घरफिचर्ससारांशजुन्या सायकलची, नवी गोष्ट!

जुन्या सायकलची, नवी गोष्ट!

Subscribe

काळाच्या हवाली केलेली आपली पिढी म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत समायोजन करत आलीय. आपल्या मुलांनाही त्यांचे त्यांना जगू द्यावे, करू द्यावे, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे त्यांच्या जगण्यात आपण फार हस्तक्षेप आणि अवास्तव अपेक्षा करू नयेत, अशी आता माझी धारणा झालीय. आपण पालक असावे, पण शक्यतो मालक बनू नये. तरच ते खंबीर होतील. कोणत्याही संघर्षाला तोंड देऊ शकतील असे नेहमीच वाटते, पण ते अजूनही जमत नाही. मुलाच्या सायकल दुरुस्तीच्या या ढकल प्रवासात असे अनेक विचार मनात येऊन गेलेले. या वेळेत एवढे मात्र केले. अर्ध्या रस्त्यात माझी चूक सुधारून मुलाच्या हातात सायकल दिली आणि त्याला म्हटले की, आता तुझी सायकल तू ढकल. मी आहेच सोबत.

काही वर्षांपूर्वी सायकल या अद्भुत वेगवान वस्तूने तेव्हा आमची झोप उडवली होती. स्वप्नात बरेच काही तेव्हा असायचं. त्यात आपण भरधाव वळणांनी सायकल चालवतोय अशी उनाड स्वप्ने पडायची. अर्थात हे का घडायचं? त्याचे कारण म्हणजे आमच्या गावातील नुकतेच लग्न झालेल्यांना तेव्हा हुंड्यात घड्याळ, रेडिओ आणि सायकल मिळालेली असायची आणि हे उजळलेले आंदणवीर गावभर बगलेत रेडिओ अडकवून सायकल दामटत हुंदडायचे. वास्तविक नवी नवरी मिळाल्याच्या आनंदापेक्षा त्यांना सायकलवर मांड ठोकून या नव्या सखीला फिरवण्यात, तिला दाखवण्यात भारी फुशारकी वाटायची. त्यांचे ते कट मारणे, गल्लीबोळातून सायकल दामटणे पाहून आमच्याही मनात अशा प्रयोगाचे कुतूहल जागे झाले.

हायस्कूलला दुपारी किमान दोन तास जेवायची सुट्टी असायची. या वेळेत शाळेच्या बाहेर असलेल्या स्टँडवर दोन-तीन सायकल मार्ट होती. तिथे जाऊन एक तास भाड्याने सायकल घेऊन ८-१५ दिवसांत आम्ही सायकल शिकलो. या काळाच्या खुणा अजूनही आमच्या हातापायावर गोंदणासारख्या शाबूत आहेत. असे पडत, रडत एकादाचे आम्ही सायकल शिकलो. दरम्यान, एके दिवशी फार फार मनाला लागणारी घटना घडली. आम्हाला सायकल शिकवणार्‍या ज्येष्ठ मित्रांनी दगा देऊन आम्हाला खड्ड्यात पाडले आणि मोठा गंभीर प्रसंग ओढवला. सायकलचे पायडल बाजूला पडले. आता काय करायचे? सायकल मार्टवाल्याला पैसे भरून द्यावे लागणार. तसेच हिरमुसले तोंड घेऊन सायकल ढकलत आम्ही मार्टकडे गेलो. दुकानदाराचा चेहरा अर्थातच बघण्यासारखा झालेला. मी तर आतून धास्तावलेलो. आता किती पैसे भरून द्यावे लागतात. त्याने सायकल तपासून घेतली आणि तुटलेल्या एक्सलचे रुपये आमच्याकडून मोजून घेतले. त्या दिवशी किराणा सामान आणण्यासाठी घरच्यांनी पैसे दिलेले. त्या पैशांची विल्हेवाट अशी लागली. खिशात पैसे होते म्हणूनच सायकल घेऊन दुपारच्या सुट्टीत मजा केली. घरी आल्यावर काय सजा मिळाली हे काय आता सांगायला पाहिजे.

- Advertisement -

असेच धडपडत, ठेचकाळत आमची सायकल सवारी सुरूच होती. नंतर अकरावीला कॉलेजला जाण्यासाठी सेकंडहँड सायकल आली. आजीने तिच्या डब्यात साठवलेल्या साडेचारशे रुपयांतून ‘ए वन’ कंपनीच्या सायकलवर माझे कॉलेज सुरू झाले. बारावी होईपर्यंत तिने आमची सोबत केली. तिला फार जीव लावला. तिला जपले. नदीत नेऊन धुतले, पुसले. दसर्‍याला तिची मनसोक्त मनोभावे पूजा केली. तिच्यावर बसूनच अनेक स्वप्ने पाहिली. तिची छोटी-मोठी दुखणी आम्हीच दुरुस्त केली.

हे सारे आठवायचे कारण म्हणजे आज सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी बर्‍याच दिवसांपासून आमच्या चिरंजीवांची नादुरुस्त सायकल दुरुस्त करायला आम्हाला ढकलत घेऊन जावे लागतेय. तेव्हा असली कामे आम्हालाच करावी लागत. आम्हीच आमचे शिकलो, धडपडलो, उठलो, पुन्हा चालायला लागलो. आताच्या पिढीचे काय होणार? त्यांना सर्वच जागेवर मिळतेय आणि मुलांना बाहेर पाठवून बिनधास्त राहण्याइतके आजचे वातावरण, रहदारी आपल्या काळासारखी निश्चिंत थोडीच आहे. आपणच त्यांना असे परस्वाधीन, परावलंबी, आत्मरत बनवत आहोत की या काळाचेच हे परिमाण कळत नाही. गावात वाढलेली माझ्यासारखी पिढी बिनधास्त वाढली. कुठेही आम्ही उनाडलो, भटकलो. यातून खूप काही शिकलो. आता मात्र तसे राहिलेले नाही. आपल्या मुलांना हे सांगावे तर बाबा तुमच्या वेळेस तसे होते. आता बदलले आहे, असे मुले बोलतात. त्यांना त्या काळाचे आपले जगणे सांगून तरी खरे वाटेल का?

- Advertisement -

काळाच्या हवाली केलेली आपली पिढी म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत समायोजन करत आलीय. आपल्या मुलांनाही त्यांचे त्यांना जगू द्यावे, करू द्यावे, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे त्यांच्या जगण्यात आपण फार हस्तक्षेप आणि अवास्तव अपेक्षा करू नयेत, अशी आता माझी धारणा झालीय. आपण पालक असावे, पण शक्यतो मालक बनू नये. तरच ते खंबीर होतील. कोणत्याही संघर्षाला तोंड देऊ शकतील असे नेहमीच वाटते, पण ते अजूनही जमत नाही. मुलाच्या सायकल दुरुस्तीच्या या ढकल प्रवासात असे अनेक विचार मनात येऊन गेलेले. या वेळेत एवढे मात्र केले.

अर्ध्या रस्त्यात माझी चूक सुधारून मुलाच्या हातात सायकल दिली आणि त्याला म्हटले की, आता तुझी सायकल तू ढकल. मी आहेच सोबत. कसाबसा तयार होऊन तो सायकल ढकलू लागला. वरून ऊन, रोडवर रहदारी, पण बाजूने सुरक्षित अंतर ठेवून त्याच्याबरोबर चालू लागलो. काही वेळातच त्याचा चेहरा लालबुंद, घामाघूम झाला. मनात म्हटले, अरे हे तर काहीच नाही? असे कित्येक अनुभव आम्ही घेतलेत. त्यामुळे यश, अपयश, आशा-निराशा असे जीवनातले सर्व अनुभव पचवता येतात. नाहीतर एक प्रश्न आला नाही म्हणून नाराज होणारी ही पिढी दिसली की मला माझी परीक्षा आठवते. पास झालो यातच आकाश ठेंगणे होणारी.

सायकलच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात अशा भरून राहिलेल्या. ऐंशी-नव्वदच्या दशकात सायकलची हवा होती. टू व्हीलर फारच तुरळक असे. आमच्या गावात जे डॉक्टर येत त्यांची तेवढी फटफटी तेव्हा आम्ही पाहिलेली. एरवी आमचे गुरुजी दररोज सायकलवरूनच येत. तेव्हा गुरुजींसारखी सायकल पळवता आली पाहिजे असे आमचे पोरांचे स्वप्न. गुरुजींची उन्हातील सायकल सावलीत ढकलत लावतानाही तिचा होणारा स्पर्श काय भारी वाटायचा. डांबरी रोडवरून पळणार्‍या सायकलपेक्षा कॉलेजच्या वाटेवरील ती पाऊलवाट आणि त्यावर धूम पळणारी माझी सायकल, तिच्या टायरचा तो र्सरर्र्र्र्र आवाज आजही कानात घुमतोय. तिच्यासोबत केलेले ते अवखळ प्रयोग असे सारे काही. गावातील आणि पुढे शहरातील दहा एक वर्ष तरी नितांत सुंदर होते.

तिच्यासोबतचे पाहिलेले एक स्वप्न मात्र राहूनच गेले. आमच्या गावातील तेव्हाचे मोठे लोक पंढरपूर, नाशिक, त्रिंबक, शेगाव अशी तीर्थयात्रा १५-२०च्या समूहाने सायकलवर करायचे. सर्व साहित्य सोबत घेऊन. तेव्हा आपण जावे का यांच्याबरोबर? असा विचार मनात यायचा, पण घरून परवानगी मिळायची नाही. एकदा घरच्यांशी भांडून त्यांना न सांगताच या सायकलपटूंबरोबर त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला तर? पिटाळलेच मला त्यांनी परत. तेव्हापासून अशी सफर करता आली नाही याचे शल्य आहेच. आता माझ्याकडे चारचाकी गाडी आहे, पण सायकलने दिलेला तो निखळ आनंद त्यात नाही. ज्या आजीने मला सायकल घेऊन दिली, ती माझी बारावी झाल्यावर आमच्यातून निघून गेली. तिने माझा तेव्हाचा कॉलेजचा प्रवास किती सुकर केला, पण तिला माझ्या गाडीत बसवण्याचे भाग्य मला लाभले नाही. माझ्या आयुष्यातील सायकलच्या गोष्टीला अशी हळवी किनार लाभलेली आहे. अजूनही सायकल दिसली की मला माझी दादांची आई वेणूआजी दिसू लागते.

–डॉ. अशोक लिंबेकर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -