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -