घरफिचर्ससारांशमुल्हेरचा रासक्रीडा उत्सव

मुल्हेरचा रासक्रीडा उत्सव

Subscribe

मनोरंजन आणि संस्कृतीची जोपासना करण्याचा दावा करणार्‍या कार्यक्रमातून ऑर्केस्ट्रा, डीजेसारख्या आधुनिक संगीत वाद्य पद्धतीची भुरळ तरुणाईला आकृष्ट करीत असताना दुसरीकडे हजारो वर्षांची परंपरा जोपासणारा बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील रासक्रीडा उत्सव मिति आश्विन शुद्ध पौर्णिमा रविवार ९ रोजी संपन्न होत आहे. रासक्रीडेचा हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर येथेच साजरा केला जातो. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व तसेच पिढ्यानपिढ्या अखंडपणे सुरू असलेला हा अद्वितीय सोहळा आजही तितक्याच श्रद्धेने व निष्ठेने साजरा केला जात आहे. कोजागरी पौर्णिमा आली म्हणजे भाविकांना वेध लागतात ते रासक्रीडा उत्सवाचे. राधाकृष्ण जय कुंज बिहारी, मुरलीधर गोवर्धन धारी हे भजन कानावर पडताच मुल्हेर येथे जमलेल्या हजारो भक्तांची मने उत्साहाने प्रफुल्लित होऊन जातात.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका अर्थात बागलाण हा तसा पूर्वापार संपन्न परिसर. त्यातील मुल्हेर परिसरातून सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिण पर्वतरांगेचा आरंभ होतो. मुल्हेर हे प्राचीन काळापासून धार्मिक आणि ऐतिहासिक असे महत्त्वाचे स्थान आहे. महाभारत काळातही मुल्हेरचे अस्तित्व असल्याचे सांगितले जाते. याशिवाय शिवकाळात मुल्हेरचा किल्ला हा अनेक ऐतिहासिक घडामोडींचे केंद्र होता. तर त्याच्याही आधीपासून म्हणजे चौदाव्या शतकापासूनच्या इतिहासात मुल्हेरची नोंद आहे. या परिसरावर तिसर्‍या शतकात अभिरांची राजवट होती. स्वतःला कृष्ण परंपरेतील मानणार्‍या अभिरांचे राधा हे कुलदैवत. त्यातूनच रासक्रीडा उत्सवाची सुरूवात इथे झाली असावी.

बागलाणमधील देवळाणे येथील प्राचीन मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमध्येही रासचक्र दिसते. या चक्रात कृष्ण आणि गोपिका दिसतात. रासक्रीडेबाबत अन्यही आख्यायिका आहेत. प्राचीन काळी उत्तरेतून दक्षिणेत जाण्याचा मार्ग मुल्हेरवरून जात असल्याने साधू आणि ऋषींचा इथे वावर असे. मुल्हेर पर्वतावरून व्याध या तार्‍याचे दर्शन घेण्यासाठी ते इथे मुक्काम करत, असा संदर्भ देऊन हा रासक्रीडा उत्सव पाच हजार वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात सातशे वर्षांपासून रासक्रीडा उत्सव होत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.

- Advertisement -

रासक्रीडेचा हा सोहळा संपूर्ण भारतात फक्त वृंदावन, मथुरा आणि मुल्हेर येथेच साजरा केला जातो. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व तसेच पिढ्यानपिढ्या अखंडपणे सुरू असलेला हा अद्वितीय सोहळा आजही तितक्याच श्रद्धेने व निष्ठेने साजरा केला जात आहे. कोजागरी पौर्णिमा आली म्हणजे भाविकांना वेध लागतात ते रासक्रीडा उत्सवाचे. राधाकृष्ण जय कुंज बिहारी, मुरलीधर गोवर्धन धारी हे भजन कानावर पडताच मुल्हेर येथे जमलेल्या हजारो भक्तांची मने उत्साहाने प्रफुल्लित होऊन जातात. श्री उद्धव महाराज यांची समाधी असलेले श्रीक्षेत्र मुल्हेर येथे प्राचीन काळापासून ही परंपरा चालत आली आहे. रासक्रीडाची सुरुवात ही रासचक्राच्या सजावटीपासून सुरू होते. यासाठी २८ फुट व्यासाचे भव्य चक्र दोरीच्या सहाय्याने विणून तयार केले जाते.

चक्राची सजावट केळीची पाने व झेंडूच्या फुलांनी केली जाते. रासक्रीडेतील अनेक वेगवेगळी कामे पूर्वापार अनेक समाजांना वाटून दिलेली असून सर्व समाजघटकांना विविध जबाबदार्‍या सोपवत सामाजिक एकतेचा संदेशही या उत्सवातून देण्याचा प्रयत्न पूर्वापार होत आला आहे. आजही हे सर्व समाज आपापली परंपरा व जबाबदारी सांभाळून आहेत. रासमंडलासाठी लागणारी केळीची पाने व झेंडूची फुले आणण्याचे काम भिल्ल व कोकणी समाजाकडे, रासमंडल विणणे व देव सांभाळण्याची जबाबदारी शिंपी समाजाकडे, रासाच्या चाकाची व रासमंडळाच्या दांड्या सांभाळण्याचे काम मराठा समाजाकडे, दिवाबत्तीची सोय करण्याचे नियोजन तेली समाजाकडे आणि भजन परंपरा व पूजा साहित्याची जबाबदारी ब्राह्मण व वाणी समाजाकडे आहे. गावातील इतर सगळी मंडळी रासाच्या चाकाच्या सजावटीत व भजन गायनात सहभागी होतात.

- Advertisement -

मुल्हेर परिसरातील ४२ खेड्यांमधून प्रामुख्याने आदिवासींची वस्ती आहे. त्यांचा सहभाग या उत्सवात असतो. गुजरातच्या डांग भागातूनही काही आदिवासी या उत्सवासाठी मुल्हेर गाठतात. सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्या मध्यकाळी म्हणजेच संपतकाळी हे चक्र चंद्र सूर्याच्या साक्षीने, श्री उद्धव महाराज की जयच्या जयघोषात १४ फूट उंचीच्या रासस्तंभावर चढवतात. चक्र म्हणजे मंडल होय. वृंदावनात अशाच मंडलाखाली भगवान श्रीकृष्ण गोपिकांसमवेत वृंदावनात रासक्रीडा खेळत. या मंडलाचे प्रतिक म्हणजेच हे रासचक्र आहे तर रासक्रीडेला गोपी व कृष्णाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार इ.स. पूर्व ३००० साली महाभारत कालीन राजा। मयुरध्वजास भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य चक्षूंनी रासक्रीडेचे दर्शन घडवले. तेव्हापासून मुल्हेर येथे अश्विन पौर्णिमेस रासक्रीडा उत्सव साजरा केला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळते. रासक्रीडा उत्सवाची धुरा सध्या मुल्हेरच्या श्री उद्धव महाराज समाधी संस्थानकडे आहे. चारशे वर्षांपूर्वी उद्धव महाराजांनी मुल्हेरला समाधी घेतली. त्यांचे गुरू श्री काशीनाथ महाराज मुल्हेरलाच राहत. त्यांच्याही आधी मुल्हेरमध्ये रासक्रीडा उत्सव सुरू होताच.

मात्र, इ. स. १६४०च्या सुमारास काशीनाथ महाराजांनी रासक्रीडा उत्सवाची पुनर्रचना केल्याचे संदर्भ श्री उद्धवमहाराज संस्थानचे ११ वे मठाधिपती डॉ. रघुराज महाराज यांच्या अभ्यासाने सापडले आहेत. यावरून तेव्हापासून आजतागायत हा रासक्रीडा उत्सव मुल्हेर येथे सुरू आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्याचा सहवास आणि उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणात हा रासोत्सव आजही उत्तर भारतीय पद्धतीनेच साजरा केला जातो. श्री उद्धव महाराजांच्या समाधीसमोर संपातकाली रास स्तंभावर चक्र चढल्या नंतर पूजा, आरती होते. रात्री अधिकारी घराण्यातील एका मुलाला श्रीकृष्णाचे रूप दिले जाते. नवसाने झालेल्या मुला, मुलींना राधागोपिका बनवून राधा कृष्ण जय कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी वा भजनाच्या जयघोषाने देवघरापासून समाधी मंदिराकडे नेतात, रात्री नऊ वाजता आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होतो. सकाळी सात वाजेपर्यंत रासाच्या चक्राखाली व्रज भाषेतील १०५ भजने म्हटली जातात. या भाजनांची रचना विस्कळीत झाली. ती पुन्हा सुस्थापित करण्याचे काम श्री काशीनाथ महाराजांनी केले. या भजनांची गायकी पंजाबी आहे. तर पखवाज उत्तर भारतीय आहे. सुमारे अर्धा किलो वजनाची दक्षिणी झांज अत्यंत वेगाने या भजनांमध्ये वाजवली जाते.

या भजनांचे वैशिष्ठ्य म्हणजे ही भजने संत कबीर, नरसिंह स्वामी यांनी रचलेली असून यात श्रीकृष्णाशी असलेली गोपिकांची एकरूपता, विरहाचि व्याकुळता आणि समर्पण याचे हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. केदार, सारंग, जयजयवंती, अडाना, सोरट, भूप, प्रभात, तोडी, कल्याण, मालगौडा, सामेरी, कानडा, परज, मालू, बिलावर, मालकॉस, रामकली, भैरवी, नायकी आदी रागदारीत गायली जातात. रासक्रीडेची भजने गाण्यामध्ये तरुण वर्गाचा उत्साह लक्षणीय असतो, हेही एक या उत्सवाचे वैशिष्ठ्य. भजन सोहळ्याची सांगता भैरवीने होते. हा परमोच्च क्षण असतो. यावेळी उपस्थित भाविकांचे अश्रूंनी डोळे भरून येतात. सकाळी ८.३० वा. रासस्तंभावरून रासचक्र हळूवारपणे खाली उतरविले जाते. त्यानंतर रासचक्र महोत्सवाची सांगता होते. यादिवशी मुल्हेरमध्ये मोठी यात्रा भरते. या उत्सवाला महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातूनही जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविक कोजागिरीच्या रात्री उपस्थित असतात. त्यामुळे मुल्हेरला यात्रेचे स्वरूप येते.

या उत्सवात नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठीही गर्दी असते. त्यात अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलणारे अधिक असतात. नवस हा श्रद्धेचा भाग असला तरी हा रासक्रीडा उत्सव म्हणजे एक सांस्कृतिक सोहळा आहे यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -