घरफिचर्ससारांशऑनलाइन गेमिंगची भुरळ !

ऑनलाइन गेमिंगची भुरळ !

Subscribe

‘ऑनलाइन गेमिंग’ हा सध्या गहन चर्चेत असलेला विषय आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवून देणारा असल्याने आणि मुलांचा आवडता विषय असल्याने बरेच तरुण आज या व्यवसायात प्रवेश करत आहेत. हा व्यवसाय जितका लोकप्रिय आहे, तितकंच गेमिंगच्या नादामुळे होणार्‍या काही चुकीच्या गोष्टींबद्दल पालकवर्गात अस्वस्थता दिसून येते. परंतु, व्यसनास बळी न पडता योग्य प्रकारे उपयोग केल्यास कोणतीच गोष्ट वाईट ठरत नाही. महत्वाचे म्हणजे ऑनलाइन गेमिंगमध्ये कितीतरी जण चांगल्या पद्धतीने कमाई करताना दिसत आहेत. भारतातील एका 18वर्षीय मुलाने गेम खेळून इतके पैसे कमावले, की त्याने ह्या वयात स्वतःचे नवीन घर घेतले आहे. आता विचार करा, वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी स्वतःचे घर घेण्यास सक्षम बनवणारा याहून फायदेशीर कोणता व्यवसाय असेल? या क्षेत्रात असे बरेच मार्ग आहेत, ज्यांचा अवलंब करून खरोखर चांगला, अर्थपूर्ण व्यवसाय करता येऊ शकतो. ते कसे, जाणून घेऊया !

आपण स्वतःचे युट्यूब चॅनल काढू शकता. यासाठी तुमच्याकडे व्हिडिओ गेम असला पाहिजे. सुरूवातीला एकाच गेमवर लक्ष केंद्रित करून तुम्ही हळूहळू यश संपादन करू शकता. हा व्यवसाय सध्या तेजीत असून, अनेक युट्यूब छाननेल्स जोरात सुरू असलेले दिसून येत आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये, ‘PewDiePie’ ह्या चॅनलला सर्वात-प्रथम क्रमांकावर लोकप्रिय म्हणून नोंदवले गेले. ह्या चॅनलला 110 मिलीयन सबस्क्राईबर्स मिळाले. यानंतर दुसरा क्रमांक एका स्पॅनिश गेमरच आहे, ज्यास 32.6 मिलीयन सबस्क्राईबर मिळाले. गेम्सच्या विविध स्पर्धा होत असतात. ह्यांच्यात भाग घेऊन आर्थिक नफा कमावता येतो. या स्पर्धांमध्ये विजेत्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे कमावता येतात.

- Advertisement -

‘गेम डेवलपर’ तसेच, ‘कॅरॅक्टर अ‍ॅनिमेटर’ म्हणून काम करू शकता. यामध्येही लाखाच्या घरात पैसे कमवण्याची संधी असते. तुमच्याकड जर प्रतिभा (creativity) असेल, तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय होऊ शकतो. डिप्लोमा इन गेम डिजाइन, प्रोफेशनल डिप्लोमा इन गेम आर्ट, डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन, गेमिंग अँड स्पेशल इफेक्ट्स, 3डी गेम कंटेंट क्रिएशन असे कितीतरी अभ्यासक्रम यात उपलब्ध आहेत. यात अनेक अवघड प्रक्रियांद्वारे गेम्स तयार करण्यात येतात. त्यामुळे यात करियरला चांगला स्कोप आहे.

– फ्रीलान्स गेम डेवलपर : ह्या क्षेत्रातही फ्रीलान्सिंगची संधी मिळू शकते. आपण कोणत्याही बंधनांशिवाय, हव्या त्या वेळी काम करू शकता आणि पैसे कमवू शकता.

- Advertisement -

– जसे जसे हे क्षेत्र अधिकाधिक प्रगत होत चालले आहे, तसे तसे काम वाढते आहे. ‘गेम टेस्टिंग’ हा आणखी एक व्यवसायाचा पर्याय तुम्ही निवडू शकता. गेम टेस्टेर्सचीही मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासोबत स्क्रिप्ट राइटर, गेम मॉडेलर, लेवल डिजायनर, गेम क्वालिटी अश्युरंस टेस्टर, आर्ट डिजायनर, लेवल स्क्रिप्टर, इंटरॅक्टिव मीडिया डिजायनर, असे नानाविध करियरचे पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. लेखन कलेत निपुण असलेल्यांसाठीही यात संधी उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे, या सगळ्या व्यवसायांमध्ये भरघोस उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे. सध्या कितीतरी तरुण या व्यवसायांमधून नफा कमावतात. त्यांच्यातीलच काही जण ह्या व्यवसायातून पैसा कसा मिळवायचा याबद्दल इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन क्लासेससुद्धा घेत आहेत. अशा रेकॉर्ड गेम ट्रेनिंगच्या माध्यमातूनही खूप कमाई होते आहे. भारताची वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी ह्या दोन्हींचे मिश्रण स्पर्धेला जन्म देते आहे. पण याच स्पर्धेमुळे जास्तीत जास्त प्रगती कशी साधता येईल याचा विचार जवळजवळ प्रत्येक जण करतो आहे. त्यामुळेच, ऑनलाइन गेमिंगसारख्या आकर्षक क्षेत्रांकडे युवकांची पावले वळत आहेत.

भारतात या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ असून त्यामुळे येथे राहणार्‍यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पण, ह्या ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या क्रेझचा फायदा सायबर अपराधी मात्र करून घेत आहेत. ऑनलाइन गेमिंगच्या सहाय्याने ते लोकांना लुटण्याचा ‘गेम’ खेळत आहेत. बाजारात येणार्‍या गेम्सचा स्तर आकर्षित करणारा असतो. सतत खेळून एका ठराविक स्तरानंतर याचे व्यसन जडल्यावर, पुढील स्तरात प्रवेशण्यासाठी यात पैसे मागितले जातात. ह्याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत. ते लोकप्रिय गेम्सच्या वेबसाईटसारखी हुबेहूब वेबसाइट बनवतात. यानंतर गेम्स खेळणार्‍यांची गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. सध्या छोट्या मुलांनाही पालकांचा डेबिट, क्रेडिट कार्डसचा नंबर माहीत असतो. तसेच, मुले सायबर गुन्ह्यांबाबत बेसावध असतात. त्यामुळे, गेमची पुढील लेव्हल खेळण्यासाठी ते ही माहिती पालकांना न सांगता शेअर करू शकतात. अशा पद्धतीने सायबर गुन्हेगार मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन नागरिकांना लुटू शकतात. तसेच, गेमिंग साईट्सवर वेगवेगळ्या पद्धतीने यूपीआय आणि लिंक्स यांच्या मदतीने लोकांना लुटतात. कधी बोनसच्या नावाखाली तसेच कॅशबॅक ऑफरच्या बहाण्यानेही लोकांना पिन टाकण्यास प्रवृत्त करून ते नागरिकांकडून त्यांच्या अकाऊंटची माहिती काढून त्याद्वारे अकाऊंट रिकामे करतात.

सायबर गुन्हेगार आता मालवेयरचा उपयोग करून गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर गेमिंग खात्यांमध्ये प्रवेश मिळवत आहेत. ब्लडीस्टीलर ट्रोजन नावाच्या मालवेयरचा ते यासाठी उपयोग करत आहेत. हा मालवेयर वापरकर्त्यांची बँकेतील खात्याची माहिती, पासवर्ड, फॉर्म, तसेच कूकीझमध्ये प्रवेश करतो. ब्लडीस्टीलर ट्रोजन मालवेयर बहुतेक गेमिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातूनच डार्क वेबवर विकली जाणारी माहिती गोळा करून लक्ष्य बनवतो. कोडनेड ब्लडीस्टीलर ट्रोजन हा ब्राऊजरवरुन कूकीज, पासवर्ड, फॉर्म, बँक कार्ड आणि पीसीवरील माहिती आणि स्क्रीनशॉट्स, तसेच, डेस्कटॉप, uTorrent, मेमोरी लोगमधील डाटा, इत्यादी चोरण्यास सक्षम असून एपिक गेम्स, जीओजी, ऑरिजिन, स्टीम, वीमवर्ल्ड, टेलिग्राम, ट्रोजन बेथेस्डा यांचा वापर करणार्‍यांचा डाटा गुन्हेगार वापरू शकतात. परंतु, हे त्यांना तेव्हाच करता येते, जेव्हा वापरकर्ते स्वतः विचार न करता अविश्वसनीय अ‍ॅप्स, किंवा फाईल्स वगैरे डाऊनलोड करतात, लिंक्सवर क्लिक करतात.

बरेच लोक गेम खेळण्यासाठी जे चीट कोड डाऊनलोड करतात, त्यात या प्रकारचा धोका असतो. त्यात धोकादायक मालवेयर असू शकतात. त्यामुळे पालकांनी व तरुणांनी सावध रहावे. त्यांनी या व्यवसायास पाठिंबा दिला आहेच, परंतु यात प्रवेश करण्याआधी, मुलांनी व पालकांनी सायबर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण, साबर गुन्हेगार हे सामान्य लोकांच्या कल्पनेपलीकडे जाऊन वेगवेगळे फंडे वापरुन ठगवण्यात सराईत आहेत. त्यामुळे सायबर तज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही हितकारक ठरेल. याप्रमाणेच, लहान मुलांकडे फोन, बँक कार्ड डिटेल्स वगैरे देताना पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ते ही गोपनीय माहिती कुठे शेअर करत नाहीत ना, याच्याकडे पालकांनी लक्ष द्यावे. गेमिंग क्षेत्रात खूप पैसे मिळतात तसेच झटपट मिळतात, म्हणून हुरळून न जाता, त्यातही लागणारे परिश्रम, संयम ह्यांचाही विचार करावा. तसेच प्रत्येक गोष्टीला जशा चांगल्या व वाईट अशा दोन बाजू असतात, तशाच गेमिंग क्षेत्रालाही आहेत. सायबर गुन्ह्यांपासून धोकेही आहेत. हे सर्व जाणून घेऊनच या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय युवकांनी घ्यावा.

–तन्मय दीक्षित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -