घरफिचर्ससारांशपॉर्न नको, लैंगिक शिक्षणच हवे

पॉर्न नको, लैंगिक शिक्षणच हवे

Subscribe

मुळात लैंगिकता हा प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे त्याबाबत कोणत्याही प्रकारच्या विकृत कल्पनांना अजिबात थारा असता कामा नये. पण मुळात हे लैंगिक शिक्षण मुलांना देणार कोण..? लैंगिक शिक्षण दिले जायला हवे हे योग्यच ! त्याच्या अभावामुळे सर्व समस्या निर्माण होत आहेत, हे वास्तव. पण हा विषय समोर येताच ज्या पालकांना आपण गृहीत धरतो त्यांना तरी या विषयीची पुरेशी माहिती आहे का? शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवल्यास आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज घडीला असे वातावरण आहे का..? की जिथे शिक्षक विद्यार्थ्यांशी या विषयावर दिलखुलास संवाद साधू शकतील.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये मोठ्या वेगाने तांत्रिक क्रांती झाली. सर्वसामान्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेत. अगदी घरातल्या लहान मुलांनादेखील स्मार्टफोन हक्काचा वाटतो आहे. पण तरी आपण स्मार्ट झालो आहोत का..? की फक्त डर्टी पिक्चर्समध्ये रमून राहिलो आहोत…? हे प्रश्न नेहमी पडतो. जगातील सर्वाधिक पॉर्न पाहण्यात पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होतो. इंटरनेटचा वापर आणि स्मार्टफोनमुळे निर्माण झालेले कितीतरी गंभीर सामाजिक तसेच वैयक्तिक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले आहेत. त्यातच लैंगिक शिक्षणाचा अभाव ही समस्या सर्वच वयोगटांना भेडसावते आहे. माहितीच्या अभावामुळे लहान मुलांवर होणारे अत्याचार, त्यांचा घेतला जाणारा गैरफायदा, पौगंडावस्थेतील गोंधळलेली मुले आणि म्हणून कमी वयातील गरोदरपणा, शारीरिक समस्यांना बळी पडणे, पुरेशी लैंगिक साक्षरता नसल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणींना सामोरे जात पॉर्नचा आधार घेत विकृतींना आपल्या आयुष्यात स्थान देणारी विवाहित जोडपी, व्यसन लागून आपले आयुष्य, करियर्स नष्ट करून घेणारे युवक अशा विविध स्वरूपात ही समस्या आपल्यासमोर आहे.

खरं तर भारत हा असा एकमेव देश आहे जिथे सर्वात आधी लैंगिकतेकडे शास्त्र म्हणून बघितले गेले. अभ्यासपूर्णरित्या त्याची मांडणी केली गेली. लैंगिक विज्ञानावर आधारित विज्ञान भरव तंत्र, ‘कामसूत्र’, ‘अनंगरंग’, ‘रतिरहस्य’ या प्रकारचे बरेच ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी प्रथम भारतात लिहिले गेले. असे असतानाही आजच्या परिस्थितीत पारंपरिक संस्कार, भारतीय समाजाची लैंगिकतेकडे एक अश्लील गोष्ट म्हणून पाहण्याची मानसिकता अशा विविध कारणांमुळे या विषयासंदर्भात एक अघोषित आणीबाणी आपल्याकडे लागू आहे. आजही आपल्याकडे दोघेच असतानादेखील अंधारात करण्याची, मुलांपासून लांब ठेवण्याची त्यांच्याशी चर्चा न करण्याची गोष्ट म्हणून लैंगिकतेकडे पाहिले जाते. आणि त्यामुळेच लहान मुलांच्या मनामध्ये याविषयीचे कुतूहल निर्माण होते. मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं ही नैसर्गिक प्रेरणा आहे.

- Advertisement -

त्यामुळे या मुलांची उत्सुकता ताणली जाऊन मग सगळ्या गोष्टींचा शोध सुरू होतो. त्यातून हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून पोर्नोग्राफीकडे वळणे सहाजिकच आले. याद्वारे निर्माण होणार्‍या समस्या, दुष्परिणाम, व्यसन याविषयी आपण बघत आहोतच…. मुळात प्रश्न आहे तो ही समस्या सोडवण्याचा. मुलांवर चांगले किंवा वाईट परिणाम करणार्‍या गोष्टी आजूबाजूला सतत घडत असतात. त्यातली कुठली निवडायची हा सारासार विचार त्यांना करता येणं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे त्यांनी ओळखू शकणे यासाठी पालक आणि मुले यांच्यामधे एक अत्यंत मोकळेपणाचा संवाद महत्वाचा आहे. पालकांनीच याविषयी मुलांना योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. खरे तर आपण आपल्या पाल्यांना ज्या गोष्टीपासून दूर ठेवूच शकत नाही, निदान त्यातली योग्य-अयोग्यता आपल्याला त्यांना समजावून सांगता यायला हवी.

मुळात लैंगिकता हा प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे त्याबाबत कोणत्याही प्रकारच्या विकृत कल्पनांना अजिबात थारा असता कामा नये. पण मुळात हे लैंगिक शिक्षण मुलांना देणार कोण..? लैंगिक शिक्षण दिले जायला हवे हे योग्यच ! त्याच्या अभावामुळे सर्व समस्या निर्माण होत आहेत, हे वास्तव. पण हा विषय समोर येताच ज्या पालकांना आपण गृहीत धरतो त्यांना तरी या विषयीची पुरेशी माहिती आहे का? शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवल्यास आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज घडीला असे वातावरण आहे का..? की जिथे शिक्षक विद्यार्थ्यांशी या विषयावर दिलखुलास संवाद साधू शकतील. मुळात पालकांमध्ये त्याविषयी कमालीचा पूर्वग्रह व गोंधळाचे वातावरण पाहायला मिळते.

- Advertisement -

लैंगिक शिक्षण म्हणजे नेमकं काय किंवा मुलांशी काय आणि कसे बोलायचे हाच प्रथमतः त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न असतो. एक ठराविक वर्ग सोडला तर बाकी सर्वसामान्य लोक आपल्या मूलभूत गरजा भागवण्यात व्यस्त असतो. रोजचा घरखर्च, मुलांचे शिक्षण, दोन वेळचे जेवण, यासाठी त्यांचा संघर्ष आहे. त्यांच्याकडून आपण हा विषय समजावून घेऊन आपल्या पाल्यांना समजावून सांगण्याइतपतची अपेक्षा म्हणजे मृगजळच… आणि शिक्षकांच्या बाबतीत बोलायचे तर शिक्षकांना असणारी सरकारी कामे पाहता त्यांनी वेळेत वर्गात तास घेणे हेच नवल…! तर त्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा विषय हाती घेऊन तो विषय विद्यार्थ्यांसमोर मांडणे. म्हणजे स्वप्नवतच!

या समस्या काही अलीकडच्या काळातील नाहीत. पण सद्य:स्थितीत त्याचे वाढलेले प्रमाण आणि होणारे परिणाम हे गांभीर्याने घेण्यासारखेच आहेत. यामुळे मुलांपर्यंत जर ही माहिती पालक आणि शिक्षक पोहोचू शकत नसतील तर मग त्यांना हे सांगणार कोण…? हा निरुत्तरीत प्रश्न. खरे तर समस्येतच उपाय दडलेला असतो. असे मला वाटते. हातात आलेल्या मोबाईलमुळे सुरू झालेल्या समस्येचे निराकरण मोबाईल करू शकतो. काही अंशी समस्येचे समाधान होऊ शकते. युट्युब, गुगल किंवा इतर विविध सोशल मीडियावर लैंगिक शिक्षणाविषयी तज्ज्ञांनी लिखित किंवा व्हिडिओच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेली योग्य व अभ्यासपूर्ण माहिती सर्वच वयोगटातील लोकांना महत्त्वाची आणि त्यांच्या कुतूहलाला, प्रश्नाला योग्य उत्तरे मिळवून देणारी असू शकते.

विविध सिनेमेदेखील अलीकडच्या काळात या विषयावर भाष्य करणारे आहेत. जसे की, बालक-पालक, लघु चित्रपट, माहितीपट, जर विद्यार्थ्यांना शाळेत दाखवण्याची सोय केल्यास, विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र बसून ते पाहिले तर लैंगिक साक्षर होण्यास व याविषयीचा टॅबू फोडण्यास मदत होऊ शकते. शिवाय आता लैंगिक शिक्षण हे काही विशिष्ट गोष्टी पुरते मर्यादित राहिलेले नाही. वाढत्या वयामध्ये मुले-मुली गोंधळलेल्या अवस्थेत असतात. ते तमाम स्थित्यंतरांचा अनुभव घेत असतात. शरीरधर्मामुळे आपल्याच आतून उफाळणार्‍या लैंगिकतेचे नियमन नेमके कसे करायचे, बाहेरून होणारे लैंगिक आघात अपघात नेमके कसे टाळायचे.

यासाठी सध्या लैंगिक शिक्षण देणे महत्वाचे आहे. आजच्या लैंगिक शिक्षणाचा भर हा जबाबदार लैंगिक वर्तन, लैंगिकता हाताळण्यासाठी युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव, प्रौढांना स्वतःचे कामजीवन दुर्लक्षित न करता जगण्याचे मार्गदर्शन, यावर असला पाहिजे. लैंगिकतेविषयीच्या डोळस शिक्षणाचा हादेखील एक भाग असू शकतो. अज्ञानापोटी निर्माण होणारे कुतूहल शमणे हा मूलभूत मानवी स्वभाव असतो. त्यामुळे विकृती येते आणि माणूस असाध्य रोगांनी पछाडला जातो. त्यामुळे लैंगिक आरोग्य हादेखील महत्त्वाचा विषय सध्या लैंगिक शिक्षणामध्ये हाताळला जाणे गरजेचे आहे.

मला वाटते आपण सर्वांनी आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून ही समस्या आपापल्या स्तरावर सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. यातूनच आपल्या भावी पिढीचे व्यक्तीमत्व सुदृढ आणि वैचारिक ठेवण चांगली राहण्यास मदत होईल….

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -