घरफिचर्ससारांशस्वत:च्या आयुष्याची उजळणी!

स्वत:च्या आयुष्याची उजळणी!

Subscribe

बाई ही चित्रपटात दाखवतात तशी सुपरवुमन नाहीये, साधी हाडामासाची व्यक्ती आहे. तिलाही मानसन्मान, भावभावना आहेत, पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत आजही तिचे अस्तित्वच लाथाडले जाते. परिणामी कोणाचेच सहकार्य न मिळाल्याने मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे ती आपली वाटच बदलून टाकते. तिचे करियर तिथेच संपते. मग ‘बाईपण भारी देवा’सारखा चित्रपट बघून ती स्वत:च्याच आयुष्याची उजळणी करते. स्वत:ला पुन्हा नव्याने चाचपून पाहते, पण महिलांनो चित्रपट बघून आयुष्य जगता येत नाही. ते ज्याचं त्याचं त्यालाच जगावं लागतं. त्यामुळे आपल्यासमोरची आव्हानंही आपल्यालाच पेलावी लागतात.

–कविता जोशी-लाखे

सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या मराठमोळ्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. महिलांच्या आयुष्यातील जवळजवळ सर्वच कंगोरे यात दाखवण्यात आल्याने महिला वर्गाने हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतलाय. विशेष म्हणजे अमराठी महिलांच्याही पसंतीस हा चित्रपट उतरला आहे. यात भाषेची अडचणही आली नाही. कारण एकच, महिला मग ती मराठी असो किंवा इतर भाषिक सगळ्यांच्या पदरी सारखीच परिस्थिती आणि माणसं आलेली आहेत. सगळ्याच जणी भारतीय असून थोड्याफार फरकाने सारखंच आयुष्य जगत आहेत. यामुळे या चित्रपटातील प्रत्येक पात्रात त्या स्वत:लाच बघत आहेत.

- Advertisement -

या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या महिलांच्या आयुष्यातील बर्‍यावाईट घटना अनेक जणी प्रत्यक्षात जगत आहेत, तर काही जणी अनुभवून जगून झाल्या आहेत. यामुळे केवळ मनोरंजनच नाही तर महिलांच्या भावभावनांनाच हात घालणारा हा चित्रपट ठरला आहे. भारतातील ८७ टक्के महिला तणावग्रस्त आयुष्य जगत असल्याचं डेलॉईट इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कदाचित याच कारणामुळे माहेरची साडी, काकस्पर्श, बाईपण भारी देवा आणि अगदी आताचा विरे दी वेडींगसारखे महिलांना त्यांचंच रूप आरशात दाखवणारे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत आहेत.

फेसबुकसारख्या सोशल मीडियावरही आता बायका व्यक्त होऊ लागल्या आहेत. कारण लग्नाआधी पिता, लग्नानंतर पती, नंतर मुलगा यांच्याच निगराणीखाली जगणार्‍या या महिलांना व्यक्त होण्यासाठी आश्वासक आणि विश्वासू असं आसपास कोणी दिसत नाहीये. यामुळे मनाची ही घालमेल कधी प्रत्यक्ष पडद्यावर आपल्या आयुष्याशी अगदी तंतोतंत मॅच होत असल्याची जेव्हा दिसते तेव्हा बायका तनमन हरपून पोटभर हसताना दिसतात आणि दुसर्‍याच क्षणाला थिएटरच्या अंधारात पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसताना दिसताहेत, पण सगळ्यांनाच मेंटली रिलॅक्स होण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन महिलाप्रधान चित्रपट पाहणे जमेल असं नाही.

- Advertisement -

याचाच दाखला डेलॉईट इंडियाने सर्वेक्षणात घेतलाय. ज्या देशातील ८७ टक्के महिला जेव्हा तणावग्रस्त आयुष्य जगत असल्याची कबुली देतात तेव्हा ही चिंतेची बाब ठरते. कारण याच महिला भारताचं भविष्य घडवणार्‍या आहेत. मुलांना जन्मच नाही तर त्यांना घडवणार्‍याही आहेत, पण जर त्यांचेच मानसिक आरोग्य धोक्यात असेल तर त्याचे दूरगामी परिणाम हे देशाच्या भवितव्यावरही नक्कीच होणार यात शंका नाही. यामुळे महिलांना फक्त आर्थिकच नाही तर भक्कम मानसिक आधाराचीही गरज आहे. यावर विचार करण्याची ही योग्य वेळ आहे.

डेलॉईट इंडियाच्या सर्वेक्षणानुसार इतर देशांतील नोकरदार महिलांच्या तुलनेत भारतातील नोकरदार महिलांना सर्वाधिक मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतोय. कधी हा सामना घरातूनच सुरू होतो, तर कधी कामाच्या ठिकाणी. या मानसिक कोंडमार्‍यामुळे भारतीय महिलांच्या मानसिक आरोग्याचा दर्जाही दिवसेंदिवस ढासळू लागला आहे, याकडे या सर्वेक्षण अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. महिलाप्रधान चित्रपट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे महिलांचे भावनाविश्व दाखवणारे जरी माध्यम असले तरी ते तात्पुरते आहे.

काही तासांसाठीच ते महिलांचा ताण घालवू शकते. बाकी इतर दिवसात त्यांना दिवसाचे २४ तास कधी घरात, तर कधी ऑफिसमध्ये मान अपमानाचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे ही समस्या फक्त ठरावीक महिलाच नाही तर उच्चशिक्षित महिलांनाही भेडसावत आहे. घऱ आणि नोकरी सांभाळताना करावी लागणारी तारेवरची कसरत भारतीय महिलांच्या पाचवीलाच पुजली आहे. त्यामुळे मनशांतीसाठी छंद जोपासण्याची उसंत या नोकदार महिलांना मिळत नाहीये. त्या फक्त नोकरी आणि घर याच चक्रात अडकून पडल्या आहेत. त्याचाच परिणाम जसा त्यांच्या शरीरावर होतो तसाच तो त्यांच्या मानसिक आरोग्यावरही होतोय.

भारतीय महिला स्वत:साठी जगणंच विसरून गेल्या आहेत, असंच डेलॉईटच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. बरोबर याउलट चित्र आपल्याला इतर देशांमध्ये बघायला मिळते. महिलांना जगण्याचे पूर्णत: स्वातंत्र्य आहे. यामुळे त्या स्वत:साठी वेळ काढतात तसेच आवडते छंदही जोपासतात. क्लब पार्टीच्या निमित्ताने या महिलांना मन मोकळे करण्याची संधीही मिळते, पण आपल्याकडे असे कार्यक्रम सामान्यतः हायफाय सोसायटीमध्ये होतात, मात्र सामान्य महिलांना असे स्वातंत्र्य मिळत नाही. यामुळे मनाचा कोंडमारा सहन करतच या महिलांना जगावे लागते. याला कारण आहे आपला समाज. कारण आपण कितीही शिकलो किंवा मुलींना शिकवलं तरी शेवटी सगळ्या जणींना समाजाने आखून दिलेल्या चौकटीतच राहावं लागतं. यास काही जणी अपवादही आहेत. त्यामुळे महिलांना फक्त शिक्षण देऊन आपले काम संपत नाही, तर त्यांना मानसिकरित्या खंबीर बनवण्याकडेही प्रत्येक कुटुंबाने लक्ष द्यायला हवे.

आपल्याकडे महिलांना घराबरोबरच ऑफिसमध्येही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठीही विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यात अनेक वेळा मानसिक कुचंबणा, ऑफिसमधले राजकारण याबरोबरच विनयभंगासारख्या दिव्यातूनही महिलांना जावे लागते, पण कधी नोकरीची गरज तर कधी आर्थिक परिस्थितीमुळे आहे ते स्वीकारण्यापलीकडे अन्य पर्याय नसतो. मग आहे तेच सहन करीत त्या नोकरी करतात. अशा वेळी जर कुटुंब तिच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले तरच ती ही आव्हाने पेलून त्यावर विजय मिळवू शकते. कारण ती काही चित्रपटात दाखवतात तशी सुपरवुमन नाहीये. साधी हाडामासाची व्यक्ती आहे. तिलाही मान सन्मान, भावभावना आहेत, पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत आजही तिचे अस्तित्वच लाथाडले जाते.

परिणामी कोणाचेच सहकार्य न मिळाल्याने मानसिक खच्चीकरण झाल्याने ती आपली वाटच बदलून टाकते. तिचे करियर तिथेच संपते. मग बाईपण भारी देवासारखा चित्रपट बघून ती स्वत:च्याच आयुष्याची उजळणी मोठ्या पडद्यावर बघत स्वत:ला पुन्हा नव्याने चाचपून पाहते, पण महिलांनो चित्रपट बघून आयुष्य जगता येत नाही. ते ज्याचं त्याचं त्यालाच जगावं लागतं. त्यामुळे आपल्यासमोरची आव्हानंही आपल्यालाच पेलावी लागणार आहेत. त्यासाठी शरीराबरोबर मनाचीही काळजी घ्या. सध्या आपल्या देशात लोकसंख्येचा मोठा भाग असलेल्या महिलांपैकी ८७ टक्के महिला तणावग्रस्त आयुष्य जगत आहेत. तो आकडा वाढू न देण्याची काळजी प्रत्येकीने घ्यायला हवी. कारण सध्याचे वातावरण महिलांसाठी असुरक्षित आहे. त्यामुळे आपल्या शरीराची आणि मनाची सुरक्षा आपल्याच हाती आहे. कारण सध्या कुंपणच शेत खायला लागलं आहे. तेव्हा सावध आणि समर्थ व्हा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -