घरफिचर्सकल्पिताची करामत : व्हिन्सेंट अ‍ॅण्ड मी

कल्पिताची करामत : व्हिन्सेंट अ‍ॅण्ड मी

Subscribe

‘व्हिन्सेंट अ‍ॅण्ड मी’ या चित्रपटाचा विषय जरासा वेगळा, म्हणजे चित्रकलेशी संबंध असलेला आहे. अर्थातच केंद्रस्थानी विन्सेंट व्हॅन गॉग (गॉफ) आणि त्याची चित्रं आहेत. व्हिन्सेंट अ‍ॅन्ड मी (फ्रेंच नाव व्हिन्स्टेंट एट मोई) या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मायकेल रुब्बो. आणि निर्मिती होती नीना डेमेर्स आणि क्लॉड नेजर यांची. या चित्रपटातील व्हिन्सेंटची म्हणून दाखवण्यात आलेली चित्रे त्यांनी स्वतःच काढली होती.

कित्येकदा आपल्या मनात येतं की, असं काही झालं तर? तशी काही शक्यता नाही, हे माहीत असलं तरी असा विचार येतो खरा. आणि काही वेळा असं होतं की, कुणीतरी एखादी घटना वा अनुभव सांगतो आणि ते ऐकूण आपल्याला चक्रावल्यासारखं होतं. तो काय सांगतोय त्यावर आपला विश्वासच बसत नाही. असं होणं कसं शक्य आहे? कधीतरी असं होऊ शकतं का? असंही आपल्या मनात येतं. सांगणारा एवढ्या ठामपणं सांगत असतो की, त्याला खोटं सांगतोय असंही म्हणता येत नाही, आणि खरं म्हणावं तर तसं काही शक्य नाही, असंही वाटत असतं. आपण स्वप्नामध्येही अशा प्रकारचं काहीतरी अनुभवत असतोच की. शिवाय अनेकदा एखादी गोष्ट वाचताना अथवा नाटक, चित्रपट पाहतानाही वाटतं कारण त्यात वास्तव आणि कल्पित यांचं बेमालूम मिश्रण घडवण्यात आलेलं आपल्याला माहीत असतं. हे सारं केवळ मनोरंजनासाठीच आहे हे ठाऊक असलं, तरीही आपण त्याचा मनापासून आनंद घेतो. त्यावेळी एकदम आपल्या मनात येतं, खरंच असं काही झालं तर… खरंच किती मजा येईल!

असंच वाटायला लावणारा एक सिनेमा फ्रेंच भाषेत 1990 साली कॅनडामध्ये निर्माण करण्यात आला होता. नंतर तो इंग्रजीमध्येही (बहुधा डब करून) आला, पण त्यामुळं त्याची रंगत जरादेखील कमी झाली नाही, उलट त्याला जगभरातून चांगली दाद मिळाली होती. तो चित्रपट म्हणजे व्हिन्सेंट अ‍ॅण्ड मी. अन्य चांगल्या चित्रपटांप्रमाणंच तो कितीदा पाहिला तरी दर वेळी त्याची गोडी वाढल्यासारखंच वाटतं.

- Advertisement -

या चित्रपटाचा विषय जरासा वेगळा, म्हणजे चित्रकलेशी संबंध असलेला, आहे. अर्थातच केंद्रस्थानी विन्सेंट व्हॅन गॉग (गॉफ) आणि त्याची चित्रं आहेत. व्हिन्सेंट अ‍ॅन्ड मी (फ्रेंच नाव व्हिन्स्टेंट एट मोई) या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मायकेल रुब्बो. आणि निर्मिती होती नीना डेमेर्स आणि क्लॉड नेजर यांची. या चित्रपटातील व्हिन्सेंटची म्हणून दाखवण्यात आलेली चित्रे त्यांनी स्वतःच काढली होती. याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे यात आपण स्वतः खुद्द व्हिन्सेंट व्हॅन गॉगला पाहिलंय आहेे, असा दावा करणार्‍या जीन (जिअ‍ॅन) कॅलमेंट या महिलेने यात स्वतःचीच भूमिका केली आहे. त्यावेळी ती 114 वर्षांची होती. ती आजतागायत चित्रपटांत भूमिका केलेली सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे. आपण 1888 मध्ये गॉगला बेटलो होतो असे ती सांगते. त्यावेळी मी 12/13 वर्षाची होते असे तिने सांगितले होते. खरे तर हा चित्रपट मुलांसाठी म्हणून बनवण्यात आला आहे, तरीही तो मोठ्यांनाही खिळवून ठेवणारा आहे. तो मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या चित्रपटांच्या मालिकेतला अकरावा चित्रपट होता.

जो ही एक तेरा वर्षांची क्वेबेक येथे राहणारी मुलगी आहे आणि तिला लहानपणापासून चित्रे काढण्याची आवड आहे. त्यामुळे ती आपल्या लहानशा गावामधून शिकण्यासाठी मोठ्या शहरातील कला विद्यालयात आलेली आहे. आपला हीरो विन्सेंट व्हॅन गॉग याच्याप्रमाणंच आपल्याला चित्रे कशी काढायची ते शिकता येईल अशी तिची आशा आहे. सरावासाठी ती नित्य-नियमाने स्केचिंग, म्हणजे कच्चे रेखाटन /आरेखन करत असते. अनेकांना तिची चित्रे पाहताना ती तिनं काढलेली नसावीत असं वाटतं. तिच्या शिक्षिकेचीही तशीच समजून असते.

- Advertisement -

एक दिवस ती असेच रेखाटन करत असताना एका अनोळखी, गूढ वाटणार्‍या युरोपियन कला विक्रेत्याबरोबर तिची गाठ पडते. तिची ती चित्रे पाहून, तो तिची ती चित्रे त्याला विकत घ्यायची आहेत असे सांगतो. आपल्याला या रेखाटनांचे पैसे मिळणार या गोष्टीवर तिचा प्रथम विश्वासच बसत नाही. पण त्याच्या आग्रहाने अखेर ती आपली चित्रे विकायला तयार होते. तो खरोखरच तिच्या चित्रांना भरपूर मोबदला देतो. पैसे देतानाच तो तिला तू अशीच आणखी काही चित्रे काढ, मी तुला चांगले पैसे देऊन ती विकत घेईन, असे सांगतो. ती खुशीने त्याला तयार होते. तो तिचा निरोप घेऊन अ‍ॅमस्टरडॅमला परत जातो.

अ‍ॅमस्टरडॅमला गेल्यानंतर, ती चित्रे विन्सेंट व्हॅन गॉग यानेच काढलेली आहेत, असे सांगून त्यावर खूप कमाई करतो. त्यानंतर काही काळातच जो ला एका नियतकालिकात लहान विन्सेंट व्हॅन गॉगची चित्रे लाखो डॉलरना विकली गेल्याची बातमी दिसते आणि त्या बातमी सोबतची छायाचित्रे तिने काढलेल्या चित्रांचीच असतात. हे सारे वाचून ती थक्क होते. आपल्या चित्रांना एवढा भाव मिळावा याचे तिला आश्चर्य वाटते. ती चित्रे जो चीच आहेत हे फक्त ती आणि तिचा मित्र फेलिक्स यांनाच माहीत असते. त्यामुळे ते दोघे त्यांच्या काही मित्रांबरोबर, त्या गूढ युरोपियन कला विक्रेत्याच्या शोधात अ‍ॅमस्टरडॅमला पोहोचतात. कारण तो बनवाबनवी करत असल्याचे त्यांना कळलेले असते.

अ‍ॅमस्टरडॅमला गेल्यानंतर त्यांच्यापुढं दोन पर्याय असतात. एक म्हणजे त्या गूढ युरोपियन कलाविक्रेत्याचा शोध घेणे किंवा एकोणिसाव्या शतकातल्या विन्सेंट व्हॅन गॉगला आर्लेस येथे जाऊन गाठणे. त्यानंतर बरीच धावपळ सुरू होते. आपण कोणत्या कामासाठी आलो आहोत हे कळू नये, म्हणून या बालसेनेला खूप धावपळ करावी लागते. तरीही एकीकडे ते आपला शोध चालूच ठेवतात. त्या दरम्यानच या शोधासाठी भटकत असताना जो ला ठिकाणी काहीतरी हालचाल दिसते. तेथे कोण आहे याची उत्सुकता वाटते. तेवढ्यात एका माणसाची चाहूल लागते. ती चटकन एका झुडुपामागे लपते. आणि तेथून तिला जे काही दिसते, त्यामुळे थक्क होते. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. कारण तथे खुद्द व्हॅन गॉग चित्र रंगवताना तिला दिसतो. ती नीट निरखून पाहू लागते. आणि थोड्याच वेळात तिला जे दिसते आहे, ते खरेच आहे, याची खात्री पटते.

आपला हीरो साक्षात चित्र रंगवताना पाहून ती हरखून जाते आणि मग बाजूच्या रस्त्यानं आत जाऊन त्याची तयार होत असलेली कलाकृती पाहू लागते. तो आपले चित्र रंगवण्यातच गर्क असतो. पण काही काळात थोडं दूर जाऊन चित्र कसं तयार होत आहे, हे बघताना त्याला तिची चाहूल लागते आणि तिला पाहून आश्चर्य वाटतं. मग ती पुढे होऊन चाचरत, अडखळत त्याच्याशी थोडं बोलायचा प्रयत्न करत असते. पण काही काळातच तिचा संकोच दूर पळतो आणि ती विश्वासानं त्याच्याशी बोलू लागते. मला तुमची चित्रं आवडतात आणि त्याप्रमाणंच चित्रं काढायचा मी प्रयत्न करते. पण मला काही अडचणी येतात. तुम्ही मला तुमची धाटणी समजावून द्याल का असेही विचारते. तो म्हणतो ः तुला असं का वाटतं? त्यावर ती उत्तरते की, तुमची चित्रं बहुमोल असतात. म्हणून.

त्यावर तो हसतो. आणि हसत हसतच उगाच काहीतरी बोलून मला खूश करू नको, असं म्हणते. त्यावर ती गंभीरपणे सांगते की, मी तुम्हाला काहीतरी सांगेनच कशी? अहो, तुमच्या चित्रांना लिलावात लाखो डॉलर मिळताहेत. त्यावर तो अगदी पोट धरधरून हसायला लागतो आणि म्हणतो हे जरा अतीच होतंय हं! त्यावर ती शपथेवर मी खरं तेच सांगत आहे असं म्हणते. त्यावर तो म्हणतो पूर्वी मला कुणीही अशी रक्कम देऊ केली नव्हती. तू उगाच काहीतरी का सांगतेस? त्यावर ती म्हणते. अहो, हे एकोणीसशे नव्वद साल आहे, तुम्हाला काहीच ठाऊक नाही की काय? आता मात्र तो खरंच अचंबित होतो आणि एकदम गंभीर होतो. म्हणतो ः ते सारं जाऊ दे, तुला शिकायचंय नं? चल दाखवतो तुला. असं म्हणून तो पुन्हा चित्रफलकाकडे जाऊन रंगवायला लागतो. त्याचं रंगवणं सुरू असताना ती एकदम म्हणते, मला शिकवताय नं? लगेच तो तिच्या हातात ब्रश देऊन, ठीक आहे, कर सुरुवात असं सांगतो. ती काम सुरू करते आणि एकदम एका ठिकाणी थांबते आणि म्हणते हा प्रकार मला येत नाही, त्यावर तो तिचा हात धरून ब्रश कसा फिरवायचा ते दाखवतो. ती त्याप्रमाणं करते आणि हे बघा, असं मधेच अडखळायला होतं असं म्हणते. त्यावर तो ती रीत पुन्हा दाखवतो आणि ती त्याप्रमाणे करू लागते. हळूहळू तिला ते जमायला लागतं. तिचा चेहरा प्रफुल्लित होतो.

त्यालाही ते पाहून बरं वाटतं आणि तो तिला शाबासकी देतो. आता सूर्यास्ताची वेळ झाली, तुला घरी जायला हवं असं म्हणतो आणि तिला एक चित्र भेट देतो. ती परतते आणि घरी येऊन झोपी जाते. दुसर्‍या दिवशी उठल्यानंतर तिला ते सारं आठवतं आणि ते स्वप्न की वास्तव असा प्रश्न तिला पडतो. तोच तिची नजर बाजूला वळते आणि तिच्या पलंगाशेजारी तेच चित्र तिला दिसते. जो प्रमाणे आपणही आश्चर्याने थक्क होतो. खरे काय झालं असावं, हा प्रश्न प्रेक्षकांनीच सोडवावा किंवा केवळ एक फॅन्टसी म्हणून तिचा आस्वाद घ्यावा, असंच दिग्दर्शकाला वाटत असावं.

छोट्या जो ची भूमिका नीना पेट्रोंझिओनं फारच छान केली आहे. तशी तिचा मित्र फेलिक्सची क्रिस्टोफर फॉरेस्टनं. आणि व्हिन्सेंट व्हॅन गॉग तर अगदी खरा वाटावा असा चेकी कार्यो यानं वठवला आहे. ज्या लोकांनी गॉगला पाहिलेलं नाही, त्यांना तो म्हणजे हुबेहूब गॉगची प्रतिकृतीच वाटावी असे त्याचे सादरीकरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -