घरफिचर्सलडाखचा धडा

लडाखचा धडा

Subscribe

भारतासोबतचे आर्थिक वा इतर प्रश्न सोडवण्यासाठी सीमावाद उकरून काढणे आणि कुरबुरी घडवून आणणे हा चीनचा नेहमीचा खेळ झालेला आहे. यावेळी भारतीय सैनिकांनी तो खेळ एकदाचा संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसत आहे. कारण भारत सरकारने सैन्याला कुठल्याही कारवाईसाठी परवानगीची गरज नसल्याचे सांगून पूर्णपणे मोकळीत दिली आहे. त्यामुळे सोमवारी रात्री जे घडले त्यात आपल्या पराक्रमी २० सैनिकांना हुतात्मा व्हावे लागले हे दु:खदायक आहेच, पण त्या वीरांनी चीनचेही मोठे नुकसान केले आहे.

लडाखमध्ये मागील काही दिवसांपासून चीनच्या सैन्याने केलेल्या घुसखोरीमुळे निर्माण झालेल्या तणावाचे सोमवारी रात्री चकमकीत रुपांतर झाले. तत्पूर्वी चिनी सैन्याने अडीच किलोमीटर मागे जाण्याचा निर्णय घेतला होता व सैन्य अधिकारी स्तरावर चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आधीची करोना महामारीच्या संकटामुळे चिंतेत असणार्‍या भारतीयांना काहीसा दिलासा मिळाला होता. या महामारीमुळे भारतात आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण असल्याने भारत सरकारसह कुणालाही सीमेवर युद्ध व्हावे, याची खुमखुमी नाही. तसेच आर्थिक व सामरिक दृष्ठ्या भारतापेक्षा बलाढ्य असलेल्या चीनसोबत भारत युद्ध करू शकणार नाही, असा संदेश भारतात दूरवर पोहोचवण्यात चिनी गुप्तचर यंत्रणा यशस्वी ठरली आहे. या आधी चीनने १९६२ च्या युद्धात भारताचा पराभव केला होता व त्या युद्धातील पराभवाची सल प्रत्येक भारतीयाच्या मनात असली तरी चीनने अक्साईचीनसह गिळंकृत केलेला प्रदेश कधीही भारताला मिळू शकणार नाही, अशी भारतीयांची मानसिकता करण्यातही चीनच्या हस्तकांना यश आलेले आहे. त्यामुळे जेव्हा कधी चीनी सैन्य भारताच्या सीमेवर अतिक्रमण करते त्या त्या वेळी भारतीयांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण होते.

भारतीयांना चीनच्या या आगळिकीची चिंता वाटत असली तरीही भारतीय म्हणून आपल्या सार्वभौमत्वावर होणार्‍या घाल्याचे दु:खही वाटत असते. चीनच्या मनात येते तेव्हा चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसतात. तेथे काही दिवस थांबतात आणि चर्चेनंतर तो प्रश्न मिटला असे दोन्ही देशांकडून जाहीर केले जाते. चीनसोबतच्या या आगळिकीमध्ये केवळ झटापटी होतात, कारण १९९२ च्या करारान्वये दोन्ही बाजूंनी बंदुकीच्या गोळ्यांचा वापर करायचा नाही, असे निश्चित केले आहे. त्यामुळे चीनसोबत भारतीय सैन्याच्या कुरबुरी होत असल्या तरी तेथे हिंसा घडत नाहीत, सैनिकांना बलिदान द्यावे लागत नाही, यामुळे या दोन्ही बाजूंनी केवळ झटापटीवरच भागवले जात होते. मात्र, यावेळी भारतासह संपूर्ण जग करोना विषाणू महामारीविरोधात लढण्यात गुंतले असताना चीनने लडाखमधील गावलाण या भागात घुसखोरी करून त्यावर ताबा मिळवला. त्यामुळे भारतीय सैनिक व चिनी सैनिक यांच्यात तणाव निर्माण झाला.

- Advertisement -

भारतीय सैनिकांनी चिन्यांचा तीव्र प्रतिकार करून त्यांच्या माघारीसाठी आग्रह धरला. भारतीय सैन्य मागे हटण्यास तयार नाही व भारत सरकारही सैन्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्यामुळे चीनने त्यांचे सैन्य मागे घेण्यास सहमती दाखवली. त्यानंतर सैन्याधिकारी स्तरावर चर्चा सुरू असतानाच सोमवारी रात्री चिनी सैन्याने आपल्या २० जणांच्या तुकडीला गाफील ठेवून त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत तीन जण हुतात्मा झाले, तर उर्वरित १७ जण गंभीर जखमी झाले. मात्र, लडाखमधील तापमान निचांकी पातळीवर असल्याने दोन अधिकार्‍यांसह २० जण हुतात्मा झाल्याची बातमी भारतात पसरली. संपूर्ण जगामध्ये करोना विषाणू पोहोचवण्याची काळजी घेतलेल्या चीनने स्वत:चे आकडे कधीच जाहीर केले नाही. त्यामुळे चिनी सैन्याचे नेमके काय नुकसान झाले आहे, याची कुठलीही आकडेवारी जाहीर केली नाही. मात्र, भारतीय सैन्याने चिन्यांबरोबर अदम्य साहस आणि पराक्रमाची शर्थ करीत त्यांचे किमान ३५ जवान ठार केल्याचा अंदाज अमेरिकन लष्करी गुप्तचर संस्थांनी व्यक्त केला आहे, तर भारतीय सैन्याच्या हवाल्याने दिलेल्या बातम्यांनुसार ४५ ते ५३ चिनी सैनिक ठार झाले आहेत.

युद्ध हे कुठलेही असो ते वेदनादायी अ्रसते.. युद्धात कधीही सहभागी न झालेले लोक आपला व शत्रुच्या सैन्याने गमावलेल्या सैनिकांच्या संख्येवरून युद्धाचे यश-अपयशाचे गणित मांडत असतात. मात्र, कुणाचा भाऊ, मुलगा, पती, पिता गमावलेल्या कुटुंबाचे दु:ख कल्पनातीत असते. यामुळे युद्धामध्ये आकडे मोजण्याच्या अमानुष पद्धतीला आपल्याकडे कधीही प्रतिष्ठा मिळालेली नाही. यामुळे चीनसोबत आपल्या कुरबुरी असल्या तरी तेथे कुणाच्याही जीवावर बेतत नसल्याने चीन सोबतच्या वादाला कधीच फारचे गांभीर्याने घेतले जात नव्हते. मात्र, भारतासोबतचे आर्थिक वा इतर प्रश्न सोडवण्यासाठी सीमावाद उकरून काढणे आणि कुरबुरी घडवून आणणे हा चीनचा नेहमीचा खेळ झालेला आहे. यावेळी भारतीय सैनिकांनी तो खेळ एकदाचा संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसत आहे. कारण भारत सरकारने सैन्याला कुठल्याही कारवाईसाठी परवानगीची गरज नसल्याचे सांगून पूर्णपणे मोकळीत दिली आहे. त्यामुळे सोमवारी रात्री जे घडले त्यात आपल्या पराक्रमी २० सैनिकांना हुतात्मा व्हावे लागले हे दु:खदायक आहेच, पण त्या वीरांनी चीनचेही मोठे नुकसान केले आहे. चिनी सरकारला व सैन्याला असा प्रतिकार अपेक्षित नव्हता. त्यामुळे एकीकडे भारतीय सैनिकांचा आकडा चिनी माध्यमांमध्ये सांगणार्‍या चीनला स्वत:चे आकडे लपवण्याची कसरत करावी लागत आहे. तसेच त्यांनी अधिकृतपणे भारतसोबतचा सीमा प्रश्न चर्चेेद्वारे सोडवण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

करोना विषाणू महामारीमुळे युरोप व अमेरिकी देशांचा चीनवर रोष वाढत असताना भारताने आर्थिक पातळीवर त्याकडे एक संधी म्हणून त्याला प्रतिसाद दिला. भारताच्या या प्रयत्नांना खीळ बसवण्यासाठीच चीनने लडाख प्रांतात आगळीक केली, पण त्याचा शेवट असा होईल, हे त्यांना अपेक्षित नसावे. चीनने मागे हटण्याचे जाहीर करूनही त्यांचे सैनिक मागे जाण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांना विचारण्यास गेलेल्या एका तुकडीशीच चिन्यांनी हातापायी करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या आंगलट आला आहे. अर्थात संपूर्ण जगाला आपल्या पोलादी सत्तेच्या कवेत आणण्याचे स्वप्न बाळगणार्‍या चीनचे धोरण बदलेल, असे समजणे बाळबोध ठरणारे आहे. मात्र, चीनला हवा असलेला दबाब झुगारण्याइतकी भारताची भूमिका कणखर झालेली असल्याचा संदेश भारताच्या पराक्रमी वीरांनी यातून दिला आहे. ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. एकीकडे भारतीय सैन्य पराक्रम गाजवत असताना वीरांच्या पराक्रमाचा सन्मान करण्याचे सोडून भारतातील विरोधी पक्ष या सैन्यांच्या बलिदानाबाबत सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. सीमेवर तेही जगातील सर्वात उंच ठिकाणी झालेल्या चकमकीत काही जवानांनी बलिदान दिल्यानंतर सरकारकडून अधिकृत माहिती मिळण्याची वाट पाहण्याइतपत धीरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राहिला नाही. त्यांनी सरकारने तातडीने माहिती जाहीर करण्याचे आव्हान दिले. एवढ्या तातडीने माहिती घेऊन राहुल गाधींना नेमके काय साधायचे होते, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. विरोधी पक्षांना सरकारला प्रश्न विचारण्याचा व सरकारच्या निर्णयांची समीक्षा करण्याचा अधिकार आहे. तसा तो प्रत्येक भारतीयालाही आहे. मात्र, चीनसारख्या पाताळयंत्री शेजार्‍याविरोधात झालेल्या चकमकीनंतर एक देश म्हणून सर्व भारतीय एक आहोत, असा संदेश जगाला आणि चीनलाही जाणे गरजेचे असताना काँग्रेससह प्रादेशिक पक्षांच्या वाचाळवीरांनी याकडे सरकारला प्रश्न विचारण्याची संधी म्हणून बघितले.

सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका करण्याचा त्यांना अधिकार जरूर आहे, मात्र, त्यासाठी आधी सरकार व सैन्याकडून त्याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्याइतपत वाट बघणे आवश्यक होते. त्याऐवजी शत्रू देशाच्या मालकीच्या माध्यमांनी जाहीर केलेल्या एकांगी माहितीवर विश्वास ठेवून अपरिपक्वतेचे प्रदर्शन घडवण्यात आले हे या देशाचे दुर्दैव आहे. एरवी आपण देशाच्या सार्वभौमत्वाच्या गप्पा मारत असतो. मात्र, कुठल्याही देशाचे सार्वभौमत्व हे त्याच्या सीमांचे रक्षण किती कठोरपणे केले जाते, यावर अवलंबून असते. केवळ संसदेत व जाहीर सभांमधील भाषणांमधून सार्वभौमत्व भोगता येत नाही. त्यामुळे आपल्या सार्वभौमत्वासाठी सैन्यदलाला पूर्णपणे पाठिंबा आणि मोकळीक देणे गरजेचे असून अशा संकटाच्या घडीमध्ये त्यांची पाठराखण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, हे विसरून चालणार नाही. अन्यथा चीनसारखा पाताळयंत्री शत्रू आपल्यातील मतभिन्नतेचा फायदा उठवू शकतो, हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -