घरफिचर्सआपण किती माणूस होऊ शकलोय?

आपण किती माणूस होऊ शकलोय?

Subscribe

माणूस कितीही प्रगत झाला वा त्याने कितीही मोठे शोध लावले, विचारधारा निर्माण केल्या, तरी मूलत: माणूसही या निसर्ग रचनेतला एक पशूप्राणीच आहे. सजीवांच्या नैसर्गिक रचनेत माणसाला विचार करण्याची क्षमता अधिक असल्याने माणसाने इतर प्राण्यांपेक्षा मोठी मजल मारून निसर्गावरही मात केली आहे. निसर्गाची विविध रहस्ये हुडकून काढून नवनव्या सुविधा उभ्या केल्या आहेत. त्यातून अन्य सर्व सजीवांवर वर्चस्व प्राप्त केले आहे.

काही महिन्यांपूर्वी काश्मिरात कठुआ इथे एका बालिकेवर सामूहिक बलात्कार झाला होता. तसाच काहीसा प्रकार नंतर उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात झाला. तेव्हा जे लोक बलात्काराने चवताळून उठले होते, त्यापैकी कोणालाही आज केरळातील ख्रिश्चन धर्मीय साध्वींवरच्या बलात्काराची फिकीर नसल्याचे दिसते. त्याही महिला आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला असेल, तर तितक्याच अगत्याने या स्त्रीवादी लोकांनी हिरीरीने पुढे यायला हवे होते. पण झाडून सगळे मूग गिळून गप्प आहेत.

कारण स्वाभाविक आहे. कुठलाही बलात्कार, अत्याचार, गुन्हा हा विविध धर्म व राजकीय, जातीपाती यांच्या निकषावर ठरवला जात असतो. जर तो गुन्हा करणारा आपला बुवा असेल, तर त्याविषयी भक्तिभावाने बोलायचे असते. किंवा मौन धारण करायचे असते. तो कोणी मुल्लामौलवी असेल वा ख्रिश्चन धर्मिय फादर धर्मोपदेशक असेल, तर गप्प राहिले मग तुम्ही पुरोगामी होता. कारण त्यामुळे संघ वा हिंदूत्ववादी शक्तींना बळ मिळण्याचा धोका असतो. हे आधुनिक पुरोगामी विज्ञान आहे. कुठल्याही धर्मतत्वाचा आधार ईश्वर आणि सैतान असतात. त्यातल्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण सैतानाचे शत्रू व्हावे लागते. मग ईश्वर भले कल्याण करणारा नसला वा अत्याचार करणारा असला, तरी बेहत्तर. आपल्याकडून सैतानाला मदत होता कामा नये. तसे काही होणार असेल, तर निमूट ईश्वराचे अत्याचारही गुणगान करीत सोसायचे असतात. यात ईश्वर आणि सैतान बिचारे कुठेही येत नाहीत किंवा ते असल्याचा कुठला पुरावा अजून विज्ञानानेही दिलेला नाही. पण त्याची कुणाला गरज असते? आपण आहारी गेलेलो असलो, मग सैतानाचे शत्रू म्हणून सर्वकाही सोसायला पर्याय उरत नाही. सामान्य लोकांनी फक्त सोसायचे असते आणि ईश्वर वा सैतानाच्या दलाल प्रतिनिधींची हुकूमत निमूट मानायची असते.

- Advertisement -

सोशल मीडियापासून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍या महिला मुलींविषयी व्यक्त होणारी मते वा प्रतिक्रिया कशा ‘सभ्य’ असतात? आपल्या आवडत्या विचार भूमिकांविषयी विरुद्ध लिहिणार्‍या बोलणार्‍या महिलांची कशी गणती होत असते? तिथून हा प्रकार सोकावत जात असतो. इतक्या सहजपणे शिवीगाळ चालते, की राम कदम सुसह्य वाटावा. आताही सोशल मीडियात राम कदम यांना शिव्याशाप देताना त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांविषयी व्यक्त झालेल्या अनेक प्रतिक्रिया तितक्याच निषेध करण्यायोग्य आहेत.अगदी राम कदम यांची जीभ घसरली असे अनेक बातम्यांत म्हटलेले आहे. म्हणजे जीभ घसरली नसती आणि ते शब्द त्यांनी उच्चारले नसते, म्हणून ते महिलांचा सन्मान करतात असेच गृहीत आहे ना? मनातले ओठावर यायला वेळ लागत नाही, तशी परिस्थिती असली मग पुरते. मुद्दा अशा धारणा भावना मनात असता कामा नयेत. स्त्रियांना उपभोग्य वस्तू वा मजेचे साहित्य समजण्याची मानसिकता, अशी बेसावध क्षणी मनातून शब्द रुपाने बाहेर पडत असते. कदमच म्हणतात, प्रत्यक्ष प्रसंगी कोणी निषेध केला नाही. ही बाब सर्वात भयंकर आहे. कारण तिथे मुली महिलाही होत्या आणि स्वत:ला सभ्य म्हणवणारेही शेकडो लोक होते. पण कोणी निषेधाला पुढे सरसावला नाही. माध्यमातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि मगच निषेधाचा महापूर आलेला आहे, असेच कुठल्याही सामूहिक बलात्कार वा अपहरणानंतर घडत नसते का? तेव्हा बघे असलेलेही नंतर तावातावाने निषेधाचा सूर आळवू लागतात. पण प्रत्यक्ष घटनाप्रसंगी सगळे चिडीचूप असतात. बलात्कार होऊ दिला जातो, विनयभंग-छेड काढली जाऊ शकते. मग प्रत्येकातला श्रीकृष्ण जागा होऊन द्रौपदीला वस्त्रे पुरवण्याचे उद्योग सुरू होतात. घटनास्थळी हस्तक्षेप कोणी करायचा? राम कदमना तिथेच रोखणारा कोणी नव्हता.

माणूस कितीही प्रगत झाला वा त्याने कितीही मोठे शोध लावले, विचारधारा निर्माण केल्या, तरी मूलत: माणूसही या निसर्ग रचनेतला एक पशूप्राणीच आहे. सजीवांच्या नैसर्गिक रचनेत माणसाला विचार करण्याची क्षमता अधिक असल्याने माणसाने इतर प्राण्यांपेक्षा मोठी मजल मारून निसर्गावरही मात केली आहे. निसर्गाची विविध रहस्ये हुडकून काढून नवनव्या सुविधा उभ्या केल्या आहेत. त्यातून अन्य सर्व सजीवांवर वर्चस्व प्राप्त केले आहे. मग हे सर्व करताना जंगली मानसिकतेतून बाहेर पाडण्यासाठी विवेक व विचारांची कास धरलेली आहे. पण हजारो पिढ्यांची वाटचाल केल्यावरही माणसाला आपल्यातला पशू पूर्णपणे मारून टाकता आलेला नाही. इतर पशू प्राण्यांवर विजय मिळवताना आपल्याच अंतरंगात दडी मारून बसलेल्या श्वापदाच्या मुसक्या कायमस्वरूपी बांधून टाकण्यात माणसाला यश मिळालेले नाही. तसे झाले असते, तर कायदे व शिक्षा वगैरेची गरज भासली नसती. मानव समाजाचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासन शासन व विविध यंत्रणा उभ्या कराव्या लागल्या नसत्या. त्या कराव्या लागलेल्या आहेत. कारण माणसाने निसर्गावर कितीही मात केलेली असली, तरी त्याला आपल्या मनाचा ठाव घेता आलेला नाही. कुठल्या क्षणी मनातले दबा धरून बसलेले श्वापद उसळी मारून बाहेर येईल, त्याचा अंदाजही माणसाला अजून बांधता आलेला नाही. म्हणून विविध कायदे शस्त्रास्त्रे व चाकोर्‍या निर्माण करून माणसातील या श्वापदाला नियंत्रणाखाली ठेवावे लागते. त्याला जरा सैल स्थिती मिळाली वा किंचित चिथावणी मिळाली, तरी जंगली श्वापदाला लाजवणारी कृत्ये माणूस करीत असतो.

- Advertisement -

कुठे अशा धनप्राप्ती वा दैवी शक्ती सिद्ध करण्यासाठी नरबळी दिले जातात. रस्त्यावर एखाद्या मुलीची छेड काढली जाते वा दुबळ्या व्यक्तीला गैरलागू वागणूक मिळताना आपण बघतो. कधी तिथे हस्तक्षेप करून आपल्यातल्या माणुसकीची साक्ष देण्याची इच्छा आपल्या मनात जागते का? नसेल, तर माणुसकी कशाला म्हणायचे? कुठल्याही माणसाच्या वा जमावाच्या वागण्यातून वेगवेगळे संदेश संकेत मिळत असतात. त्यातून येऊ घातलेल्या संकटाचा इशाराही मिळत असतो. पण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून कितीसा पुढाकार घ्यायला सज्ज असतो? ज्याचे त्याचे खाजगी आयुष्य आहे, असे बोलून आपणच अंग झटकत असतो. ती स्थिती वा प्रसंग आपल्या आयुष्यात अवतरण्यापर्यंत आपण अंग झटकून टाकत असतो. अशा घटना कानी येतात तेव्हा सहानुभूती दाखवून नामानिराळे रहाण्यात दंग असतो. रिंकू पाटीलपासून निर्भयापर्यंत मागल्या पंचवीस वर्षांत त्याच अनुभवातून आपण गेलेलो नाही काय? आपण किती माणूस होऊ शकलोय?

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -