घरफिचर्ससारांशउद्योगांसाठी कर्ज मिळविण्याचे फंडे!

उद्योगांसाठी कर्ज मिळविण्याचे फंडे!

Subscribe

एखाद्या तरुणाला जेव्हा नवा उद्योग सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज हवे असते, तेव्हा सर्व प्रकारची तयारी करावी लागते. बँकेत गेला आणि बँकेने कर्ज दिले असे होत नाही. त्यामुळे आधी बँकेत खाते खोला. त्यात काहीतरी व्यवहार करा. प्रोजेक्ट फाईल बनविताना ती व्यवस्थित बनवा. त्यात हवी असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित लावा. ज्या जागेवर प्रोजेक्ट करावयाचा आहे ती जागा रेंटवर असेल तर रेंट अ‍ॅग्रीमेंट करा. स्वत:चे मार्जिन, सबसिडी किती मिळणार याबाबत आत्मविश्वासाने बोला. बँकेमध्ये स्वत: जा. कुठल्याही एजंटकडे फाईल देऊ नका. सरकारच्या वेगवेगळ्या काय स्कीम आहेत याचे स्वतः ज्ञान मिळवा. अशा विविध गोष्टी काळजीपूर्वक केल्या तरच उद्योगासाठी कर्ज मिळणे सुलभ होते.

-राम डावरे

गणेश हा एक होतकरू तरुण. त्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्याला बँक कर्ज हवे आहे आणि तो बँकेमध्ये जातो.
गणेश आणि बँक मॅनेजर यांच्यात झालेल्या चर्चेचा वृत्तांत :
गणेश : सर मी आत येऊ का ?
बँक मॅनेजर : हो, या.
गणेश : सर, मी गणेश. मला फूड प्रोसेसिंगमध्ये एक उद्योग सुरू करायचा आहे, तर मला लोन हवे आहे. त्याबद्दल चर्चा करायला मी आलो आहे.
बँक मॅनेजर : पण आमचे कर्ज वाटप सध्या बंद आहे आणि तुमचे आमच्या बँकेमध्ये अकाऊंट आहे की नाही?
गणेश : हो सर, माझे तुमच्याच बँकेमध्ये अकाऊंट आहे.
बँक मॅनेजर : पण मी सध्या जरा बिझी आहे तर मला वेळ नाही आता तुमची फाईल बघायला.
गणेश : ओके सर, मी नंतर येतो आपल्याला कॉल करून. तुम्ही माझी लोन फाईल ठेवून घ्या आणि मला माझ्या फाईलवर Received असा सही शिक्का द्या.
बँक मॅनेजर : अशी आम्ही फाईल Received करून सही शिक्का वगैरे काही देत नाही. ओके.
गणेश : पण सर ही सरकारी बँक आहे आणि मी माझी फाईल जमा करत आहे तर मला Received म्हणून सही शिक्का द्यावाच लागेल तुम्हाला.
बँक मॅनेजर : मला अक्कल हुशारी शिकवू नका. मी कामात आहे नंतर या.
गणेश : पण सर सरकारने नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मोठे पॅकेज देऊ केले आहे आणि सरकारी बँकांना कर्ज उपलब्ध करून द्यायला लावले आहे. सरकार गॅरंटी पण घेत आहे तरी तुम्ही असे आम्हाला डिमोटिव्हेट करता.
बँक मॅनेजर : सरकारला काय लागते सांगायला, इथे कर्ज थकले की कर्जाची वसुली आम्हाला करावी लागते.
गणेश : पण सर माझा प्रोजेक्ट खूप वेगळा आहे, जरा समजून घ्या.
बँक मॅनेजर : गणेशची फाईल मॅनेजर आता हातात घेतात आणि विचारतात काय प्रोजेक्ट करणार आहात तुम्ही?
गणेश : सर, मला टोमॅटो प्रोसेसिंगचे युनिट टाकायचे आहे.
बँक मॅनेजर : प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आहे का?
गणेश : सर, मी फाईलमध्ये सर्व कागदपत्रे दिली आहेत आणि सुरुवातीला इंडेक्स दिली आहे आणि त्याला पेज नंबर पण दिले आहे. त्या इंडेक्सनुसार त्या त्या पानावर सर्व कागदपत्रे सीरिअरली लावली आहेत.
बँक मॅनेजर : किती लोन हवे आहे तुम्हाला?
गणेश : सर, माझा प्रोजेक्ट रु. १०० लाखांचा आहे. मला रु. ६५ लाख लोन हवे आहे आणि रु. १० लाख मी स्वतःचे भांडवल टाकणार आहे. मला रु. २५ लाख सबसिडी मिळणार आहे.
बँक मॅनेजर : प्रोजेक्ट जिथे करणार आहे ती जागा स्वतःची आहे का?
गणेश : नाही सर, मी ती जागा रेंटवर घेतली आहे आणि मी भाडे करारनामा १० वर्षांचा केला आहे. तो नोंदीत आहे आणि फाईलमध्ये लावला आहे.
बँक मॅनेजर : तुम्हाला रु. ६५ लाख कर्ज हवे आहे तर तुम्ही कोलॅटरल सिक्युरिटी काय देणार आहात?
गणेश : सर, माझ्याकडे काही सिक्युरिटी नाही, पण सरकारची जी
Cgtmse गॅरंटी स्कीम आहे त्यात मला कोलॅटरल देण्याची गरज नाही.
बँक मॅनेजर : मग तुमचे लोन नाही होणार. काहीतरी प्रॉपर्टी असेल सिक्युरिटी देण्यासाठी तर आपण विचार करू.
गणेश : पण सर msme लोनसाठी रु. २०० लाखांपर्यंत कोलॅटरल सिक्युरिटी सरकार घेते ना?
बँक मॅनेजर : ते मला सरकारचे काही सांगू नका. काही सिक्युरिटी नसेल तर लोन नाही मिळणार.
गणेश : पण सर माझी फाईल तर बघा. मी त्या प्रोजेक्टवर खूप काम केले आहे. वेगवेगळ्या संबंधित प्रोजेक्टला भेटी दिल्या आहेत. फूड प्रोसेसिंगचा कोर्स केलेला आहे. मार्केट सर्व्हेही केला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून मी त्यावर खूप काम केले आहे. मार्केटिंगसंबंधी काही लोकांशी करार पण केला आहे.
बँक मॅनेजर : बरं ठीक आहे. फाईल ठेवून जा. मला सध्या वेळ नाही मी नंतर बघतो.
गणेश : ठीक आहे सर, फाईल मी ठेवून जातो. मला माझ्या फाईलवर Received म्हणून सही शिक्का द्या.
मॅनेजर : गणेश तुम्हाला सांगितले ना की असे Received म्हणून आमची बँक सही शिक्का नाही देत.
गणेश : ठीक आहे सर. तुम्ही जे मला सांगत आहात, ते मला लेखी स्वरूपात द्या.
बँक मॅनेजर : वैतागून शिपायाला आवाज देतो व सांगतो यांची फाईल जमा करा आणि यांना त्यांच्या फाईलवर Received म्हणून सही शिक्का द्या. गणेश फाईल द्या तिकडे.
गणेश : सर, फार फार आभारी आहे. मी परत कधी येऊ.
बँक मॅनेजर : मला ५ ते ६ दिवस खूप काम आहे. मी तुमची फाईल बघून तुम्हाला कॉल करतो मग या.
गणेश : धन्यवाद सर
तर मित्रांनो वरील बँक मॅनेजर व गणेशमधील संवाद नवीन उद्योजकांना काय शिकवतो?

- Advertisement -

तर खालील गोष्टी शिकवतो :
१. आधी बँकेत खाते खोला. त्यात काहीतरी व्यवहार करा.
२. प्रोजेक्ट फाईल बनविताना ती व्यवस्थित बनवा. त्यात हवी असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित लावा.
३. ज्या जागेवर प्रोजेक्ट करावयाचा आहे ती जागा रेंटवर असेल तर रेंट अ‍ॅग्रीमेंट करा.
४. स्वत:चे मार्जिन, सबसिडी किती मिळणार याबाबत आत्मविश्वासाने बोला.
५. बँकेमध्ये स्वत: जा. कुठल्याही एजंटकडे फाईल देऊ नका.
६. सरकारच्या वेगवेगळ्या काय स्कीम आहेत याचे स्वतः ज्ञान मिळवा.
म्हणजे बँक मॅनेजरसोबत जरा डोकं लावता येतं. जसे की msme उद्योगांसाठी रु २ कोटींपर्यंत कोलॅटरल फ्री लोन मिळते.
७. प्रोजेक्टबद्दल काय माहिती आहे, किती माहिती आहे, मार्केटिंग कसे करणार याचा स्वत: भरपूर अभ्यास करा.
८. बँकेमध्ये फाईल जमा करताना आपल्या फाईलवरती Received असा सही शिक्का घेण्याचा कायम आग्रह धरा.

एकदा का तुम्हाला Received सही शिक्का मिळाला की ती फाईल वेळेत प्रोसेस करणे आरबीआयच्या नियमानुसार बँक मॅनेजरवर बंधनकारक आहे, मग त्याला जर ती फाईल रिजेक्ट करायची असेल तर त्याला त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याची परवानगी घेणे जरूरी आहे.

- Advertisement -

तसेच आरबीआयने एक तक्रार पोर्टल तयार केले आहे, त्या पोर्टलवर तुम्ही बँकेविरुद्ध तक्रार करू शकता व तक्रार आल्यानंतर आरबीआय त्यावर लगेच माहिती मागवून घेते. हे ऑनलाईन तक्रार वेब पोर्टल आहे. त्याचा वेब अ‍ॅड्रेस आहे https://www.rbi.org.in/Scripts/Complaints.aspx

या पोर्टलवर तुमच्या तक्रारीचे स्टेटस काय आहे हेसुद्धा रोज तुम्हाला पाहता येते. त्याकरिता तुम्हाला बँकेसोबत तोंडी न बोलता नेहमी लेखी पत्रव्यहार करणे गरजेचे आहे. नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी बँकांच्या विविध कर्ज योजना असतात, पण प्रोजेक्टचा पूर्ण अभ्यास स्वतः करून व सर्व माहिती घेऊन आत्मविश्वासाने बँकेकडे जायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -