घरफिचर्सआत्महत्यांची सामाजिक बाजू

आत्महत्यांची सामाजिक बाजू

Subscribe

१९ व्या शतकात शेवटी एमिल डर्कहॅम या समाजशास्त्रज्ञाने आत्महत्यांमागील सामाजिक घटकांच्या भूमिकेची मांडणी केली आहे. त्याच्या पुढ्यात आत्महत्यांबाबत आश्चर्यचकीत करणारे आकडे होते. डर्कहॅम हा फ्रेंच, त्याच्या शेजारचं राष्ट्र जर्मनी, पण जर्मनीपेक्षा फ्रान्समध्ये दहापट आत्महत्या होत होत्या. इतर नागरिकांपेक्षा सैन्यातील लोकांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते आणि सैन्यात सैनिकांच्या तुलनेत अधिकार्‍यांतील आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. आणखी एक गंमत इतिहासात दिसत होती. रोमन साम्राज्य कोसळण्याच्या जरा आधी आत्महत्यांचे प्रमाण वाढलं होतं. ओटोमन साम्राज्य कोसळतानादेखील हेच दिसलं होतं. जेव्हा आर्थिक अरिष्टे कोसळली तेव्हा तेव्हा आत्महत्या वाढल्या होत्या. पण १८४८ मध्ये जेव्हा युरोपभर क्रांतीचं लोण पसरलं तेव्हा मात्र आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं होतं.

डर्कहॅमच्या लक्षात आलं की जेव्हा समाजात तुटलेपणा आला, व्यक्ती एकट्या पडल्या, त्या त्यावेळी त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. त्याला असेही जाणवले की जेव्हा जेव्हा समाजाचे व्यक्तीवरचे नियंत्रण शिथिल झाले, तेव्हा तेव्हा आत्महत्या वाढल्या. अविवाहीत, घटस्फोटीत, कुटुंब गमावलेली माणसं यांच्यात दिसणार्‍या आत्महत्यांना त्याने इगोइस्टीक आत्महत्या म्हटलं. इतरांशी तुटल्यामुळे अशी माणसे आत्महत्येकडे ढकलली जातात. अशी एकटी माणसे एखाद्या धार्मिक संप्रदायाचा भाग असतील, एखाद्या क्लबची सभासद बनतील, एखाद्या संघटनेची वा पक्षाची सभासद बनतील आणि अशा गटांमध्ये मजबूत भातृभाव असेल तर सहाजिकच एकटेपणा कमी होतो आणि आत्महत्येचा धोकादेखील. या गटातील संबंध जितके घट्ट तितकं आत्महत्येपासून संरक्षण अधिक, याचं गंमतशीर उदाहरण म्हणजे कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट या ख्रिश्चन धर्माच्या दोन संप्रदायातील आत्महत्यांचं भिन्न प्रमाण. अमेरिकेतील एका निरीक्षणात कॅथॉलिक संप्रदाय अधिक संघटित असल्यामुळे हे असल्याचं मानलं जातं. तसंच गंमतीशीर निरीक्षण कुटुंबाविषयी आहे. ज्या जोडप्यांना मुलं असतात त्या जोडप्यातील विसंवादाचं आणि आत्महत्यांचं प्रमाण कमी असतं.

- Advertisement -

१८४८ च्या युरोपच्या खंडीय क्रांतीच्या वेळी आत्महत्या का कमी झाल्या. याचं उदाहरण याच स्पष्टीकरणात आहे. यादवी युद्धामध्ये रक्तपात, मारामारी वगैरेचा ताण असला तरी लोक समान ध्येयाने एकत्र आले होते. त्यांना ध्येय्यासाठी जगायचे होते. अडचणीत देखील त्यांना एकमेकांची सोबत होती. ही सोबत हेच त्यांना आत्महत्यांपासून दूर ठेवणारे व्हॅक्सिन होते.

याच्या उलट दुसरीकडे घट्ट सामाजिक बंध असलेल्या समाजात ऑल्ट्रिस्टीक आत्महत्या हा मजेशीर प्रकार आढळतो. ऑल्ट्रिजम म्हणजे देशप्रेम किंवा समुहावरचे प्रेम. समाजाच्या भल्यासाठी बलिदान करण्याची वृत्ती, याचं क्लासिकल उदाहरण म्हणजे दुसर्‍या महायुद्धावेळी जपानी वैमानिकांनी केलेले हाराकिरी. एलटीटीइचे सुईसायडर बाँबर्स याच मनोवृत्तीतून तयार झाले होते. जिहादसाठी, धर्मासाठी, क्रांतीसाठी बलिदानाची तयारी यामुळेच होते.

- Advertisement -

डर्कहॅमला जाणवलेला दुसरा अक्ष म्हणजे समाजिक नियमनाचा, व्यक्तीगत गरजा आणि हव्यास यावर समाजाने एक मर्यादा निश्चित केलेली असते. समाजाचे त्यावर नियंत्रण असते. जेव्हा हे नियंत्रण उधळले जाते, तेव्हा अमर्याद हाव आणि ती पूर्ण करू न शकल्याचे वास्तव या आंतरविरोधामुळे माणसाला जीवन निरुपयोगी वाटू लागते. आज समाजात हेच दिसत नाही का? कामगार असो की भांडवलदार, अमर्याद हाव हीच मानवी मनाची वृत्ती सामान्यपणे दिसत नाही काय?

औद्योगिक क्रांतीने भौतिक गरजांची रेलचेल केली. एखाद्या मुघलसम्राटाच्या नशिबात नव्हत्या, त्या वस्तू आम्ही आज उपभोगतो. गंमतीने सांगायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज कधीच एअर कंडिशन्ड सोडाच, पण गरगर फिरणार्‍या फॅनखाली झोपू शकले नाहीत. विमान प्रवास सोडाच दुचाकी चालवू शकले नाहीत. पण आम्ही त्यांच्यापेक्षा आणि त्यांच्या काळातील जनतेपेक्षा अधिक सुखी झालो आहोत का?

आमच्या लहानपणी दशावतारी किंवा तत्सम पारंपरिक नाटक बघायला मौज वाटायची. आज आमच्या हातात मोबाईलवर वाटेल तो मनोरंजनाचा कार्यक्रम आम्ही पाहू शकतो. पण तरीही आज अधिक मौज करतो, असे म्हणता येईल का? पण हे केवळ नॉस्टॅल्जिक फिलींग आहे का? नाही, आजचे जीवन अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. जलद बनले आहे. निवांतपणा कमी झाला आहे. सुखसाधने भरपूर आहेत. पण त्याचा आनंद घ्यायला वेळ नाही. पूर्वी उत्पादनांचा उद्देश उपभोग होता. भात का पिकावायचा ? जेवणासाठी, आंबे का लावायचे ? खाण्यासाठी, पण आज भात भात का लावायचा ? विकण्यासाठी , आंबे का लावायचे ? विकण्यासाठी, वस्तू विकायच्या, पैसे मिळवायचे आणि दुसर्‍या वस्तू विकत घ्यायच्या. जिथून बाजारासाठी उत्पन्न होऊ लागले तिथून संदर्भ बदलले. औद्योगिक क्रांतीमुळे केवळ तंत्रज्ञान बदलले नाही तर समाजिक व्यवस्था बदलली. मार्केट हे या समाज व्यवस्थेचे अविभाज्य अंग, नफा ही या व्यवस्थेची प्रेरणा, मग अधिक नफा हे शहाणपण, पण अधिक नफा कसा मिळणार? अधिक उत्पन्न काढून, अधिक उत्पन्न काढायला हवं तर उत्पादन निर्मितीची गती वाढवायला हवी. यंत्रांची गती वाढवायला हवी. यंत्रे दिवसरात्र चालू ठेवायला हवी. पण यंत्रे आपोआप चालत नाहीत. त्यासाठी कामगार लागतात.

जिवंत कामगारांनी स्वतःला यंत्रासोबत जोडून घ्यावं लागतं. आपण एक उदाहरण घेऊ, रात्रपाळी हॉस्पीटल, रेल्वे, वाहतूक, पोलीस वगैरे अत्यावश्यक सुविधा सोडून आवश्यक नाही. रात्रंदिवस साबण बनवून, क्रिम बनवून काय देशकल्याण साधणार आहे ? पण तरीही अनेक अनावश्यक ठिकाणी रात्रपाळी असते. त्यात कंपनीला फायदा होत असला तरी त्याचा परिणाम मात्र कामगाराला शारिरीक आणि मानसिक आरोग्याचं मूल्य चुकवून भोगावा लागतो. प्रत्येक माणसाच्या शरीरात एक जैविक घड्याळ असतं. केव्हा झोप येईल, केव्हा उठायला होईल. शरीरात कोणत्यावेळी कोणते घटक तयार व्हावेत. याचं एक सुनियोजित चक्र असतं. (या जैविक घड्याळामुळे जेटलॅग जाणवतो) पण ज्यांची दर आठपंधरा दिवसांनी पाळी बदलते. त्यांच्या शरिरात या जैविक घडाळ्याचा तोल सहाजिकच ढासळतो. त्याचा कुटुंबातला, समाजातला वेळ बदलत राहिल्यामुळे तणाव निर्माण होतो. नातेसंबंधात तणाव होतो. आवश्यक झोप न मिळाल्यामुळे तो भावनिक अस्वस्थतेचा शिकार बनू शकतो.

अधिक उत्पन्न काढण्याचा ताण केवळ शारिरीक श्रम करणार्‍या कामगारावरच असतो असं नाही. उच्च पदस्थ अधिकारी, अभियंत्यांसारखे उच्च कौशल्याची कामे करणार्‍या व्यक्ती, एवढेच नव्हे तर शास्त्रज्ञ देखील या तणावाखाली आहेत. प्रा. दामोदर कोसंबी म्हणाले होते की आजचा शास्त्रज्ञ फॅराडेपेक्षा खूपच अधिक श्रीमंत जीवन जगत असला तरी त्याच्यावर पेटंट मिळवण्याजोगा शोध लावण्याचा सतत दबाव असतो. हा दबाव व्यक्तीच्या सृजनशीलतेचा आनंद हिरावून घेतो. निर्णयप्रक्रियेत स्थान नसल्यामुळे कामातला आनंद कमी होतो. त्याचा परात्मिकरण होते. सगळ्याची किंमत नफा, पैसे, परतावा, विनिमय यात मोजण्याची वृत्ती कामाच्या जागेपुरती मर्यादीत राहात नाही. जीवनातील निम्मे ते एकतृतीयांश काळ जिते जातो तिथले विचार व्यक्तीच्या भावजीवनात झिरपणं साहाजिकच असतं.

कौटुंबिक नातेसंबंधात, मुलांच्या संगोपनात ही मूल्ये झिरपतात. ही व्यवस्था केवळ अधिक उत्पन्नाचा हव्यास करून थांबत नाही. कारण केवळ अधिक उत्पन्न करून नफा वाढत नाही. उत्पन्न विकलं जायला हवं. अधिक खपायला हवं. लोकांच्या त्या नैसर्गिक गरजा नसतानाही खरेदी व्हायला हवं. म्हणजे मग कृत्रिम गरजा वाढवणं आलं. आजच्या जाहिराती, मनोरंजनाची साधनं हेच करत असतात. तुमच्या मालकीच्या अधिक वस्तू असणं हाच यशाचा निकष असल्याचं बिंबवत असतात. अधिक खरेदी करण्यासाठी , अधिक पैसा हवा. अधिक पैशांसाठी अधिक काम. पण दिवसाचे तास २४, मग अधिक तास आणणार कुठून? कौटुंबिक जीवनाला दिले जाणारे तास कमी करून जीवनाचा निवांतपणे आस्वाद घेण्याचे तास कमी करून, एवढं सगळं करून अमर्याद हव्यासाचा राक्षस शांत होऊ शकतो का? नाही, हव्यास आणि प्रत्यक्ष प्राप्ती यातील नेहमीच उरणारे अंतर व्यक्तीला फ्रस्ट्रेट करते. मी हे मिळवत नसेन तर मी नालायक आहे. माझ्याकडे अमुक एखादी वस्तू नसेल तर माझ्या मित्रांच्यात माझी किंमत झिरो होईल, असे विचार बनतात. आणि ज्या मूठभर लोकांना या सगळ्या गोष्टी मिळतात, ते तरी मनःशांती मिळवतात का? त्यांच्यावर देखील मार्केटमध्ये येणारी नवी वस्तू घेण्याचा दबाव उरतोच.

भांडवलशाही झंझावातात माणसाला उपभोग आणि प्राण्याचा उपभोग यात फरक असतो. हेच विसरायला होतं. प्राणी इंद्रियांच्या उपभोगाने समाधानी होतात. माणसाला उपभोगासाठी मनाचा निवांतपणा लागतो. त्यामुळे इंद्रिय सुख लुटल्यानंतर, ओरबाडून घेतल्यावरदेखील माणूस तृप्त नाही. स्वामी विवेकानंदांना एका श्रीमंताने म्हटले की तुम्ही संन्यास घेऊन तुमचे जीवन फुकट घालवत आहात. मी बघा जीवनाचा रसरसून अनुभव घेतोय. स्वामी म्हणाले, एखाद्याने त्याला मिळालेले फळ सालीसकट कसेतरी तोंडात कोंबण्याची घाई करावी आणि दुसर्‍याने निवांतपणे ते फळ व्यवस्थित साल सोलून त्याच्या प्रत्येक फोडीचा अस्वाद घ्यावा, यात फरक आहे.

माणूस हा कळप करून जगणारा प्राणी आहे. त्याचं जीवन सामुहिक. सहजीवनाच्या तत्वांवर बेतलंलं. त्याचे सण, उत्सव, धार्मिक कर्मकांडे सहजीवनावर आधारीत. पण आजच्या समाजव्यवस्थेने सहजीवनाच्या मूल्यांऐवजी व्यक्तीकेंद्रीत मूल्ये दिली. व्यक्तीगत महत्वाकांक्षांपुढे सामुहिक जीवन मागे टाकलं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे गर्दीत असूनही माणूस आज एकटा आहे. नात्यातला ओलावा कमी झालाय. आज ओरबाडून खाणं आहे. आस्वाद घेणं नाही. हा संस्कृतीक र्‍हास आहे. सामाजिक विघटन आहे.

हे बदलायचं असेल तर आत्महत्येची घटना ही केवळ वैयक्तिक घटना आहे असं न मानता. ती एक सामाजिक प्रक्रियेचं व्यक्त रुपदेखील आहे हे लक्षात घ्यायला हवं. ज्या सामाजिक व्यवस्थेने ही आत्मकेंद्रित मूल्ये तयार केली. ती सामाजिक व्यवस्था बदलणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी एका बाजूला राष्ट्रीय धोरण ठरवणे गरजेचे आहे तर दुसरीकडे समाजातून सामुहिक पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांची दिशा व्यक्तीकेंद्री मुल्यांऐवजी सहजीवनाची मूल्ये रुजवणारी असावीत. जीवनाच्या प्रत्येक आयामाच्या निर्णय प्रक्रियेत लोकांना आणून त्यांचे परात्मिकरण कमी करायला हवं. लोकांची सृजनशीलता मार्केटच्या दबावाखाली चिरडली जाऊ नये म्हणून प्रयत्न करायला हवेत.

कौशल्यांबरोबरच मुलांच्या भावनिक बुद्ध्यांक वाढवणारं शिक्षण द्यायला हवं. वेशभूषा, खानपान आणि अवडंबर माजवणे यालाच धर्म मानण्याऐवजी धर्म चित्तवृत्तीनिरोधः चा स्वीकार करायला हवा. संस्कृती म्हणजे केवळ कपड्यांचे, जेवणाचे, भाषा, संगीत, गाणी प्रकार नाहीत. हे लक्षात यायला हवं. विनोबा भावे यांनी संस्कृतीची व्याख्या दिली आहे. ते म्हणतात भूक लागली असता खाणं ही प्रकृती, भूक न लागतादेखील खाणं ही विकृती आणि स्वतःला भूक लागली आहे अशा वेळी उपाशी माणूस पुढ्यात येतो तेव्हा स्वतःच्या पुढ्यातील ताट भुकेल्याचा पुढ्यात सरकवणं ही संस्कृती. या व्याख्येप्रमाणे सुसंस्कृत बनायला हवं. असे व्यापक सामाजिक बदल झाले, तरच वाढलेलं आत्महत्यांचे प्रमाण प्रभावीपणे कमी करता येईल.

-डॉ. रुपेश पाटकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -