घरफिचर्ससारांशकर्तृत्वावर विश्वास ठेवणार्‍या सुरेखाताई सावंत

कर्तृत्वावर विश्वास ठेवणार्‍या सुरेखाताई सावंत

Subscribe

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण अशा एका कर्तृत्ववान शेतकरी महिलेची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांवर मात करत संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढला आहे. आलेल्या संकटांचा सामना करताना त्या कधीही खचल्या नाहीत. ना कधी संकटांसमोर हार मानली. वेळोवेळी जबाबदारी ओळखून त्या अधिक कणखर बनल्या आणि आपलं कतृत्व सिद्ध करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांनी स्वतःवर ओढवलेल्या संकटांशी केलेला सामना महिलांसोबतच शेतकर्‍यांसाठी देखील प्रेरणादायी असा आहे. अशा या महिलेच नाव आहे. सुरेखाताई सुरेश सावंत (वय वर्ष - 56) मु. पो. नामपूर ता. सटाणा जि. नाशिक.

वयाच्या साधारण सोळा-सतराव्या वर्षी नामपूर येथील प्रगतिशील शेतकरी कुटुंबातील सुरेश सावंत यांच्याशी 1982 मध्ये सुरेखाताई यांचा विवाह झाला. यानंतर त्यांना दोन मुली व दोन मुले झाली. साधारण वीस ते पंचवीस लोकांचं एकत्र कुटुंब. सासरे नारायण सावंत हे पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी व प्रसिद्ध टेलर होते. यामुळे घरात येणार्‍या जाणार्‍या लोकांचा मोठा राबता असायचा. अशा एकंदरीत परिस्थितीत सुखाचा संसार सुरू होता. लग्नानंतर सात-आठ वर्षातच पती सुरेश सावंत यांना किडनीच्या आजाराने ग्रासले. यातच त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. सासर्‍यांनी अनेक ठिकाणी उपचार करण्यासाठी नेले. त्याला सर्व कुटूंबाने साथ दिली. मात्र, किडनी देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हे सुरेखाताईंना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता माझी किडनी घ्या असे कुटूंबियांना सांगितले. 1992 मध्ये यासंदर्भातील टेस्ट केल्यानंतर सुरेखाताईंनी एक किडनी आपल्या पतीला दिली. आणि पतीचे आयुष्य वाढवले. यावेळी मुलंदेखील लहान होती. किडनी दिल्यानंतर आता सर्वकाही व्यवस्थित होईल असं संपूर्ण कुटूंबियांना वाटत होतं.

मात्र, किडनी दिल्यानंतरदेखील पतीचे आजारपण कायम होते. एकीकडे घरातील काम अन दुसरीकडे पतीच आजारपण अशा संकटांचा सामना चालूच होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होत. पतीची तब्येत खालावली आणि 1998 ला पतीचं निधन झालं. हा संपूर्ण कुटूंबावर मोठा आघात होता. इतक्या प्रयत्नानंतरही आपल्या कुटूंबातील सदस्याला आपण वाचवू शकलो नाही याचं दुःख सुरेखाताईंसोबतच संपूर्ण कुटूंबाला झालं. या धक्क्यातून सावरत नाही तोच 1999 ला एकत्रित कुटूंबाची विभागणी झाली. सासरे नारायण सावंत यांनी आपल्या चारही मुलांना शेतीचा समान हिस्सा आणि प्रत्येकाला घर अशी व्यवस्था आधीपासूनच करुन ठेवली होती. त्यामुळे सुरेखाताईंना विभक्त झाल्यावर या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला नाही. मात्र, दुसरा संघर्ष सुरू झाला तो पतीच्या पश्चात कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळण्याचा आणि वाट्याला आलेली शेतजमीन करण्याचा. या सर्व गोष्टींची जबादारी आपल्या खांद्यावर घेत सुरेखाताईंनी आपली दोघ मूल सचिन व सागर यांना सोबत घेत वाट्याला आलेली दहा-बारा एकर जमीन कसायला सुरुवात केली. विहिरींना कमी पाणी असल्यामुळे डाळिंब बाग लागवडीचा निर्णय घेत ठिबक सिंचनाच्या मदतीने बाग फुलवली.

- Advertisement -

अशातच मोठी मुलगी सारिकाच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. आणि 2001 मध्ये मोठ्या थाटामाटात मुलीचा विवाह पार पाडला. डाळिंबाचे चांगले उत्पन्न मिळू लागले. हळूहळू संपूर्ण क्षेत्रावर डाळिंबाची बाग लावली. अशातच 2006 ला दुसर्‍या मुलीचा विवाह केला. सुरेखाताई जरी विभक्त म्हणून राहत होत्या तरी देखील. सासरे नारायण सावंत, जेठ प्रभाकर सावंत, रमेश सावंत व दिर भाऊसाहेब सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन व भक्कम साथ वेळोवेळी मिळत होती. उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळत असतानाच दुष्काळाने घात केला. उत्पन्नाला फटका बसला. अशा परिस्थितीतदेखील न डगमगता म्हातारपणीचा विचार न करता अंगावरील सोन्याचे दागिने मोडून शेतीला अर्थसहाय्य उपलब्ध केले. गावातून रोज शेतात जावे लागत असल्यामुळे, शेतातच बंगला बांधून शेतीला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला. यातूनच शेतात बंगल्याचे बांधकाम सुरू झाले. 2012 ला मोठा मुलगा सचिन याचा विवाह झाला.

यादरम्यान कुटूंबाची चांगल्याप्रकारे प्रगती झाली. बंगला देखील बांधून पूर्ण झाला. आणि सुरेखाताई आपल्या कुटूंबासह शेतात राहायला गेल्या. पूर्णवेळ दोघ मुलांसोबत शेतीत झोकून देत काम सुरू केले. मात्र, 2014 मध्ये डाळींब बागेवर ‘तेल्या’ रोगाचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाले आणि फुललेली बाग बघता बघता उध्वस्त झाली. नियतीने घातलेला हा दुसरा मोठा आघात होता. अशातच शेवटचा मुलगा सागर याचा विवाह झाला. डाळींब बाग उध्वस्त झाल्यामुळे. पपई, कांद्याकडे आपले लक्ष वळवले. याकाळात सतत नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत सुरेखाताईंनी मूल, सुना, नातवंडांना त्याची झळ बसू दिली नाही. परिणामी डोक्यावरील कर्ज वाढत गेले. मात्र, कधीही डगमगल्या नाहीत. आलेल्या संकटांशी दोन हात करत आजही त्याच हिमतीने उभ्या आहेत. सचिन आणि सागर ही दोन्ही मुले यशस्वीपणे शेती करत आहेत. नातवंडासोबत रमण्याच्या वयात देखील त्या आज मजुरांच्या मागे उभ्या राहतात. सासर्‍यांची चांगली शिकवण आणि संस्कारांची शिदोरी आज त्यांना जगण्याचं बळ देत आहे.

- Advertisement -

आज पतीला किडनी देऊन साधारण 29 वर्षे आणि पतीला जाऊन 22 वर्षे झाली. एकाच किडणीवर असतानादेखील आज कोणत्याही प्रकारचा आजार नाही. एकच किडनी असल्याच कधी त्यांनी भांडवलदेखील केलं नाही. सुरेखाताईंचा देवावर विश्वास नसून कर्तृत्वावर आहे. यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली, पण त्या कधी मंदिरात गेल्या नाहीत. आजपर्यंतच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी आपल्या कामाला प्राधान्य दिले आहे. म्हणूनच त्यांनी एक प्रगतिशील महिला शेतकरी म्हणून वाटचाल केली आहे. त्यांच्या या सर्व प्रवासात त्यांना सासरे कै. नारायण केशव सावंत, जेठ कै. प्रभाकर सावंत, रमेश सावंत, दिर भाऊसाहेब सावंत व दोन्ही मुलं सचिन व सागर यांनी खंबीर साथ दिली.

दुष्काळ नापिकीमुळे अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आपण टीव्ही, पेपरमधून बघतो. मात्र, कितीही संकटे आली तरी त्यांना परतवून लावण्याची धमक आपल्यात असली पाहिजे. संकटे येतात आणि जातात. मात्र, जन्म हा एकदाच मिळतो. संकटांसमोर हार मानून मृत्यूला कवटाळने हा पर्याय नाही. हीच शिकवण सुरेखाताईंच्या या यशस्वी वाटचालीतून आपल्याला बघायला मिळते. जीवनात अनेक संकटे आली असतानादेखील आत्महत्येसारखा बुरसट विचार कधी सुरेखाताईंच्या मनाला शिवला नाही. कारण त्यांनी कायम आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला. सुरेखाताईंसारख्याच अनेक महिला आज आलेल्या संकटांवर मात करत समाजासमोर एक आदर्श निर्माण करत आहेत. अशा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि मानाचा मुजरा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -