घरफिचर्ससारांशआय लव्ह यू : ‘एआय’!!!

आय लव्ह यू : ‘एआय’!!!

Subscribe

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना कधी असा विचार केला आहे का की एखादा रोबोट तुम्हाला गुलाबाचे फूल देत प्रपोज करेल? ही कुठली सायन्स फिक्शन मुव्ही नाही तर येत्या काळात आपल्याला पाहता येईल असे ‘एआय’चा झालेला साम्राज्य विस्तार आहे. ‘यू लव्ह इट ऑर यू हेट इट, यू कॅन नॉट इग्नोर इट, इट्स एआय’ असे हे ‘यथार्थ’ आहे.

निव्वळ पांचटपणा किंवा फालतूपणा वाटू शकेल पण हे सर्व आजचे वास्तव सत्य आहे. २०२२ सालच्या सप्टेंबर महिन्यातच स्त्री व पुरुष ‘सेक्सबॉट्स’ अशा अगदी विवाहसंस्थाच मोडकळीस आणणार्‍या रोबोटची निर्मिती झाली, अशा बातम्या अमेरिकेत झळकल्यात. त्यामुळे नैतिक की अनैतिक या चर्चा सुरू होईपर्यंत आपले लाडके या रोबोटच्या प्रेमात पडून ‘हम दिल दे चुके सनम’ असे येत्या काळात म्हणताना दिसतील. आता मनाप्रमाणे वागणारे जावई व सुना रोबोट रूपाने घराघरात वावरू लागतील. परिणामी हुंडा तसेच घटस्फोट, भांडणे आदी सामाजिक कटकटी कदाचित कायमच्या मिटलेल्या असतील. समजा काही वाद उद्भवलेच तर चीनप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) बेस्ड रोबोट तंत्रज्ञान वापराने जज आणि वकील म्हणून काम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वीच सज्ज झाले आहेत. अमेरिकेत अधिकृतपणे रोबोट वकिलाला मान्यता दिली गेली आहे.

नखशिखांत बदल!

- Advertisement -

‘एआय’ने मानवी भावभावना जाणून घेणारे यंत्रमानव म्हणजे रोबोट तयार झाले आहेत. एका बाजूला अंतराळात परग्रहवासी म्हणजे ‘एलियन्स’चा शोध ‘एआय’च्या मदतीने सुरू आहे, तर पृथ्वीवर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ने रोबोट अँकर आज बातम्या देऊ लागले आहेत. नागपूरला हॉटेलमध्ये वेटर रोबोट आले आहेत. बंगलोर व मुंबईत रोबोट टीचर आले आहेत. अमेरिकेत विद्यापीठ व कॉलेजमध्ये शिकविण्यासाठी प्राध्यापक म्हणून रोबोटला अ‍ॅक्रीडेशन (मान्यता) मिळाली आहे. त्यामुळे कौशल्य विकास व सृजनशीलता यावर लक्ष केंद्रित करता येईल हा विचार पुढे येत आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सरकारी कामकाजासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत चक्क सनदी अधिकार्‍यांच्या दोन रँक (श्रेणी) रद्द करीत आहे. भारतातदेखील उद्या राजकीय पक्षांनी आपले ‘एआय’ रोबोट निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे केलेत तर नवल वाटायला नको.

काय आहे ‘एआय’?

- Advertisement -

आता तर ‘एआय’ म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये निर्माण करीत आहे. मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणता येईल. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेची पावलं नाही असे एकही क्षेत्र आता उरणार नाही हे आपण जितके लवकर समजून सज्ज होऊ तितकीच आपल्या रोजगार आणि अस्तित्वाची स्पर्धा सुलभ होईल.

‘बुद्धिमत्ता’ ही मानवी प्रयत्नांचाच परिपाक आहे. मानवी समूहाच्या मर्यादांवर मात करीत ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अविश्वसनीय वाटणार्‍या गोष्टी वास्तवात उतरत आहेत. ह्युमन सिव्हीलायझेशनच्या (मानवी सभ्यता) पोटाची व ज्ञानाची भूक भागविण्याचा प्रवास सुरू आहे. सध्या जगातील प्रथम क्रमांकाची टेक्नॉलॉजी ‘एआय’ असून यात सर्वाधिक पगाराच्या नोकर्‍या उपलब्ध आहेत. असे असले तरी जगभर या क्षेत्रात काम करण्यासाठी नैसर्गिक बुद्धिमत्ता असणार्‍या कोट्यवधी लोकांचा अक्षरश: दुष्काळ आहे. अशा वेळी घाबरून न जाता आपण कुठे आहोत याचा शोध आणि बोध घेणे फक्त गरजेचे नव्हे तर अपरिहार्यदेखील आहे.

‘एआय’ आणि अस्तित्वाचे युद्ध

अमेरिकेतील वॉशिंग्टनमधून आलेल्या बातमीनुसार ‘गुगल’ आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे ‘एआय’ फीचर असलेल्या सर्च इंजिनसह कार्यरत होणार आहे. अस्तित्व टिकविण्यासाठी यूजर्सला नेमके काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी फीडबॅक घेणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या लोकप्रिय ‘चॅटजीपीटी’ला टक्कर देण्यासाठी गुगलच्या कोड रेडचा एक भाग म्हणून ‘ऍटलास’ नावाच्या प्रकल्पांतर्गत ही संभाषणात्मक सेवा आहे. यासाठी ‘बार्ड’ नावाचा एक नवीन प्रायोगिक ’एआय चॅटबॉट’ एक संवाद साधणारी कन्वर्सेशनल एआय सर्व्हिसदेखील गुगल सुरू करीत आहे. ‘एआय’ आणि अस्तित्वाची लढाई नव्हे तर हे ‘युद्ध आमचे सुरू’ असे म्हणावे लागेल.

सेंटर ऑफ एक्सलन्स

कृषी उद्योग उभारणीस भरघोस प्रोत्साहन, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना तीन सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सेंटरची उभारणी, भारतीय ऑपरेटिंग सिस्टिम, आर्थिक व्यवहारासाठी भारतीय अ‍ॅप या सर्वांसाठी सरकारने ठोस धोरण आखले आहे. याशिवाय भारतातील कुठलीही आणि कुठल्याही स्वरूपाची माहिती आयटी कंपन्या जर गोळा करीत असतील तर त्याची स्पष्ट कल्पना देशातील सरकारला यापुढे देण्यासाठी तरतूद व कायदा बनविला गेला आहे आणि यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) असलेल्या सॉफ्टवेअर यंत्रणा देखरेख ठेवणार आहेत.

आयआयटी खरगपूरनंतर आता भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूरच्या नोएडा आऊटरी परिसरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड इनोवेशन-ड्रिवेन एंटरप्रेन्योरशिप सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टता केंद्र स्थापित होईल. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड टप इंडस्ट्रीच्या मदतीने यांची उभारणी होईल. फिक्की इंडिया उद्योग टाई-अप आणि व्यावसायिक मदत करणार आहे.

‘एआय’ वॉरियर्स बनताना…

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्ता (एनआय) वापरून अगदी मानवी बुद्धिमत्तेसारखे निर्णय घेण्याची क्षमता यंत्रणांमध्ये विकसित करणे होय. यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टींचा वापर होत असल्याने इलेक्ट्रॉनिक सायन्स या शाखेला अचानक जास्त महत्त्व प्राप्त झाले. खरंतर इलेक्ट्रॉनिक्सबरोबर कॉम्प्युटर्स हादेखील महत्त्वाचा विषय मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता सॉफ्टवेअर आणि कोडींग स्वत:हून करणारे अल्गोरीदम तयार झाले आहेत. चॅटजीपीटी तुम्हाला अगदी सेकंदाच्या काही भागात जर प्रोग्रामिंग करून देत असेल तर कॉम्प्युटर प्रोग्रामर ठेवण्याची गरजच काय? या विचाराने आयटी क्षेत्रात हजारो लोकांच्या नोकर्‍या गेल्या हे वास्तव आहे. हार्डवेअर आणि मॅकॅनिकल गोष्टी तयार करणारे रोबोट आणि कोबोट अजून तरी तयार होणे बाकी आहे आणि यामुळेच हार्डवेअरचे आणि हार्डवेअर कार्यान्वित (ऑपरेट) करणार्‍या विविध सिलिकॉन चिप डिझाईनचे महत्त्व यांची जगभर डिमांड पुरविण्याचे सामर्थ्य इलेक्ट्रॉनिक्स शाखेत असल्याने या शाखेला महत्त्व प्राप्त झाले नाही तरच नवल!

नाशिक आणि एआय सेंटर ऑफ एक्सलन्स!

२०२३-२४ च्या बजेटमध्ये तीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन होणार आहेत. विशेष धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील बागलाण तालुक्यातील म्हणजे सटाणा येथील महाविद्यालयांच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागातर्फे (डू इएस) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी मिळावी यासाठी बनविलेला व युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन (यूजीसी) कडे पाठविलेल्या ९० लाखांचा आणि सहा महिन्यांत पूर्ण होणार्‍या नाविन्यपूर्ण व अभिनव ग्लोकल ‘एआय’ अभ्यासक्रमास मंजुरीदेखील मिळाली होती. राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) मान्यता दिलेली असतानाही हा कार्यक्रम नाशिकमध्ये राबविला गेला नाही हे विशेष! चार वर्षे फाईल धूळ खात पडल्याने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) हाच अभ्यासक्रम जवळपास १० कोटींचे बजेट बनवित थोडा बदल करीत गुजरात येथील आनंद युनिव्हर्सिटीमध्ये राबविला जाणार असल्याचे कळते. थोडक्यात महाराष्ट्रातील नाशिकची घोषणा होण्यापूर्वीच पहिले ‘एआय’ सेंटर ऑफ एक्सलन्स आता आनंद येथे स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

याशिवाय २०२१ साली ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारकडे जवळपास १०० कोटी इतका निधी मंजुरीसाठी नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा येथील कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागामार्फत ‘एग्रीकल्चर टेक्नोलॉजी रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर’च्या मान्यतेसाठी पाठवायचा प्रस्तावदेखील मानवी ‘रासायनिक अभिक्रिया’च्या चक्रात अडकल्याने मंजूर होण्यापासून दूर राहिल्याने नाशिक प्रगतीपासून दूर राहिले. ‘परिवर्तना’नंतर आता ‘मविप्र’तर्फे एग्रीकल्चर व इंडस्ट्रीसाठी कौशल्य विकासाने सक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी ‘एआय’, एडव्हान्स टेक्नोलॉजी रिसर्च, ट्रेनिंग अँड एप्लिकेशन्स सेंटर उभारणीसाठी ‘मविप्र’ सरचिटणीस अ‍ॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

खरंतर नाशिकला ७००० कोटींची केंद्र सरकारने मंजुरी देत जवळपास ३५० एकर जमिनीवर ‘आयटी हब’ उभारण्यासाठी ‘एआय’ सेंटर ऑफ एक्सलन्सची भूमिका महत्त्वाचीच आहे. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरासाठी नैसर्गिक बुद्धिमत्तेने घेतलेले मानवी निर्णय किती फायदेशीर ठरतील याचे उत्तर मिळेल. कारण ‘ए आय’ को रोखना मुश्किल ही नहीं, बल्की नामुमकिन है! सो आय लव्ह यू ‘एआय’!!!

–(लेखक प्राध्यापक असून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -